माझे सुपरहिरो!
काल आसावरीशी बोलत असताना ती म्हणाली, ‘लहान असताना माझा आवडता हिरो जितेंद्र होता.’ त्या वेळी तो तिला ठोकळा वगैरे मुळीच वाटला नव्हता म्हणे. त्याचं दिसणं, त्याचं बोलणं, त्याचं वाकडंतिकडं नाचणं - तिला सगळच आवडायचं. तिने त्याचे पोस्टकार्डवर मिळायचे तसे दोनएकशे फोटो जमवले होते. ती भूतकाळात जाऊन पोहोचली होती आणि तिच्या डोळ्यासमोर बहुतेक तो जितेंद्र नृत्याच्या पोझमध्ये उभाच असावा. तिच्या चेहर्यावर हासू उमटलं होतं. हीच आसावरी पंधरा दिवसांपासून ‘मला बोअर होतंय, कंटाळा आलाय यार’ असं सारखं म्हणत होती. पण या जितेंद्रने क्षणात तिचं बोअर होणं, कंटाळलेपण नाहिसं करून टाकलं होतं. तिचा चेहरा इतका खुलला होता की मीही तिला जास्त न चिडवता तिच्यासह तिचं 'जितेंद्र प्रेम' स्वीकारलं. हळूच तिनं मला प्रश्न केला, 'तुला कोण आवडायचं ग?'
मला तर कळायला लागलं तसा शशी कपूर हा हिरो आवडायला लागला होता. 'जब जब फूल खिले', 'वक्त, हसीना मान जायेगी', 'कन्यादान', 'प्यार का मोसम', 'अभिनेत्री', 'शर्मिली', 'आ गले लग जा', 'चोर मचाये शोर', 'प्रेम कहानी', 'चोरी मेरा काम', 'फकिरा', 'दुसरा आदमी', 'काला पत्थर', 'सुहाग', 'दो और दो पॉंच', असे अनेक चित्रपट मी बघितले! शशी कपूरमधला हळुवारपणा, समंजसपणा आणि त्याच वेळी त्याच्यातला अवखळपणा मला खूपच आवडायचा. तो कोणाला फसवेल, चोरी करेल, खोटं वागेल असं कधीच वाटायचं नाही. त्याच्या खरेपणाबद्दल मनात कधी शंकादेखील यायची नाही.
त्यानंतर मात्र एका वादळी हिरोनं आयुष्यात प्रवेश केला. तो आला आणि त्यानं आपणच एकमेव असलो पाहिजेत अशा रीतीनं ठसा उमटवला. त्याचं नाव होतं अमिताभ बच्चन! शहेनशहा, ऍन्थनी, विजय, वगैरे वगैरे! त्याचा पहिला चित्रपट बघितला तो 'जंजिर'! त्या चित्रपटातला त्यानं उभा केलेला पोलीस अधिकारी इतका आवडला की पोलीस अधिकारी असावा तर अमिताभ बच्चनच असं मनाला वाटून गेलं. त्यानंतर बघितला 'दीवार'! मग मन जरा बिथरून गेलं. पोलीस अधिकारी का गुंड...? आपल्याला कोणाच्या बाजूनं उभं राहायचंय हेच कळेनासं झालं. पण अमिताभची झालेली परवड, त्याची लहानपणापासूनची झालेली फरफट, त्यानं स्वीकारलेला चुकीचा मार्ग सगळं मनाला भिडत गेलं. तो चुकीचा आहे असं मानायला मन तयार होत नव्हतं. त्यामुळे नकारात्मक भूमिकेतला एक गुंड अमिताभ हाच चित्रपटाचा आणि माझा हिरो होता. त्याचे सुरुवातीचे पडेल चित्रपट 'बंधे हाथ', 'बन्सी बिरजू', 'परवाना', 'गहरी चाल', 'सौदागर', वगैरे केवळ त्याच्या प्रेमापोटी बघितले. चित्रपट सुरू झाला की त्याची दमदार एन्ट्री, त्याची जबरदस्त अशी संवादफेक, त्याचा त्याच्या आईशी, बहिणीशी बोलताना झालेला हळुवार काळजीचा स्वर, तर त्याच वेळी अन्यायाच्या विरुद्ध लढताना जणू काही त्याच्यातला ज्वालामुखी उद्रेक होऊन केव्हाही बाहेर पडेल असं वाटावं असा त्याचा धीरगंभीर आवाज ....सगळंच कसं मनाला स्पर्शून जाणारं होतं. तो दहाच काय पण एकाच केळी शंभर गुंडांना मारू शकतो अशी खात्री वाटायची. त्याचं अनाथपण मनाला कातर करून सोडायचं. त्यानं दारू वगैरे प्यायली तरी ‘जाऊ देत, तो बिचारा दुःख विसरण्यासाठी दुसरं काय करणार?’ असं वाटायचं. काहीही झालं तरी विजय त्याचाच झाला पाहिजे असं मन म्हणायचं. त्याच्यासमोर इतर सगळेच कसे दुय्यम होऊन जायचे. बघता बघता त्याची आई, त्याची बहीण, त्याची प्रेयसी, त्याचे शत्रू सगळेच धूसर होऊन जायचे आणि शिल्लक राहायचा फक्त तो आणि तोच! ही त्याची मक्तेदारी खरं तर न पटायला हवी होती. पण त्या काळात असं झालं खरं. 'जंजिर' नंतर त्याचे 'मजबूर', 'कभी कभी', 'चुपके चुपके', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिली', 'सिलसिला', 'नमकहराम', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'दोस्ताना', 'कस्मेवादे', 'दो और दो पॉंच', 'सत्ते पे सत्ता', 'सुहाग', 'डॉन' असे कितीतरी चित्रपट बघितले.
