‘सिंफनी’चा पुण्यातल्या प्रभात रोडला रंगलेला कार्यक्रम!

‘सिंफनी’चा पुण्यातल्या प्रभात रोडला रंगलेला कार्यक्रम!

तारीख
-
स्थळ
Prabhat Road Pune

आज दुपारी तीन वाजता प्रभात रोडवर असलेल्या भारती हौसिंग सोसायटीतर्फे सिंफनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन-अडीच महिन्यांपूर्वी ठरलेला कार्यक्रम आज संपन्न झाला. या सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती असते. तसंच कार्यक्रम वेळेत सुरू करणं हेही यांचं खास वैशिष्ट्य! आजही उपस्थितांची खच्चून गर्दी होती आणि संपूर्ण हॉल तर भरलाच, पण हॉलच्या बाहेरही खुर्च्या ठेवाव्या लागल्या. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून आम्ही कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रम रंगतच गेला.

रसिक श्रोत्यांची प्रत्येक गाण्याला मिळणारी दाद खूप समाधान देणारी होती. आजच्या कार्यक्रमात अच्युत गोडबोले आणि सभागृहातल्या रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहामुळे मलाही एक गाणं सादर करावं लागलं. ज्या वेळी झुमरू या चित्रपटातलं ठंडी हवा ये चांदनी सुहानी हे गाणं पडद्यावर सादर करायचं होतं, तेव्हा मूळ डोमानी धुनही ऐकवायची होती. त्या वेळी किशोर कुमारवर बोलताना एक अभिनेता, एक निर्माता, एक दिग्दर्शक, एक गायक, एक संगीतकार, एक संवेदनशील माणूस म्हणून अनेक पैलू मला आठवत होते आणि त्याच वेळी ठंडी हवा या गाण्यातला त्यानं केलेला यॉडलिंगचा वापर! मी श्रोत्यांबरोबर हे शेअर करत असतानाच मला आग्रह झाल्यानं मी किशोरकुमारचंच गाणं गायचा निर्णय घेतला. आवाजही लागला आणि श्रोत्यांची मनापासून भरभरून दादही मिळाली.

कार्यक्रम कसा संपला कळलंच नाही. आयोजकांनी आभार मानताना, 'पाश्चात्त्य संगीतापासून दूर पळणार्‍या आम्हाला सिंफनीमुळे या भीतीपासून मुक्ती मिळाल्याचं सांगितलं. आता प्रत्येक गाणं ऐकताना हा कार्यक्रम आठवणार' असं त्या म्हणाल्या. तसंच 'आज एल्व्हिस प्रीस्लेमुळे शम्मीकपूरचं महत्व कळलं, लॉर्ट शॉर्टीमुळे लक्ष्मीकांत प्यारेलालचं ओम शांती ओम गाणं कळलं. मोत्झार्टच्या ४० क्रमांकाच्या सिंफनीमुळे सलिल चौधरींचं छाया चित्रपटातलं इतना ना मुझसे तू प्यार बढा या गाण्यातली अवीट गोडी कळली आणि आजचा कार्यक्रम झाला नसता तर दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले यांचे या विषयावरचे परिश्रम कळले नसते' अशा शब्दांत आयोजकांनी आमचे आभार मानले.

'सिंफनी'चा कार्यक्रम नेहमीच मला आनंद आणि समाधान देऊन जातो. आजचाही कार्यक्रम असाच रंगतदार आणि नवीन कामासाठी हुरूप देणारा झाला. हा कार्यक्रम व्हावा म्हणून आशा होनवाड, माधुरी पटवर्धन, शैला पाध्ये यांनी विशेष पुढाकार घेतला होता. आजच्या कार्यक्रमाला लेखिका नीलम ताटके, प्रसाद मिरासदार आणि डॉ. अश्विनी देशपांडे आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे आणखीनच आनंद झाला. सगळ्यांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन आम्ही अर्थातच घरचा रस्ता पकडला!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो