आयटी इंजिनिअर जयवंत पाटील ‘शेतकरी’ बनतो तेव्हा......

आयटी इंजिनिअर जयवंत पाटील ‘शेतकरी’ बनतो तेव्हा......

जयवंतच्या आग्रहामुळे आणि मला आलेल्या अनुभवामुळे मी हम्पी उत्पादनाची, ज्यात दूध, तुप, आणि सेंद्रीय पद्घतीने पिकवलेलं धान्य यांची एक क्लिप टाकत आहे. जरूर पाहा आणि या हम्पी उत्पादनाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी, जयवंतला जाणून घेण्यासाठी हा लेखही जरूर वाचा.
आयटी इंजिनिअर जयवंत पाटील ‘शेतकरी’ बनतो तेव्हा......

काही वर्षांपूर्वी मी बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला आणि बलराज साहनी यांची अप्रतिम भूमिका असलेला ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट बघितला होता आणि तेव्हापासून त्या चित्रपटानं माझ्या मनाचा जो ताबा घेतला, तो आजपर्यंत! या चित्रपटाला त्या वेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. भारतातल्या १० उत्कृष्ट चित्रपटात ‘दो बिघा जमीन’ ची गणना होते. पण हा चित्रपट गल्लाभरू नसल्यानं त्या वेळी फारसा चालला नाही. या चित्रपटानं भारतीय सिनेमात नवयथार्थवादाची सुरुवात केली. खरं तर हा चित्रपट म्हणूच नये. यात भारतातल्या शेतकर्‍याची विदारक स्थिती दाखवली होती. दुष्काळामुळे हवालदील झालेला शेतकरी, सावकाराचं कर्ज आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची झालेली फरफट आणि अखेर डोळ्यांदेखत हातातून गेलेली जमीन.......हे भारतीय शेतकर्‍याच्या भीषण अवस्थेचं चित्र बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटात १९५४ साली दाखवलं होतं. यात रोजच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण झाल्यानं गावाकडून शहराकडे धावणार्‍या मनुष्याचं जगणं बघायला मिळतं. पण त्याचबरोबर शहरात जाऊनही त्याच्या हाती काहीच लागत नाही. वाट्याला येतं ते फक्त बकाल जीवन! त्याचं सुख संपल्यातच जमा होतं. सुखाची स्वप्नंही तो बघू शकत नाही कारण ती स्वप्नं बघायलाही त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, इतका तो त्या घाण्याच्या बैलासारखा जुंपला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षांनतरही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं वास्तव आज तसंच बघायला मिळतं आहे. त्या वेळी बिमल रॉयनं उपस्थित केलेले प्रश्‍न आजही उत्तराच्या शोधात उभे आहेत हेच खरं! 

दरवर्षी शेतकर्‍यांची प्रसिद्ध होणारी आत्महत्यांची आकडेवारी पोटात खड्डा निर्माण करणारी आहे. सरासरी दर २८ ते २९ मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतो. भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटले जाणार्‍या एम.एस. स्वामीनाथन यांनी आपल्या एका लेखात शेतीमधल्या अरिष्टाविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे. 'आपल्या देशाचं भवितव्य बंदुकीवर अवलंबून नसून धान्यावर अवलंबून आहे आणि शेतीत पुरेशी गुंतवणूक करून नीट लक्ष दिलं नाही तर देशावर मोठं संकट मात्र नक्कीच कोसळेल' असं भाकीतही त्यांनी केलं आहे. तसंच शेतीमध्ये आपण आजपर्यंत घातक रसायनांचा जो मारा केला, त्याचे परिणामही आज भोगावे लागत आहेत. अतिरेकी रसायनांच्या मार्‍यामुळे आणि किटकनाशकांमुळे पंजाबमधल्या जमिनींचं वाळवंटीकरण वेगानं होत आहे. ही सगळी आजची आपल्या शेतीची अवस्था आहे आणि त्यातच 'शेती करणं म्हणजे कर्जबाजारी होऊन मृत्यूला आमंत्रण देणं' हे रुजल्यामुळे आहे तोही जमिनीचा तुकडा विकून बहुसंख्य शेतकरी शहराकडे धावताना दिसतात. 
अशा वेळी ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटातलं या चित्रपटातलं मन्नाडेच्या आवाजातलं गाणं मनात आशावाद निर्माण करतं ः 

धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के 
मौसम बिता जाये, मौसम बिता जाये
अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा
कौन कहे इस और तू फिर आये ना आये
मौसम बिता जाये, मौसम बिता जाये

