वेध कट्टा, पुणे - चैतन्य सरदेशपांडे

वेध कट्टा, पुणे - चैतन्य सरदेशपांडे

तारीख
-
स्थळ
Pune

२१ डिसेंबर २०१९.  आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्‍या रंगाची साडी नेसायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकमेकांकडे विजयी मुद्रेनं बघितलं. काहीच वेळात आम्हाला कार्यक्रमासाठी टेरेसवर येण्याची सूचना आली आणि माझ्या पुढे चैतन्य आणि मी त्याच्या मागे असं आम्ही जाऊन पोहोचलो. दीपक पळशीकरसर चैतन्यला बघताच स्वागत करत, ‘या’ म्हणाले आणि खुर्चीवर बसण्याची विनंती केली. पण चैतन्य ऐकतोय कसला? तो आपला मोबाईल कानाला लावून येरझारा घालत बोलण्यात मग्न होता. त्याला समोरच्या श्रोत्यांचीही शुद्ध राहिली नव्हती.

मी पळशीकरसरांना हातानंच खूण करत थांबवलं आणि चैतन्यला आवाज दिला, पण त्याला माझा आवाजही ऐकायला येत नव्हता. मग मी त्याच्या मागे आणि तो माझ्या पुढे - पण मोबाईलवर बोलतच - अशी आमची पळापळ सुरू झाली. अखेर मी प्रेमानं चैतू म्हणणं सोडलं आणि 'कार्ट्या थांब' असं जोरात ओरडले, तेव्हा चैतन्य भानावर आला आणि त्यानं मोबाईल बंद केला. मी त्याला ओरडत आणि हाताला धरून खेचत खुर्चीवर नेऊन बसवलं. समोर असलेल्या श्रोत्यांची मी माफी मागितली. चैतन्यनं असं वागायला नको होतं हेही त्याला सांगितलं. त्यानंतर रीतसर वेध कट्टयाचा कार्यक्रम सुरू झाला. वेधच्या शिल्पानं अगदी नेमक्या शब्दात चैतन्यची ओळख करून दिली. त्यानंतर अर्थातच माझीही करून दिली. 'वेध कट्टयाची परमनंट सदस्य' म्हटल्यावर खुशीत येऊन मीच टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाची सुत्रं आमच्या हाती सुपूर्त करण्यात आली. (सुरुवातीला चैतन्य लोकांकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर जे बोलत फिरला आणि मी त्याच्यावर कार्ट्या म्हणून जी ओरडले, तो आमच्या एन्ट्रीचा एक भाग होता. म्हणजेच आम्ही मुद्दामच जरा वेगळी नाट्यमय सुरुवात केली होती!)

मी चैतन्यबद्दल बोलायला सुरुवात केली. चैतन्यचे बाबा म्हणजेच माझा मित्र धनू याची आणि माझी मैत्री चैतूच्या जन्माआधीपासूनची म्हणजे आम्ही अकरावीत असल्यापासूनची हे आवर्जून सांगितलं. थोडक्यात मी चैतन्यला त्याच्या जन्मापासून किंवा आधीपासून ओळखते हेच मला सांगायचं होतं. चैतन्यच्या घरातच नाटकाचं वातावरण असल्यानं तो कळायच्या आधीपासूनच नाटकाकडे वळला. वडिलांच्याच बालनाट्यात त्यानं सुरुवातीला काम केलं. वडिलांबरोबर सतत नाटकाच्या प्रॅक्टिसला जाणं असायचंच. मग शिकत असतानाच कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन शाखेत प्रवेश घेतला. कम्प्युटर क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण करून पदवी देखील मिळवली, मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमलंच नव्हतं आणि मग आपल्याला नाटकच करायचंय कोणा एका क्षणी निश्चित झालं. झी गौरवचं नामांकन चैतन्यच्या ‘माकड’ या नाटकाला मिळालं. तसंच नाट्यगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार या नाटकाला मिळाले. वर्तमानपत्रांनी आणि समीक्षकांनी या नाटकाची वाखाणणी केली.

आसपासचं राजकारण, त्याची नको त्या थराला गेलेली पातळी आणि 'मला काय करायचंय असं म्हणणारा' सर्वसामान्य माणूस, यात कसा ओढला जातो आणि त्यात त्याची कशी फरफट होते यावर भाष्य करणारं हे नाटक आपण कसं लिहिलं आणि कधी विचारही केलेला नसताना त्यातली प्रमुख भूमिकाही करावी लागली याबद्दल चैतन्य बोलला. त्यानं माकड नाटकातला एक प्रसंगही श्रोत्यांसमोर करून दाखवला. चैतन्यनं रीतसर नाट्यक्षेत्रातलं शिक्षण घेऊन त्यातलीही पदवी मिळवली. ही पदवी मिळवताना त्याचा संबंध वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या भाषेशी, त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या गाण्यांशी आला. त्यातलं बंगाली भाषेतलं एक गाणं चैतन्यनं गावून दाखवलं. हे अनुभव खूप शिकवून गेले असं त्याला वाटत होतं. त्यानं तेंडुलकरपासून अनेक लेखकांचं लिखाण वाचलं होतंच, पण आता त्यानं शेक्सपिअर अभ्यासला. त्याची नाटकंही केली आणि त्यातल्याच ऑथेल्लो या नाटकातलं इंग्रजीमधले डॉयलॉग त्यानं सफाईदारपणे सादर केले. चैतन्य मालिकांचं संवाद लेखन करतो, तो स्वतः एकांकिका आणि नाटकंही लिहितो.

भानू काळेंच्या अंतर्नाद या मासिकात त्याची पहिली चिकारा ही कथा प्रसिद्ध झाली आणि तिला पहिला पुरस्कार मिळाला. त्या कथेचा सार त्यानं सांगितला. चाळीशीतल्या माणसाची होणारी घुसमट, त्याचं जगणं आणि एका कुत्र्याचं जगणं यातलं साम्य त्यानं या कथेत दाखवलं होतं. माकड असो का कथा - तुझं लिखाण जरा जड असतं असं म्हटल्यावर चैतन्यनं आपण पुण्यात शिकायला आलो तेव्हाच आपल्याला जड जड लिहिलं तरच लोक मानतील असं वाटल्यामुळे आपण तसं लिहायला लागलो असा विनोद केला. कार्टून फिल्म्स, अ‍ॅनिमेटेड फिल्मस, फॅन्टसी, वास्तव या सगळ्यांची एकमेकांत घुसळण होते आणि आपलं लिखाण बाहेर येतं असं चैतन्यला वाटतं. गर्दीमुळे मुंबईची तुंबई कशी झाली आहे आणि ठसका ही एक एकांकिका यावरही चैतन्य बोलला. चैतन्य सगळ्यात माध्यमात वावरत असला, तरी शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज, मालिका, चित्रपट यात सगळ्यांत जास्त नाटक हेच माध्यम जास्त आवडतं असं तो म्हणाला.

यानंतर त्याच्या सध्या गाजत असलेल्या गुगलिफाय या दीर्घांकावर तो बोलला. गूगलनं आपल्या जगण्यावर कसं आक्रमण केलंय आणि अशा आक्रमण झालेल्या एका मुलीला कुणी तो त्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो यावरचं कथानक यात आहे. आपली मेमरी काम करणं सोडून देतेय, आपण गूगलवर किती अवलंबून झालोय हेही त्यानं सांगितलं. इतकंच नव्हे तर गुगलिफायमधला एक प्रसंगही त्यानं सादर करून दाखवला. आपल्यासमोर आपणच स्पर्धेला उभे आहोत आणि आपणच आपली वाट शोधत चालणार आहोत असं चैतन्य म्हणाला. आपल्या वडिलांनी आपल्याला कधीही कुठल्याही बाबतीत अडवलं नाही आणि कायमच सपोर्ट केला असं त्यानं आवर्जून सांगितलं. मला काही अचिव्ह करायचंय, किंवा माझी काही स्वप्नं आहेत याचा मी विचार केला नसून मी प्रक्रियेतला, प्रत्येक क्षणातला आनंद घेत चालणार असल्याचं चैतन्य म्हणाला.

शेवट करताना चैतन्यनं आम्ही लिहिलेल्या 'कॅनव्हास' या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यातल्या पिकासोचा लहानपणचा एक किस्सा सांगितला. पिकासोला पिकासोच व्हायचं होतं, तसंच चैतन्यला चैतन्यच व्हायचं आहे असं तो म्हणाला! चैतन्यबरोबरच्या गप्पा सगळ्यांनाच भावल्या. यश मिळाल्यावर आपण त्या यशस्वी कलाकाराची यशोगाथा लोकांसमोर मांडतो, पण पुणे वेधकट्टयाचं वैशिष्ट्य असं की प्रक्रियेत आनंद घेणार्‍या, यशापयशाची पर्वा न करणार्‍या एका तरुणाला त्यांनी इथं बोलतं केलं! कार्यक्रमाच्या शेवटी वेधची डॉ. ज्योती शिरोडकर हिने अतिशय गोड स्वरात आभार मानले. आभार कसे मानावेत याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते ज्योतीकडून घ्यावं. कार्यक्रमाची जी उंची असते, तितकीच उंची ती आभार प्रदर्शन करून गाठते हे विशेष!

आजच्या कार्यक्रमात चैतन्यनं मीरारोडचं पॅसेंजरची प्रतीक्षा करणार्‍या एका रिक्षाचालकाची गोष्ट सांगितली होती. तो रिक्षाचालक जवळच्या ठिकाणी जाणार्‍या पॅसेंजर्संना नाही म्हणायचा आणि असं करता करता नाही हे उत्तर इतकं सहजपणे त्याच्या तोंडून बाहेर पडत गेलं की लांबचा म्हणजे मीरारोडला जाणारा पॅसेंजरही त्यानं नाही म्हणत गमावला. त्या रिक्षावाल्याला जेव्हा आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने जवळचे, दूरचे असं न करता जो येईल त्या पॅसेंजरला त्यानंतर रिक्षात घ्यायला सुरूवात केली आणि यातच त्याला मीरा रोडला जाणारे पॅसेंजरही आपोआपच मिळायला लागले. हे सांगताना चैतन्यनं आपणही कमी लांबीच्या भूमिका आल्या की नाकारायचो असं सांगितलं. जॉन अब्राहमचा चित्रपट असलेला फोर्स टू हा चित्रपटही त्यानं नाकारला होता. पण रिक्षावाल्याचा अनुभव ऐकताच चैतन्यनं स्वतः फोन करून ती छोटीशी भूमिकाही स्वीकारली. रोजच असे अनुभव आपल्याला शिकवतात असं तो म्हणाला. याचा उल्लेख करून ज्योतीनं उद्या तुलाही तुझ्या करियरमधलं मीरारोडचं पॅसेंजर मिळेल अशा शुभेच्छा नव्हे तर खात्री दिली.

चिकारा कथा लिहिणारा चैतन्य हा वयाच्या विशीत चाळीशीतल्या माणसाची व्यथा लिहितो, यावरून त्याची संवेदनशीलता किती तीव्र आहे याविषयी तिनं सांगितलं. चैतन्यचं चैतन्य कशात आहे तर त्याच्या शिकण्यातल्या हपापलेपणात आहे, मनाला आवडेल, जिवाला रुचेल ते करण्यातच आहे असं ज्योतीनं म्हटलं. काळाची पावलं ओळखून वेळीच गूगलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार्‍या चैतन्यचं तिनं कौतुक केलं. आज जरा ज्योतीला वेधकट्टयाची नशा अंमळ चढली असावी. कारण दीपा देशमुख म्हणजे लेखनाचा कधीही न थांबणारा, अखंड कोसळणारा धबधबा असं वर्णन तिनं माझ्याबाबतीत केलं. माझं लिखाण, सामाजिक काम याबरोबरच मी चैतूसारख्या किती कार्ट्यांमध्ये दडलेला (मी चैतुला सुरुवातीला रागाने कार्ट्या म्हटलं होतं!) हरहुन्नरीपणा ओळखून त्यांना प्रकाशात आणलं याचा उल्लेख केला. (खरं तर मला डॉक्टरांनी ६ किलो वजन कमी करायला सांगितलंय, पण या ज्योतीमुळे या कार्टीमुळे ते त्याच क्षणी १२ किलोनं वाढलं!)

सरतेशेवती आजचा वेध कट्टा चैतन्यमुळे चैतन्यमय झाल्याचं ज्योतीनं सांगितलं आणि तेच चैतन्यमयी वातावरण मनात घेऊन उपस्थित सर्व आपापल्या घराकडे वळले! आज कार्यक्रमात चैतन्यचे सुयश, पूजासह अनेक मित्र, निकिता थोरात तिची मैत्रीण प्राची, शंकर, मस्कतहून पुण्यात स्थायिक झालेले विनायक जोशी आणि त्यांच्या पत्नी, मुक्ता मनोहर, सरिता आवाड आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो