फूल खिले है गुलशन गुलशन.....
दूरदर्शनवर प्रसन्न, हसतमुख असणारी एक व्यक्ती 'फूल खिले है गुलशन गुलशन' हा कार्यक्रम सादर करायची. या कार्यक्रमाचं शीर्षक तिच्यासारखंच, तिच्यासाठीच आहे असं वाटायचं. या कार्यक्रमाबरोबरच तिचं नावही बरोबरीनंच जोडलं जायचं. तिचं नाव तबस्सूम! आठवली ना?
खरं तर तबस्सूमचं खरं नाव किरणबाला सचदेव! तिचे वडील अयोध्यानाथ हे एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई असगरी बेगम ही देखील एक लेखिका, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होती. आपल्या नवर्याचं मन राखावं या हेतूनं असगरी बेगम यांनी आपल्या मुलीचं नाव किरणबाला ठेवलं, तर आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी अयोध्यानाथ यांनी आपल्या मुलीचं नाव तबस्सूम असं ठेवलं. तबस्सूमचा जन्म १९४४ सालचा, आणि १९४७ साली तर तिनं ‘मेरा सुहाग’ या चित्रपटात पदार्पणही केलं. बेबी तबस्सूम म्हणून ती वयाच्या अवघ्या ३ वर्षांच्या वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत आली. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटात भूमिका केल्या. मात्र ती खरी लक्षात राहिली ती तिच्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ या कार्यक्रमामुळे!
अरूण गोविल या अभिनेत्याचा मोठा भाऊ विजय गोविल याच्याबरोबर तबस्सूमचं लग्न झालं. तबस्सूमनं जवळजवळ २१ वर्ष फूल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम दूरदर्शनवर यशस्वीरीत्या राबवला. आज यू-टयूबवर 'तबस्सूम टॉकीज' या कार्यक्रमाचेही अनेक एपिसोड्स आपल्याला बघायला मिळतात.
खरं तर आज मी आधी अन्वर या गायकावरचा आणि नंतर विजय आनंदवरचा तिचा कार्यक्रम बघत होते. तबस्सूम अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे. ती जेव्हा एखाद्याबद्दल बोलते, तेव्हा ती पूर्णपणे त्या व्यक्तीमध्ये गुंतलेली असते आणि ते तिच्या बोलण्यातून, चेहर्यावरून जाणवतं. आजही ती जेव्हा अन्वर बद्दल बोलत होती, विजय आनंद बद्दल बोलत होती. तेव्हा काही हळव्या प्रसंगांवर बोलताना तिचा आवाज कातर झालेला ऐकायला येत होता. तिच्या चेहर्यावर ती वेदना स्पष्ट दिसत होती. तो तिचा अभिनय नव्हता, ते तिचं सादरीकरण नव्हतं, तर तिच्यातला सहजपणा, नैसर्गिक ओघ होता. हे सगळं बघत असताना मला गणेश देवी यांचं वाक्य आठवलं, ते म्हणाले होते, आपण जे बोलतो, जे वागतो, तेच आपल्या लेखणीतून, तेच आपल्या जगण्यातून दिसलं पाहिजे. तुम्ही जसे आहात तसेच असला पाहिजेत’ आणि हे किती खरंय याचा प्रत्यय मला तबस्सूमकडे बघून येत होता.
तबस्सूम म्हणजे स्माईल, तबस्सूम म्हणजे हास्य, तबस्सूम म्हणजे मुस्कान किंवा मुस्कुराहट! ही तबस्सूम वयाने ७५ ची असली तरी, ती खरोखरंच आजही तीन वर्षांची असल्यासारखी निरागस वाटते. असं वाटतं आजही ती सदाबहार आहे! तिचं व्यक्तिमत्व म्हणजे फूल खिले है गुलशन गुलशन............सारखंच!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment