कोल्हापूर दौरा

कोल्हापूर दौरा

तारीख
-
स्थळ
Kolhapur

कोल्हापूर दौरा छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सीएसआयबीईआर)कोल्हापूर यांच्या सोशल वर्क विभागातर्फे दोन दिवसांची बदलती कुटुंबव्यवस्था या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वय १७ ते ६० या वयोगटातले स्त्री-पुरुष या कार्यशाळेत सहभागी झाले होते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेची कारणं, या वेगाबरोबर कसं जुळवून घ्यावं लागेल अशा अनेक मुद्दयांवर यात उहापोह झाला.

प्रभाकर भोसले यांनी थिंक पॉझिटिव्ह कट्टा कसा सुरू झाला आणि त्याचा कुटुंबव्यवस्था बळकट होण्यास कसा हातभार लागू शकतो याविषयी सांगितलं. यमाजी मालकर यानं समाधान आणि यश याविषयी बोलताना यश ही बाह्यावस्था तर समाधान ही अंर्तव्यस्था असल्याचं सांगत सगळ्यात जवळचं नातं स्त्री-पुरुष असून छोटया छोट्या कारणांनी हे मौल्यवान आयुष्य उदध्वस्त करू नये, कुटुंबाच्या नात्यातलं चैतन्य जपलं पाहिजे, ते चैतन्य हरवलं तर नातं दुरावतं हे खूप प्रभावीपणे मांडलं. निवासी सकाळ संपादक श्रीरंग गायकवाड यांनीही समारोप करताना संतांचे दाखले देत कुटुंबव्यवस्थेवर भाष्य केलं. सीएसआयबीईआर या संस्थेचा परिसर खूपच मोकळा आणि प्रसन्न होता. इथे भेटलेल्या प्राध्यापकांनी जेव्हा माझी पुस्तकं वाचली आणि त्यात काय आवडलं हे सांगितलं तेव्हा आणखीनच संवाद रंगला.

त्यानंतर मनस्पंदन फाऊंडेशन आणि फोर्थ सी’ज कौन्सिलिंग सेंटर पुणे आणि ज्येष्ठ नागरिक संघ राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉझिटिव्ह सेकंड इनिंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तरार्धात आलेलं एकाकीपण, जाणवणारी पोकळी, अनेक गोष्टींमुळे सतत वाटत राहणारी खंत अशा अनेक मुद्दयांवर संवाद घडला. वैवाहिक समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय कोल्हापूरच्या स्मिता जोशी, यमाजी, प्रभाकर आणि मी यात सहभाग घेतला होता.

खरं तर या संवादामध्ये आमच्यासह सगळेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आयुष्यात मुबलकता आल्यानं, वेग वाढल्यानं, महत्वाकांक्षा वाढल्यानं काय काय घडतं आहे याबद्दल बोलून यमाजीनं एका तराजूत करियर तर दुसर्‍या तराजूत नातं बरोबर घेऊन चाललं पाहिजे असं सांगितलं. नात्यातला गोडवा टिकून राहण्यासाठी आनंदाचे क्षण वाटले पाहिजेत हेही सांगितलं. वय वाढायला लागलं की मनुष्य भूतकाळात रमायला लागतो. त्या भूतकाळातल्या रम्य आठवणींऐवजी कटू आठवणी त्याला जास्त छळायला लागतात. मग त्या आठवणींचं उगाळणं सुरू राहतं. अशा वेळी ते झटकून कसं टाकावं, वर्तमान सुंदर कसा करावा याविषयी बोलताना मी त्यांना काही दाखले दिले. कार्यमग्न राहण्यानं काय काय सकारात्मक गोष्टी घडू शकतात तेही सांगितलं. कमीत कमी अपेक्षा कशा करता येतील याचीही काही उदाहरणं दिली. आयुष्याच्या सांजवेळी काय आठवावं याविषयीची वैभवची कविता मी सादर केली आणि थांबले.

थिंक पॉझिटिव्हच्या वतीनं अर्चना चंद्रसेन आणि विजय कोठाळेही सहभागी झाले होते. कोल्हापूरचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांच्यात अमृता जोशी, अंकोली या तरुणाईनं देखील भाग घेतला होता. मला भेटायला माझी मैत्रीण सुवर्णरेहा हिची वहिनी गौरी सूर्यवंशी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांच्याशी हितगुज झालं. माझ्यात त्यांना सुवर्णरेहा दिसत राहिली हे ऐकून खूपच भारी वाटलं. तसंच पुण्याहून आमच्या जीनियसचं इंग्रजी भाषांतर करणारी स्नेहा ही तरुणी आपल्या कोल्हापूरस्थित आईला घेऊन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली होती. मायलेकींच्या भेटीनं हा आनंद द्विगुणित झाला हेही तितकंच खरं!

प्रभाकर भोसले आमचे घनिष्ठ मित्र! चित्रकार असून त्यांचा थिंक पॉझिटिव्ह हा दिवाळीअंक खूपच गाजतो आहे. त्यांना त्याबद्दल ९ मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यातूनच त्यांना थिंक पॉझिटिव्ह कटटयाची कल्पना सुचली आणि लगेचच त्यांनी ती अमलात आणली. आयुष्यात बदल घडवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या वयोगटांसाठी सकारात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तुम्हीही जरूर या थिंक पॉझिटिव्ह कटटयात सहभागी होऊ शकता! कोल्हापूरला जाताना आणि पुण्याला परतताना झणझणीत मिसळ, कढीवडा, तांबडा-पांढरा रस्सा असे जिभेचे चोचलेही आम्ही पुरवून घेतले आणि एकमेकांची चेष्टामस्करी करत पुण्यात पोहोचलो!

दीपा देशमुख, पुणे 

कार्यक्रमाचे फोटो