विज्ञानगावाची सैर!

विज्ञानगावाची सैर!

तारीख
-
स्थळ
Kalyanehole Jalgaon

विज्ञानगावाची सैर! पुण्याहून जळगावमध्ये प्रवेश करताच जयदीप, विशाल, देवल या नोबेल फाऊंडेशनच्या टीमनं माझं आणि आसावरीचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केलं. फुलं बघताच आम्ही प्रवासाचा शीण विसरून ताज्यातवान्या झालो. फ्रेश होऊन, जयश्रीच्या हातचा ब्रेकफास्ट घेऊन आसावरी, शुभा आणि मी जयदीपबरोबर विज्ञानगावाच्या रस्त्याला लागलो. गप्पांमध्ये रस्ता कधी सरला कळलंच नाही. विज्ञानगावात प्रवेश करताच आईन्स्टाईन, सी.व्ही. रामन, न्यूटन, गॅलिलिओ, स्टीफन हॉकिंग आमचं स्वागत करताना पावलोपावली भेटत गेले. या सगळ्यांचे फोटो प्रत्येक दिव्याच्या खांबावर, झाडावर स्वागतासाठी सज्ज होते.

२००० वस्तीचं हे गाव झाडून सडा टाकावा असं स्वच्छ होतं. गावच्या सरपंचांच्या कार्यालयात आम्ही पोहोचलो. इतक्या लहानशा गावात सरपंचांचं कार्यालय वातानुकुलित होतं. या गावातले सरपंच बिनविरोध निवडून येतात, ही इथली विशेष परंपरा आहे. मागच्या वेळी तर चक्क एक इंजिनिअर झालेली तरूणी गावची सरपंच बनली होती. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या यांनी आमचं स्वागत केलं. सरपंच राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या विचारसरणीतूनच जयदीपची जडणघडण झाली होती. अनेक गावकरी देखील आमच्या स्वागताला आले होते. त्या सगळ्यांसह आम्ही नोबेल फाऊंडेशनच्या विज्ञान हॉलमध्ये शिरलो. मुलामुलींनी हॉल भरलेला होता. विज्ञान तुमच्यात किती आत्मविश्वास निर्माण करतं ते मला या मुलामुलींमध्ये बघायला मिळालं. भिंतीवरही वैज्ञानिक हसतमुखानं वेलकम करत होते. सरपंच आणि मान्यवर सदस्या यांनी मला विज्ञानगावची आठवण म्हणून एक सुबक अशी बैलगाडी भेट दिली.

मी मुलांशी संवाद साधला. विज्ञान का आवश्यक आहे, कला का गरजेची आहे, जगण्यासाठीची मूल्यं अशा अनेक विषयांवर गोष्टींमधून संवाद झाला. मुलांना माझं बोलणं आवडत होतं. मी बोलून होताच, आसावरीनंही बोलावं असा जयदीपनं आग्रह केला. आसावरीनं मला चकितच केलं. कधीकाळी तिनं तिच्या मुलीला - आरोहीला - शिकवलेलं विज्ञानगीत तिला अचानक आठवलं. ते तिनं मुलांना गाऊन दाखवलं. मुलांनी ठेका धरला आणि या गाण्यानं विज्ञानगावावरच जादू केली. आमच्या गावाचं हे आम्ही गाणं करू असंही सगळ्यांनी जाहीर केलं. जमलेल्या मुला-मुलींपैकी देवयानी या धीटुकल्या मुलीनं आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही येण्याचा आनंद, त्यांच्या गावातले विज्ञानाचे उपक्रम, त्यांच्या विचारसरणीत होत असलेले बदल यावर ती भरभरून बोलली.

आपल्या गावाला विज्ञानगाव बनवण्यासाठी झटत असलेल्या जयदीप आणि टीम चं मला खूप कौतुक वाटलं. सगळ्यांचे आभार मानत आम्ही जयदीपच्या घरी जेवणासाठी पोहोचलो. जयदीपला ‘जेवण अतिशय साधं हवं’ असं आवर्जून सांगितल्यामुळे जळगावचं प्रसिद्ध वांग्याचं भरीत, भाकरी, कढी, घरी केलेलं गावरान लोणचं, नागलीचा पापड आणि जिलेबी असं चविष्ट जेवण आम्ही केलं. जयदीप ज्यांना आदर्श मानतो त्यांचे फोटो मला घरात बघायला मिळाले. त्यात अच्युत गोडबोले आणि जयदीपचा १० वर्षांपूर्वीचा मोठा फोटो भिंतीवर दिमाखात लटकत होता. त्यांच्या या भेटीमुळेच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली असं जयदीप अभिमानानं सांगत होता.

आम्ही जयदीपच्या आई-वडिलांचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघताच, गावातली अनेक मुलं पुन्हा रस्त्यात भेटली. आम्हाला तुमचं बोलणं खूप आवडलं असं धीटपणे सांगत होती. त्यांच्याबरोबर फोटोही त्यांना काढायचे होते. पाय निघत नव्हता, पण निघणं भाग होतं. रस्त्यातच विशालच्या घरी भेट दिली. जयदीप आणि विशाल दोघांच्याही आईनं मला लोणचं बांधून दिलं होतं. लोणचं, ताजा ताजा शेतातला हरभरा, जळगावची प्रसिद्ध बोरं असा सगळा खजिना घेऊन आम्ही तृप्त मनानं विज्ञानगावातून बाहेर पडलो. अंगणातल्या एका सुस्तावलेल्या मांजरीनं अर्धवट डोळे उघडून आम्हाला बाय केलं. माझं मन ठेका देत आसावरीनं गायलेलं गाणं गात होतं ः डोळे उघडून बघा, गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का, हे उलगडण्याला शिका

दीपा देशमुख, पुणे

कार्यक्रमाचे फोटो