अनंताची गोष्ट आणि महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था श्रीगोंदा

अनंताची गोष्ट आणि महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था श्रीगोंदा

तारीख
-
स्थळ
Shreegonde

अनंताला कबूल केल्याप्रमाणे काल दुपारी साडेचार वाजता मी श्रीगोंदा इथं पोहोचले. पोहोचेपर्यंत विकास पाटील हा गुणी कार्यकर्ता तरुण सतत संपर्कात होताच, त्यामुळे प्रवासात कुठली अडचण येण्याचा संभवच नव्हता. पोहोचताच समोर एका पांढर्‍याशुभ्र इमारतीनं आमचं स्वागत केलं. अनंता तर समोर उभा होताच, पण त्याच्यामागे उभा असलेला, नव्हे शांतपणे बसलेला, बोलक्या डोळ्याचा विवेकानंदाचा पुतळा देखील स्वागत करत होता. ( हा सुरेख भव्य पुतळा नगरभूषण प्रमोद कांबळे या विख्यात शिल्पकार मित्राने बनवला आहे!) अनंतानं फिरून सगळा परिसर दाखवला. थोड्याच वेळात संपन्न होणार्‍या कार्यक्रमाच्या तयारीत मुलं गुंतली होती. त्यांचे कार्यक्रमाला शोभेसे पेहराव आणि मेकअप बघून त्यांच्यातला उत्साहही जाणवत होता.

महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेची ही इमारत ६ एकर जागेत उभी असून तिच्या बाजूला वनखात्याचं जंगल आहे. या जंगलामुळे पावसाळ्यात एक अनोखं निसर्गसौंदर्य न्याहाळण्याचा आनंद मिळणार आहे. समोरच्या झाडाखाली छान छान रंगीबेरंगी साड्यांमध्ये काही स्त्रिया बसलेल्या दिसल्या. माझ्या डोळ्यातला प्रश्न पाहून अनंतानं मला त्यांची ओळख करून दिली. तो म्हणाला, ताई यांच्याशी बोला. प्रत्येकीची कहाणी फार वेगळी आहे. त्या हसतमुख तरुणींच्या डोळ्यात एक वेदना जाणवली. संगीता या तरुणीपासून मी सुरुवात केली. या सगळ्या फासेपारधी स्त्रिया होत्या. संगीताचंच नव्हे तर या सगळ्याच स्त्रियांचं लग्न अतिशय लहान वयात झालं होतं. संगीता तर १० पर्यंत शिकली होती. पण तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न लगेचच एकाबरोबर लावून दिलं. नवरा दारूडा आणि मग रोजचीच मारहाण आणि धिंगाणा! त्यातच पदरात चार मुलं! दुसरी शोभा, दिसायला देखणी तिचीही तीच अवस्था! या सगळ्यांच्या बोलण्यातून त्यांचे आई-वडीलच मुलींच्या विक्रीला कसे कारणीभूत असतात ते कळलं. पोटच्या पोरीला विकताना आपलं दारिद्र्य या उपायानं मिटेल असं त्यांना वाटत असावं. आपल्या समाजातल्या चालीरीती विषयी त्या तरुणी बोलत होत्या तेव्हा त्या अघोरी रितीच्या त्या कशा बळी आहेत हे कळत होतं. दारू आणि मारहाण यांचा परिणाम मुलांवर देखील होणारच....मुलंही त्या वातावरणाप्रमाणे निर्ढावलेली बनत जाणार, शाळेत जाणार नाहीत आणि वाईट मार्गाकडे वळणार हे ठरलेलंच! अशा वेळी अनंतानं सुरू केलेली फासेपारधी मुलांसाठीची संस्था त्यांच्यासाठी मोठा आधार बनली.

