महिला दिन-2019 आणि मी! भावे हायस्कूल पुणे
महिला दिन-2019 आणि मी! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूल मध्ये काल 'महिला दिन' साजरा झाला. मागच्या वर्षी विज्ञान दिनाच्या निमित्त मी याच संस्थेत गेले होते. महिला दिन साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री जवळगीकर मॅडमकडून मला निमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्यांचं आग्रहाचं निमंत्रण नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी १२ वाजता कार्यक्रम संपन्न होणार होता. मी संस्थेच्या परिसरात प्रवेश करताच सगळीकडे एकच उत्साहाचं वातावरण नजरेला पडलं. बारावीच्या मुलांना शुभेच्छा देणारे, तसंच महिला दिनाचं स्वागत करणारे बोर्ड दिसत होते. मुख्याध्यापक, इतर स्टाफ यांच्याशी बोलून आम्ही कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पोहोचलो. सगळ्या शिक्षिका समारंभ असावा अशा छान तयार होऊन आल्या होत्या. इथं माझ्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा होणार होता. जवळजवळ ५० शिक्षिकांना विद्यार्थ्यांकडून सन्मानित करण्यात येणार होतं. एक छानशी भेटवस्तू, पुस्तक, पेन आणि गुलाबाचं फूल देऊन मुलांनी माझं आणि उप-मुख्याध्यापिका मॅडम यांचं स्वागत केलं. त्यानंतर ५० शिक्षिकांनाही विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीत भेटवस्तू देऊन अभिनंदन केलं. आजच्या दिवशी कार्यक्रमाची आणि इतर आयोजनाची सगळी जबाबदारी पुरुषवर्गानं आनंदानं घेतलेली होती. मुख्याध्यापकांनी महिला दिन का साजरा केला जातो याची पार्श्वभूमी मुलांना सांगितली. सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मी व्याख्यानासाठी उभी राहिले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत राहणार्या अनेक जगविख्यात स्त्रियांची या वेळी आठवण झाली. सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, पायथॅगोरसची शिष्या थिओना, ग्रीसमधल्या अॅलेक्झांड्रिया शहरातली गणितज्ञ हायपेशिया, पदोपदी अडथळे पेरणार्या समाजाकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहिलेली आणि दोनदा नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी, इच्छा नसतानाही सतीसारख्या दाहक प्रथेला बळी पडलेली अलकमंजिरी आणि शेकडो/हजारो स्त्रिया, आफ्रिकेतली गायिका आणि कार्यकर्ती मीरियम मकेबा अशा अनेक स्त्रियांविषयी, त्यांच्या कार्याविषयी मी बोलले. स्त्रियांच्या बाजूनं उभे राहणारे, अनिष्ट प्रथेविरुद्ध लढून स्त्रियांना आत्मसन्मानाचं जगणं मिळवून देणारे जोतिबा, गोपाळराव, कर्वे, राजा राममोहन रॉय असे अनेक पुरुषही या प्रसंगी आठवले. सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या भावे स्कूलशी ऋणानुबंधाचं एक नातं तयार झालं आहे, ते नातं मनात घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन मी परतीच्या रस्त्याला लागले! दीपा देशमुख, पुणे.