एच. यू. गुगळे प्रोडक्शन्स निर्मित - एक खोड तीन फांद्या

एच. यू. गुगळे प्रोडक्शन्स निर्मित - एक खोड तीन फांद्या

तारीख
-
स्थळ
Nagar

२५ डिसेंबरला सर्वत्र नाताळ साजरा होत असताना नगरमधल्या केडगाव इथे स्वीट होममध्ये ‘एक खोड तीन फांद्या’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होणार होतं. नगरला जाताना विनया देसाईच्या रुपानं काल नाताळच्या सँतानं मला एक छानशी मैत्रीण भेट दिली. विनया दिसायला देखणी, प्रसन्न व्यक्तिमत्वाची, बुद्धिमान आणि मनमिळाऊ स्वभावाची! पाचच मिनिटांत तिनं मला आपलंसं केलं. त्यातच बोरं, हरभरा अशा अनेक आवडी सारख्या निघाल्यामुळे तर ‘दो जिस्म एक जान है हम’ वगैरेसारखी गाणी मन गाऊ लागलं..... नगरला म्हणजेच केडगावला स्नेहालयाच्या स्नेहाकुंर शाखेत आम्ही पोहोचलो. इथल्या गेस्ट हाऊसमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली होती.

स्नेहांकुरमध्ये पाळण्यात इवलाली बाळं झोका घेत पहुडताना आणि दोन ते तीन वर्षांची मुलं-मुली बागडताना दिसली. स्नेहांकुरची इमारत रोडनजीक, स्वच्छ, टुमदार अशी असून मुनोत पती-पत्नी यांनी ही जागा स्नेहांकुर प्रकल्पासाठी भेट दिली. ही जागा रस्त्याला म्हणजेच हायवेला लागून असल्यानं हिची आज काय किंमत असू शकते हे वेगळं सांगायला नकोच. पण एका चांगल्या कामासाठी मुनोत यांनी ती स्नेहालयला भेट द्यावी यात स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी यांचं निरपेक्ष काम आणि मुनोत कुटुंबीयांचा मानवतवावादी दृष्टिकोन बघायला मिळतो. प्रत्येक बाळामागे एक आया सांभाळायला दिसली. इथलं एकूणच वातावरण रूक्ष कोरडं नव्हतं, तर आपुलकी आणि स्नेह घेऊन इथे काम करणारी मंडळी वावरताना दिसली. बाळासाहेब यांनी मला आणि विनयाला स्नेहांकुर प्रकल्पाची सगळी माहिती तर दिलीच, पण आमच्याबरोबर फिरून तिथल्या सगळ्या व्यवस्था दाखवल्या.

या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणार्‍यांपैकी संजय गुगळे हे नाव महत्त्वाचं! गिरीश कुलकर्णी आणि स्नेहालय यांना आपल्याच कुटुंबाचा भाग मानणारं गुगळे कुटुंबीयाचं दर्शनही मला इथं झालं. विनया आणि मी बरोबर सहा वाजता स्वीट होम मध्ये पोहोचलो. सगळा परिसर छानशा पोशाखांनी नटलेल्या स्त्री-पुरुषांनी गजबजून गेला होता. खूपच उत्साहाचं वातावरण होतं. कडाक्याची थंडी असतानाही या मोकळ्या लॉनवर कोळशाच्या शेगडीसारखी ऊबदार व्यवस्था करण्यात आली होती. स्वीटहोमचा परिसर बघता बघता शेकडो खुर्च्यांनी भरून गेला आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली.

कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी विनया खास पुण्याहून आली होती. तसा गिरीश कुलकर्णींचा तिला आग्रहवजा आदेशच होता. विनयाचं निवेदन अतिशय ओघवतं, रसाळ आणि अतिशय स्नेहपूर्ण आवाजातलं होतं. तिच्या निवेदनातून कार्यक्रम पुढे सरकत होता. ८५ वर्षांच्या सदाबाई गुगळे यांचं आत्मकथन डॉ. दया अतुल जेठे या तरुणीनं अतिशय सुरेख रीतीनं शब्दबद्ध केलं होतं. मनोगत व्यक्त करणार्‍या सावळ्याशा दयाकडे मी बघत होते. अतिशय साधी पण तरतरीत अशी ही तरुणी! विनयाकडून मला कळलं की अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून दया शिकत इथंपर्यंत येऊन पोहोचली. लोकांकडे काम कर, कंदिलाच्या मिणमिणत्या दिव्यात अभ्यास कर, अनेकदा उपाशीपोटी राहत वाटचाल करणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर भूतकाळाच्या त्या कष्टमय प्रवासाचं जराही सावट नव्हतं. दयानं लग्न करतानाही सगळ्या झगमगाटाला नाकारून स्नेहालय संस्थेत आपलं लग्न साजरं केलं. उंचीला फार तर माझ्याएवढी असलेली दया बघता बघता माझ्यापेक्षा कितीतरी उंच होत गेली आणि आभाळाला टेकलेली मला भासली.

'एक खोड तीन फांद्या’ या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. मला या गोष्टीचा अतिशय आनंद झाला. याचं कारण ८५ वर्षांची सदाबाई हिनं आपल्या आयुष्यात अनेक चढउतार बघितले, पण न डगमगता, परिस्थितीपुढे न हारता तिनं शून्यातून जग निर्माण केलं. आपल्या नवर्‍याला तिनं दिलेली साथ, आपली मूल्य आणि सचोटी बरोबर घेऊन मुलांवर केलेलं संस्कार....बदलत्या काळाप्रमाणे स्वीकारलेले चांगले बदल.... अशा सदाबाईसारख्या स्त्रीच्या आत्मकथनाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं ही माझ्यासाठी खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट होती. सदाबाईंची तीन मुलं - रमेश, दिलीप आणि संजय आज आपापल्या व्यवसायात स्थिर आहेत, समाजात, शहरात चांगलं नाव कमवून आहेत. सदाबाईंच्या तिन्ही सुना स्वभावानं वेगवेगळ्या मात्र आपल्या सासूकडून अनेक गोष्टी शिकून तयार झाल्या आहेत. आपल्या सासूवर त्यांचं किती प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून कळतं. अशी सासू आणि अशा सुना बघायला मिळणं खरंच विरळा!

खरं तर ‘एक खोड तीन फांद्या’ या पुस्तकात सदाबाई यांचा प्रवास वाचक म्हणून आपणही करत राहतो.....वास्तव स्वीकारणं, सुनेला जेवताना काहीच न उरणं यातही खंत न बाळगणारी सकारात्मक विचारांची सदाबाईमधली स्त्री पावलोपावली आपल्याला भेटते. त्यावर नवर्‍यानं उशिरा घरी येऊन तिला जेवणासाठी केलेली सोबत .... नवराबायकोमधलं उत्कट नातं आपणही अनुभवतो. बालवयातल्या एका मुलीच्या वयातले प्रत्येक टप्पे इथं आहेत....सून ते सासू हा प्रवासही करताना किती खंबीरपणे, मूल्यांना बरोबर घेऊन घराची एकात्मकता सांभाळून केलाय हे कळतं. स्वतःच्या चुकाही मान्य केल्या आहेत. त्याबद्दलची लागलेली टोचणी फळं न खाऊन, पेढा न खाऊन व्यक्त होताना अनेक प्रसंगांमधून दिसते. नवर्‍याच्या पाठीशी खंबीर राहणारी एक स्वाभिमानी स्त्री सदाबाईच्या रूपात भेटते. नवर्‍याचा आकस्मिक मृत्यू पचवून तितक्याच ताकदीनं ही स्त्री मुलांपाठी उभी राहते. मात्र त्याच वेळी सुनेच्या मृत्यूनं काही क्षण कोसळून पडते. जुन्या चालीरीती मोडीत काढत ती आपल्या मुलाचा पुनर्विवाह करून देते. हे सगळं करण्यासाठी खूप धाडस लागतं. ते सदाबाईंनी त्या त्या वेळी दाखवलं आहे. त्या काळाच्या पटावर जाऊन बघितलं तर त्या वेळी असा विचार कोणाच्या मनाला शिवत देखील नसे, तो विचार सदाबाईंनी अमंलात आणला.

हे गुगळे कुटुंब म्हणजे राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटासारखं ‘हम साथ साथ है’ आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब हे फक्त चित्रपटातून, तेही चांगलं हसतं खेळतं कुटुंब बघायचं असेल तर राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटांमधूनच बघायला मिळतं. मी मात्र ते गुगळे कुटुंबात प्रत्यक्ष अनुभवलं. मुलं, सुना, नातवंड सगळी सदाबाईला घट्ट चिटकून आहेत. या सगळ्यांमधलं प्रेम त्यांच्या डोळ्यांमधून, त्यांच्या कृतीमधून जाणवतं. सदाबाई आणि हरकचंदजी या नवराबायकोचं नातं इतकं उत्कट की मला या नात्यात लुई पाश्चर आणि मेरी दिसले .....मला या नात्यात मेरी क्युरी आणि प्येर क्युरी दिसले.....आपल्या बायकोला भेळ खाऊ घालणारे हरकचंदजी आणि त्या साध्या भेळनं आनंदित होणारी सदाबाई....माझ्या डोळ्यांपुढून सरकतच नव्हते. या पुस्तकातल्या आधारवडाचं खोलवर रुजलेलं मूळ हे हरकचंदजी असून भरभक्कम खोड सदाबाई आहेत. याच्या विस्तारलेल्या शाखा तीन मुलांच्या, सुनांच्या आणि नातवंडांच्या रुपात दिसतात. आजच्या चंगळवादी जगात माणुसकीची मूल्य जपणार्‍या माणसांची, सामाजिक भान जपणाऱ्या विचारांची, प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची खूप खूप आवश्यकता आहे.

या कार्यक्रमात गुगळे कुटुंबीयांनी उपस्थित स्नेहीजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्राध्यापक शेलार यांचंही मनोगत खूपच विचार करायला लावणारं होतं. सदाबाईंना विनयानं मोठ्या खुबीनं बोलतं केलं होतं. सदाबाईची नातसून आणि नात यांनी या पुस्तकातल्या काही निवडक उतार्‍यांचं वाचन अतिशय अप्रतिमरीत्या केलं. सगळ्या उपस्थितांसाठी गुगळे कुटुंबीयांच्या वतीनं जेवणाची आणि मसालेदार दूधाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात फुलांचे गुच्छ, भेटवस्तू सगळ्यांना फाटा देण्यात आला होता. याच वेळी गुगळे कुटुंबीयांनी या पुस्तक प्रकाशनाचं औचित्य साधून स्वतः एक लाख एक रूपये स्नेहालयाला देणगीदाखल दिले. मला भेटायला किरण आला होता. अगदी अल्प वेळ झालेली ही भेट आनंद देऊन गेली. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्याशी देखील एक वेगळ्याच स्नेहात मी बांधली गेले आहे. त्यांना भेटून खूप बरं वाटलं. अनेक संकटं येऊन पुन्हा पुन्हा उभा राहणारा हा माणूस मला अनेक कठीण प्रसंगात बळ देऊन जातो.

गिरीश कुलकर्णींची आणि प्राजक्ता यांची भेट झालीच. गिरीशसारखा विनम्र माणूस मी अद्यापपर्यंत बघितला नाही. कुठल्याही कामाचं श्रेय स्वतःकडे न घेणारा, पुढे न येणारा हा माणूस माझ्यासाठी आदर्शव्रत आहे. ८५ वर्षांच्या उत्साही सदाबाईंनी पुन्हा घरी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण मला दिलं आहे. या समारंभानं मला खूप काही दिलं. तो सगळा साठा गुगळे कुटुंबीयांकडून घेऊन मी आणि विनया आपल्या मैत्रीची गाठ पक्की करत पुण्यात परतलो - मात्र गुगळे कुटुंबीयाचं डवरलेलं झाड मनात घेऊन!

दीपा देशमुख, पुणे

deepadeshmukh7@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो