आयपीएच - २८ वं वर्ष - वर्धापनदिन सोहळा!
काल ठाण्यात सप्तसोपान इथं आयपीएचचा २८ वा वर्धापनदिन सोहळा सायंकाळी संपन्न झाला. आयपीएचचा सप्तसोपानचा परिसर इतका सुरेख आहे की एखाद्या चिमुकल्या गावाचा फील तिथे येतो. ही जागा मिळवण्यासाठी आयपीएचला अथक प्रयत्न करावे लागले. त्या पडिक जागेची आधीची अवस्था आणि आताचं चैतन्यमय वातावरण यांची तुलना त्या वेळचे फोटो बघितले की सहजपणे लक्षात येते.
उर्वी आणि भारती या दोघींनी काल २८ वर्षांच्या प्रवासाचा धावता आढावा घेतला. त्यानंतर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पुण्यात सुरू होत असलेल्या आयपीएचबद्दलची माहिती दिली. पुणे कोअर टीमचं (हर्षद, मुकुल, शिल्पा, सुखदा, इनायत, ज्ञानेश्वर, पळशीकरसर, मी - दीपा देशमुख) स्वागत केलं, तर शुभेच्छा देताना थत्ते मॅडमनं हातावर दही देऊन पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या, तेव्हा एकदम 'लै भारी' वाटलं!
कार्यक्रमानंतर पोटपूजेची व्यवस्था एकदम हटके केलेली होती. पावभाजी, रगडा पॅटिस, पाणीपुरी, मूगाचा हलवा, कुल्फी वगैरे वगैरे! आयपीएचच्या त्रिदलनं बनवलेल्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
कार्यक्रम नेहमीप्रमाणेच खूप घरगुती वातावरणात नेणारा, अतिशय सुरेख झाला.
मी विचार करत होते. या २८ वर्षांत डॉ. आनंद नाडकर्णी या माणसानं काय अफाट काम करून ठेवलंय. हा माणूस नुसता कल्पकच नाही तर त्या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवतो. त्या उतरवल्यानंतर त्यातलं सातत्य तर टिकवून ठेवतो, पण लगेच दुसर्या कल्पनेनं जन्म घेतलेला असल्यानं त्यामागे लागतो. लहान मुलांसाठी, किशोरांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी.....किती किती उपक्रम.....खरं तर आजच्या आभासी जगात सगळं प्लॅस्टिकच्या फुलांसारखं जगणं आणि वागणं झालेलं असताना आयपीएचच्या कुठल्याही उपक्रमातलं वातावरण बघितलं, अनुभवलं की माणसं जोडणं, त्यांच्यातला स्नेह वृद्धिंगत करणं, त्यांच्यातला सुसंवाद वाढवणं या गोष्टींची घट्ट रुजवणूक डॉक्टरांनी केलेली दिसते. आज या नात्यांची खूप खूप आवश्यकता आहे.
डॉक्टरांप्रमाणेच त्यांच्या गुरू डॉ. शुभा थत्ते मॅडम जेव्हा, दीपा पुढल्या वेळी घरीच राहायला ये म्हणतात, तेव्हा खरोखरंच भरून आलं.
पुण्यातलं आयपीएचचं काम बघण्यासाठी डॉ. सुखदा आणि टीम जय्यत तयार झालीये. सुखदा ही अतिशय गोड, बुद्धिमान, प्रेमळ मुलगी असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली असल्यानं तो अनुभव आता पुणेकरच नव्हे तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश असे अनेक ठिकाणांवरून येणारे लोक घेतील.
काल डॉ. मानसी देशमुख ही गोड मैत्रीण सोबत असल्यानं पुणे-मुंबई-पुणे प्रवास खूपच उत्साहदायी झाला. ठाण्यात तिची बहीण प्रणाली आणि तिचा मुलगा मीहिर यांचीही भेट झाली. प्रणाली आणि मीहिर यांच्या प्रेमळ आणि अगत्यशील स्वभावाचा अनुभव आला.
रात्री पुण्यात परतल्यावर डोळ्यासमोर आयपीएचचा नवा लोगो तरळत राहिला. हा लोगो शाम देशपांडे यांनी केला असून अतिशय ताजातवाना करणारा लोगो आयपीएचची अर्थपूर्ण ओळख सांगणारा आहे. माझ्यासहित आयपीएच टीम आणि पुणेकर यांना खूप खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख
२४ मार्च २०१८.
Add new comment