जरुर वाचा 'नर्तक' !

जरुर वाचा 'नर्तक' !

तारीख
-
स्थळ
Pune

काल सायंकाळी पत्रकार भवन इथे 'नर्तक' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभासाठी गीताबरोबर सहा वाजता पोहोचले. समोरच्या दोन तीन रांगा लोक उपस्थित होते. बाकी सगळा हॉल रिकामा होता. बाबा भांड,आशा भांड, सौदामिनी राव, यमाजी, अंजली, रवींद्र, महेश या सगळ्यांशी नजरेनं भेट झाली. पाचच मिनिटांत संपूर्ण हॉल भरला. नंतर तर लोकांना बसायला जागा नाही, म्हणून लोक मागच्या बाजूला चक्क उभे राहिले. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांचं स्वागत झालं. ज्ञानेश्वर जाधव या एका स्मार्ट तरुणानं अतिशय सुरेख आणि नेटकं असं सूत्रसंचालन केलं. विलासनं सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर आपल्या मनोगतात त्यानं आपल्या गुरू सौदामिनी राव ऊर्फ आक्का यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या फक्त आपल्या गुरूच नाही तर आपल्या आई बनल्या असं तो म्हणाला. बाबा भांड आणि आशा भांड यांच्यासारखे गुरू शालेय वयात लाभल्यामुळे आपल्याला दिशा मिळाली असं म्हणत त्यानं त्यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या.

आज व्यासपीठावर सगळे आपले मित्र आणि गुरूजन असल्याबद्दलचा आनंद त्यानं व्यक्त केला. विलासच्या नृत्यगुरू सौदामिनी राव या वयाच्या ८० व्या वर्षी देखील आपल्या शिष्याचं कौतुक करण्यासाठी उभ्या राहिल्या. आपण जे जे सांगू ते विलासनं कसं ऐकलं, नृत्यातले बारकावे कसे आत्मसात केले, त्यासाठी कसे परिश्रम घेतले याविषयी त्या बोलल्या. विलासच्या कादंबरीतल्या शिवा पाटील या नायकाची घुसमट आपण जवळून बघितली असल्याचं बाबा भांड म्हणाले. विलासनं आपला प्रवास आणि कादंबरी लिहीत असताना अलिप्त राहण्याचं कसब साध्य केलं आहे याबद्दल त्याचं कौतुक त्यांनी केलं. तसंच भूतकाळ सतत बाळगला तर त्याचं ओझं बनण्याचा धोका त्यांनी सांगून वर्तमानाचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला. मुखपृष्ठाबद्दल त्यांनी गार्गीचं कौतुक केलं, तर आशा भांड यांनी शाळेत असताना आम्ही विलास आणि विलाससारख्या खेडेगावातून आलेल्या अनेक मुलांचे केवळ शिक्षकच नव्हतो तर पालकही होतो असं त्या म्हणाल्या. विलास गणित या विषयात अत्यंत हुशार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी बोलण्यासाठी उभी राहिले.

माझ्यासमोर तर नर्तकच्या निमित्तानं देवगिरी कॉलेज,औरंगाबादच्या कॉलेजच्या दिवसांतल्या अनेक आठवणी फेर धरून नाचत होत्या. विलासचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्व, नाटक, शेरोशायरी, नृत्य असं काय काय आठवत होतं. कॉलेजच्या आठवणी सांगत असतानाच त्या टप्प्यानंतर आम्ही सगळेच कसे विखुरलो आणि अचानक पुण्यात कितीतरी वर्षांनी पुन्हा कसे भेटलो याबद्दल सांगितलं. त्या भेटीतल्या गमतीजमती आठवून माझ्या आणि उपस्थितांच्या चेहर्‍यावर स्मित उमटलं. त्यानंतर मी नर्तक कादंबरीवर बोलले. कादंबरीमधल्या नायकाचा सकारात्मक दृष्टिकोन, त्याचा प्रवास, पाटलाच्या पोरानं नृत्य शिकणं हे जसं त्याच्या घरात मानवत नाही, तसंच पुरुषाचं नृत्य शिकणं समाजालाही रुचत नाही. त्याच्या नृत्यप्रवासात येणारे अडथळे, गुरूंचं राजकारण, हेवेदावे, आर्थिक अडचणींशी सामना, मित्रांबरोबरचे दिवस, कॉलेजातले गुलाबी दिवस, त्या प्रेमातून मिळालेली प्रेरणा, पुण्यातला संघर्षाचा काळ, भेटलेली-सोबत राहिलेली माणसं, एका खेड्यातल्या मुलाचा नृत्याच्या कार्यक्रमातून घडलेला युरोप प्रवास, कलाकाराची यशाची धुंदी आणि अपयशामुळे झालेली फरफट याबद्दल मी बोलत गेले. त्याचबरोबर आजही अनेक कलाकार पोटापाण्याचा प्रश्न समोर येताच, कला बाजूला सारून अर्थार्जनासाठी धडपड करताना दिसतात. मनात मात्र ती खंत, तो सल बोचत असतो. नर्तक पुस्तकाचं सुरेख बोलकं मुखपृष्ठ बनवणार्‍या गार्गीचंही कौतुक या प्रसंगी केलं.

माझ्यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी यमाजी उभा राहिला. यमाजीनं एक कलाकार कसा विचित्र असतो, तो चौकटीतलं जगणं नाकारून वेगळा मार्ग कसा शोधतो आणि त्या वाटेवरून कसा चालतो यावर भाष्य केलं. विलासबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या. तसंच कुठलीही अभिजात कला शिकताना, तिला आपलंसं करताना या मार्गातल्या सगळ्या काट्यांची जाणीव, येणारे अडथळे यांचा परिचय करून घेतला पाहिजे, त्याची तयारी ठेवली पाहिजे असं सांगितलं. समाजाची अनास्था, स्पर्धेचं जीवघेणं वातावरण याविषयी त्यानं सावधगिरी बाळगावी असं सांगितलं. विलासला शुभेच्छा देत यमाजीनं आपलं भाषण संपवलं. ज्ञानेश्वर जाधव यांनी सगळ्यांचे आभार देखील खुसखुशीत शैलीत व्यक्त केले. कार्यक्रम कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही.

कार्यक्रम संपताच विलासभोवती नव्या पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी गराडा पडला. आशा भांड यांचे कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक वेगळे पैलू बघायला मिळाले. आशाताईंना जुने, दुर्मिळ असे दिवे जमा करण्याचा नाद आहे. त्यांच्या घरी गेलं की प्रथम हे असंख्य दिवे आपलं स्वागत करतात. बघत राहावं असा हा दिव्यांचा संग्रह आहे. काल त्यांनी आता आपण स्मार्ट फोनचे अनेक फिचर्स नातवाकडून कसे शिकतो आहोत याविषयी मला आणि अंजलीला सांगितलं. सेल्फी काढण्यात त्यांनी तज्ज्ञता मिळवलेली दिसली. माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी प्रकाशनाचा कार्यक्रम झाला की लेखक आणि व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर यांच्या स्वाक्षर्‍या त्या पुस्तकावर घेते कारण त्या दिवसाची ती आठवण नेहमी सोबत राहते. माझा त्या मागचा हेतू जाणून घेऊन लगेचच आशाताईंनी आपल्या पुस्तकावरही सगळ्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. चांगलं ते लगेचच अंमलात आणणं या त्यांचा स्वभाव मला खूपच भावला.

मला काल माझे अनेक फेसबुक मित्र आणि मैत्रिणी भेटल्या. माझं लिखाण आवडणारी राजे निंबाळकर ही मैत्रीण काल पहिल्यांदा भेटली. त्यानंतर माझं चित्रपटांचं लिखाण आवर्जून वाचणारी आणखी एक मैत्रीण भेटली. काकडे नावाचा तरूण त्याची फ्रेंड रिक्वेस्ट का अ‍ॅक्स्पेट केली नाही म्हणून विचारत होता. त्याचं पहिलं नाव विसरल्यानं सकाळपासून मला त्याची रिक्वेस्ट सापडत नाहीये. ही पोस्ट वाचल्यावर कृपया त्यानं रिप्लाय करावा म्हणजे मी त्याची प्रोफाईल शोधू शकेन. विलास, महेश, बाबा भांड, आशा भांड आणि आलेल्या सर्व स्नेहीजनांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. यमाजी, अंजली, गीता आणि मी स्वरूप मध्ये पोहोचलो आणि अतिशय सुरेख, स्वादिष्ट असं जेवण हापूस आंब्याचा रसासहित केलं आणि तृप्त मनानं आपापल्या घरी पोहोचलो.

परतीच्या प्रवासात विलासचं बदलत्या वाटांना स्वीकारत चालणं आणि त्यात त्याला साथ देणारी अतिशय गोड अशी जोडीदार नीलम पाटील सस्मित चेहऱ्याने सोबत करत राहिले!!!

दीपा देशमुख, पुणे

कार्यक्रमाचे फोटो