कऱ्हाड कल्पना चावला विज्ञान केंद्र

कऱ्हाड कल्पना चावला विज्ञान केंद्र

तारीख
-
स्थळ
Karhad

९ आणि १० जानेवारी असं कऱ्हाड जवळ ९ तारखेला धारेवाडी आणि १० तारखेला सकाळी कऱ्हाड इथं कल्पना चावला विज्ञान केंद्र इथे आमचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या प्रवासाची व्यवस्था सारंग ओंक या विज्ञानवेडया तरुणानं केली होती. आम्ही साताऱ्याजवळ पोहोचताच आम्हाला मामाची आठवण आली. मामा याचं नाव रमेश वेलणकर. वय वर्ष ७५ !!! अतिशय प्रेमळ आणि निरागस माणूस!! आमचे ते मामाच आहेत. मामाला २००० च्या वर हिंदी गाणी आजही तोंडपाठ आहेत. त्या गाण्यामागचा इतिहासही त्याला ठाऊक असतो. संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज लोकांशी स्नेहाचं नातं आहे. जराही अहंकार नसलेला आमचा मामा - त्याला भेटल्यावर मामा गाणं असं म्हटलं की कुठलेही आढेवेढे न घेता सांगाल ते गाणं सुरेल आवाजात गायला सुरु करतो. त्याचं गाणं MUSIC सह असतं. हे संगीतही त्याच्याच तोंडून बाहेर पडत. कुठलेही INSTRUMENTS त्याला लागत नाहीत. वयाची ७५ ओलांडलेला मामा - पण त्याचा आवाज जराही बेसूर होत नाही आणि गाण्याचे शब्दही त्याला कधी दगा देत नाहीत.

सातारा जवळ येताच मामाला फोन करताच मामा धावत आम्हाला भेटायला HIGHWAY ला आला. मधुमती मधलं माझं आवडतं गाणं त्याने लगेच गायला सुरुवात केली. हॉटेल मधले वेटर, इतर लोक स्तब्ध होऊन ऐकत राहिले .... टूटे हुए ख़्वाबों ने हम को ये सिखाया है दिल ने जिसे पाया था, आँखों ने गवाया है हम ढूँढते है उनको, जो मिल के नहीं मिलते रूठे है ना जाने क्यों, मेहमान वो मेरे दिल के क्या अपनी तमन्ना थी, क्या सामने आया है लौट आयी सदा मेरी, टकरा के सितारों से उजड़ी हुयी दुनियाँ के, सुनसान किनारों से पर अब ये तड़पना भी कुछ काम ना आया है मामा मात्र गाणं गाताना पूर्णपणे आपल्याच तंद्रीत असतो. मामाची भेट म्हणजे संगीतमय सुहानी सफर असते. मामाला लवकर पुन्हा भेटण्याचा वायदा करून आम्ही धारेवाडी च्या डोंगरावर पोचलो.

शिवम प्रतिष्ठानच्या वतीने युवांसाठी शिबीर आयोजित केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातून जमलेले ५००० तरुण तरुणी जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधताना आम्ही अक्षरशः भारावून गेलो. त्यानंतर विश्वंभर चौधरी या पर्यावरण आणि अर्थकारण यावर काम करणाऱ्या तज्ञ व्यक्तीचं अतिशय स्पष्ट आणि परखड विचार व्यक्त करणारं व्याख्यान आम्ही ऐकलं आणि नंतर काही वेळ गप्पाही मारल्या. त्याच सायंकाळी विज्ञान केंद्रातल्या चिन्मय, स्मिता आणि इतर तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर आवाजात गाणी गायली. त्या गाण्याचे सूर रात्रभर मनाला वेढून टाकत राहिले.

दुसर्या दिवशी सकाळी कल्पना चावला विज्ञान केंद्रात विज्ञान्वेड्या मुलांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी गप्पा मारण्यासाठी आम्ही पोचलो असता कऱ्हाड पासून १५ किमी, ३० किमी ते ५० किमी अंतरावरून आलेली मुले आम्हाला भेटली. ही मुले त्यांची प्रत्येक रविवारची सुट्टी या विज्ञान केद्रात काही शिकण्यासाठी घालवतात. हे विज्ञान केंद्र संजय पुजारी नावाचे शिक्षक चालवतात. आपलं आयुष्य विज्ञानासाठी वेचणारा माणूस म्हणूनच त्याची ओळख करून द्यावी लागेल. संपूर्ण विज्ञान केंद्र वैज्ञानिक आणि वैज्ञानिक साहित्य यांनी भरलेलं होतं. तिथे अर्थातच जीनियस ची १२ पुस्तकं ऐटीत आपली जागा पटकावून बसली होती. कार्यक्रम मस्त झाला. खरा संवाद कार्यक्रम संपल्यावरच होत असतो. कारण नंतर जवळ येऊन भरभरून बोलणारी मुले, तरुणवर्ग, शिक्षक आणि पालक - खरंच किती नाती क्षणात जोडली जातात!!!

आम्ही कल्पना चावलाच्या वडिलांशीही फोन वर बोललो त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं. कार्यक्रम संपवून परत येताना आयोजकांचा फोन आला. ते सांगत होते, आमच्या कार्यक्रमाच्या वेळी पेंढारकर नावाच्या एका गृहस्थांनी आमच्या पुस्तकांचा stall लावला होता. कार्यक्रम संपल्यावर मुले आणि पालक पुस्तकांची मागणी नोंदवत होते. त्या वेळी माझं भाषण मन लावून ऐकणारा एक चिमुरडा स्वतः रांगेत उभं राहून एका पुस्तकाची नोंदणी करायला उभं होता. पेंढारकरांनी त्याला कुठलं पुस्तक हवंय आणि कोणासाठी हवंय असं प्रश्न करताच तो म्हणाला, त्या दीपा madam ने सांगितलंय ना त्या रिचर्ड फाईनमन चं पुस्तक मला हवंय. कोणासाठी असं मिश्किलपणे विचारताच तो मात्र गंभीरपणे उत्तरला, माझ्या आईवडिलांसाठी!!! दीपामॅडम म्हणाल्या नं पालकांनी आपल्या मुलाशी कसं वागावं, ते या पुस्तकातून शिकता येईल म्हणून मला हे पुस्तक त्यांच्यासाठी घ्यायचं आहे. आयोजक हसत सांगत होते आणि आम्ही मुलांच्या मनातून उमटणार्या भावनांचा विचार करत होतो!!! या प्रवासानं भरभरून अनुभव दिले. चांगले मित्र दिले. (संजय पुजारी, नेहा, सारंग ओक, चिन्मय, अलका वैद्य आणि ...) मोठेच नाही तर लहानही मित्र दिले!!!

परतल्यावर दुसऱ्या दिवशीही फोन सांगत राहिला, पुन्हा कधी येताय, तुम्ही गेल्यापासून आम्ही त्याच वातावरणात आहोत. लवकर या!!!'

कार्यक्रमाचे फोटो