ब्रेक अप के बाद हैदराबाद 

ब्रेक अप के बाद हैदराबाद 

तारीख
-
स्थळ
हैदराबाद

(‘हैदराबाद मराठी ग्रंथ संग्रहालय शताब्दी महोत्सव’ – आपण या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल, आपल्या आदरातिथ्याबद्दल, भरघोस प्रतिसादाबद्दल आणि निखळ स्नेहाबद्दल  श्री खळदकर, देशपांडे अँड देशपांडे, परळीकर आणि उपस्थित हैदराबादकर यांची मी मनापासून आभारी आहे. )
१९ जून २०२२ या दिवशी हैदराबाद ग्रंथ संग्रहालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उद्‍घाटनपर व्‍याख्यानासाठी जायचं दोन महिने आधीच निश्चित झालं होतं. 
बघता बघता उन्हाळा संपला आणि जून महिना उजाडला, हैदराबादला प्रस्थान करण्याचा दिवस उजाडला. माझ्यासोबत अर्थातच माझी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मैत्रीण नयन कुलकर्णी असणार होती. अपूर्वकृपेने आम्ही भल्या पहाटे पुण्याच्या विमानतळावर जाऊन पोहोचलो.
चेक-इन वगैरे सगळं होताच, आम्ही ठरलेल्या वेळी आमच्या विमानात सीट क्रमांक ७ ए आणि ७ बी वर स्थानापन्न झालो. विमानाच्या खिडकीतून बघताना ढगांवरून आपण पंख लावून एखाद्या परीसारखं विहरतो आहोत असं वाटायला लागलं. मी खिडकीतून बाहेर बघत होते आणि मन भूतकाळात डोकावत होतं. 
शाळा संपून अकरावीत प्रवेश केलेली मी, काहीही कळत नसतानाही आपण आता खूप मोठे झालो आहोत असं वाटणारं वय – त्यातच कोणीतरी प्रेमपत्राद्वारे प्रेम व्‍यक्‍त केल्यामुळे त्या पहिल्याच प्रेमात आकंठ बुडालेली मी – खरोखरं ते दिवस फुलासारखे मुलायम, मृदू, मखमली….प्रत्येक प्रेमगीत जणूकाही आपल्याच मनातल्या भावना व्‍यक्‍त करण्यासाठी लिहिलेलं असावं असं वाटायचं. प्रेम लपून राहत नाही म्हणतात, तसं एक दिवस मोठ्या भावाला याचा सुगावा लागला आणि प्रेम फुलण्याआधी, बहरण्याआधी, भेटीगाठी होण्याआधीच त्या प्रेमाचा ‘दी एन्ड’ झाला. मोठ्या भावामुळे नाही तर प्रियकरात धाडस नसल्यामुळे, तो शिकत असल्यामुळे, त्याचे निर्णय आई-वडिलांवर असल्यामुळे आणि तो त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचे आई-वडील त्याला आपल्या गावी घेऊन गेले. मिलनेसे पहले बिछडल्यामुळे मी त्या काळात एकूणएक विरहगीत आळवले असतील.
त्याच दरम्यान मोठ्या भावाचं लग्न ठरलं आणि हैदराबादला खरेदी करून पुढे तिरूपतीला जायचं घरच्यांनी नक्‍की केलं. मला घरी एकटीला सोडलं तर मी ताजा ताजा  ब्रेक अप झाल्यामुळे आत्महत्या करेन की काय अशी भीती वडिलांना वाटली असावी, त्यामुळे त्या सगळ्यांबरोबर मला हैदराबादला नाईलाजाने जावं लागलं. त्या वेळी मी खूप दु:खात असल्यासारखी अर्थातच संपूर्ण प्रवासात चेहरा पाडूनच होते.
मग भराभरा कॅलेंडरची पानं उलटत गेली आणि अचानक दोन महिन्यांपूर्वी हैदराबाद मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष विवेक देशपांडे यांचा फोन आला. ग्रंथांविषयी मी बोलावं असं त्यांना वाटत होतं. मी होकार दिला. त्यामुळेच आज ‘ब्रेक अप के बाद हैदराबाद’ला मी निघाले होते.
आपण प्रवास करतो आहोत असं वाटण्यापूर्वीच हैदराबादला आमचं विमान लँड झालं. आम्ही बाहेर आलो तर ग्रंथालयाचे कार्यवाह सतीश देशपांडे आमचं स्वागत करत उभे होते. आम्ही १३ किमी लांबीच्या उड्डाणपुलावरून प्रवास करत होतो. विमानतळाच्या बाहेर पडताच दोन्ही बाजूंनी लाल-केशरी रंगांची फुलं असलेल्या झाडांनी मन प्रसन्न केलं. आपण भारताच्या बाहेर दुसऱ्या कुठल्यातरी देशात आहोत असं काहीसं वाटत होतं. त्यातच सतीश देशपांडे हा मनुष्य इतका उत्साही, प्रसन्न आणि बोलका, की आमची अनेक वर्षांची गट्टी असावी असं वाटलं. त्यातच आमच्या कॉमन स्नेह्यांच्याही ओळखी निघाल्या, मग काय – ‘आज आनंदी आनंद झाला’ अशी गाणी आसपास वाजू लागली.
काहीच क्षणात आम्ही विवेक देशपांडे यांच्या घरी पोहोचलो. चार-पाच मजली बंगलाच म्हणावा, अशा त्यांच्या टोलेजंग देखण्या वास्तूत आम्ही प्रवेश केला. चौथ्या मजल्यावर प्रवेश करताच एका सहा-साडेसहा फूट उंच, गोऱ्यापान, देखण्या, रुबाबदार व्‍यक्‍तीने आमचं ‘या’ म्हणत स्वागत केलं. विवेक देशपांडे हे आता आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमधल्या महत्वाच्या अधिकारपदावरून निवृत्त झाले आहेत. गुप्तचर संस्थेमध्ये रॉ असो वा आयबी यातल्या अधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्यांसारखी चांगल्या कामाची प्रसिद्‍धी कधीच मिळत नाही. सगळं काही गुप्तपणे चालल्यामुळे ते लोकांसमोर कधीच येत नाहीत. अगदी मृत्यू झाला, तरी पोलिसी सन्मानात, तिरंग्यात लपेटून, तोफांची सलामी देवून त्यांना निरोपही दिला जात नाही आणि असं सगळं घडणार हे माहीत असूनही अनेक तरूण गुप्तचर संस्थेत काम करण्यासाठी दाखल होतात. त्यांची बुद्धी, त्यांच्यातलं कुतूहल, जिज्ञासा त्यांना या शाखेत जाण्यास भाग पाडते. भगवदगीतेमधलं ‘फळाची इच्छा न धरता कर्म करत राहा’ सुवचन आयबी किंवा रॉ मधले अधिकारी प्रत्यक्ष जगत असतात. त्यातलेच एक विवेक देशपांडे!
विवेक देशपांडे, त्यांची पत्नी जया, शैलाताई  आणि मुलगा पराग यांच्याशी बोलून मला  परक्या ठिकाणी नाही, तर आपल्याच घरी आलो आहोत असा फिल आला. जया यांनी इतका स्वादिष्ट नाश्ता बनवला की आम्ही असा उपमा आणि चटणी दहा हज्जार वर्षांत खाल्ली नव्‍हती असं मनोमन म्हटलं.
विवेक देशपांडे यांनी आमच्या राहण्याची अतिशय उत्तम व्‍यवस्था केल्यामुळे आमचं तिथलं वास्तव्‍य अगदीच सुखाचं होतं. काही वेळानंतर आमच्या मिळून साऱ्याजणीच्या हैदराबादच्या प्रतिनिधी शुभांगी परळीकर यांच्याकडे जेवायला जायचं ठरल्यामुळे माझ्यातला हत्ती डुलत डुलत निघाला. हैदराबादच्या मध्यभागात त्यांचा सुरेखसा जुन्या पद्घतीचा टुमदार बंगला स्वागत करत होता. शुभांगी परळीकर यांनी वयाची सत्तरी ओलांडली असली, तरी त्यांच्यातला उत्त्‍साह हा १८ वर्षांच्या तरुणीला लाजवेल असा. फक्‍त मी आणि नयनच नाही, तर त्यांनी ग्रंथालयाचे अध्यक्ष खळदकर पती-पत्नी, कार्यवाह देशपांडे पती-पत्नी, कार्याध्यक्ष देशपांडे पती-पत्नी आणि त्यांचे स्नेही असं सगळ्यांना जेवायला बोलावलं होतं. त्यांच्या पंचपक्वान्नाच्या आतिथ्यामुळे आम्ही भारावून गेलो. आम्ही निघणार तेवढ्‍यात त्यांनी हैदराबादची खास ओळख असलेल्या पोचमपल्ली प्रकारचे सुरेख रंगाचे ड्रेस मला आणि नयन -दोघींनाही भेट दिले. आम्ही ‘कशाला कशाला’ असं म्हटलं खरं, पण ते घेणं भागच होतं. थँक्यू शुभांगीताई!
निवासस्थानी पोहोचताच, काहीच वेळात आम्हाला कार्यक्रम स्थळी घेऊन जाण्यासाठी नयना देशपांडे या डॉक्टर आल्या होत्या. दक्षिण भारतीय असाव्‍यात असं वाटत असलं तरी आडनावावरून आणि बोलण्यावरून त्या महाराष्ट्रीयन आहेत हे मान्य करावं लागत होतं. पिवळ्या रंगाच्या साडीतली नयना ही खरोखरंच एक मस्त मैत्रीण! हैदराबादच्या रस्त्यावरची तुंबलेली ट्रफिक, अरूंद रस्ते, गल्ल्या यातून नयना सफाईदारपणे गाडी चालत होती. हसतमुख असलेली, प्रसन्न व्‍यक्तिमत्वाची ही स्त्री मला खूपच आवडली. तिने स्वत:ला चक्‍क ड्रायव्‍हरच्या भूमिकेत टाकलं होतं आणि ड्रायव्‍हरच्या भाषेत ती आमच्याशी बोलत होती. सभागृह येताच तिने त्याच सफाईने गाडी पार्क करत आम्हाला ‘सलाम साब’ असंही म्हटलं.
ग्रंथालयाची इमारत खूप जुनी असल्याचं लक्षात येत होतं. मात्र काम करत असलेल्या सगळा स्टाफ खूप उत्साही, आनंदी आणि मदतीला तत्पर असल्याचं लक्षात येत होतं. ग्रंथालयाचं एक एक दालन ओलांडत, खुणावणारी पुस्तकांची कपाटं, ग्रंथालयांसाठी आयुष्यभर झटलेले पण आता फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झालेले मान्यवर, सुरेखशी रांगोळी बघत आम्ही सभागृहात पोहोचलो. 
सभागृह भरलेलं, मी नजर फिरवताच मला जोशी काकू आणि त्यांची मुलगी मृणाल आलेल्या दिसल्या. निर्मला जोशी औरंगाबादच्या माझ्या शेजारी, नॅचरोपॅथीचा तीन वर्षांचा कोर्स आम्ही मिळून केला होता, म्हणजे माझी वर्गमैत्रिणही. हुशार स्त्री आणि तिच्या तिन्ही मुलगी अपर्णा, वृषाली आणि मृणाल याही तितक्याच बुद्धिमान. दोघींना भेटून खूप खूप छान वाटलं. तेवढ्यात पिवळ्या टी-शर्टमधला एक तरूण समोर आला आणि त्याच्याकडे बघताच ‘हा इथे कसा’ असं मनात म्हणत ती त्याच्याकडे बघतच राहिले. तो तरूण म्हणजे आमचा विनू – विनय टांकसाळे, क्वेस्ट या संस्थेत शिक्षणावर काम करत असलेला कम्प्युटर इंजिनिअर तरुण. मला आश्चर्यचकित करायचं म्हणून त्याने तो येणार असल्याचं मला आधी सांगितलं नव्‍हतं म्हणे. आम्ही कडकडून भेटलो. माझी पुण्यातली केअरटेकर असलेली मैत्रीण आसावरी हिचे हैदराबादस्थित असलेले अरूण काका दोन-अडीच तासांचं अंतर कापून माझं व्‍याख्यान ऐकायला आले होते. त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून आसावरीचेच नव्‍हेत तर ते माझेही काका असल्यासारखं वाटलं. खरं तर तिथे आलेले लोक माझ्यासाठी अनोळखी असले, तरी ते अनोळखीपण कुठेच जाणवत नव्‍हतं. 
सुरेखशा निवेदिकेने आम्हाला व्‍यासपीठावर आमंत्रित केलं. दीप प्रज्वलन आणि ग्रंथालयाच्या लोगोचं उद्धाटन केलं. सतीश देशपांडे यांनी ग्रंथालयाचाआजवरचा प्रवास, देणगीदाते यांच्याविषयी संक्षिप्त असं प्रास्ताविक केलं. त्यानंतर ग्रंथालयाचे अध्यक्ष खळदकर यांनी आपलं मनोगत व्‍यक्‍त केलं. शुभांगी परळीकर यांनी एक अत्यंत सुरेख अशी शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून माझं स्वागत केलं. माझा परिचय देखील करून झाला होता आणि मी बोलण्यासाठी माईक हातात घेणार, तेवढ्यात माझ्या नजरेचा शोध थांबला. कारण माझे मित्र, तेलंगणा/राचाकोंडाचे पोलीस कमिशनर – सभागृहात प्रवेश करत होते. 
महेश भागवत यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी, मानवी तस्करी थांबवण्यासाठी जे अतुलनीय असं काम केलंय त्यासाठी शेकडो/हजारो वेळा नतमस्तक झालं पाहिजे. त्यांचं मृदू सौम्य व्‍यक्‍तिमत्व, कलासक्‍त असणं, साहित्यावरचं प्रेम आणि अभ्यास बघून हा माणूस पोलीस खात्यात कसा याचं आश्चर्च वाटतं. मात्र मुळात कार्यकर्त्यांचा पिंड असल्यामुळे, त्यांनी आपल्यातली माणुसकी आणि मानवतावाद जिवंत ठेवल्यामुळे तेलंगणाचा सर्वसामान्य नागरिक त्यांना सोडायला तयार नाही अशी त्यांची ख्याती. अमेरिकेसारख्या देशानंही ‘रिअल हिरो’ म्हणून त्यांना सन्मानित केलं. असे हे महेश भागवत -ज्यांची ओळख कल्याण तावरे या माणूसवेडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मित्रामुळे ७-८ वर्षांपूर्वी झाली. महेश भागवत यांनी आयोजकांची परवानगी घेत व्‍यासपीठावर येऊन सुरेखशी शॉल आणि भरगच्च असलेल्या फुलांनी माझा सन्मान केला. 
माझा श्रोत्यांबरोबरचा संवाद सुरू झाला. हैदराबादकरांसमोर पहिल्यांदाच बोलत असल्यामुळे खूप काही शेअर करायचं होतं. जवळ असलेल्या वेळात त्यांना लेखन प्रवासातले महत्वाचे टप्पे मी उलगडून दाखवले. सुपरहिरो, जीनियस, कॅनव्‍हास असं करत अनेक ग्रंथांविषयी आणि जग बदलणारे ‘ग्रंथ’ याविषयी मी बोलत होते. अर्थातच यातली ध्येयवेडी माणसं, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक सगळ्यांना बद्दल, त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल, त्यांच्या झपाटलेपणाबद्दल, त्यांच्या शोधाबद्दल बोलत होते, वेळ वेगानं पळत होता आणि आता थांबायला हवं अशी जाणीव होताच, मला आसावरीचे काका समोर दिसले. त्यांची इच्छा होती, मी एखाद्या गाण्यानं शेवट करावा. दोनच ओळी गाईन असं म्हटलं असलं तरी वैभव देशमुखची कविता ओठी आली की ती जायला तयारच होत नाही. त्यामुळे ही कविता सुरात ऐकवत मी अरूणकाकांच्या चेहऱ्यावरचं समाधान टीपत माझ्या व्‍याख्यानाचा शेवट केला. विवेक देशपांडे यांनी समारोप केला. माझ्या व्‍याख्यानातल्या काही मुद्द्यांवर ते बोलले. ‘वाचून झालेल्या पुस्तकांचं काय करावं हा प्रश्न नेहमीच पडायचा पण मी अलेक्झांड्रियातलं ग्रंथालय, नालंदा विश्वविद्यापीठातलं ग्रंथालय यांच्या हकिगती ऐकल्यामुळे आता यापुढे आपल्याला पुस्तकांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला कधीही पडणार नाही तर त्यांची मी योग्य व्‍यवस्था करेन’, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
सध्या हैदराबादमध्ये अनेक घडामोडी घडत असताना, आपल्या व्‍यस्त दिनक्रमात आणखीनच कामं वाढलेली असताना देखील महेश भागवत कार्यक्रमाला आले आणि मुख्य म्हणजे संपूर्ण व्‍याख्यान होईपर्यंत ते थांबले. व्‍याख्यान आवडल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. थँक्यू महेश भागवत सर आणि थँक्यू कल्याण तावरे. 
हैदराबादकरांचं वैशिष्ट्य म्हणजे सभागृहात आलेल्या प्रत्येकानं मला भेटून, बोलून, व्‍याख्यान आवडल्याचं सांगून मगच निरोप घेतला. प्रत्येकाबरोबर फोटो सेशनही झालं. विशेषत: सेल्फी! आर्किटेक्ट धर्म पती-पत्नी, विनित, अरुण दावळेकर, माधव चौसाळकर, किती कितीजणांची नावं घ्यावीत? प्रत्यक्ष लोकांबरोबरचा संवाद, त्यांना भेटणं, त्यांची ओळख हे सगळं मला खूप आवडतं. अशा ठिकाणी असामान्य काम करणारी अनेक माणसं भेटतात. त्यांच्यातली कला, कौशल्य बघून खूप चांगलं वाटतं. नवनवीन माणसं कायमची जोडली जातात. एकूण प्रवासाची वाट सुखाची होते. प्रिया नावाची मैत्रीण कार्यक्रमाला काही कारणांनी येऊ शकली नाही, पण तिची टीम – दिपाली देशपांडे भेटली. त्यांना ‘फिर शमा जलती रही’ नाटकासाठी शुभेच्छा दिल्या.
रात्री ग्रंथालयातच जेवणाची व्‍यवस्था होती. बेसीभेली भात, फुलका, भरल्या तोंडल्याची भाजी, भेंडीची भाजी, कोशिंबीर, चटणी, जिलेबी, ताक, असं खास दाक्षिणात्य पद्धतीचं सुग्रास जेवण गप्पा मारत फस्त केलं. त्यानंतर आमची लेडी डॉन ‘नयना’ हिने निवासस्थळी पोहोचवलं.
सकाळी उठताच पुन्हा एकदा जयाताईंच्या हातचा अप्पम, चटणी, पोंगल भात, चिवडा, मेथांबा असे पदार्थ भरपेट खात त्यांचा निरोप घेतला. तिथून बेगमपेठ इथलं ‘नल्ली’चं शो-रूम, साड्यांची खरेदी, मग राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कूच केलं.
चेक-इन वगैरे काही क्षणात झालं आणि आम्ही आत पोहोचलो. हैदराबादचं विमानतळ खरोखरंच बघण्यासारखं. त्यातच खरेदीची आवड असली तर आतली एकसे एक दुकानं बघताच मन ‘चंगळवादी बन मना, चंगळवादी बन’ असं म्हणतं. सजलने सांगितल्यामुळे कराचि बिस्किट्स, तिथली फेणी आम्ही खरेदी केली. तिथली खास बिर्याणी विकत घ्यावी आमच्या लक्षातच आलं नाही. अनेक शो-रूममध्ये जाण्यासाठी पावलं हट्ट धरत होती. पण मनाला दटावून पुण्याकडे निघत असलेल्या २२ बी गेटजवळ पोहोचलो. विमानात शिरताच मी नयनकडे बघितलं. आशा साठे या मैत्रिणीमुळे नयन ही मैत्रीण मला मिळाली. आशाताईंप्रमाणेच हिचं मैत्र मला प्रत्येक भेटीत, खूप काही शिकवतं. तिच्याही नकळत मी तिच्याकडून अनेक गोष्टी घेत राहते, वेचत राहते. 
विमानानं आकाशाकडे झेप घेतली, मी कापसांचे गालिचे असलेल्या विखुरलेल्या ढगांकडे खिडकीतून बघितलं – ते मला विचारत होते, ‘ब्रेकअप के बाद हैदराबाद कसं वाटलं?’ मी हसून समाधानाने ‘बोलेतो’ एकदम खुशीत मान डोलावली!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
आसावरीच्या अरुण काकांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया 
आसावरी, काल दीपा देशमुख यांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. कार्यक्रमाच्या आधी तुझी ओळख देऊन त्यांना भेटलो. त्यांना म्हणालो तुम्ही भाषण तर छान देताच  व ते मी युट्युब वर  ऐकले आहे पण आज मी आलो आहे ते तुमचे गाणे ऐकायला कारण तुमची असंख्य गाणी पाठ आहेत व  तुम्ही ती गाताही. त्या म्हणाल्या गाणं तर नाही पण शेवट कवितेने करेन व त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट वैभव देशमुख यांच्या, ‘भवताली कुणी नसताना, आठवते का काही’ या सुंदर कवितेने केला व माझी इच्छा पूर्ण केली. कार्यक्रमानंतर घरी जायला साधारण दोन तास लागत असल्याने त्यांना न भेटताच निघालो  व त्यामुळे त्यांना धन्यवाद म्हणायचे राहून गेले पण माझ्या वतीने ते तू त्यांना जरूर कळव. त्यांचे बोलणे तर सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले.  अर्थात तू  त्याचा अनुभव नेहमीच घेतेस. 
मला विशेषत्वाने त्यांचे भाषण आवडले ते त्यांच्या  शैलीने. त्या जिनियस, कँनव्हास , तुमचे आमचे सुपर हिरो, या पुस्तकांमधील प्रत्येक व्यक्ती/कलाकाराबद्दल ज्या आत्मियतेने बोलतात त्याला तोड नाही. जणूकाही त्या व ह्या व्यक्ती शाळेत बरोबरच शिकले आहेत असं वाटतं. खरंच त्यांच्यांतली ही 12/14 वर्षाची मुलगी त्यांनी सतत जागृत ठेवली आहे.  हे असामान्य.
 

कार्यक्रमाचे फोटो