प्रिय संजीवदा,
आज तुमचा वाढदिवस, या प्रसंगी शुभेच्छा देताना अनेक विचार मनात येत आहेत.
तुमची आणि साधनाताईंची भेट झाल्यापासूनचा आपला प्रवास आठवतो आहे.
खरं तर फार काही बोलायची गरजच पडत नाही, असं वाटतं या मित्राला आपल्या मनातलं सगळं नेहमीच कळतं. एक आश्वासक नजर, आश्वासक नातं तुम्ही माझ्या मनात निर्माण केलं आहे.
तुमच्या घरी एकत्र जमणं म्हणजे तर आनंदाची पर्वणीच वाटते. तुम्ही मनापासून केलेला पाहुणचार, तुमचा आग्रह, स्वतःविषयी फार काही न बोलणं, समोरच्याला बोलतं करणं, समोरच्याच्या चांगल्या कृतीला मनापासून दाद देणं असं किती किती सांगावं?
एकदा तुमच्या घरी एकत्र जमलो असताना, साधनाताईंच्या हृद्य मनोगतातून तुम्हा दोघांचा प्रवास ऐकला आणि मन अभिमानानं फुलून गेलं. तुमचं नाटकवेड, तुमचं संगीतवेड, तुमचा डॉक्टरी व्यवसाय या पलीकडला तुमच्यातला आणि साधनाताईंमधला जो एक माणूस दिसला त्यानं मन हेलावून गेलं. तुमच्या आयुष्यात तुम्ही जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्या त्या निर्णयांना फार मोठी हिम्मत लागते आणि तुमच्यात ती आहे.
तुम्हाला आणि साधनाताईला तर मला वेगळं करताच येत नाही. आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर साथ कशी निभवायची असते हे तुम्हा दोघांकडून शिकावं. नाहीतर आजच्या काळात, 'तू नही तो और सही' किंवा 'तूही हवीस आणि तीही हवीच' असं सगळं बघायला मिळत असताना तुम्हा दोघांची सुरेल साथ हा आमच्यासमोर खूप मोठा आदर्श आहे. एकमेकांमध्ये एकरूप होऊन, एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व जपत, एकमेकांना समजून घेत सुरू असलेल्या तुमच्या साथीच्या प्रवासात परस्परांवरचं प्रेम काय असतं, त्याग काय असतो, समर्पण काय असतं आणि आनंद काय असतो हे तुम्ही आम्हाला शिकवत आहात.
हे सगळं समोरासमोर आपण कधी बोलणार नाही, त्यामुळे आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुमच्याशी संवाद साधते आहे.
तुमच्या पुढल्या आनंदमयी वाटचालीसाठी खूप खूप आणि खूप शुभेच्छा.
तुमची,
दीपा देशमुख
२६ ऑगस्ट २०१७.
Add new comment