रमा नाडगौडा - शिवतीर्थ नगर पुणे कार्यक्रम
काल रमा नाडगौडा हिच्याकडे शिवतीर्थ नगर इथं लेखन प्रवासाचा कार्यक्रम महिन्याभरापूर्वीच ठरला होता. काल बुक गंगा मधलं रेकॉर्डिंग संपवून मी मधल्या वेळात घरी पोहोचले. कार्यक्रम ४ वाजता असल्याने घरातून ३ वाजता निघाले .....पण हाय रे ...इतका ट्रफिक जाम लागला की मला तिथे पोहोचायला बरोब्बर २ तास लागले .....मात्र कार्यक्रमाची वेळ टळून गेलेली असली तरी सगळ्याजणी वाट बघत होत्या.
मी सगळ्यांची माफी मागितली आणि बोलायला सुरुवात केली ....पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेतून मिळणारा आनंद, स्वतःचं शिक्षण, समृद्ध होण्याकडची वाटचाल हे सगळ सांगत गेले.
त्यानंतर सगळ्यांचाच थोडक्यात परिचय आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं यात काही वेळ गेला. जमलेल्या मैत्रिणींमध्ये कोणी लिहिणाऱ्या, तर कोणी अफाट वाचणाऱ्या, कोणी चित्रकार, तर कोणी विज्ञानातल्या किडा असलेल्या .....सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटलं. किती चांगल्या कामी यांचा वेळ जातोय - पुस्तकं वाचायची, त्यावर चर्चा करायची आणि महिन्यातून एका शनिवारी एकत्र जमून एका लेखक किंवा लेखिकेला बोलवायचं.....संवाद साधायचा ....आपल्या वेळेचा किती सुरेख सदुपयोग करताहेत सगळ्या!
यातल्या एकजण माझ्या आवडत्या लेखकाच्या पत्नी आहेत. मी १० वी ते १२ वीत असताना नारायण धारप, रत्नाकर मतकरी आणि सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांनी झपाटून गेले होते .....रात्रीच्या अंधारात पांघरून घेऊन torch च्या प्रकाशात वाचत जागायचे ते दिवस होते .....आमची पुस्तकं वाचणाऱ्या त्या वाचक मैत्रिणीचं नाव सुगंधा शिरवळकर!!! त्यांना भेटून खूप आनंद झाला ....त्यांचा मुलगा सम्राट हाही मित्रच आहे!!! खूप खूप वाचणाऱ्या मैत्रिणीनो, पुन्हा एकदा भेटू ....कारण तुमच्याशी गप्पा मारून तुमच्यातलं वेगळेपण अनुभवायचं आहे!!!
ज्या रमाने हा कार्यक्रम आयोजित केला ती खूपच गोड फेस्बुकी मैत्रीण!!!! प्रेमात पडावं अशी! वाचते, लिहिते, अनुवाद करते, शिवते, बागकाम करते ....अबब!!!