पालघर - मुलाखत - लेखन प्रवास
मुझको तुम जो मिले......
जवळ जवळ १२ वर्षांनी पालघरला पोहोचणार होते. निमित्त होतं - मनोविकास प्रकाशनाच्या अमोल पाटकर यांनी सुरू केलेल्या नव्या उपक्रमाचं - लेखक आपल्या भेटीला...आता पालघरमध्ये प्रत्येक महिन्याच्या चवथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळात हा कार्यक्रम रंगणार असून उद्घघाटन आणि ग्रंथ या पुस्तकाची ओळख वाचकांना करून द्यावी म्हणून अमोलने मला आग्रहाने निमंत्रित केलं होतं. नकाराचा प्रश्नच नव्हता. घरचंच काम होतं. त्यातच मासवण/पालघर हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मलाही तिथे जाण्याची ओढ होती.
२७ नोव्हेंबर, शनिवारी भल्या पहाटे मारुतीच्या सियाज या गाडीने पुणे शहर सोडलं आणि ठाणे मार्गे हायवेवरून गाडी आणि माझं मन धावत होतं. मनोरच्या दिशेने गाडी वळताच शैलेश या सहकाऱ्याचं घर आठवलं. खूप वेळा मनोरच्या रस्त्यांवरून, जवळ असलेल्या धरणावरून मारलेला फेरफटका आठवला. मनोरच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने असलेला हिरवागार निसर्ग स्वागत करत होता. डाव्या बाजूला तर मला चक्क दोन पेट्रोल पंप दिसले. जे पूर्वी अस्तित्वात नव्हते. माझ्या स्कुटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मला पालघर किंवा मनोरपर्यंत जावं लागायचं. मनाशी खुदकन हसू आलं तोच परिचित बसस्टॉप दिसला, बाजूला पाटी होती - मासवण! अगदी १२ वर्षांपूर्वी होती तशीच...मी ओरडले ‘उजवीकडे वळायचं आणि थांबायचं...’ वाहन चालक योगेश कांबळे यांनी लगेचच गाडी उजवीकडे वळवली आणि थांबवली.
माझ्यातली १० वर्षांची मुलगी गाडीचं दार उघडून समोरच्या गेटमधून आत शिरली आणि तिथेच थबकली. आता जिथे कार्यालय असं लिहिलेलं दिसलं, तिथे त्या वेळी आमची बेकरी होती. नाचणीची, गव्हाची बिस्किट्स अनंता, तारा आणि टीम तयार करत असे. हो, हो, अगदी ताजा ताजा पाव देखील .....आता तिथली बेकरी बंद झाली होती..मी पायऱ्या चढून वर जात असतानाच लक्षात आलं, ही पूर्वीची टुमदार बंगली नाही. जिथे समोरच्या व्हऱांड्यात मायाताई छानशा तयार होऊन काहीतरी विणकाम करत खुर्चीत बसलेल्या असायच्या. केसांमध्ये फुलं किंवा गजरा माळलेला असायचा. विणत असल्या तरी चौफेर लक्ष असायचं. मायाताई, कमाल होत्या. चक्क चिमण्यांशी भांडायच्या. मायाताईंनी तयार केलेलं बारीक मण्यांचं दारावरचं तोरण चिमण्या तोडून टाकायच्या आणि म्हणून मायाताई चिडायच्या आणि चिमण्या आणि त्या अशी जुगलबंदी कितीतरी वेळ चालायची. मात्र भांडण काही वेळात मिटायचं आणि मायाताई याच चिमण्यांच्या पिल्लांसाठी जागोजागी घरट्यांची व्यवस्थाही करायच्या. आमच्या आदिवासी परिवार शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक होत्या ना त्या. मी काम करत असलेलं संस्थेचं ते बांधकाम, ती इमारत नष्ट झालेली होती आणि त्या ठिकाणी आता वेगळीच इमारत उभी होती.
मी दाराजवळ पोहोचताच चारुताईंनी ‘या दीपाताई’, असं म्हणत हसून माझं स्वागत केलं. चारूताई, मुलींच्या वसतिगृहाच्या प्रमुख. इमारत जरी नवी असली, तरी प्रमोद, अनंता, विजया हे सगळे तेच आणि तसेच होते. प्रमोद आमच्या संस्थेच्या वाहनांचा चालक, तसंच खंदा कार्यकर्ता...अनंता बेकरीची सगळी जबाबदारी समर्थपणे पेलणारा कार्यकर्ता....विजया बडबडी कार्यकर्ती...मी मासवणला असताना जवळपास सगळ्या पाड्यांची भेट तिनेच मला करवली. माझी जीवलग मैत्रीण कधी बनली, मलाही कळलं नाही. त्यांना सगळ्यांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला. एखादा सण असावा तसे आम्हा सगळ्यांचेच चेहरे खुलले होते. बरंच काही आम्ही बोलत होतो, एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत होतो. पण खरं तर त्या शब्दांना, संवादाला तसा काही अर्थ नव्हता, त्या भेटीचाच आनंद इतका होता की शब्दांची गरजच नव्हती.
