रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण विशेष गुणवत्ता पुरस्कार
सेनापती बापट रोडवरच्या आयसीसी टॉवर्समध्ये असलेल्या एमसीसीआयएच्या हॉलमध्ये रोटरी तर्फे दिला जाणारा पुरस्कार स्वीकारायला जायचं होतं. कधी नव्हे ते घरून निघाल्यापासून पोहोचेपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा मिळाला. जणू काही माझ्यासाठीच तो खुला ठेवण्यात आला असावा! मी वेळेच्या आधीच पोहोचले होते. आत पोहोचले आणि सगळ्या रोटेरीयननी माझं स्वागत केलं. काळा ड्रेस आणि वर क्रिम कलरचं जाकिट हा पुरुषांचा पेहराव, तर लाल सलवार ओढणी आणि पांढरा जरीवर्क केलेला कुर्ता अशा ड्रेस कोडमधल्या स्त्रीया यांची तयारीची लगबग सुरू होती. स्नॅक्सचा आस्वाद घेता घेता सगळ्यांशी ओळख झाली, तेव्हा असं लक्षात आलं की हा रोटरीचा गट काही वेगळाच आहे. यांच्यातल्या प्रत्येकाला संगीत, साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान सगळ्यांचीच आवड होती आणि अभ्यासही होता. तसच त्यांच्यातलं अगत्य आणि मोकळा स्वभाव आकर्षित करणारा होता.
आम्ही पाच पुरस्कार्थी होतो. सुयश जाधव यानं दोन हात नसताना (दिव्यांग असताना) आंतरराष्ट्रीय पातळीवर जलतरणपटू म्हणून ९३ पदकं प्राप्त केली होती. प्रदीप कदम यानं आपल्या नोकरीच्या संपूर्ण कालावधीत एकही अपघात न करता पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस सुरक्षितपणे चालवली होती. कॅप्टन गंगाराम यांनी कारगिलच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलं होतं, तर मेजर उदयन ठाकूर यांनी अतिरेक्यांचा बिमोड केला होता. पाचवी होते मी - दीपा देशमुख!
आम्हाला सकाळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. आमच्या पाचही जणांच्या मानपत्रांचं वाचन पाच रोटेरीयन स्त्री-सदस्यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजात केलं. मानपत्राचं लेखन अप्पा कुलकर्णी या साहित्यवेड्या माणसानं केलं होतं. विशेष अतिथी मोहन पालेशा हे तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असं जाणवलं. त्यांनी निदा फाजली, गुरू ठाकूर यांच्या काही ओळी उदृत केल्या. त्यांचं वक्तृत्व कमालीचं होतं.
श्रीराम पवार यांनी सध्याच्या संधीकालासारखी परिस्थिती असलेल्या अवस्थेत पाच पुरस्कार्थींबद्दल बोलताना आशेचं वातावरण दिसतं अशा शब्दांत पाचहीजणांचा गौरव केला. हे पाचही जण आज वेगळ्या तर्हेच्या युद्धालाच सामोरं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अपंगत्वावर मात करत नवनवे विक्रम करणारा सुयश हा योद्धाच असल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यात वाहन चालवणं, तेही सुरक्षित म्हणजे युद्ध जिंकल्यासारखंच असल्याचं ते म्हणाले. कॅप्टन गंगाराम आणि मेजर उदयन ठाकूर हे तर प्रत्यक्ष युद्धभूतीवर युद्ध करताहेत आणि त्यात यश मिळवताहेत. माझ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, चांगल्या साहित्यिकाचं मनात नेहमीच एक द्वंद्व/युद्ध सुरू असतं आणि त्या अस्वस्थतेतूनच एका सर्जनशील विचाराचा जन्म होतो. श्रीराम पवार यांनी मी सकाळची सन्माननीय लेखक असल्याचाही आवर्जून उल्लेख केला. याशिवाय सध्याचं आभासी जग आणि त्या विळख्यात अडकलेले आपण यावरही त्यांनी काळजी व्यक्त केली.
मी माझ्या सत्काराला उत्तर देताना माझ्या आदिवासी भागात काम करत असतानाच्या रोटरीच्या आठवणी सांगितल्या. रोटरी आंतरराष्ट्रीय पातळीवर किती देशांमध्ये काम करतेय यापेक्षा ती किती तळापर्यंत पोहोचलीय याचं मला विशेष कौतुक वाटतं असंही मी म्हटलं. वाचन संस्कृती शालेय वयोगटापासून वाढावी यासाठी माझी कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास मी तयार असल्याचं सांगितलं. तसंच माझं लिखाण हे कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यावरच आधारित आहे आणि पुढेही असेल असं सांगितलं. कला आपल्या आयुष्याला सुंदर बनवते, तर विज्ञान आपल्याला डोळस बनवून आयुष्याला दिशा देतं, सामाजिक भान आपल्याला चांगला माणूस बनायला मदत करतं असं मी म्हटलं. अर्थातच रोटरीनं जो पुरस्कार प्रदान केला, त्याबद्दल मी मनापासून आभार मानले. तसंच इतर पुरस्कार्थींचंही अभिनंदन केलं.
कार्यक्रमाचं यशस्वी सूत्रसंचालन प्रदीप कुलकर्णी यांनी केलं, तर गोविंद बहिरट, मुग्धा सातारकर, अभय सावंत यांनी प्रास्ताविक, आभार मानले. कार्यक्रमानंतर चॅनेल्सचे पत्रकार उपस्थित होते, त्यांना बाईट्स दिले आणि सगळ्यांचा निरोप घेतला. हा कार्यक्रम खरोखरंच खूप नेटका आणि देखणा झाला.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com