धनू,मी आणि माणसांची भाषा

धनू,मी आणि माणसांची भाषा

तारीख
-

११ मार्चला नयन, धनू आणि मी कुसगावला सकाळी सकाळी पोहोचलो. कुसगावला जाताच नयन आणि मेरी यांनी स्त्री-शिक्षण आणि स्त्री-आरोग्य यासाठी उभं केलेलं काम बघणं, त्या मुलींशी, स्त्रियांशी बोलणं, शिक्षकांची तळमळ अनुभवणं हा एक नितांत सुंदर अनुभव असतो. हाच अनुभव नयनच्या निमंत्रणामुळे पुन्हा एकदा घेता आला. या वेळी माझ्यापेक्षाही धनूचा सहभाग जास्त असणार होता. धनू येणार असल्यामुळे त्याच्या स्वागताचा बोर्ड झळकत होता.

बघता बघता आसपासच्या गावांमधल्या दहावी-बारावीच्या मुली, आरोग्याचं काम करणार्‍या तरूणी, त्यांना शिकवणारे शिक्षक असे सर्वजण येऊन पोहोचले. येण्याआधी सगळ्यांनीच धनूची भूताचा जन्म ही शॉर्ट फिल्म बघितली होती. तसंच धनूला बघताच त्यांना कट्टीबट्टीमधला आणि अलटीपलटी मधला टोपी घातलेला धनूमधला सासरा ओळखता आला. सुरुवातीला धनू आणि मी आम्ही सुबोध जावडेकरांची 'माणसांची भाषा' ही ही विज्ञानकथा वाचली. या कथेचं अभिवाचनाच्या दृष्टीनं नाट्यरुपांतर काही वर्षांपूर्वीच मी केलं होतं. आणि पहिला प्रयोग देखील एमकेसीएलमध्ये धनू आणि मी आम्ही दोघांनीच सुबोध जावडेकरांच्या उपस्थितीत केला होता. आज ही कथा सादर करताना आधीचे अनेक प्रसंग आणि त्या त्या वेळची मौज आठवली.

आमची कथा संपली आणि मुलींची चिवचिव सुरू झाली. प्रत्येकीला काहीतरी सांगायचं होतं. मग मुलींनी या कथेतलं आपल्याला काय काय आवडलं, कथेचा सार काय, डॉल्फिनची माहिती असं बरंच काही त्यांच्या बोलण्यातून आलं. आम्हाला वाटलं त्याहीपेक्षा या मुली खूपच जास्त प्रगल्भ होत्या. अर्थात त्यांना घडवण्यात आणि एक्स्पोजर देण्यात नयन आणि मेरी करत असलेले प्रयत्न महत्वाचे! आता मुली/शिक्षक सगळेच आमच्यासोबत मोकळे झाले होते. आम्ही सगळे एका मोकळ्या ऐसपैस हॉलमध्ये पोहोचलो. आता सूत्रं धनूच्या ताब्यात होती. धनूनं नाटक का करायचं, नाटक केल्यानं आपल्या व्यक्तिमत्वात काय बदल होतो, नाटक आपल्याला निरीक्षण करण्यापासून काय काय शिकवतं, नाटक करताना वाचन किती महत्वाचं आहे, देहबोलीतून माणूस कसा बोलतो, संवादातले चढउतार कसे असायला हवेत, अशा अनेक मुद्दयांना घेऊन अतिशय रंजकरीत्या दोन तास सहभागींना खिळवून ठेवलंच, पण या सगळ्यांत त्यांचाही सक्रिय सहभाग घेतला.

सुरुवातीला थोडी बुजलेली सगळीचजण हळूहळू इतकी खुलली की आता हे सत्र संपूच नये असं वाटत राहिलं. सत्र संपल्यावर सहभागींमधल्याच काहींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नयननं धनूचे खूप खूप आभार मानले. खरं तर त्या वेळी कोरोनाचं सावट पडायला नुकतीच सुरुवात झाली होती आणि आम्ही जाऊन आलो. आम्ही त्यांना पुन्हा लवकरच येऊ असं म्हटलं होतं, बघूया आता कधी आणि कसं वातावरण निवळतंय!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो