जयप्रद - नागरिक
प्रिय जयप्रद,
निर्माणच्या शिबिराच्या वेळी तुला आम्ही पाहिलं, तेव्हा सगळ्यांपेक्षा वेगळी (म्हणजे धिप्पाड अशी) पर्सनॅलिटी पाहून आम्ही सगळेच थोडे बिचकून गेलो होतो. काही कारणांनी बाचाबाची झाली तर काय घ्या अशी भीतीही वाटली. पण जेव्हा ओळख झाली तेव्हा या भक्कम देहयष्टीमागचं मृदूमुलायम मन आम्हाला सगळ्यांनाच दिसलं.
तुझा अभिनय असो वा नृत्य....आम्ही तो अनुभव घेताना अगदी थरारून गेलो होतो....सुनृता आणि तू केलेलं ते नृत्य आम्ही आजही विसरू शकत नाही. तुझं शरीर इतकं लवचिक झालं होतं की जणू काही एखाद्या वृक्षाची डहाळीच!
मग आपण भेटतच राहिलो, बोलत राहिलो. वसंत देसाईंचा नातू तू...एक सांस्कृतिक वारसा लाभलेला...पण तुझ्या वागण्यात त्या वारश्याचा जराही दंभ कधी जाणवला नाही. जाणवत नाही. आपण आपल्या सचिनकडे धडगावसारख्या दुर्गम अशा आदिवासी भागात भर उन्हाळ्यात गेलो. त्या प्रवासातही तुझ्यातला साधेपणा क्षणोक्षणी अनुभवायला येत होता. खाण्यापिण्याचे नखरे नाहीत की निवासासाठी मला अशीच जागा पाहिजे, मला हेच लागतं वगैरे मागण्या नाहीत. तो प्रवास आपण खूप एन्जॉय केला आणि एकीकडे तुझं निर्माणसाठीच्या फिल्मचं शूटिंगही हसतखेळत पार पडत होतं.
एकदा मुंबईत दादरला कुमार केतकर याचं व्याख्यान होतं. प्रचंड गर्दी होती मी माझ्या शेजारी तुझी जागा राखून ठेवली होती. तू मात्र इकडेतिकडे फिरत होतास. मला म्हणालास दीपाताई काळजी करू नका माझी जागा कोणी घेणार नाही. पण काहीच वेळात एक जन आला आणि सांगूनही तो त्या जागेवर बसलाच. मी काय करणार? त्यानंतर तू आलास फक्त खुर्ची जवळ त्या माणसाकडे बघत उभं राहिलास. तुला एक शब्द हि बोलवा लागला नाही. तो मनुष्य चटकन सोर्री म्हणत उठून तुला जागा देऊन गेला. मग आपण खूप हसलो ....
तू गातोस देखील झकास....प्रवासात तुझ्या गाण्यांची निवड किती अप्रतिम असते हे अनुभवलंय.
तसच तुझं तुझ्या टीम बरोबरचं वागणं देखील!!!
मग आपण मुंबईत वाशीत आणि त्यानंतर पुण्यात एमकेसीएल इथे फिल्म क्लब सुरू केला. प्रत्येक फिल्मच्या वेळी तू आणि तुझी टीम आत्मीयतेनं वेळेत येत असे. फिल्मची तयारी आणि त्यानंतरचं तुझं फिल्मवरून लोकांना बोलतं करत स्वतःही बोलणं...किती छान दिवस होते ते!
त्याच दरम्यान तू औरंगाबादला जाऊन प्रसिद्ध उर्दू कवी बशर नवाज यांच्यावर उत्कृष्ट अशी फिल्म केलीस.
आता तुझा नागरिक हा चित्रपट येतो आहे. तुझ्यातलं माणूसपण, तुझ्यातली सामाजिक बांधिलकी आणि तुझी तुझ्या कार्याविषयीची निष्ठा आम्हाला खूपच भावते. नागरिकची घौडदौड यशस्वीपणे चालू राहील. पण आमच्या सगळ्यांतर्फे तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!
'सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट - नागरिक / सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिग्दर्शक - जयप्रद देसाई / सर्वोत्कृष्ट संवाद - महेश केळुसकर / सर्वोत्कृष्ट गीत लेखन - संभाजी भगत / सर्वोत्कृष्ट छायांकन - देवेंद्र गोलतकर ¥¥¥ 52 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात 'नागरिक ' ची घोडदौड / रिलीज 12 जून 2015
Add new comment