'सिंफनी' प्रकाशन सोहळा

'सिंफनी' प्रकाशन सोहळा

तारीख
-
स्थळ
पुणे

पावसाळी वातावरण, मनात बेचैनी आणि आनंद अशा संमिश्र भावना....या भावनांना बरोबर घेऊन अंबर हॉलला पोहोचले. संजय भास्कर जोशी आणि वैशंपायन हॉलच्या सजावटीत गुंतलेले होते. पावसाळी वातावरणात येणाऱ्यांसाठी गरमागरम बटाटेवडे आणि कॉफी यांचीही व्यवस्था पुस्तकपेठेनं केली होती. मनोविकासची टीम आणि अरविंद, आशिश पाटकर या वेळी या सगळ्या व्यवस्थेत गुंतलेले होते. 
मला बघताच वैशंपायन आणि संभा (संजय भास्कर जोशी) यांनी हसून स्वागत केलं. बघता बघता कळायच्या आतच हॉल तुडुंब भरला. जवळपास सगळे चेहरे ओळखीचे, आपलेसे....सगळ्यांची नावं घेतली तर चार-आठ पानं सहज भरतील..... 

कार्यक्रम सुरू झाला आणि अरविंद पाटकर यांनी 'सिंफनी'च नव्हे तर आमच्या सगळ्याच पुस्तकांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं. पाश्चात्त्य जगातल्या संगीतविश्वातल्या माणसांची ओळख ‘सिंफनी’ या पुस्तकात लेखकद्वयींनी सांगितली आहे असं ते म्हणाले. पुस्तकाचा दर्जा आणि निर्मिती चांगली असण्यासाठी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख दोघंही किती कष्ट घेतात याविषयी ते बोलले. 
त्यानंतर संजय भास्कर जोशीं यांनी अतिशय नेमकं आणि खुसखुशीत सूत्रसंचालन केलं. लेखकांचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय वगैरे अशा त्याच त्या कंटाळवाण्या गोष्टींना फाटा देऊन संभानं एका वाक्यात सगळ्यांची ओळख करून दिली. 

‘अत्यंत स्वतंत्र प्रतिभेनं पुस्तकं लिहिणारी, एखाद्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला समर्पित करणारी, एक अत्यंत कार्यक्षम आणि प्रतिभावंत लेखिका दीपा देशमुख’ अशी माझी ओळख त्यांनी करून दिल्यावर माझी अवस्था ‘आज मदहोश हुआ जायेरे, मेरा मन मेरा मन’ सारखी झाली आणि हे गाणं मनात गातच मी माईक हातात घेतला. मी सुरुवातीलाच ‘सिंफनी’ या प्रवासात आम्हाला पाश्चात्त्य संगीतातलं व्याकरण असो वा इतर गोष्टी या बाबतीत ज्यानं मदत केली आणि ज्याच्याशिवाय सिंफनी पूर्ण होऊच शकलं नसतं अशा आयटी क्षेत्रातल्या दुष्यंत पाटील या तरुणाचा सत्कार केला. तसंच सिंफनीमध्ये क्यूआर कोड समाविष्ट करावेत असा आग्रह करणाऱ्या आणि क्यूआर कोड करून देण्याची जबाबदारी उचलणार्‍या अपूर्व देशमुखचा सत्कारही केला. मनोविकासचे आशिश पाटकर आणि गणेश दिक्षित यांचाही या प्रसंगी सत्कार केला. मनोविकासची जबाबदारी  अतिशय समर्थपणे पेलणार्‍या आशिश या तरूणाचा सत्कार करणं खूपच गरजेचं होतं. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, समंजसपणा आणि आपल्या कामात सतत कल्पक बदल करणं ही त्याची वैशिष्ट्यं. मनोविकासचा गणेश दिक्षित तर या कामाची तांत्रिक बाजू सांभाळताना कामाकडे कधीही कंटाळवाणं काम म्हणून बघत नाही, तर नेहमीच आमची पुस्तकं अतिशय उत्साहानं करत असतो. त्याचा उत्साह बघून आम्हीही अगदी हक्कानं कधीही त्याला अनेक अ‍ॅडिशन्स, सूचना करत राहतो आणि तोही तो तितक्याच तत्परतेनं पूर्ण करतो. 

यांच्या सत्कारानंतर मग 'सिंफनी'चा प्रवास, पाश्चात्त्य संगीताचा इतिहास, त्यातले दिग्गज संगीतकार आणि त्यांचं कार्य आणि माझ्या लेखनप्रवासातलं अच्युत गोडबोले यांचं योगदान यावर मी बोलले. SYMPHONY हे पुस्तक माझं आयुष्य सुरेल करणाऱ्या आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या AIR FORCE मधल्या माझ्या कॅप्टन अतुल गडकरी या बालमित्राला आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ या मैत्रिणीला अर्पण केलं आहे.

