तंत्रज्ञ जीनियसला विज्ञानातला पुरस्कार प्रदान!
बालगंधर्व, पुणे इथे अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे तर्फे मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या वेगवेगळ्या विभागातल्या साहित्याला पुरस्कार काल देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते संपन्न झाला. कालच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कारार्थी हे तरूणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातले होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बर्षा तोडमल या देखण्या आणि गुणी मैत्रिणीनं केलं. खरं तर काल आम्ही प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो. वर्षाशी फेसबुकवर संवाद जास्त. मला तिचं साहित्यावरचं अभ्यासपूर्ण पण तरीही सहज बोलणं खूप खूप आवडलं.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यनगरीत सोलापूर, मुंबई, औरंगाबाद इथंपासून अनेक ठिकाणांहून पुरस्कारार्थी आले होते. तंत्रज्ञ जीनियस बरोबरच इतर विभागांत म्हणजे नाटकासाठी 'माझे सर' सूर्यकांत सराफ यांना, चरित्रात्मक लिखाण- मिसाईल मॅन बद्दल एकनाथ आव्हाड यांना, बालकथा संग्रहाबद्दल आशा अरूण पाटील यांना, उमेश घेवरीकर यांना, कविता संग्रहाबद्दल कवी गणेश घुले यांना, कादंबरी लिखाणासाठी ल. सि. जाधव यांना आणि अनुवादाबद्दल मालविका आमडेकर यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सगळ्यांना भेटण्याचा आनंदही वेगळाच होता.
सभागृहात मनपाच्या शाळांमधले विद्यार्थी बालदिन साजरा करण्यासाठी जमले होते. माधुरी सहस्त्रबुद्धे आणि रेणुताईं गावस्कर यांनी कवितांमधून मुलांशी खूपच अप्रतिम असा संवाद साधला.
वेळेअभावी पुरस्कारार्थीचं मनोगत आणि मुलांशी संवाद होऊ शकला नाही.
माझी फेसबुक मैत्रीण डॉ. गिरीजा शिंदे यांनाही मी अद्याप प्रत्यक्ष भेटले नाही. आणि नेमक्या त्या पुण्यात नसल्यामुळे भेटीची संधी हुकली. माझ्या लिखाणाचं आवर्जून कौतुक करणार्या गिरीजा शिंदे यांची या कार्यक्रमाच्या वेळी आठवण येत राहिली. कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले सारंग ओक, वैजयंती ठाकूर, राहुल आणि स्वाती, बालभारतीचे श्रीधर नागरगोजे यांच्या उपस्थितीने आणि भेटीने आनंद द्विगुणित झाला.
अभिनंदन करणाऱ्या आणि शुभेच्छा देणार्या सर्वांचे आणि संस्थेचे मनःपूर्वक खूप खूप आभार!
दीपा देशमुख, पुणे.