शिन्झेन किस - शिनइची होशी - निसीम बेडेकर
शिन्झेन किस - शिनइची होशी - निसीम बेडेकर लघुकथा वाचताना मला नेहमीच रशियन साहित्यिक चेकॉव्ह आवडतो. त्याच्या छोट्याशा कथेच्या शेवटी घेतलेल्या वळणानं मन स्तिमित होतं. त्या कथानकातून बाहेर पडायला तयार होत नाही. तसंच चेकॉव्ह प्रमाणेच जगप्रसिद्ध असलेला जपानी लघुकथेत दादा असलेला साहित्यिक म्हणजे शिनइची होशी! तीन ते चार पानांपेक्षा त्याची कथा जास्त मोठी मुळीच नसते. शिनइची होशी याच्या विज्ञानकथा देखील खूपच लोकप्रिय आहेत. नुकतंच रोहन प्रकाशनानं Rohan Champanerkar Rohan Prakashanशिनइची होशी याच्या २१ जपानी लघुकथा आणि तीन दीर्घकथा असलेलं निसीम बेडेकर यांनी अनुवादित केलेलं 'शिन्झेन किस' हे पुस्तक वाचलं. सगळ्यात जास्त आवडलं ते राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले या चित्रकारद्वयींनी रेखाटलेलं मुखपृष्ठ आणि या पुस्तकाला थेट जपानच्या वातावरणात नेणारा पुस्तकाचा शीर्षक फॉन्ट! पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप काही बोलून जातं. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही आकर्षित करेल असं मुखपृष्ठ असल्यानं मी कितीतरी वेळ तेच न्याहाळत बसले. इतर देशांमधला लेखक जेव्हा काही लिहितो, तेव्हा ते लिखाण वाचताना त्याची लेखनशैली, त्याच्या लिखाणातले संदर्भ, त्याच्या लिखाणाचे विषय याबरोबरच मानवी जीवनाचे अर्थ हा लेखक कसकशा पद्धतीनं शोधतो याविषयीचं कुतूहल शमतं. तसंच मूळ लेखकाचं लिखाण अनुवादित करणं ही खूपच कठीण गोष्ट असते. कारण आपल्या साच्यात ती गोष्ट मूळ अर्थाला बाधा न येता बसवणं हे खूपच आव्हानात्मक काम असतं आणि ते आव्हान निसिम बेडेकर यांनी लीलया पेललं आहे. त्यांची 'बोक्कोचान' आणि 'राशोमोन आणि इतर जपानी कथा' ही अनुवादित पुस्तकं देखील वाचकांच्या पसंतीसउतरली आहेत. शिनइची होशी यांच्या लघुकथा वाचताना एका वेगळ्याच विश्वाचे आपण भाग बनतो. कथा पटकन जरी संपत असली, तरी त्यातला थरार किंवा उत्कंठा आता काय घडणार यानं बेचैन होतं. मानवी मूल्यं आणि जगण्याचा आटापिटा यातल्या द्वंदात मन सापडतं. कथेतला नायक किंवा इतर पात्रं आता काय करतील, या प्रसंगामधून कसा मार्ग काढतील यानं प्रत्येक क्षणी मन धास्तावतं, तर कधी आश्वस्तही होतं. सध्याच्या कॉर्पोरेट जगाची जी स्वकेंद्रित मानसिकता आहे, त्यावरची पहिलीच कथा ‘कंपनीचं रहस्य’ ही आहे. एका बुद्धिमान, चालाख अशा व्यक्तीला एका कंपनीत काम करण्यासाठी निवडलं जातं, पण त्याला ती नोकरी न देता एक प्रस्ताव समोर ठेवला जातो. तो प्रस्ताव असतो. त्यानं प्रतिस्पर्धी कंपनीचा इंटरव्ह्यू द्यायचा आणि तिथं नोकरी करायची. ती का करायची, त्यामुळे पहिल्या कंपनीचा काय फायदा होणार असतो, कथेच्या नायकाचा प्रवास कसकसा घडतो अशी ही पहिली कथा आहे. संकटकाळी, प्रतिकूल परिस्थितीत माणसं कशी तोंड देतात याविषयी देखील काही कथा बोलतात. मोह होत असूनही मी सगळ्या कथांविषयी लिहिणार नाही. कारण तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे. जरूर वाचा शिन्झेन किस!!! दीपा देशमुख, पुणे
Add new comment