या गाण्यातल्या शब्दांप्रमाणे ‘तू काहीतरी असं कर आणि आपलं नाव इथं कोरून जा’ या कवीच्या म्हणण्याप्रमाणे आयटीमधला बीई इलेक्ट्रॉनिक्स झालेला आणि मॅनेजमेंटचीही पदवी प्राप्त केलेला उच्चशिक्षित तरूण जेव्हा शहरातून शेती करण्यासाठी खेड्याची वाट धरतो तेव्हा जगात चांगल घडवणारी माणसं आहेत, ती बदल घडवून आणू शकतात यावरचा विश्‍वास दृढ होतो! खरं तर जयवंत पाटील हा आयटी क्षेत्रात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पगारावर उच्च पदावर काम करायला लागला होता. शेती कशाशी खातात हेही त्याला ठाऊक नव्हतं. असं असतानाही त्याला शेती का बोलावत होती?

जयवंतची आयटी क्षेत्रातली नोकरी व्यवस्थित सुरू होती. मात्र काहीच दिवसांत आपलं मन इथं रमत नाहीये आणि आपल्याला इथं आनंदही मिळत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. काय करायला हवं हे मात्र त्याला काही केल्या कळत नव्हतं. कधी कधी लहानपणी सुट्टीत मामाच्या गावी शेतावर गेल्याच्या आठवणी जयवंतला आठवत असत. त्यातूनच एके दिवशी वीज चमकावी तसा शेती करण्याचा विचार मनात आला. त्यानं लगेचच आपल्या शेतीत काम करणार्‍या आणि संशोधन करणार्‍या मित्रांशी चर्चा करायला सुरुवात केली. 

या क्षेत्रातल्या अडचणी, अडथळे आणि अपयश ठाऊक असतानाही जयवंतचं अस्वस्थ मन त्याला माघार घेऊ देत नव्हतं. जयवंतनं आपल्या आई-वडिलांजवळ मनातली गोष्ट बोलून दाखवली. त्याच दरम्यान जयवंतचं लग्नही ठरलं होतं. त्यानं आपल्या भावी पत्नीजवळही मनातली खदखद व्यक्त केली. ती, तिच्या घरातले आणि जयवंतचे आई-वडील सगळ्यांनाच जयवंतच्या मनातली ही अस्वस्थता समजत होती, पण त्यावरचा उपाय म्हणजे शेती ही गोष्ट काही केल्या त्यांना सुखावणारी नव्हती. कारण शेतीमधलं भीषण वास्तव त्यांना भेडसावत होतं. तसंच वर्षानुवर्षं शेती करणार्‍याला त्यातले प्रश्‍न सोडवता येत नसताना ज्याला शेतीमधलं शून्य ज्ञान आहे तो केवळ मनात आलं म्हणून नोकरी सोडून शेती करायचं म्हणतोय हे त्यांच्या गळी उतरत नव्हतं. पण जयवंतच्या हट्टापुढे त्यांनी माघार घेतली आणि आपला पाठिंबा दिला. 
अहमदनगरजवळ पारनेर या ठिकाणच्या वाडेगव्हाण नावाच्या एका गावात जयवंतनं आपल्या दोघा मित्रांना बरोबर घेऊन ११ एकर जमीन खरेदी केली. नोकरीतले काही पैसे साठवले होते, त्या बचतीचा अशा वेळी उपयोग झाला. जयवंत या दरम्यान अनेक शेतीतज्ज्ञांना आणि शेती अभ्यासकांना भेटला. आपल्या मनातल्या शंकाकुशंका यांचं निरसन त्यानं करून घेतलं. इतकंच नाही तर अनेक शेतकर्‍यांशी भेटून त्यानं त्यांचं पारंपरिक शेतीतलं ज्ञान आणि त्यांचा अनुभव याविषयी चर्चा केली आणि त्यावरही सखोल अभ्यास केला. आता उंटावरून शेळ्या हाकणं करून चालणार नव्हतं. जयवंतला प्रत्यक्ष मातीत हात घालून काम करायचं होतं. तोच या शेतीचा मालक असणार होता आणि तोच शेतमजूर! कंपनीनंही जयवंतला शुक्रवारची सुट्टी मान्य केली. जयवंत पुण्याहून दर शुक्रवारी वाडेगव्हाणला पोहोचायचा. सोमवारी परत आपल्या कंपनीत दाखल व्हायचा. या जमिनीत पाण्याची सोय नव्हती, ती त्यानं सर्वप्रथम केली. शेतावर एका जोडप्याला कामासाठी नेमलं. आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकर्‍यांशी जयवंतनं मैत्री केली. सुरुवातीला शेतीचा अनुभव नसल्यानं अनेक गोष्टीत अपयश येत गेलं. सगळ्यात सुरुवातीला जयवंतनं शेतीतून झेंडूच्या फुलांचं उत्पादन काढलं. मात्र वितरणाचा अनुभव नसल्यानं आणि कधी काय पिकवावं याचा अनुभव गाठीशी नसल्यानं त्यात त्याला तोटा सहन करावा लागला. 

शेतीतला अनुभव जेवढा महत्त्वाचा तेवढंच त्यानंतरचं मालाचं वितरणही महत्त्वाचं ही गोष्ट जयवंतच्या लक्षात आली. यातूनच बाजारपेठेचा अभ्यास झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं उपयोगात आणता येईल यावरही जयवंतनं अभ्यास केला. शेती करताना आधुनिक यंत्रणा वापरण्याचं ठरवलं आणि ते अंमलात आणलं. आजूबाजूच्या छोट्या छोट्या शेतकर्‍यांना सामूहिक शेतीचं महत्त्व पटवून देत त्यांनाही बरोबर घेतलं. रसायनांचे दुष्परिणाम ठाऊक असल्यानं जयवंतनं सेंद्रीय शेतीवरच आपला भर ठेवला. सेंद्रीय शेती करायचं म्हटल्यावर त्याला जैविक खतं, किटकनाशकं कशी तयार करायची याचाही अभ्यास त्याला करावा लागला. स्वतः या गोष्टी करून त्यांचा यशस्वी वापर त्यानं करून बघितला. सुरूवातीला जयवंतनं तागाचं पीक घेतलं, तेव्हा त्यानं राख, शेण, गोमूत्र, लिंबोळीचं मिश्रण यांच्या एकत्रिकरणानं फवारणी केली. राखेमध्ये पोटॅशियम जास्त असल्यानं तागाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आणि परिणाम कमी पाण्यातही तागाचं पीक भरभरून आलं. जयवंतनं ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. 

शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाची समस्या होती ती शेतमजूरांची! अशा वेळी जयवंतनं त्यावर तोडगा काढला. त्यानं आपल्याकडे ज्या शेतमजूर स्त्रिया काम करतात, त्यांच्यासाठी दर आठवड्याला एक चिठ्ठी (लकी ड्रॉ प्रमाणे) काढायला सुरुवात केली. ज्या स्त्रीचं नाव चिठ्ठीत निघेल तिला एक गृहोपयोगी वस्तू भेट द्यायला सुरुवात केली. या भेटवस्तूचं अप्रुप असल्यानं स्त्री मजूरांची संख्या घटली तर नाहीच, उलट प्रत्येक आठवड्याला आजची भेटवस्तू काय असेल आणि ती कोणाला मिळेल याची उत्सुकता आणि चर्चा स्त्रियांमध्ये सुरू झाली. 

जयवंत शेती करताना अनेक गोष्टी शिकला. एकाच वेळी एकच पीक घेतलं आणि कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर सगळं पीक जमीनदोस्त होतं आणि शेतकरी कोसळून पडतो. अशा वेळी एकाच वेळी एका पिकाबरोबर दुसरं (दुय्यम) पीक कुठलं घेतलं पाहिजे, नुकसान होण्याचा दर कमी कसा केला पाहिजे हेही जयवंत शिकला. जयवंतनं आसपासच्या शेतकर्‍यांनाही सेंद्रीय शेतीचं महत्व पटवून दिलं आहे. रासायनिक शेती करण्यानं विनाकारण खर्च वाढतो असं त्याचं म्हणणं आहे आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वेगळेच. सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची होणारी धूप थांबते आणि जमिनीची क्षमताही वाढते. डोंगराळ भागावर शेती फुलवणार्‍या आणि भरपूर पीक घेणार्‍या जयवंतला लोक बघताहेत त्यामुळे त्यांचा त्याच्यावरचा आणि त्याच्या सेंद्रीय शेतीवरचा विश्‍वास वाढलाय. आता तेच जयवंतकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. सेंद्रीय शेतीमालाला मागणी यावी यासाठी जयवंतनं ‘ओ भाजीवाले डॉटकॉम’ नावाची वेबसाईट सुरू केली आहे. 

या सगळ्यांमधून ‘द ऑर्गनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी एप्रिल २०१६ मध्ये जयवंतनं स्थापन केली. आज जयवंतला त्याच्या कामात मालविका गायकवाड ही त्याची सहकारी बरोबरीनं मदत करतेय.  आपल्या ब्रॅन्डचं नाव 'हम्पी ए-२' असं ठेवून ऑनलाईन बाजारपेठेत जयवंतनं देशी गाईचं दूध विक्रीसाठी उपलब्ध केलं. शेतकर्‍यांकडून गोळा केलेल्या देशी गाईच्या दूधावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्याजवळ भूगाव इथे जयवंतनं पाश्‍चरायझेशन प्रक्रियेसाठीचा प्लॅन्ट उभारला आहे.  

आपण बाजारात उपलब्ध असलेलं कुठलंही दूध घेतलं तरी ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळतं. हेच प्लॅस्टिक कर्करोगाला हाक देणारं आहे. त्यामुळे आपण दूध न पिता प्रत्यक्ष रोगाला आमंत्रण देतो. जयवंतनं हेच दूध काचेच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. देशी गाईचं दूध (गीर गाय, साहिवाल गाय) आपल्या आरोग्याला कसं उपकारक आहे याबद्दल लोकांमध्ये जयवंत आणि मालविका जनजागृती करताहेत. तसंच दूधाचा भाव शेतकर्‍याला योग्य तो मिळावा यासाठी ते शेतकर्‍यांकडून ४० ते ४५ रुपये लीटर या भावानं दूध खरेदी करतात. त्यांनाही योग्य भाव मिळतो आणि ग्राहकांना थोडा जास्त भाव पडला तरी त्यांना खात्रीशीर, भेसळमुक्त दूध मिळतं. 

ए-२ दूध हा काय प्रकार आहे हे आधी आपण समजावून घेऊ. ए-१ दूध म्हणजे परदेशी गायींचं दूध होय. (जर्सी, होलस्टेन वगैरे आणि ए-२ दूध म्हणजे देसी गायींचं दूध!!! आज जयवंत आणि मालविका यांच्या प्रयत्नांमधून फक्त पुणे शहरात शेकडो लोक ए-२ दूधाचा लाभ घेताहेत. आता रोज नवनवीन शेतकरी आपल्या देशी गाईचं दूध जयवंतला विक्रीसाठी देण्यासाठी संपर्क साधताहेत. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याविषयी जागरूक असलेले नागरिक जयवंतशी संपर्क साधून ऑन लाईन ए-२ दूधाची मागणी नोंदवताहेत. दूधाबरोबरच देशी कोंबडीची अंडी, तूप वगैरे खाद्यपदार्थही जयवंतने उपलब्ध करून दिले आहेत. 

शेतीविषयी काहीही माहिती नसताना जयवंतनं या क्षेत्रात २००९ साली झपाटलेल्या अवस्थेत उडी घेतली. मात्र त्यानं त्यातला सगळा कारभार जाणतेपणानं केला. शेती करणं किंवा दूधाचा व्यवसाय करणं म्हणजे एक कंपनीच चालवण्यासारखं आहे, असं जयवंत म्हणतो. इथल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून शेती ते ग्राहक यातले मध्यस्थ जयवंतनं काढून टाकले आहेत. ऑन लाईन विक्री उपलब्ध करून दिल्यामुळे वितरणाचा नवा मार्गही शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिला आहे. तसंच सेंद्रीय शेती (bभाज्या आणि फळं) आणि ए-२ दूध यांच्यामुळे लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली आहे. तसंच जयवंतचे आई-वडील आणि डॉक्टर पत्नीही प्रोत्साहन देताहेत. 

'आयटी ते शेतकरी' या जयवंत पाटील याच्या प्रवासावरचा एक धडा अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात सामील करण्यात आला आहे. एम.एस. स्वामीनाथन यांनीही जयवंतच्या कामाची त्याला पत्र पाठवून प्रशंसा केली आहे. शेतीमध्ये अनिश्‍चिततता आहे, अनेक समस्या आहेत, असं असतानाही जयवंतचा मूळ स्वभाव अडचणींचा बाऊ करण्याचा नसल्यामुळे तो हताश होत नाही. उलट समोर आलेल्या आव्हानांना तोंड देत त्यावर उपाय शोधून पुढे जातोय. 'कुठल्याही कामातला निर्मितीचा आनंद खूप मोठा असतो आणि तो मला मिळतोय' असं जयवंत म्हणतो. 

दीपा देशमुख, पुणे
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.