सानियाची विद्यावाणी रेडिओवर रंगलेली मुलाखत!

सानियाची विद्यावाणी रेडिओवर रंगलेली मुलाखत!

तारीख
-
स्थळ
विद्यावाणी रेडिओ - विद्यापीठ - पुणे

सानिया मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव! आज सानियाची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि मला खूप खूप आनंद झाला. विद्यावाणीनं ही मुलाखत फेसबुकवरून लाईव्ह प्रसारित केली. अनेकांनी फोन करून आवडल्याचं कळवलं. विद्यावाणी रेडिओची कार्यक्रम निर्माती श्रीयोगी आणि टीम चं सहकार्य नेहमीच उत्साह देणारं असतं. सगळ्यांचे खूप खूप आभार!

१९६८ साली श्री साप्ताहिकात सानियाची ‘हरवलेली पाऊलवाट’ नावाची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, मौज, स्त्री, मनोहर, किर्लोस्कर, हंस, दीपावली, सा. सकाळ, मिळून सार्‍याजणी, अक्षर, अनुभव अशा अनेक नियतकालिकांमधून तिचं लिखाण प्रसिद्ध होत राहिलं. १९७९-१९८० चा काळ.....या वेळी सानिया आणि गौरी देशपांडे या लेखिकांचं लिखाण वाचकांना आवडायला लागलं होतं. स्त्रीचं स्वातंत्र्य, तिचं अस्तित्व, तिचे प्रश्‍न, तिची घालमेल असं सगळं या दोघींच्या लिखाणातून कसदारपणे वाचकांसमोर येत होतं. सानियाचं प्रत्येकच लिखाण कसदार असलं तरी त्यांच्या 'स्थलांतर' आणि 'अवकाश' या कादंबर्‍यांनी वाचकांच्या मनावर जास्त काळ राज्य केलं. 

सानियाबद्दल वाचकांच्या मनात कुतूहल खूप आहे. याचं कारण प्रसिद्धीपासून, लोकांपासून ती दूर आहे. तिला आपल्या नावामुळे आपली जात, धर्म, पंथ वगैरे गोष्टी कळायला नको होत्या. त्यामुळे लिखाण सुरू करण्याच्या काळातच तिनं स्वतःसाठी एक नाव शोधलं. तिला सानिया हे रशियन नाव सापडलं. ज्या नावावरून जातीधर्माचा कुठलाही बोध होत नव्हता. तिला ते आवडलं आणि त्या दिवसापासून आडनाव, जात, धर्म सगळं काही गळून पडलं. 

सानिया वयाच्या दहाव्या वर्षीपासून कविता करायला लागली. पण आपला पिंड कथेचा जास्त आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आली. मात्र तिच्या साठलेल्या कविता जर प्रकाशित करायच्या ठरवलं तर त्याचे अनेक कवितसंग्रह तयार होतील आणि वाचकांसाठी ती एक अनोखी भेटच असेल. सानियाच्या वडिलांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे खूप प्रवास घडला आणि तो आपल्याला समृद्ध करून गेला असं तिला वाटतं. 
आपली कथा सत्यकथा या नियतकालिकात यावी असं त्या वेळी सगळ्याच लेखकांना वाटायचं. सत्यकथाचं नाव त्या काळी खूप होतं. सानियाची कथा सत्यकथामध्ये प्रसिद्ध झाली आणि स्वतः श्रीपुंनी तिचं खूप कौतुक केलं. त्यानंतर मात्र सानियाच्या कथा आणि त्यानंतर कादंबर्‍या वाचकांसमोर सातत्यानं येत राहिल्या. 

सानियानं कथा आणि कादंबरी यांचं लिखाण करताना जाणवणारा फरक सांगितला. कथा लिहिताना नेमक्या शब्दांत बरंच काही मांडता येतं. सानियाच्या मताप्रमाणे कथा एखाद्या खिडकीसारखी असते. तिच्या लहानशा झरोक्यातून अवकाशाच्या एका तुकड्याचं दर्शन होतं. मात्र कादंबरी लिहिताना मात्र तो दीर्घ प्रवास असतो.

खरं तर सानियाची कथा असो वा कादंबरी - त्यातली पात्रं सर्वसामान्यांपेक्षा वेगळा विचार करताना दिसतात. ती आततायीपणा करत नाहीत. एखाद्या कथेतली गृहिणी देखील मोठा विचार सहजपणे सांगून जाते. तिचं आकलन, तिची इतरांकडे, इतर नात्यांकडे बघण्याची प्रगल्भ दृष्टी खूप काही सांगून जाते. लेखिकेची मूल्यं, तिची विचारपद्धती यातून आपल्याला सतत जाणवत राहते. 

सानियाचं सहलेखन केलेलं वाटा आणि मुक्काम हे पुस्तक आशा बगे, भारत सासणे, मिलिंद बोकील आणि सानिया यांनी लिहून साहित्यिक म्हणून पडणारे प्रश्‍न, विचार, स्वातंत्र्य अशा अनेक मुद्दयांना स्पर्श करत लिहिलं आहे. या चारही दिग्गज लेखकांची मैत्री खूपच घट्ट असल्याचं ती सांगते. 

सानिया बंगलोरमध्ये लिखाणाशिवाय समुदपदेशनाचं काम करत असते. तिच्यातली कुतूहल असणारी व्यक्ती तिला या कामातून अनेक माणसांशी जोडण्याचं काम करते. त्यांचे प्रश्‍न समजून घेताना तिच्या मनात अनेक कथाबीजं रुजतात. 

सानियानं कथा, कादंबरी, ललित या प्रकारांत लिखाण केलं आहे. सानियाच्या कथा असोत वा कादंबर्‍या मनोविश्‍लेषणात्मक आहेत. मानवी नात्यांचा शोध प्रामुख्यानं तिच्या लिखाणातून दिसतो. तिचं लिखाण एकांगी नसतं, तर सगळ्या बाजूंनी बघायला हवं असंच ती आपल्या लिखाणातून सूचित करते. शेवट करताना ती आपल्या वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. नात्यांमधला हळुवारपणा, तरलपणा जपत त्या त्या नात्यांमधले एक एक पदर तिच्या लिखाणातून उलगडले जातात. 

शोध, अशी वेळ, खिडक्या, दिशा घरांच्या, ओळख, बलम, प्रयाण, वलय, स्थलांतर, भूमिका, ओमियागे, अवकाश, आवर्तन, वाटा आणि मुक्काम, प्रतीती, प्रवास, पुन्हा एकदा....हे सगळं लिखाण तुम्ही वाचलं असेलच, नसेल वाचलं तर जरूर वाचावं आणि वाचक म्हणून एक समृद्ध प्रवास सानियाच्या पात्रांबरोबर करावा. 

दीपा देशमुख

२७ मार्च २०१८.

कार्यक्रमाचे फोटो