अच्युत गोडबोले यांनी त्यांचा स्वतःचा संगीतमय प्रवास उलगडला. आपल्यातल्या कुतूहलामुळे आपण अनेक विषयांकडे खेचलो जातो आणि तो विषय समजून घेत नंतर लिहितो असं ते म्हणाले. त्यांनी माझी भरभरून प्रशंसाही केली. माझ्याशिवाय हे पुस्तक अशक्य होतं असंही प्रांजळपणे सांगितलं. अर्थातच माझे हात हॉलच्या छतापर्यंत केव्हाच पोहोचले होते. त्यांच्या मनोगतात त्यांनी आपल्या एकूण प्रवासात पाश्चात्त्य संगीताशी झालेली ओळख, मोत्झार्ट, बिटल्स, मायकेल जॅक्सन यांच्याविषयी सांगितलं. 

यानंतर प्रमुख पाहुणे आणि सुप्रसिद्ध गायक/संगीतकार कौशल इनामदार यांचं व्याख्यान खूपच अप्रतिम झालं. कौशलमधला प्रामाणिक कलावंत आणि साधा माणूस मला खूप भावला. आपल्यातल्या मर्यादा सांगत सांगत कौशलनं संगीतातल्या अनेक गोष्टी अतिशय कुशलतेनं उपस्थितांसमोर उलगडून दाखवल्या. 'संगीत कळण्यासाठी त्याचं व्याकरण समजण्याची गरज नसते, पण ते समजलं तर आपली स्वतःची समृद्ध होण्याची खोली वाढते' असं ते म्हणाले. त्यांनी सहजपणे वातावरणात एक हलकी लहर सोडावी अशा रीतीनं काही गाणी गायली. त्यांच्या बोलण्यात वॅग्नर असो, वा बाख अगदी सहजपणे आले आणि किस्से, विनोद आणि गाणी यातून उपस्थितांना हा संवाद संपूच नये अशा रीतीनं कौशल बोलत गेले. 'सिंफनी'विषयी बोलताना, ‘हे पुस्तक वाचून संपवण्याचं नसून ते कायम आपल्याजवळ बाळगण्याचं आहे’ असं ते म्हणाले. ‘पाश्चात्त्य संगीतावर आधारित 'सिंफनी'मध्ये पोक्तपणा नाही, काठिण्य नाही तर त्यात ललित आहे, ते अतिशय साधं आहे, हसता हसता ते अंतर्मुख करतं. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांची अतिशय रंजक आणि ओघवती पण अभ्यासपूर्ण शैली मला 'सिंफनी'मध्ये दिसली.’ असं ते म्हणाले. 

कौशलनं आजची शिक्षणव्यवस्था, मुलांचं कुतूहल कसं मारलं जातं, याचबरोबर कबिरापासून अनेक तत्वज्ञांचे दाखले देत उपस्थितांना एका वेगळ्या जगाची सैर घडवून आणली.  ‘एखादी कविता गुणगुणनं ही देखील ती कविता समजून घेण्याची प्रक्रिया असते’ असं ते म्हणाले. मराठी माणूस अनेक गोष्टी खूप गुंतागुंतीच्या करतो असंही म्हणत त्यांनी उदाहरण दिलं. मी एकटा पडलो असं सांगताना 'जाऊ कहॉ बता ऐ दिल, दुनिया बडी है संगदिल...' असं शैलेंद्र म्हणतो आणि शंकर जयकिशन त्या भावना संगीतबद्ध करतात. पण आपले मराठीतले सुधीर फडके याच भावना ‘हा माझा मार्ग एकला’ असं सांगताना गात गात आणखी अवघड करून सोडतात असं विनोदी अंगानं सांगितलं. मराठी माणसाच्या मनातला समीक्षक त्यांनी काही उदाहरणांमधून उलगडून दाखवला.

कौशल इनामदारच्या व्याख्यानानं संपूर्ण सभागृह आणखीनच ताजतवानं झालं.  
या कार्यक्रमाच्या वेळी अपूर्व देशमुख यानं 'सिंफनी' वाचतानाच क्यूआर कोड आपल्या मोबाईलनं कसा स्कॅन करायचा आणि 'सिंफनी' पुस्तकातली ती ती गाणी कशी ऐकायची आणि कशी बघायची याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. 

सिंफनीमध्ये दिलेल्या १५० पाश्चात्य संगीतानं प्रभावित झालेल्या निवडक हिंदी गाण्यांचं आम्ही सादरीकरण केलं. यामुळे मूळ संगीताची धुन आणि त्यानंतर हिंदी चित्रपट गीत यांनी वातावरण संगीतमय झालं. 
कार्यक्रम सुरू असताना आपल्या सर्व स्नेह्यांच्या डोळ्यांतलं कौतुक दिसत होतं. खूप छान वाटत होतं. खरं तर आलेल्या सगळ्या प्रिय प्रिय वाचकांमुळे 'सिंफनी'ची रंगत आणि सुरेलपणा वाढला होता. दोन तास रंगलेला हा कार्यक्रम कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. 
जरूर जरूर वाचा ‘सिंफनी’!

दीपा देशमुख, पुणे

- २१ जुलै २०१८