सर, तुम्ही गुरुजी व्हा!
१६ मार्च २०१९ ला सकाळी ९ वाजता रेल्वेनं मी आणि धनू (धनंजय सरदेशपांडे) परभणीच्या रेल्वेस्थानकावर पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी त्र्यंबक वडसकर, नागेश आणि परभणी वेधचे संयोजक श्री मधुकर नायक, रेखा आणि विशाखा नायक आलेले होते. सगळ्यांना भेटून अर्थातच आनंद झाला. गप्पा टप्पा करत निवासस्थानी पोहोचलो. फ्रेश होताच, परभणीची रंगकर्मी मंडळी धनूच्या रूममध्ये येऊन दाखल झाली. सगळ्यांबरोबर ओळख झाली.
परभणीत सातत्यानं नाटकं व्हावीत, त्यातलं प्रयोगशील वैविध्य सगळ्यांनी जपावं म्हणून धनंजयच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. सगळ्यांशी बोलताना घड्याळ धावत राहिलं. त्यानंतर परभणीत जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकूल इथं गेलो. प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण देणारी ही निवासी शिक्षणसंस्था! संस्थेच्या संचालिका आमच्या सोबत होत्या. तिथला कार्यक्रम आटोपून परत आलो आणि 'ग्रीन लिफ'मध्येच त्यानंतर जेवण केलं. जेवणानंतर काहीच वेळात शिवाजी महाविद्यालयाचं सभागृह गाठलं. सभागृह स्त्री-पुरुषांनी खचाखच भरलं होतं. शेवटी जास्तीच्या खुर्च्या टाकूनही जागा पुरेना, तेव्हा तरुणाईनं चक्क समोर येऊन मांड्या घालून बसून घेतलं.
आज इथं त्र्यंबक वडसकर लिखित ‘सर तुम्ही गुरूजी व्हा’ आणि तीन बालनाट्य या नाटकाच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. सुरुवातीला परभणीच्या अकादमीच्या चिमुकल्या मुलांनी गणेशवंदना सादर केली. त्यांचं नृत्य कौशल्य आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता! त्र्यंबक वडसकर हा सावळासा दिसणारा तरूण परभणीतल्या नृसिंह पोखर्णा या ग्रामीण भागातला शिक्षक! आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला! इतकंच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये नाट्यजाणिवा निर्माण करणारा, त्यांना अवांतर अनेक गोष्टींचे धडे देणारा! त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणून त्याचे मित्र, स्नेही, विद्यार्थी, परभणीतल्या अनेकविध संस्था यानिमित्तानं एकत्र आल्या होत्या. हा प्रकाशन समारंभ थाटात साजरा करण्यासाठी प्रत्येकानं एक एक गोष्ट जबाबदारी म्हणून खांद्यावर घेतली होती. कोणी आम्हा पाहुण्यांची निवासव्यवस्था केली होती, तर कोणी गाडी आणि ड्रायव्हरची व्यवस्था, कोणी सभागृह उपलब्ध केलं होतं, तर कोणी पुष्पगुच्छ आणि पॅचवर्क केलेल्या सुंदरशा शाली आणल्या होत्या. कोणी जेवणाची व्यवस्था केली होती, तर कोणी पाहुण्यांच्या तिकिटाचा खर्च! त्र्यंबक वडसरकर याला कोणीही आर्थिक झळ बसू दिली होती. त्याच्यावरचं प्रेम सभागृहात पोहोचल्यावर आम्हाला बघायला मिळालं.
आमच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर विद्यार्थी, अधिकारी, अनेक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी व्यासपीठावर येऊन त्र्यंबकचा सत्कार करून आपला आनंद व्यक्त केला. त्र्यंबकच्या समोर शाली, पुष्पगुच्छ यांचा ढीग साचला होता. सूरज या त्याच्या विद्यार्थ्याने आपल्या गुरुवर एक सुरेख कविता या वेळी सादर करून आपलं प्रेम आणि आदर व्यक्त केला. कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे, झिंगरेसर, नाट्यअभिनेता धनंजय सरदेशपांडे यांनी या प्रसंगी आपापली मनोगतं व्यक्त केली. प्रत्येकाच्या बोलण्यातून त्र्यंबक वडसरकरच्या साध्या आणि सच्चेपणाबद्दलच्या भावना व्यक्त होत होत्या. त्याच्या नाटकांची वैशिष्ट्यंही समोर येत होती.
मी त्र्यंबक वडसकरांना शुभेच्छा देत, त्याच्या नाटकातली मूल्यांची रुजवणूक यावर बोलत त्याच्याकडून नाटकं कशी असायला हवीत याबद्दलच्या काही अपेक्षाही व्यक्त केल्या. चांगले कलाकर, वैज्ञानिक यांचं आयुष्य आणि कार्य तितकंच थरारक, संघर्षमय आणि नाट्य उभारणारं असल्यानं नाटककारांनी असे विषय देखील हाताळावेत अशा अपेक्षा व्यक्त करून नाटकात मजबूत कंटेंट, सुयोग्य नेपथ्य, यांच्यावर चांगलं नाटक कसं उभं राहतं याबद्दलचे काही किस्से सांगितले. कराडचा विज्ञान वेडा कल्पना चावला विज्ञान केंद्राचा संजय पुजारी यानं मुलांना घेऊन बसवलेलं गलिलिओ नाटक, तर अपूर्व मेघदूत या नाटकाद्वारे २२ अंध कलाकारांचा लक्षवेधी अभिनय जगासमोर आणणारा सृजनशील दिग्दर्शक स्वागत थोरात यांच्याविषयी मी बोलले!!! कार्यक्रम एखाद्या मैफिलीसारखा रंगत गेला.
कार्यक्रम संपल्यावर सर्वच वयोगटातल्या साहित्यवेड्या, नाटकवेड्या रसिकांची गर्दी भेटण्यासाठी सभोवती गोळा झाली. सगळ्यांशी ओळख आणि सेल्फी वगैरे काढून झाले. सोहन, कृष्णा, रवी, विश्वजीत, श्यामची आई घरोघर पोहोचवणारे उमरीकर पती-पत्नी, संकर्षण कऱ्हाडे या अभिनेत्याचे नाट्यअभिनेते वडील, परभणी मधला Astronomy चा गट, विनोद डावरे आणि त्यांच्या दोन गोड मुली ऐश्वर्या आणि संपत्ती, असे अनेकजण भेटले. कार्यक्रम खरोखरंच खूप समाधान आणि आनंद देणारा होता. सकाळपासून आमच्याबरोबर असलेला नागेश हा तरूण आणि वेधची विशाखा यांचे किती आभार मानावेत? नायक कुटुंबीयांनी प्रेमानं दिलेली साडी माझ्यासाठी एक अत्यंत सुरेख भेट होती. दिवसभरातल्या आठवणी आठवत धनू आणि माझा परभणीहून पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला.
दीपा देशमुख, पुणे.