अनंतानं ही संस्था सुरू केली ती या मुलांचं निरागसपण जपण्यासाठी! फासेपारधी जमातीवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का मिटवण्यासाठी त्यानं हे पाऊल उचललं होतं. या कामात त्याला साथ लाभली, आशीर्वाद मिळाला तो बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचा आणि स्नेहालयच्या गिरीश कुलकर्णी- प्राजक्ता कुलकर्णी यांचा! गिरीश कुलकर्णींचे एक स्नेही मुंबईत राहत होते. त्यांचा एक जुना वाडा श्रीगोंद्यात पडिक अवस्थेत होता. त्यांनी तो गिरीश कुलकर्णींच्या ताब्यात दिला आणि गिरीश कुलकर्णींनी तो अनंताच्या ताब्यात दिला. या वाड्याची डागडुजी अनंतानं स्वतःच्या हातानं केली. कारण पडझड झालेला, गवत उगवलेला हा वाडा ओसाड अवस्थेत होता. त्याला रंगरूप आणि आकार अनंतानं दिला. फासेपारधी मुला-मुलींना एक हक्काचं घर मिळालं. मात्र अनंताची कठीण परीक्षा संपलेली नव्हती. या मुलांना कुठलीच शिस्त आणि संस्कार नसल्यानं ही मुलं या वाड्यात कुठेही शी-शू करत. यासाठी शौचालय असतं, वगैरे त्यांना ठाऊकच नव्हतं. ही घाण अनंता स्वतः काढून साफ करत असे आणि सतत या मुलांना स्वच्छतेचे धडे देत असे. वाड्यामध्ये बांधून टाकल्यासारखं वाटत असल्यानं ही मुलं काहीच वेळात पळून जायची. त्यांना शोधून आणता आणता अनंताची दमछाक व्हायची. मुलांना आंघोळीचं महत्व पटवणं, खाण्यापिण्याची रीतभात शिकवणं, लोकांशी नम्रपणे कसं बोलायचं याची शिकवण देणं, त्यांना गावातल्या शाळेत दाखल करणं, अनाथ निराधार मुलांना त्यांचं नाव आणि पालक म्हणून आपलं नाव देणं अशा अनेक गोष्टी सुरुवातीच्या काळात अनंताला कराव्या लागल्या. कदाचित आई-वडिलांना जे जमलं नसतं, ते अनंतानं करून दाखवलं.

आज मला हे सगळं आठवत होतं, कारण मी सुरुवातीच्या काळाची साक्षीदार होते. आणि आज अनंताचे कष्ट आणि या कामाचा अहोरात्र घेतलेला ध्यास यातून ही निवासी इमारत उभी होती. ज्या स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य मातीमोल झालेलं असलं, तरी माझ्या मुलांच्या वाट्याला मात्र हे आयुष्य येऊ द्यायचं नाही या निर्धारानं उचलेलं पाऊल अनंताकडे वळलं होतं आणि अनंतानं या मुलांना आपल्या संस्थेत दाखल करून घेतलं होतं. या मुलामुलींचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. त्या आदर्श मातांचा सत्कार देखील झाला. वाड्यातली ती वळण नसलेली, केसांच्या जटाबटा झालेली झिपरी मुलं आणि आजची शहरी मुलांना लाजवतील इतका बदल झालेली मुलं मी बघत होते. अनंतानं या कामाबरोबरच गावात ग्रंथालय सुरु केलं, तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणांसाठी मार्गदर्शन करणारी अभ्यासिका निर्माण केली. गावात तीन दिवसांची व्याख्यानमाला सुरू केली. आज अनंताबरोबर विकास पाटील या तरुणासह अनेक तरुण कार्यकर्त्यांची टीम सोबत आहे. स्नेहालय, आनंदवन यासारंख्या संस्था पाठीशी उभ्या आहेत.

रोज नवी स्वप्नं उराशी बाळगणारा अनंता बघितला, तर बघणार्‍याचा विश्वास बसणार नाही इतका तो साधा आहे. असा तरुण इतकं मोठं काम उभं करू शकतो का असं कुणालाही वाटेल, पण हा साधा तरुण ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल पिंपळसुट्टी ता शिरूर जि पुणे इथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी (प्यून) म्हणून कार्यरत आहे. आपल्या पदाची आणि कामाची त्याला लाज वाटत नाही. आज गावात त्याच्याविषयी प्रत्येकाच्या डोळ्यात आदर दिसतो. अनंताला स्वतःला ही प्रतिष्ठा, हा मानसन्मान, काहीही नको आहे, त्याला फक्त समाजानं वाळीत टाकलेल्या या फासेपारधी समाजातल्या मुलामुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना उभं करायचं आहे. मी आलंच पाहिजे हा आग्रह अनंतानं धरल्यामुळेच मी या दिवसाचा सुरेख अनुभव घेऊ शकले. माझं सुरेख रेखाचित्र काढून मला भेट दिलेले कलाकार प्रशांत राऊत यांचे खूप आभार.

डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, नरेंद्र मेस्त्री, डॉ. प्रकाश शेठ, प्राध्यापक, पत्रकार आणि भेटलेले वाचक या सगळ्यांनी भेटीचा जो आनंद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार! प्राजक्ता कुलकर्णी यांच्यातलं साधेपण आणि कार्यकर्तेपण बघून मी नतमस्तक झाले. कालच्या पुणे ते श्रीगोंद्या या प्रवासात उन्हाची काहिली जाणवली नाही, कारण सोबतीला या उन्हाला पळवून लावणारे डॉ. प्रकाश शेठ, गीता भावसार आणि चंदू माझ्या सोबतीला होते! अनंताशी संपर्क करायचा असल्यास - 9404976833

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो