थिंक ग्लोबल फाऊंडेशनचा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृति गौरव पुरस्कार २०१६
१६ डिसेंबर २०१६ - शुक्रवार- थिंक ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीनं अच्युत गोडबोले आणि मला स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावे दिेला गेलेला पुरस्कार - याविषयी मनात खूप संमिश्र भावना होत्या. पुरस्कार म्हणजे काय, त्यासाठी आपण योग्य आहोत का, असे अनेक प्रश्न मनात गर्दी करून होते. मात्र मन म्हणालं एका खूप चांगल्या मनाच्या व्यक्तीच्या नावानं हा पुरस्कार आपल्याला मिळतोय ही खूप अभिमानाची बाब आहे. तसंच आपण तर नगण्य आहोत, पण या पुरस्कारानं पुढली वाटचाल आणखी बळ देणारी ठरत असेल तर त्याचा स्वीकार करूया आणि खूप काम करत चालत राहू या. तसंच पुरस्काराची जी रक्कम मिळेल ती कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य यासाठीच संस्थेनं उपयोगात आणावी. तिच्यावर आपण कुठलाच हक्क दाखवू नये. अच्युत गोडबोले यांनी आजपर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्काराची रक्कम अनेक चांगल्या संस्था आणि अनेक चांगली कामं यासाठीच दिलेली आहे. आपल्यालाही दुसरा मोह नाहीच. हे सगळं मनात येताच मनाची अस्वस्थता संपली.
पहाटे सहा वाजता अच्युत गोडबोले आणि मी आम्ही नगरचा प्रवास सुरू केला. नगर शहरात शिरताच प्राजक्ता (ठुबे) आणि अभिजीत (म्हस्के) या माझ्या मुलांकडे नाश्ता करण्यासाठी पोहोचलो. चविष्ट नाश्त्याबरोबरच घरातल्या दुधाचा खरवस ही खास स्वीट डीश होती. तिथून नगरचं न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या आवारात शिरलो. सागर काळे प्रवेशद्वारात स्वागताला उभा होता. आत शिरताच आमच्या दोघांचे फोटो आणि त्याखाली माहिती असे मोठे बॅनर्स बघायला मिळाले. संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता. महाविद्यालयाचा परिसरही खूपच देखणा! आत पोहोचताच महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य झावरे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, माहिती अधिकारी, पोलिस अधिकारी, लखनौ विद्यापीठातले गणितज्ज्ञ निमसे असे अनेक जण स्वागतासाठी जमले होते. सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर, मुलगी रीमा अमरापूरकर, त्यांचे भाऊ राजाभाऊ अमरापूरकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ आणि मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर असे अनेक मान्यवरही उपस्थित होते. आम्ही सगळेच सभागृहात पोहोचलो. सभागृह खचाखच भरलेला आणि बाहेरही तेवढीच गर्दी!
कार्यक्रम १० वाजून ३० मिनिटांनी सुरू झाला. एक तास सुरुवातीचा पुरस्कार वितरण सोहळा आणि इतरांची थोडक्यात भाषणं, सदाशिव अमरापूरकर यांच्या जीवन आणि कार्य यावरील संक्षिप्त फिल्म आणि नंतरच्या एका तासात विनोद शिरसाठ आमची मुलाखत घेतील असा नियोजित कार्यक्रम होता. मात्र हा कार्यक्रम लांबला आणि जवळपास चार तास सलग चालला. विशेष म्हणजे एकही विद्यार्थी वा श्रोता चुळबूळ न करता प्रतिसाद देत होता.
किरण काळे यांनी आणि त्यांच्या टीमने तयार केलेली सदाशिव अमरापूरकर यांच्यावरची संक्षिप्त फिल्म खूपच सुरेख! माझ्या डोळ्यासमोर आमच्या भेटी आठवत राहिल्या. सदाशिव अमरापूरकर यांना मी ३ ते ४ वेळा भेटली असेन. त्यांची ओळख आणि भेट ही देखील अच्युत गोडबोले यांच्यामुळेच!!! एकदा त्यांना भेटलो तेव्हा ताराशंकर बंडोपाध्याय याचं पुस्तक त्यांच्या टेबलवर दिसलं, मी झडप घालताच अमरापूरकर म्हणाले खूप चांगलं पुस्तक आहे, वाचलस का? मी नकारार्थी मान हलवली. मात्र शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या शेष्प्रश्न या पुस्तकाने मी त्या वेळी वेडी झाले होते. मी हे पुस्तक नेऊ का विचारताच अच्युत गोडबोले म्हणाले मुळीच नाही. मला तर ते पुस्तक हवंच होतं. माझा हिरमुसला चेहरा बघून त्यांनी ते पुस्तक घेवून जा अशी आनंदाने परवानगी दिली. मी त्या वेळी खजिना मिळाल्यासारखी खुश झाले होते ....
खरंच सुनंदा अमरापूरकर म्हणाल्या, त्याप्रमाणे ते जणू काही याच वातावरणात आहेत असंच वाटत राहिलं. थिंक ग्लोबल फाऊंडेशनचे किरण काळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य झावरे यांनी प्रास्ताविक आणि भूमिका स्पष्ट केली. पुरस्कार प्रदान झाला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कवडे यांनी अतिशय अप्रतिम असं मनोगत व्यक्त केलं. जीनियस मालिकेतल्या शास्त्रज्ञांविषयी त्यांनी भरभरून कौतुक केलं. देहदान, स्वच्छता आणि काही शासकीय योजनांविषयी ते आवर्जून बोलले आणि नागरिकांना तसं आवाहनही केलं. या वेळी अनेक मान्यवर बोलले. सुनंदा अमरापूरकर यांच्यासाठी हा खूपच हृद्य प्रसंग असणार होता. त्या म्हणाल्या आम्ही ५० वर्षांपासून सोबत आयुष्य काढलं. बालवर्गापासूनची आमची मैत्री! अतिशय योग्य अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातोय यासाठी त्यांनी समाधान व्यक्त केलं. किरण काळे या तरुणाचंही कौतुक केलं.
या कार्यक्रमात आम्हाला प्रदान करण्यात आलेली मानपत्रं नंदकुमार देशपांडे यांनी अतिशय नेमक्या,बोलक्या आणि ओघवत्या शब्दात तयार केली. वीणा दिघे ही संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदनाची धुरा सांभाळणारी आणि मानपत्राचं वाचन करणारी युवती अतिशय प्रसन्न आणि गोड आवाजाची तर होतीच, पण अतिशय समर्थपणे तिने आपली जबाबदारी पार पाडली.
यानंतर व्यासपीठावरचे मान्यवर प्रेक्षकात जाऊन स्थानापन्न झाले आणि व्यासपीठावरची रचना दोनच मिनिटांत बदलली गेली. तेवढ्या वेळात अच्युत गोडबोले आणि माझे बाईट्स पत्रकार आणि चॅनेल्सनी घेतले. तेवढ्या दोन मिनिटांची संधी साधून अनेक उत्साही तरुण-तरुणींनी धावत येऊन आमच्याबरोबरचे सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला.
'जीनियस आपल्या भेटीला' - मुलाखत सुरू झाली. व्यासपीठावर प्रसिद्ध शिल्पकार-चित्रकार, नगरभूषण प्रमोद कांबळे हे कॅनव्हासवर आमच्या दोघांचं चित्र चितारत होते. खूप सुरेख अनुभव होता तो. आम्ही सुरुवातीलाच आमच्या कॅनव्हासची एक प्रत प्रमोद कांबळे यांना देऊन आमचा स्नेह व्यक्त केला. मुलाखत घेणारा विनोद शिरसाठ हा साधनेचा अत्यंत उमदा, विचारी तरुण संपादक! खूप नेमके आणि महत्त्वाचे प्रश्न विचारून त्यानं आम्हाला बोलतं केलं. मुलाखतीला रंग भरला गेला तो त्यांच्या नेमक्या सूत्रधाराच्या भूमिकेमुळेच! सुरुवातीलाच आम्ही थिंक ग्लोबल फाऊंडेशनच्या कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य या कार्यासाठी आमच्या पुरस्काराची रक्कम सुपूर्त केली.
या मुलाखतीच्या वेळी अनेक गोष्टी आठवत होत्या, व्यक्तही होत होत्या. अच्युत गोडबोले यांच्या घरातलं वातावरण खूप प्रोत्साहनपर आणि त्यांच्या घरी येणार्या साहित्यिक, संगीतज्ज्ञ यांच्या सहवासामुळे त्यांची जडणघडण त्यांनी सांगितली. मला मात्र केवळ मुलगी असल्यानं नाटकापासून ते गॅदरिंग वा इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आठवत होता. सातच्या आत ऐवजी सहाच्या आत घरात असंच वातावरण होतं. आज मनात कोणाचाही राग नाही. ते जसे घडले, आपल्या बहिणीची काळजी म्हणूनही कदाचित तसं वागले असतील. पण त्या पुढल्या वाटचालीत भेटलेली अनेक चांगली माणसं आणि त्यांच्यामुळे आयुष्याला मिळत गेलेली दिशा खूप मोलाची ठरली. या सगळ्यांचंच ऋण व्यक्त करावं वाटलं. विद्या बाळ, आशा साठे, गीताली, विजया चौहान, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, डॉ. अभय-राणी बंग, मेधा पाटकर, अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, मुक्ता मनोहर.......किती किती नावं चित्रफितीसारखी झर्रकन डोळ्यासमोरून गेली. या प्रवासानं किती किती जिवलग मित्र-मैत्रिणी दिले! प्राजक्ता-अभिजीतसारखी मोजता येणार नाहीत इतकी मुलं-मुली दिली!
आपल्या आयुष्यातलं कलेचं स्थान आणि महत्त्व अधोरेखित करत, सुपरहिरो, कॅनव्हास आणि जीनियसवरही श्रोत्यांशी संवाद साधता आला. पुस्तकांची लेखन प्रक्रिया, त्यातले किस्से आणि स्वतःला त्यातून मिळत गेलेलं समृद्धपण हे सगळं व्यक्त करता आलं. अच्युत गोडबोले यांच्यामुळे इंग्रजी वाचन वाढलं, दृष्टिकोन व्यापक बनला आणि हाडाचा शिक्षक, प्रोत्साहन देणारा शिक्षक कसा असतो हे अनुभवता आलं. या लेखनप्रवासात मनोविकासचे अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर यांच्याशी तर कुटुंब म्हणूनच नातं जोडलं गेलं.
अच्युत गोडबोले यांनी या वेळी माझ्याविषयी खूप भरभरून कौतुक केलं. दीपाचं अनेक वर्षांपासूनचं लिखाणातलं योगदान, त्यामुळे लिखाणाची एकसारखी झालेली शैली, दीपाचा सिंहाचा वाटा आणि लिखाण चांगलं झालं असेल तर केवळ दीपामुळेच अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रम अतिशय चांगला झाला. त्यानंतर कितीतरी वेळ तरुण-तरुणींची स्वाक्षरी आणि फोटोसाठी उडालेली झुंबड, त्यांच्या हातातली आमची पुस्तकं - आम्हाला सुखावत राहिली. नगरमधल्या अशोक-मीनल काळे या अतिशय गोड, उत्साही वास्तुशिल्पींनी पुणे गेस्ट हाऊसच्या देखण्या परिसरात आम्हाला जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. या सगळ्यांत एन. डी. कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता. तिथे पोहोचताच सुनंदा अमरापूरकर यांनी मायेनं जवळ घेऊन मारलेली मिठी आणि तो स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला भेट देणं हा तर नितांत सुंदर अनुभव होता. एक एक चित्र आणि ती भव्य शिल्पं बघून डोळ्याचं पारणं फिटलं. दोघंही पती-पत्नी खूप उत्साहानं सगळंकाही दाखवत होते, त्याविषयी बोलत होते. त्यांनी आम्हाला स्वतः केलेलं शिल्प भेट दिलं, तेव्हा तर आम्हाला खूप भरून आलं. थँक्स प्रमोदजी!
थिंक ग्लोबल फाऊंडेशन (मंगल काळे, गुलाबराव काळे, किरण-स्नेहल, सागर-कोमल, राजवर्धन, सिद्धांत) आणि संपूर्ण टीमशी नातं जोडलं गेलंय ते आता कायमचंच - त्यांचा स्नेह बरोबर घेऊन आम्ही तृप्त मनानं पुण्याला परतलो!
दीपा देशमुख
१६ डिसेंबर २०१६.