भाषा
'भाषा' या संस्थेची सुरुवात १० वर्षांपूर्वी स्वाती राजे यांनी केली. प्रादेशिक भाषांचं संवर्धन व्हावं, भाषेतलं सौंदर्य कळावं, भाषेचं जतन व्हावं आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली भाषा आपण चांगल्या रीतीनं आत्मसात करावी आणि एक सजग, सुजाण नागरिक त्यातून घडावा या तळमळीनं भाषेची स्थापना झाली. भाषा संस्थेचे यक्षप्रश्न, कथायात्रा असे अनेकविध उपक्रम गेली अनेक वर्षं सुरू आहेत. या वर्षी देखील महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी ‘यक्षप्रश्न’ या प्रश्नमंजुषा उपक्रमात भाग घेतला. 'आपले खेळ आपले खेळाडू' हा विषय या वर्षी होता. एखाद्या टीव्ही चॅनॅलवर बघावा इतका अप्रतिम कार्यक्रम प्रत्यक्षात साकारला गेला. याचं श्रेय क्वीझचा संवादकर्ता मेघशाम या लाघवी आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या तरुणाला द्यावं लागेल.
दोन मिनिटांत एक छोटीशी गोष्ट सांगून समोरच्याला त्यात गुंतवून हळूच एक प्रश्न विचारायचा ही त्याची खुबी मला खूपच आवडली. यक्षप्रश्न मध्ये सामील झालेल्या मुला-मुलींसाठी हा खूपच अविस्मरणीय आणि शिकवणारा अनुभव ठरावा. माझ्याबरोबर आलेली आसावरी तर वय वर्षं दहा होऊन जागच्या जागी उड्या मारत होती. तिलाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असायची. तिचाही हात अदृश्य बजरकडे जायचा आणि नकळत वरही व्हायचा. माझ्या कठोर नजरेमुळे ती गप्प राहिली हे माझं नशीब! बुकगंगा इंटरनॅशनलचे संचालक मंदार जोगळेकर आणि मी आम्ही या भाषेचे प्रमुख पाहुणे म्हणून गेलो होतो. आमच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. खरं तर या मुलांचा चुणचुणीतपणा, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचा धीटपणा, यशापयशाची काळजी न करता धीटपणे प्रश्नाला सामोरं जाण्याची वृत्ती बघून अरे, आपल्याला हे सगळं येत नाही याची जाणीव झाली आणि त्यांचं मात्र खूप खूप कौतुक वाटलं.
या कार्यक्रमाला मुलांबरोबरच, पालक आणि शिक्षक प्रचंड संख्येनं उपस्थित होते. या प्रश्नमंजुषेत मुलांना उत्तरं आली नाही तर प्रेक्षकांनी उत्तरं द्यायची होती आणि त्यात काही प्रेक्षक यशस्वी झाले. एकूणच भाषेच्या विकासासाठी सुरू असलेला हा उपक्रम प्रत्येक वर्षी नवं रूप घेऊन येणारा असल्यानं प्रत्येकानं आपल्या पाल्याला यात सामील करायला हवं आणि स्वतःही! यक्षप्रश्न या उपक्रमात प्रत्येक वर्षी वेगळा विषय हाताळला जातो. जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. भाषाच्या कार्यक्रमात बुकगंगानंही प्रायोजक म्हणून आपली भागीदारी नोंदवत या उत्साहवर्धक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाला प्रोत्साहन म्हणून बक्षिसादाखल पुस्तकं देऊ केली होती. त्यांचं मनापासून अभिनंदन! या प्रसंगी भाषेचे विश्वस्त जयदीप राजे आणि रणजीत नाईकनवरे हे देखील उपस्थित होते.
भाषेसाठी धडपडणाऱ्या, परिश्रम करणाऱ्या भाषाप्रेमी स्वाती राजे हिला आणि सतत झटणाऱ्या भाषा टीमच्या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!
दीपा देशमुख
५ फेब्रुवारी २०१८.