अमिताभच नाही तर त्याची जया भादुरी, त्याची श्वेता, त्याचा अभिषेक हे सगळे जणूकाही माझेच होते. म्हणूनच त्याचा अपघात झाला त्या वेळी आपल्याच घरातलं कोणी आजारी पडावं इतकं वाईट वाटत राहिलं. लहान असल्यामुळे अद्याप विचार पक्के झाले नव्हते. त्यामुळे घरातल्या धार्मिक वातावरणात मीही देवभोळी होते. मग त्या अमिताभचा जीव वाचवण्यासाठी रोज देवासमोर हात जोडून उभं राहणं आणि प्रार्थना करणं हे काम नीत्याचं होऊन बसलं. इतकंच नाही तर त्याच्यासाठी रडून पडून नवस बोलायला आईलाही लावला होता. (आता या सगळ्या गोष्टी आठवल्या की हसू येतं, पण तेव्हा मात्र तो त्याच्या नव्हे तर जणू काही माझ्याच जीवनमरणाचा प्रश्न होता!) त्या अपघातातून अमिताभ वाचला, मी समाधानाचा सुस्कारा सोडला. त्या वेळी आसावरीसारखंच मीही पोस्टकार्डचे शे-दोनशे अमिताभचे फोटो जमवले होते. त्याच्याबद्दलचे छापून आलेले लेख कापून ठेवणं वगैरे हे जणूकाही माझं कर्तव्यच असायचं.
हळूहळू मोठी होत गेले, तसतसं मग अनेक हिरोंनी अमिताभला जरा सरकवून आपली जागा निर्माण केली. त्यात बलराज साहनी, गुरु दत्त, नसिरुद्दिन शाह, रघुवीर यादव, फारूख शेख, अशी दिग्गज मंडळी होती. बलराज साहनीचं खरंखुरं असणं आणि पडद्यावरही तसंच वाटणं खूपच भावलं. गुरू दत्त तर काळाच्या आधी जन्मलेला एक शापित कलावंत असावा तसाच भासला. नसिरुद्दिन शाह याचा 'स्पर्श' चित्रपट खूप आवडला. तर रघुवीर यादवच्या लहानमोठ्या सगळ्याच भूमिका मनावर कोरल्यासारख्या असायच्या. 'माया मेमसाब'ही लक्षात राहिला तो शाहरूख खान मुळे नव्हे तर रघुवीर यादव मुळेच! फारूख शेख तर आपल्याच जवळचा कोणी असावा असा वाटायचा!
लहानपणी वडील नोकरीच्या ज्या ठिकाणी असायचे, तिथे दर आठवड्याला चित्रपट बदलले जात. करमणुकीचं साधन चित्रपट एवढंच असायचं. मग आम्ही चित्रपट बघायला जायचं म्हटलं की आख्खं थिएटर थिएटरचा मालक फिनेलनं धुवून घेत असे. साहेब येणार आणि साहेबांची मुलं येणार म्हणून खूप जय्यत तयारी केली जात असे. आम्हाला साहेबांची मुलं म्हणून मिरवण्यापेक्षा आपल्याला चित्रपट बघायला मिळतोय याचाच खूप आनंद व्हायचा. आठवड्यातून एक चित्रपट हमखास बघणं व्हायचं. 'गुलाम बेगम बादशाह' किंवा 'कालिचरण' असे आता आठवणारही नाहीत असे कितीतरी चित्रपट त्या वेळी बघितले.
आता सगळं खूप सोपं झालंय. पूर्वीच्या हिरोचा समंजसपणा, हळुवारपणा, त्याची मूल्य, त्याचा त्याग आणि समर्पण भावना सगळं हळूहळू बदलत गेलं. हळव्या प्रेमळ हिरोची जागा केव्हातरी अचानक आलेल्या आक्रमक अशा अमिताभनं घेतली. त्यानं अनेक वर्षं राज्य केलं आणि मग त्यानंतर एकूणच आयुष्याची गती इतक्या वेगानं वाढली की कितीतरी हिरो आले आणि गेले. त्यांचं प्रेम, त्यांचा राग, त्याचं बंड काहीच फारसं भावेनासं झालं. अत्याधुनिक तंत्रज्ञानात कुठेतरी काहीतरी हरवत गेलं. यात काही आमीर खान, राजकुमार राव यांच्यासारखे अपवाद आहेत - नाही असं नाही. पण या जागतिकीकरणाच्या रेट्यात ठसा उमटवणारं फारसं कुणी पडद्यावरचं जवळ आलं नाही हे मात्र खरं!
आजही आयुष्यात अनेक हिरो आहेत. पण हे हिरो जरा वेगळे आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत, ते संशोधक आहेत, ते कलाकार आहेत, ते पत्रकार आहेत आणि ते साहित्यिक आहेत! मग कधी त्यांचा चेहरा पी. साईनाथसारख्या निर्भिड पत्रकाराचा होतो, तर कधी तो संशोधकवृत्तीच्या रिचर्ड अटेनबरोचा होतो. कधी तो चेहरा ज्याच्या विचारांवर प्रेम करावं अशा बर्त्रांट रसेलचा असतो, तर कधी तो चेहरा आयुष्याचं तत्वज्ञान सांगणार्या हारूकी मुराकामीचा असतो! कधी तो चेहरा चिवट इच्छाशक्ती आणि कुतूहल असणाऱ्या अशा स्टीफन हॉकिंगचा असतो, तर कधी तो चेहरा इंजिनिअर, शिक्षणतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, उद्योजक असलेल्या अशा सर्वेसर्वा विश्वेश्वरेयाचा असतो!
दीपा देशमुख.
Add new comment