वीणा गवाणकर -  मुलाखत 

वीणा गवाणकर -  मुलाखत 

तारीख
स्थळ
पुणे

माय मराठी महाराष्ट्र संघ आणि इनरव्हिल क्लब ऑफ पुणे इम्पिरियल यांच्या संयुक्त विद्यमाने वीणाताईंची मुलाखत आज सायंकाळी पाच वाजता झूमवर आयोजित करण्यात आली होती. आदल्या दिवशी, रात्री मला आयोजकांतर्फे हेमा भूमकर यांचा फोन आला आणि तुम्ही वीणा गवाणकर यांची मुलाखत घ्याल का असं विचारलं, त्या वेळी मी ताबडतोब होकार दिला. वीणाताईंशी संवाद साधायला कोणाला नाही आवडणार? मात्र होकार दिल्यानंतर थोडासा ताणही आला. कारण आपण ज्यांना मानतो, ज्यांचा आदर करतो, त्यांच्याशी बोलताना काही कमीजास्त झालं तर, आपण वेळेवर ब्लँक झालो तर, असे अनेक विचार मनात येऊ लागले. पण नंतर वीणाताईंची छबी आणि त्यांच्या याआधीच्या भेटी आठवताच तो ताण क्षणार्धात दूर झाला.

पाच ते साडेपाच ईशस्तवन, प्रास्ताविक, परिचय वगैरे गोष्टींमध्ये गेला. ईशस्तवन अणि वीणाताईंसाठी रचलेली कविता खूपच श्रवणीय होती. प्रिया निभोजकर यांनी अतिशय सुरेख रीतीनं आजच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी पार पाडली. त्यांचं बोलणं ऐकत राहण्यासारखं आहे. आयोजकांपैकी हेमा भूमकर यांनीही आपल्या मनोगतातून वीणाताईंविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

मुलाखतीची सूत्र माझ्या हातात येताच, मी म्हटलं, ‘आता करून दिलेल्या परिचयापेक्षाही वीणाताईंचा शब्दापलीकडला परिचय आणखीनच वेगळा आहे. परभणीला वेध  उपक्रमात  डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वीणाताईंना विचारलं होतं, की तुमच्या सगळ्या चरित्र नायक/नायिका यांच्यामध्ये तुम्हाला कुठलं साम्य दिसतं? त्या वेळी वीणाताई म्हणाल्या होत्या, या सगळ्यांमध्ये साधेपण आहे, प्रामाणिकपणा आहे, अखंड धडपड आहे, अभ्यासूपणा आहे, ते आपल्या मूल्यांशी तडजोड करत नाहीत, आणि ही सगळी त्यांची मूल्यं मला खूप आवडतात.‘ मलाही वीणाताईंमध्ये हे सगळेच गुण दिसतात. त्या साध्या आहेतच, त्या अभ्यासू आहेत, त्यांची अखंड धडपड सुरू असते आणि त्याही आपल्या मूल्यांशी कधी तडजोड करताना दिसत नाहीत. ज्या वेळी इंटरनेटची सुविधा नव्हती, मोबाईल फोन्स नव्हते, त्या काळात वीणाताईंनी हाती घेतलेलं लिखाणाचं व्रत आजही अविरत सुरू आहे आणि त्यांच्यातल्या संशोधक आणि परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे.’

वीणाताई ज्या वेळी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करत होत्या, त्या वेळी त्यांनी तिथली खूप मोठ्या संख्येत असलेली ग्रंथसंपदा चक्क वाचून काढली. मराठी माध्यमातून शिकलेल्या वीणाताईंनी इंग्रजीतल्या पुस्तकांची धास्ती बाळगली नाही. त्यांच्या वाचनातूनच एके दिवशी त्यांना काही लिहावं वाटलं आणि त्यातूनच ‘एक होता कार्व्हर’चा जन्म झाला.
खरं तर कार्व्हरचं नाव घेतलं की वीणाताई डोळ्यासमोर येतात आणि वीणाताईचं नाव घेतलं की काव्हर्र समोर येऊन उभा राहतो, असं हे दोघांमधलं नातं घट्ट विणलं गेलंय.
वीणाताईंनी आज कार्व्हर, सालिम अली, विलासराव साळुंखे, रॉबी डिसिल्वा, डॉ. खानखोजे, रेमंड डिटमार्ट यांच्याविषयी  सांगितलं. याबद्दल मी जास्त लिहिणार नाही कारण वीणाताईंची ही सगळी पुस्तकं तुम्ही जरूर विकत घ्यावीत आणि ती वाचावीत असं मला वाटतं.

डॉ. आयडा स्कडर, रोझलिंड फ्रँकलिन, गोल्डा मेयर आणि लीझ माईट्नर या स्त्रियांचं कर्तृत्व, त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा आणि तरीही त्यांनी केलेलं नेत्रदीपक काम याविषयी मी विचारत वेळेची मर्यादा लक्षात घेवून प्रश्नांना आवरतं घेतलं. 15 वेळा नोबेलसाठी नामांकन झालेली लीझ माईट्नर हिच्याविषयी बोलताना मी वीणाताईंकडे बघत होते. या सगळ्या नायिका त्यांच्या आसपासच असून त्या त्यांच्या सख्यासोबती आहेत असं मला जाणवलं. ज्या तळमळीनं त्या बोलत होत्या, ती तळमळ आज सहभागी असलेल्या प्रत्येक शिक्षकानं घ्यावी असंही मला वाटलं.

आज वीणाताईंना बघून राज्याच्या कानाकोपर्‍यातून सहभागी झालेले शिक्षक अक्षरश: भारावून गेले होते. वीणाताईंना ऐकून कृतकृत्य झालो असं त्यांना वाटतं होतं. आपण कार्व्हर वाचलं, आपल्या मुलीनंही काव्हर्र वाचलं, आपण आपल्या घरात ज्ञानेश्वरी शेजारी कार्व्हर ठेवलंय,  असं अभिमानानं पालक सांगत होते, पालक, शिक्षक आणि आयोजक सगळ्यांनाच आजचं सत्र ‘कळस गाठलेलं सत्र’ वाटत होतं आणि याचं कारणच होतं आजच्या मुख्य विदुषी - वीणा गवाणकर.

मुलाखतीनंतर जवळजवळ एक तास सहभागींचे प्रश्न आणि मनोगत यांच्यात रंगला. 

शेवट करताना मी म्हटलं, वीणाताई म्हणतात, अंधाराला दोष देण्यापेक्षा एक मेनबत्ती लावावी आणि पुढे जावं. मला वीणाताईंचं हे वाक्य खूप आवडलं. वीणाताईंच्या कार्व्हरपासून सुरू झालेल्या लेखनप्रवासानं अख्खा मार्ग लख्ख करून उजळवला आहे. या वाटेवरून आज आम्ही चालताना आणखीनच समृद्घ होत आहोत.
वीणाताई, तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.

(आजच्या या कार्यक्रमात दिल्लीहून माझे उच्चपदस्थ अधिकारी मित्र प्रफुल्ल पाठक, पुण्याहून वृषाली वांजरीकर हे आवर्जून सहभागी झाले होते, त्यांचे मन:पूर्वक आभार.)

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो