समाजवादी महिला सभा महाराष्ट्र
जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आज समाजवादी महिला सभा, महाराष्ट्रच्या वतीनं नारायणपेठेत माझा ‘जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान होतं. वेळेत घरून निघूनसुद्धा ओला टॅक्सीनं मला चुकीच्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं. मग चालत चालत एकदाची सुनियोजित ठिकाणी पोहोचले. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांहून आलेल्या समाजवादी महिला सभेच्या सदस्यांची मिटिंग सुरू होती. मी अगदी ठरलेल्या वेळात म्हणजे चार वाजता पोहोचले आणि त्यांची पण मिटिंग आटोपली. वर्षा गुप्ते यांनी माझं हसून स्वागत केलं. कार्यक्रमाला लगेचच सुरूवात झाली. आजच्या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीनं खूपच महत्व होतं. मी ज्या आदिवासी सहज शिक्षण परिवार, मासवण या संस्थेत काम केलं, ती संस्था समाजवादी महिला सभा, महाराष्ट्र यांच्या पुढाकारानं सुरू आहे. या समाजवादी महिला सभेतल्या सगळ्याच स्त्रिया एकसे एक बुद्धिमान, अनेक विषयांमध्ये रस असलेल्या, पुरोगामी विचारांच्या समाजकार्यालाच आपलं जगणं मानणार्या अशा आहेत. वयाची साठी-सत्तरी ओलांडली तरी यांचा उत्साह १८ वर्षांच्या तरुणीला लाजवेल असा आहे आणि कामाचा उरक देखील तसाच! सुधा रणदिवे, सुमन देशपांडे, साधना दधिच, विजया चौहान, वर्षा गुप्ते, विमलताई आणि किती नावं घ्यावीत, सगळ्यांनाच मी खूप जवळून बघितलंय. साधारणतः महिनाभरापूर्वी हा कार्यक्रम ठरला, तेव्हा मी चटकन होकार दिला. ज्या ठिकाणी आपण काम केलं आणि त्यानंतरचा आपला प्रवास आपल्याला भरभरून देतच गेला, अशा ठिकाणाचं माझ्या मनात एक सुखद कोपरा आहे. त्याची आठवण मनात घेऊनच मी बोलायला उभी राहिली. समोरच्या सगळ्याच माझ्याच होत्या, परकेपण वाटलं नाहीच. माझ्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात मग ते मासवणचं काम असो, नर्मदा बचाव आंदोलनातला अनुभव असो, वा लेखनप्रवास असो, सगळ्या अनुभवांनी बी पॉझिटिव्ह हा मंत्र दिला. खरं तर प्रवासाच्या सुरुवातीला विजयाताई (विजया चौहान) या जेव्हा जेव्हा कामं अडली, अपयश येतंय असं वाटायला लागलं, तेव्हा कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवरून सगळं ऐकून घेत आणि ‘दीपा, बी पॉझिटिव्ह’ असं सांगत. यातले अनेक अनुभव आज मी सांगत राहिले. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे केलेला आरईबीटीचा कोर्स स्वतःसाठी आणि इतरांसाठी कसा उपयुक्त ठरला. हे अनुभवही मी सांगितले. लेखन प्रवास करताना, कॅनव्हास असो, वा जीनियस मालिका, सिंफनी असो, वा सुपरहिरो या सगळ्याच पुस्तकातल्या जगप्रसिद्ध व्यक्तींनी ‘बी पॉझिटिव्ह, कार्यमग्न राहा, कामात झोकून दे’ असंच सांगितलं होतं, आहे. वेळ कसा भुरकन उडाला खरोखरंच कळला नाही. माझं बोलणं संपल्यानंतर काही वेळ प्रश्नोत्तरं झाली. वैभवची एक कविता गावून मी थांबले. आजच्या कार्यक्रमाला प्रभाकर भोसले हे मित्र आठवणीनं आले होते. त्यांची ओळख सगळ्यांशी करून दिली आणि त्यांनीही सहभागींशी संवाद साधला. एकूणच आजच्या कार्यक्रमात खूप आनंद मिळाला, समाधान मिळालं. थँक्यू वर्षांताई आणि टीम! दीपा देशमुख, पुणे