आज सकाळी दाराबाहेरून
आज सकाळी दाराबाहेरून आवाज आला, नुकताच माझा आणि अपूर्वचा नाश्ता झाला होता. दाराजवळ येवून सेफ्टी दार न उघडता मेन डोअर ओपन करून बघितलं तर एक चहाच्या रंगाचं मांजर दाराबाहेरून हाका मारत होतं. दार उघडलेलं पाहून त्यानं वार्तालाप सुरू केला.
चायकॅट : ए, देना मला काहीतरी खायला
मी : ओळख ना पाळख, कसा काय येवून मागतोस रे?
चायकॅट : अग दे ना, भुकेनं जीव कळवळतोय, कळत नाही का?
मी : ए शहाण्या, मागायचंच आहे तर नम्रपणे माग की, अख्खी इमारत का जागी करतो आहेस?
चायकॅट : तुमचं गिळून झालंय वाटतं, म्हणून ही मग्रुरी? अग दे म्हणतोय ना.
मी : आधी आवाज खाली कर. मग बघू.
चायकॅट : ठीकये, आण लवकर.
मी खरं तर मांजरप्रेमी आहे. पण आमच्या सोसायटीतली मांजरं, विशेषत: आलेले हे बोकोबा अत्यंत टपोरी, उर्मट, चोर्या करण्यात पटाईत, असे आहेत. त्यामुळे निदान आमच्या सोसायटीतल्या मांजरांपुरतं तरी माझं प्रेम आटलेलं आहे. तरीही या कोरोना काळात एकूणच प्राण्यांची भुकेनं काय अवस्था झाली असेल या विचारानं अस्वस्थ होवून मी गॅसवरचं दूध एका प्लेटमध्ये घेतलं. दूध चांगलंच गरम होतं, जरा फुंकून बाहेर आणलं आणि बाजूच्या भिंतीवर ठेवलं. क्षणार्धात या चायकॅटनं उडी मारून आधी दूधाचा अंदाज घेतला आणि दूध गरम आहे कळताच हळूहळू सावधपणे प्यायला सुरुवात केली. दूध पिवून झाल्यावर त्याचं पोट भरलं नसल्यामुळे त्यानं पुन्हा माझ्यावर डाफरायला सुरुवात केली.
चायकॅट : अग दे अजून, पोटात भुकेनं आग उसळलीय. अर्धवट दूध पाजून तुला काय मिळणारये?
बोकोबाचं जोरजोरात तारसप्तकातलं बोलणं ऐकून अपूर्व बाहेर आला आणि मला म्हणाला, दे दूध त्याला नाहीतर हाकलून तरी दे. अख्ख्या इमारतीला ऐकू जाईल असा ओरडतोय. मग मीही पुन्हा स्वयंपाकघरात वळाले आणि पुन्हा प्लेटभर दूध आणून भिंतीवर ठेवलं. त्यानं ते बघितलं आणि पुन्हा सगळं गट्टम केलं. त्यानंतर पंज्याने मिशा आणि तोंड स्वच्छ चाटून पुसून साफ केलं. मला वाटलं आता माझ्याकडे बघून थँक्स तरी म्हणेल. पण त्यानं पुन्हा दारासमोर उडी मारत, मला आणखी काही सुनावलं,
चायकॅट : आतापुरता चाललोय, पण माझं पोट पूर्ण भरलेलं नाहीये. पुन्हा येईन. तेव्हा जरा नॉनव्हेज वगैरे काहीतरी खाउ घाल. चिकट कुठली.
खावून वर पुन्हा शिरजोरी करणार्या या बोकोबाकडे पाहून मी मेन डोअर लावलं आणि आत वळाले.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
या बोक्याचं नाव Suniti Limaye हिच्या कॉफी कॅट वरून प्रेरित होऊन ठेवण्यात आलेले आहे.
Add new comment