पालघरहून अमोल पाटकर देखील मासवणला आला होता. आता मासवणवरून पालघरला आम्ही मिळूनच जाणार होतो. अमोलची आणि आदिवासी सहज शिक्षण परिवार संस्थेच्या कार्यकर्त्यांची ओळख मी करून दिली. संध्याकाळी कार्यक्रमाला सगळ्यांनी यायचं असं आग्रहाचं निमंत्रण देऊन आम्ही पालघरच्या दिशेने निघालो.
गाडी धावत होती.....सूर्या नदीवर एकदम उंचावर नवा पूल बांधलेला दिसला...हा पूल बांधावा म्हणून त्या वेळी मासवणसह अनेक गावांनी केलेले प्रयत्न आठवले. गोविंदा या अभिनेत्याने पूल बांधून देऊ असं आश्वासनही दिलं होतं....याच पूलाच्या कच्च्या बांधावर एका शिबिराच्या वेळी राजू इनामदार, धनू, शरद आणि मी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो...आता आमच्या गाडीने आठवणींसोबतच सूर्या नदीचा नवा पूल ओलांडला होता, इतक्यात चहाडे नावाचा पाडा लागला, इथे मुलांसाठी घेतलेलं शिबीर आठवलं...लहान मुलांसोबतच्या गप्पा आठवल्या...बघता बघता घाटाची वळणं सुरू झाली. या घाटात आमच्या कार्यकर्त्यांना कधी वाघ दिसायचा, मग ते वर्णन विशाल, मी आणि शैलू आश्चर्यचकित होऊन ऐकायचो. या घाटातून पालघर ते मासवण, मासवण ते पालघर मी स्कुटीवरून ये-जा करायची, तर कधी बसने. मासवणमध्ये मोबाईलचे टॉवरच नव्हते, पण तरीही मी मोबाईल जवळ ठेवायची आणि हेडफोन लावून गाणी ऐकत प्रवास करायची.
अगर मै पुछू जवाब दोगे, दिल क्यों मेरा तडप रहा है
तेरे भी दिल मे है प्यार कुछ कुछ, मेरे भी दिल मे जरा जरा है
खलनायक अजितने चक्क नायकाच्या भूमिकेतून हे गाणं गायलं होतं, त्यानंतरचं गाणं रफी आणि सुमन कल्याणपूरचं :
बहोत हसीन है तुम्हारी ऑखें, कहो तो मै इनसे प्यार करलू
बडा है धोका तेरी नजरमे मै किसतरह ऐतबार कर लू.....
मग एकामागून एक आवडती गाणी सुरूच असायची :
मुझको तुम जो मिले ये जहाँ मिल गया,
तुम जो हसें दिलमे मेरे दिल का कँवल देखो खिल गया......
उम्र हुयी तुमसे मिले फिर भी जाने क्यू,
ऐसे लगे जैसे पहले बार मिले है,
ये नई नई प्रित है, तूही तो मेरा मीत है,
न जाने कोई साजना ये तेरीमेरी दास्ताँ,
गाणी ऐकता ऐकता अंतर संपायचं आणि मुक्कामाचं ठिकाण यायचं....आजही मासवण-पालघरचा तो घाट तसाच हिरवागार होता...आम्ही पालघरला पोहोचलो. मनोविकासच्या पुस्तकांच्या दालनात पोहोचलो. अमोल पाटकर या तरुणाने आणि त्याचा सहकारी सौरभने अतिशय सुरेख पद्घतीने पुस्तकांचं दालन सजवलं होतं. मनोविकास आणि इतर अनेक नामवंत प्रकाशकांची उत्तम पुस्तकं तिथे विक्रीसाठी उपलब्ध होती. अपूर्व आणि मी हावरटासारखी अनेक पुस्तकं निवडली आणि खरेदी करून आपल्या ताब्यात घेतली.
त्यानंतर अमोलच्या पत्नीने केलेलं सुग्रास जेवण करून पालघरच्या पाच बत्ती किंवा हुतात्मा चौक नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातल्या प्रसिद्घ के. पी. सेंटरमध्ये पोहोचलो. के. पी. सेंटर हे पालघरमधलं साड्यांचं खास दुकान. या दुकानाचा मालक तुषार जैन. मी पालघरला 12 वर्षांपूर्वी पहिल्यांदा पोहोचले, तेव्हा मासवणला मला घर मिळवून देण्यापासून ते अनेक गोष्टीत तुषारने मला खूप खूप मदत केली होती. अपूर्व मुंबईहून सुट्टीच्या दिवशी मला भेटायला आला, की त्याला आईस्क्रीम खाऊ घालणं, आग्रहाने लस्सी पाजणं तुषार त्याचा मोठा भाऊ बनून करायचा. आताही तोच प्रसन्न, उत्साही, प्रेमळ तुषार माझ्यासमोर उभा होता.
