जीव ओवाळून टाकावा असं काही....

जीव ओवाळून टाकावा असं काही....

तारीख
-
स्थळ
Pune

पुण्याला देशाची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांची राजधानी म्हटलं जातं आणि ते खरं असल्याचा प्रत्यय सातत्यानं येतो. या सगळ्याच क्षेत्रांतली माणसं, संस्था आणि त्यांचं काम बघून आपण निदान साक्षीदार म्हणून तरी हे सगळं अनुभवतो आहोत याचा आनंद निराळाच आहे. ‘किती घेऊ दोन करांनी’ अशी अवस्था पुण्यात राहत असताना होते हेही तितकंच खरं. एचआयव्ही पॉझिटिव्हने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी पुण्यातली 'मानव्य' ही संस्था काम करते. या संस्थेच्या संस्थापक विजया लवाटे यांचा १५ वा स्मृतिदिन काल एस.एम. जोशी सभागृहात संपन्न झाला.

मी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होते. मानव्य संस्थेत मी काही वर्षांपूर्वी डॉ. अभिजीत सफईबरोबर गेले होते. त्यामुळे मला ही संस्था, मुलं, स्टाफ असं अंधुकसं आठवत होतं. एस. एम. जोशी सभागृहात पोहोचताच तिथं विजयाताईंचे चिरंजीव आणि संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे, उज्जला लवाटे आणि सुषमा आपटे यांनी स्वागत केलं. काहीच मिनिटांत सभागृह भरलं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या संसाराला आपणही काही आर्थिक हातभार लावावा या हेतूनं विजया नावाची एक तरूणी काम शोधते आणि तेच तिचं काम तिला स्वतःच्या घराबरोबर अनेकांसाठी घर उभारण्यासाठी प्रवृत्त करतं याची गोष्ट माझ्या डोळ्यासमोर तरळत होती.

सुरुवातीला वेश्यावस्तीत जाणं, त्यांचे आरोग्याचे प्रश्न समजून त्यांना साहाय्य करणं, यातून त्यांच्या मुलांसाठी काम सुरू करणं असं करत करत आज हे काम व्यापक स्तरापर्यंत पोहोचलं आहे. विजयाताईंना त्यांच्या कामात त्यांच्या पतीनंही तितकीच मोलाची साथ दिली आणि आज त्या नसल्या तरी त्यांचा मुलगा आणि सून ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. काहीही दोष नसताना वाट्याला आलेला विकार घेऊन जगणं, नातेवाईक आणि समाजाची उपेक्षा सहन करणं, वाटेत अनेक समस्या असणं आणि त्यात या मुलांचं बालपण कोमेजून जाणं अशी परिस्थिती एचआयव्हीनं बाधित असलेल्या या मुलांची! अशा वेळी या मुलामुलींना मानव्यनं हक्काचं घर तर दिलं, माया दिली, प्रेम दिलं आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यासाठी देखील अनेक उपक्रम हाती घेतले. इतकंच नाही तर अशा मुलामुलींचे योग्य वयात लग्न जमवण्यात पुढाकार घेतला.

मानव्यचा गणेश नावाचा मुलगा घनकचर्‍याचं व्यवस्थापन करत असून विख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. व्यासपीठावर गणेश आणि त्याच्या बहिणीला बोलावून त्यांचं कौतुक केलं, त्या वेळी वाटलं या आणि अशा मानव्यच्या गुणी मुलांवरून जीव ओवाळून टाकावा.... काल मानव्यच्या मुलामुलींनी सुरेखसं स्वागतगीत सादर केलं. तसंच या मुलामुलींनी स्वतःच संहिता तयार करून एक छोटी नाटुकली व्यासपीठावर सादर केली. या नाटुकलीमध्ये विजयाताई लवाटे यांनी या मुलांसाठी माया, प्रेम, शिस्त, समर्पण, त्याग जे जे केलं ते या मुलांनी या नाटुकलीतून दाखवलं आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. यातली सगळीच मुलं विशेषतः साक्षी नावाची चिमुकली या सगळ्यांचा अभिनय इतका जिवंत होता, की वाटलं जीव ओवाळून टाकावा....

माझं भाषण - भाषण म्हणण्यापेक्षा उपस्थितांशी संवाद झाला. मानव्यचं मोलाचं काम, मानव्यची कर्तव्यतत्पर असलेली टीम आणि मानव्यला काहीही कमी न पडू देणारे दाते यांच्याविषयी मी बोलले आणि त्याच वेळी अशा परिस्थितीत मुलांना नैराश्य येऊ शकतं कारण सगळ्याच बाजूंनी त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशा वेळी आपल्याला प्रेरणा देणार्‍या व्यक्ती आठवायला हव्यात. त्यासाठी मग स्टिफन हॉकिंगचं उदाहरण मी दिलं. मोटर न्यूरॉनसारख्या विकारानं आक्रमण केलेला हा तरूण - डॉक्टरांनी केवळ २ वर्ष जगशील असं सांगितलेलं असतानाही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ८० वर्षांचं आयुष्य जगतो आणि तेही साधंसुधं नाही तर जगाला दीपवून टाकणारं संशोधन करतो आणि आपल्या कामानं जगासमोर एक आदर्श उभा करतो. मोटर न्यूरॉन या विकारामध्ये स्नायूवरचं सगळं नियंत्रण जातं, वाचा जाते, श्वासोच्छवास घ्यायला देखील त्रास होतो. हे सगळं स्वीकारून हा माणूस सतत आनंद पसरवत राहिला. बीथोवनसारखा महान संगीतकार देखील या प्रसंगी आठवला. त्याच्या प्रेमाची परिपूर्ती न होणं, प्रेमाला मृत्यू होईपर्यंत लपवून ठेवावं लागणं, ठार बहिरेपण वाट्याला येणं अशा सगळ्या निराशाजनक वातावरणात देखील जगाला अचंबित करून टाकणारं काम करतो. त्याची नववी सिंफनी तर महायुद्धाच्या वेळी जपानननं आपल्या सैनिकांना प्रेरणा मिळावी म्हणून वाजवली. आजही जपानमध्ये नववर्षाची सुरुवात म्हणून ही सिंफनी वाजवली जाते.

स्टिफन हॉकिंग असो की बीथोवन - अशा कितीतरी लोकांनी केवळ स्वतःसाठी नाही तर त्यापलीकडे जाऊन जगण्याला अर्थपूर्ण केलं. आपल्या कामातून लोककल्याणही केलं. ही माणसं खरोखरंच ग्रेट. तसंच किंवा त्याप्रकारे विजयाताईंनी जे रोपटं लावलं, त्याची जोपासना आज मानव्यची टीम करताना बघून वाटलं, यांच्यावरून जीव ओवाळून टाकावा.....

मानव्यचा डॉ. समीर ढवळे, वाहनाचालक दत्तात्रय काटे, माझी गोड मुलगी डॉ. अश्विनी देशपांडे आणि नात काव्या, सुषमा आपटे - किती नावं घेऊ? या सगळ्यांबरोबरचं स्नेहाचं नातं आणखीन घट्ट झालं. विनया देसाई ही गोड मैत्रीण मला स्नेहालयनं एका छानशा प्रसंगी भेट दिली. ही देखील मानव्यची विश्वस्त आहे. पहिल्याच भेटीत आपलंसं करणारी ही गुणी मैत्रीण कालं सूत्रसंचालन करत होती. तिचं बोलणं ऐकत राहावं असं! कायम प्रसन्न असणारी ही मैत्रीण बघून खरोखरंच वाटतं, जीव ओवाळून टाकावा....

दुसर्‍या भागात काल सुवर्ण संगीत या कार्यक्रमाचं आयोजन मानव्यनं श्रोत्यांसाठी केलं होतं. लगेचच हा कार्यक्रम सुरू झाला. प्रवीण जोशी आणि मंजिरी जोशी या जोडीबरोबर हेमंत वाळूंजकर, केदार परांजपे, अमित कुंटे, अजय अत्रे आणि दीप्ती कुलकर्णी हे कलाकार होते. सगळी तरूण टीम आणि पहिल्या गाण्यापासूनच यांनी पुणेकरांचं मन जिंकलं. 'मोगरा फुलला' या गाण्यानं सुरुवात झाली आणि वातावरणात मोगर्‍याचा दरवळ पसरला. त्यानंतर मंगेश पाडगावकरांचं या जन्मावर या जगण्यावर शतःदा प्रेम करावे, मेंदीच्या पानावर (मेंडोलिनवर सादर केलेलं गाणं), संधीकाली या अशा, आई, रेशमाच्या धाग्यांनी, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, बालगीतांमध्ये नाच रे मोरा, झुक झुक झुक आगीनगाडी, चांदोबा चांदोबा भागलास का, केतकीच्या बनी, धुंद मधुमती रात रे नाथ रे, घननिळा, लडिवाळा, जरा हौले हौले चलो मोरे साजना, अशी अनेक गाणी सादर केली.

प्रत्येक गाण्याला वन्स मोअर द्यावा अशी श्रोत्यांची अवस्था झाली होती. संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं होतं. जयदेव या संगीतकाराच्या अभी ना जाओ छोडकर या गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे खरोखरंच संपूच नये असा होता. न राहवून मी व्यासपीठावर गेले. प्रत्येक कलाकाराचं स्वतंत्ररीत्या अभिनंदन केलं, मी त्यांच्याशी बोलत होते पण मन म्हणत राहिलं, यांच्यावरून जीव ओवाळून टाकावा........

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो