वेध कट्टयावर कैफी आझमीचा उलगडला प्रवास!

वेध कट्टयावर कैफी आझमीचा उलगडला प्रवास!

तारीख
-
स्थळ
Pune Vedh

संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलं आणि वेगळ्या वाटेनं जाणार्‍या आयएएस अधिकार्‍यांबद्दल विषय निघाला की त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं. अधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचं संवेदनशील मन सतत जागं असल्यानं त्यांच्या कामाकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्याचं जाणवतं. म्हणूनच दुष्काळी भागातला पाणी प्रश्न असो वा स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न असो, बालमजुरीचा प्रश्न असो वा दहशतवादाचं वातावरण असो, खेळ असो वा चित्रपट असोत, या सगळ्याच विषयांवर लिहिणारे आणि मानवतावाद जपणारे लक्ष्मीकांत देशमुख आपल्यासमोर येतात. खरं तर त्यांची आणखी वेगळी आणि महत्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नावर ठोस भूमिका घेणं आणि ती जाहीरपणे मांडणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात, लेखकानं केवळ लेखन करून थांबायचं नसतं तर आपल्या नैतिक भूमिका आणि मूल्यं यांच्यासाठी प्रत्यक्ष कामही करायचं असतं. त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांच्यातला कार्यकर्ताही सतत जागा असतो हे कळतं.

त्यांची ३० पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यात कथा, कादंबरी, ललित लेख, अशा अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना शासनाचे आणि अन्य महत्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. साहित्य ही फावल्या वेळाची करमणूक नाही, तर बुद्धी, भावना आणि प्रतिभा यांच्या त्रिवेणीसंगमातून घडवलेलं ते जीवनदर्शन आहे असं म्हणणारे लक्ष्मीकांत देशमुख प्रेमचंदांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. प्रेमचंदांना उथळ, वरवर लिहिणारे लेखक आवडत नसत. गरिबांचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत. नेमकं तेच काम लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपण अधिकारी असताना प्रत्यक्ष कृतीतून केलंय. तसंच आपल्या लिखाणातून देखील केलं आहे. ते म्हणतात, मी भूतकाळात रमणारा लेखक नाही आणि भविष्याचा वेध घेणारा लेखकही नाही, तर मी वर्तमानात जगणारा लेखक आहे.

प्रेमचंद म्हणत, जर लेखकाला उन्हात कष्ट करून दुपारी झाडाखाली विसावलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या रापलेल्या आणि काळवंडलेल्या चेहर्‍याच्या सुरुकुत्यांमधलं सौंदर्य आणि राबराब राबणार्‍या कष्टकरी स्त्रीच्या राठ पडलेल्या हातामधलं सौंदर्य जाणवत नसेल तर तुम्ही लेखक म्हणून घ्यायला पात्र नाहीत. वैयक्तिक अनुभवापेक्षा समाजाचे अनुभव, समाजाचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत असत. आणि नेमकं हेच लक्ष्मीकांत देशमुख यांनीही आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं.

वेध कट्टयावर लक्ष्मीकांत देशमुख यांचा अधिकारी ते कार्यकर्ता लेखक हा प्रवास थोडक्यात त्यांनी सांगितला. तसंच ते बडोदा इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या काळातल्या त्यांच्या भूमिका, सत्ताधार्‍यांना राजा तू चुकतो आहेस हे स्पष्टपणे सांगणं, नयनतारा सहगलच्या बाबतीत जो निर्णय झाला, त्याचा निषेध नोंदवणं, मराठी भाषेची चळवळ अशा अनेक विषयांवर लक्ष्मीकांत देशमुख बोलले. त्यानंतर कैफी आझमी यांचं पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी का लिहिलं, त्यामागे त्यांची भूमिका काय होती याचा वेध घेणं या कट्टयावर झालं. गरिबी, मूल्यांचा र्‍हास, दहशतवाद, क्रौर्य, सत्तेची दडपशाही, यामुळे सामान्य माणूस हतबल झालेला दिसतो. अशा वेळी त्याला आवाज देत त्याला आत्मभान देता येईल का असा विचार लक्ष्मीकांत देशमुख सातत्यानं करत असतात. त्या अस्वस्थतेतूनच कैफी आझमी या पुस्तकाची निर्मिती झाली.

वयाच्या अकराव्या वर्षी कैफी आझमी यांच्या शायरीला कशी सुरुवात झाली, काही कारणांमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी कसं भाग पाडलं आणि तेच कैफी आझमी पुढे कट्टर मार्क्सवादी कसे बनले हा प्रवासही लक्ष्मीकांत देशमुख यांनी उलगडून दाखवला. कैफी आझमींमधला कार्यकर्ता, धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात असलेला मानवतावाद, गरम हवा सारखे त्यांचे चित्रपट, अनुपमा, हिररांझा, कागजके फूल, हकिकत सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीतं, त्यांच्या कविता, कैफी आझमी आणि शौकत यांच्यातलं उत्कट प्रेम, ३२ वर्ष पॅरेलेसिस झालेला असतानाही केलेलं सामाजिक काम आणि त्यांना भरभक्कमपणे शौकतनं दिलेली साथ हा सगळा प्रवास खरोखरंच थक्क करणारा होता. कैफी आझमी सारखा शायर, कवी, प्रियकर, पती आणि कार्यकर्ता पुन्हा होणे नाही हेच मनाला जाणवत राहिलं.

वेध कट्ट्या तर्फे आज सुरु असलेल्या मुलाखतीचा ताजा फोटो सुरेख फ्रेम सह आम्हाला स्वागत थोरात या मित्राच्या हस्ते भेट देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची कायमस्वरूपी आठवण! एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा आणि कैफी आझमी अशी दोन्हीही पुस्तकं वेध कट्टयावर आज उपलब्ध करण्यात आली होती. मात्र मुलाखतीनंतर सगळीच पुस्तकं संपली आणि स्वाक्षरीसाठी सगळ्यांनीच लक्ष्मीकांत देशमुख यांच्याभोवती गराडा घातला. आजच्या वेध कट्टयावर अंजली लक्ष्मीकांत देशमुख, स्वागत थोरात, विश्वंभर चौधरी, सरिता आवाड, शंकर, चित्रा देशपांडे, अश्विनी देशपांडे, निकिता थोरात, सीमा चव्हाण, अप्पा आसोंडकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज विश्वंभर चौधरी यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय करून द्यावा असं वेध कट्टयातर्फे सांगण्यात आलं आणि त्यांनी देखील आज इथे तीन देशमुख एकत्र आल्याचं सांगितलं. मुलाखत देणारे लक्ष्मीकांत देशमुख, मुलाखत घेणारी दीपा देशमुख आणि परिचय करून देणारे देखील विश्वंभर चौधरी हे देशमुखच! अगदी अनौपचारिकरीत्या त्यांनी परिचय करून दिला.

दीर्घ मुलाखतीनंतर आभाराचं काम नेहमीप्रमाणे डॉ. ज्योती शिरोडकर हिने समर्थपणे केलं. कार्यक्रम संपला तरी लोकांना जागीच खिळवून ठेवण्याची ताकद तिच्या आभाराच्या शब्दांत असते हे मात्र खरं. (मला इथे आणखी कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत हे आज आवर्जून लक्षात आलं.) तिने लक्ष्मीकांत देशमुख हे जागल्याची अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं सांगितलं. तसंच लक्ष्मीकांत देशमुख यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेली ट्रिंग ट्रिंग टेलिफोन ही कविता आपण लहानपणी कशी ऐकली आणि त्या वेळची वडिलांबरोबरची आठवण ज्योतीने सांगितली आणि आज त्याच कवीला, लेखकाला आपण समोर बघतो आहोत याचा आनंद तिच्या गहिरवल्या स्वरातून कळत होता.

कार्यक्रम संपला आणि कैफी आझमी प्रत्येकाच्या मनात रेंगाळत राहिले हे मात्र नक्की. मात्र घरी परत येत असतानाच शबाना आझमीला अपघात झाल्याचं वृत्त कळलं आणि मन अस्वस्थ झालं. तिला लवकर आराम पडो असं मन सारखं म्हणत राहिलं. ( कैफी आझमींप्रमाणेच शबानाच्या रक्तात कार्यकर्तेपण असून आपल्या गावाच्या विकासासाठी ती करत असलेलं काम प्रशंसनीय आहे आणि विशेष म्हणजे त्याचा कुठेही गाजावाजा न करता हे काम अविरतपणे सुरू आहे.) (आजचा कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्र वाहिनीने live दाखवला. त्याबद्दल प्रियदर्शिनी आणि टीम यांचे मनापासून आभार.)

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो