थिंक पॉझिटिव्ह कट्टा आणि रयत शिक्षण संस्था, सातारा
३० जानेवारी २०१९ ही तारीख सातारा इथल्या कलामहोत्सव कार्यक्रमासाठी महिनाभरापूर्वीच राखून ठेवली गेली होती. ३० तारखेला सकाळी दहा वाजता यमाजी, मी, प्रभाकर भोसले आणि त्यांची थिंक पॉझिटिव्ह टीम असे आम्ही सातार्याच्या दिशेनं निघालो. सातार्याचा रस्ता नेहमीच विमानानं प्रवास घडवल्याचा आनंद देतो. दोन्ही बाजूचे हिरवेगार डोंगर आणि हिरवाई मनाला प्रफुल्लित करत असते. एकमेकांची चेष्टामस्करी करत प्रवास कसा संपला कळलंच नाही. आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात पोहोचलो. तेव्हा शाळेची भव्य इमारत आणि पटांगण पाहून सुखावलो.
सुरुवातीला इथल्या कलादालनाचं उद्धघाटन केलं. मुला-मुलींनी अतिशय अप्रतिम अशी निसर्गचित्रं काढली होती. तसंच अनेक हस्तकौशल्याच्या उपयुक्त वस्तू तिथे बघायला मिळाल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून काही वस्तूंची निर्मिती करण्यात आली होती. हे दालन मनाला खूप खूप समाधान देऊन गेलं. मुलामुलींमधल्या कलागुणांना विकसित करण्याची ही खूपच सुरेख संधी होती. शिक्षिकांबरोबरच मुलं-मुली देखील दालनातल्या वस्तूंची माहिती देत होते. व्यासपीठाकडे जाताना स्थानापन्न झालेल्या श्रोत्यांकडे नजर टाकली. १८०० मुलं-मुली, १२९ रयत शिक्षण संस्थेतले मुख्याध्यापक आणि शिक्षक, तसंच पालक असे २५०० च्या गर्दीनं भरलेला समुदाय....सगळ्यांचे चेहरे प्रसन्न आणि उत्सुकतेनं भरलेले दिसत होते.
आम्ही व्यासपीठावर स्थानापन्न झालो. यमाजी मालकर प्रमुख पाहुणा तर मी अध्यक्ष होतो. यमाजीचा विषय 'आम्ही भारतीय- भारत माझा' असा होता. तर माझा ‘बी पॉझिटिव्ह’! रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर 'थिंक पॉझिटिव्ह'चे प्रभाकर भोसले यांनी 'थिंक पॉझिटिव्ह' कट्टा सुरू करण्यामागची भूमिका सांगितली. समृद्धी या शब्दांचा अर्थ सांगत असताना उपस्थित असलेल्या समृद्धी नावाच्या ६ मुली व्यासपीठावर आल्या. समृद्धी म्हणजे दृष्टिकोन, समृद्धी म्हणजे आरोग्य, समृद्धी म्हणजे भरभराट, समृद्धी म्हणजे आनंद, समृद्धी म्हणजे समाधान, समृद्धी म्हणजे नाती....असं सांगत प्रभाकरनं अतिशय सोप्या पद्धतीनं मुलांशी आणि शिक्षक-पालक यांच्याशी संवाद साधला. यमाजी मालकर या माझ्या मित्राने आम्ही भारतीय असल्याबद्दल आम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभिमान वाटतो, इथंपासून बोलायला सुरुवात केली. रयत शिक्षण संस्थेची मुलं-मुली धीट आणि उत्साही असल्यानं त्यांचे हात उत्तरासाठी वर होत होते. कोणाला कृषिप्रधान देश असल्यामुळे अभिमान वाटत होता, तर कोणाला आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान वाटत होता. कोणाला स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकांचं योगदान आठवत होतं, तर कोणाला देशातल्या विविधतेचं आकर्षण वाटत होतं. अचूक उत्तर देणार्याला एक छानशी कॅप बक्षिसादाखल यमाजीच्या हस्ते मिळत होती. विषय गंभीर असूनही यमाजीच्या शैलीनं तो अतिशय समर्पकपणे सर्वांपर्यंत पोहोचला.
आयुष्यात चढउताराचे अनेक प्रसंग येतात, संकटं येतात अशा वेळी आपलं मन सकारात्मक असलं तर त्या गोष्टींना तोंड देत आपण पुढे कसे जाऊ शकतो याविषयी मी बोलत गेले. कलावंत असोत, वा शास्त्रज्ञ - यांची चिकाटी, हार न मानण्याची वृत्ती, लोककल्याणाचा ध्यास यातूनच त्यांची सकारात्मक वृत्ती आपल्याला काय शिकवते किंवा देते याबद्दलचे काही किस्से मी सांगितले. हे सगळेच किस्से उपदेशपर नसल्यानं मुला-मुलींनाच नव्हे तर शिक्षक-पालक यांच्याही चेहर्यावर हासू फुलवून गेले. सकारात्मक वृत्ती घडवण्यासाठी डॉक्टर एलिस यांची आरईबीटी पद्धत कशी काम करते ते सांगत मी समारोप केला. रयत शिक्षण संस्थेची वाटचाल खरोखरंच स्तिमित करण्यासारखी! त्यांच्यावतीनं काम करणार्यांना सगळी आकडेवारी तोंडपाठ पाहून आम्ही तर थक्कच झालो. कार्यक्रम संपल्यावर रयतच्या ऑफिसमध्ये चहा-फराळ आणि गप्पा झाल्या. मात्र ऑफिसपर्यंत पोहोचायला मला काही वेळ लागला. शिक्षक-पालक आणि मुला-मुलींसोबत वेळ द्यावा लागला. माझ्या व्याख्यानाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकाव्यात असं त्यांना वाटत होतं. आठवीत आमचा धडा असल्यानं त्या धड्याच्या अनुषंगाने त्यांच्या मनात काही अवांतर प्रश्न होते, त्याबद्दलही त्यांना बोलायचं होतं, तसंच त्यांना सेल्फी काढायचे होतेच. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद मला अधिकाधिक श्रीमंती बहाल करत गेला.
इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या लोकांसमोर संवाद साधता आला, आपलं म्हणणं पोहोचवता आलं याबद्दल यमाजी, प्रभाकर आणि रयत शिक्षण संस्था यांच्याविषयी ‘थँक्यू’ असं मनात म्हणत मी ऑफिसमध्ये प्रवेश केला. परतीच्या प्रवासात ममता, अमृता, यमाजी, प्रभाकर, सुचित्रा, नीलेश, सचिन आणि सर्वच टीमबरोबर भेळचा आनंद घेत पुण्यात पोहोचलो!
दीपा देशमुख, पुणे