कार्यक्रम संपला की जेवायला एकत्र जाऊ आणि खूप गप्पा मारू असं तुषारशी बोलून अपूर्व आणि मी त्याचा तात्पुरता निरोप घेतला. आम्ही लक्ष्मी हॉटेलमधल्या रुममध्ये पोहोचून तयार होताच, माझी मुलाखत घेण्यासाठी विरारहून मनोज आचार्य हा मित्र आला. मनोज हा माझा मुंबईतला पहिला मित्र...ज्या मुंबईने मला घाबरवलं होतं, त्या वेळी मनोजच्या मैत्रीने मला मुंबईमधलं वास्तव्य, माझं काम सुसह्य केलं होतं. मुंबईची भीती दूर केली होती. मनोज चित्रकार आहे, लेखक आहे, संगीताचा दर्दी आहे आणि अतिशय संवेदनशील माणूस आहे.
थोडा वेळ गप्पा मारून मनोज, अपूर्व अणि मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. पाटकर पती-पत्नीने आमचं स्वागत केलं. त्यांची गुणी कन्या स्निग्धाही छानशी तयार होऊन स्वागत करत होती. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मनोविकासच्या प्रांगणातच कार्यक्रमाची तयारी केलेली होती. अमोल पाटकर याने उपस्थितांचं स्वागत केलं आणि प्रास्ताविक करत मनोज आचार्य यांचा परिचय करून दिला. त्यानंतर सगळी सूत्रं मनोजच्या हातात दिली.
मनोजने एक एक प्रश्न विचारत माझा लेखनप्रवास उलगडण्यास मदत केली. विशेष म्हणजे लेखनप्रवास आणि सामाजिक कार्याचा प्रवास कसा समांतर चालत राहिलाय याची जाणीव या मित्राने करून दिली. सुरुवात करतानाच मला मासवण आणि पालघर इतकंच नव्हे, तर इथल्या ७८ आदिवासी पाड्यांनी, संस्थेच्या डॉ. सुधा रणदिवे, सुमन देशपांडे, विजया चौहान, साधना दधिच, वर्षा, इतर सगळेच कार्यकर्ते यांनी काय दिलं याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी वाटली. खरं तर अत्यंत अभ्यासू, व्यासंगी असे सुजाण श्रोते समोर होते अणि मला बोलतं करण्यासाठी सज्ज असलेला मनोज यामुळे गप्पा रंगत गेल्या. सुरुवातीलाच मनोविकास आणि माझं नातं याविषयी देखील मी बोलले. या गप्पांमध्ये औरंगाबाद आकाशवाणीमधलं कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून केलेलं काम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची कार्यकर्ता म्हणून स्त्री सक्षमीकरण आणि विज्ञान यासाठी केलेलं काम, मासवणमधलं शिक्षणाचं काम, असा सामाजिक कार्याचा धावता प्रवास, तुमचे आमचे सुपरहिरो, जीनियस, कॅनव्हास, सिंफनी, नारायण धारप, पाथफाइंडर्स अशा सगळ्या पुस्तकांचा प्रवास, पुस्तक निर्मितीमागच्या प्रेरणा, लिखाणातल्या गमतीजमती आणि वैशिष्ट्यं, वाचकांचा बळ देणारा प्रतिसाद, असं बरंच काही मी बोलत होते.
या प्रवासात जग बदलणाऱ्या ५० ग्रंथांची ओळख मला कशी झाली याविषयी मी मनोजला आणि अर्थातच उपस्थित श्रोत्यांना सांगत होते. ग्रंथ लिहायचं कधी ठरलं, या ग्रंथांचं महत्व आजही काय आहे, आपल्या आयुष्यात ग्रंथांमुळे कशाप्रकारची समृद्घी येते, डिक्शनरीचा सॅम्युअल जॉन्सन असो, की ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईमचा लेखनकर्ता स्टीफन हॉकिंग असो, स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाचं भान दाखवणारी बेट्टी फ्राईडन असो, की गणिताच्या अदभुत नगरीची सैर करवून आणणारा युक्लिड असो, प्रेमाचं आयुष्यातलं स्थान सांगणारा एरिक फ्रॉमसारखा मानसशास्त्रज्ञ असो, की मानवजातीचा प्रदीर्घ इतिहास आणि प्रवास सांगणारा युवाल नोआ हरारी असो, आयुष्याचा समतोल राखणारं वात्स्यायनाचं कामसूत्र असो, की अर्थशास्त्राचं मोल सांगणारा चाणक्य असो, बुद्घाचे विचार सांगणारा ग्रंथ त्रिपिटक असो, की प्रत्येक गोष्ट तपासून बघा, पडताळून बघा, सिद्घ झाल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं म्हणत डॉयलॉग लिहिणारा आधुनिक विज्ञानाचा पितामह गॅलिलिओ असो अशा अनेक ग्रंथांविषयी आणि ते लिहिणाऱ्या दिग्गज लेखकांबद्दल मी बोलत राहिले.... ग्रंथ बरोबरच लवकरच येऊ पाहणाऱ्या पुस्तकांविषयी देखील श्रोत्यांना सांगितलं. संवादाचा शेवट करताना मनोजने माझ्या प्रवासाचा अतिशय कमी शब्दांत नेमका आढावा तर घेतलाच, पण माझं कौतुक ऐकताना मी संकोचून गेले. मनोजसारखा मुरब्बी संवादक असल्यामुळे गप्पांची रंगत अधिक वाढली.
मनोजने आपल्या हातातला माईक खाली ठेवला आणि आमच्या चारुताईंनी समोर येत माईक हाती घेत, मासवणच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा गहिरवलेला आवाज कानात शिरत होता, बघता बघता प्रमोद, अनंता, विजया, अंकिता, रिया आणि सगळेच कार्यकर्ते माझ्या दोन्ही बाजूंनी उभे राहिले. मला वारली चित्रकला आवडते, म्हणून त्यांनी मला सुरेख अशी वारली पेटिंगची फ्रेम भेट दिली. या भेटवस्तूचं मूल्य मी जाणून आहे, ती आता माझ्या घरात कायम असणार आहे.
खरं तर वेळ कधी संपला कळलंच नाही. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत अशा प्रथितयश वर्तमानपत्रांचे पत्रकार, मासवणचे शिक्षक होते, दांडेकर, मणियार, अप्पा डिंगोरे, तुषार, विजया, रिया, प्रमोद, वर्षा, अंकिता, शितल अशी बरीच प्रेमाची माणसं जवळ येऊन बोलत होती, तुम्हाला पुन्हा पुन्हा पालघरला यावं लागेल कारण लवकरच तुमचा पुढला कार्यक्रम ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत असं सांगत होती.
आजच्या कार्यक्रमासाठी माझी मैत्रीण स्वाती प्रभुणे यांच्या बहिणीचे पती सुधीर हेही आवर्जून आले होते. त्यांना भेटून खूप आनंद झाला. मासवणला आदिवासी मुलामुलींना कम्प्युटर शिकवणारी रिया देखील आज आवर्जून आली होती. रिया ही अत्यंत गुणी आणि गोड मुलगी, मी तेव्हाही तिच्या प्रेमात होते आणि आताही आहे. याचं कारण तिचं साधं, संवेदनशील असणं मला फार भावतं. दिसायलाही जाई-जुईच्या फुलासारखी असावी अशी रिया...तिच्या आग्रहामुळे तिच्या घरी धावती भेट दिली आणि तिने केलेला बदामाचा मिल्कशेक पित आणखी 5 किलो वजन वाढवलं. त्यानंतर आमच्या वसतिगृहात राहणारी, अत्यंत सुवाच्य हस्ताक्षर असलेली, लाघवी अशी अंकिता हिच्याही घरी तशीच धावती भेट दिली. तिथे असलेल्या तिच्या ८ महिन्यांच्या रोज नावाच्या पुतणीने माझा ताबाच घेतला. पहिल्यांदाच भेटलेलो असूनही पठ्ठी माझ्याजवळ हसत बसली. फलाहार करून पुढल्या वेळी खूप वेळ एकत्र घालवू असं म्हणत अंकिताच्या कुटुंबीयांचा निरोप घेतला. रिया, अंकिता तुम्ही प्रेमाने दिलेल्या भेटी मी खूप जपून ठेवणार आहे.
रात्रीचं शुद्घ शाकाहारी जेवण तुषारने विवामध्ये आयोजित केलं होतं. भरपूर गप्पा आणि जेवणावर ताव मारून आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. गाडी पालघरहून मासवण, मनोर करत पुण्याचा रस्ता कापत होती आणि जग बदलणाऱ्या ग्रंथच्या निमित्ताने भेटलेले मासवणपासून ते पालघरपर्यंतचे सगळ्यांचे चेहरे निरोप देत होते....मी मात्र मनाशी गुणगुणत होते :
मुझको तुम जो मिले ये जहाँ मिल गया,
तुम जो हसें दिलमे मेरे दिल का कँवल देखो खिल गया......
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com