घे भरारी

घे भरारी

तारीख

असं ठरवलं, आठवड्यातला एक दिवस निश्चित करून त्या दिवशी लिखाण न करता इतर सगळी कामं करण्यासाठी घालवायचा. त्यानुसार मग गुरूवारच ठीक राहील असा विचार केला कारण गुरूवारी  गाण्याचा क्लास असल्यामुळे तो आटोपून इतर कामं करता येतील या विचाराने आता तीन-चार तासांसाठी उबेर बुक करायची किंवा रिक्षा सांगून ठेवायची, किंवा एखादा ड्रायव्‍हर बोलवायचा किंवा...असे पर्याय एकामागून एक समोर येत असतानाच ‘घे भरारी’ या ग्रुपवर दिपाली कडू या तरुणीची एक पोस्ट बघायला मिळाली. ती ड्रायव्‍हर म्हणूनही आणि ड्रायव्‍हर विथ गाडी यासाठी देखील तयार असणार होती. मला हे दोन्ही पर्याय एकदम छान वाटले आणि मी लगेचच तिची पोस्ट सेव्‍ह करून ठेवली. बुधवारी आम्ही दोघी बोललो आणि ठरल्याप्रमाणे गुरूवारी म्हणजे काल गाडीरूपी रथातून राजकन्या दिपाली आमच्या घराच्या अंगणात येऊन थांबली. 
गाडी सुरू झाली आणि दिपालीने मला अगदी नम्र स्वरात प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझ्याकडे येण्याआधी तिने मी लेखिका असल्यापासून माझी बरीच माहिती शोधून ठेवली होती आणि मी लिहिते कशी, येणाऱ्या अडचणी, माझी व्‍याख्यानं, भेटणारे वाचक याविषयी विचारत होती. मी तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होते, मात्र त्याच वेळी मला तिच्यातलं कुतूहल बघून तिचं कौतुकही वाटत होतं. बघता बघता माझ्या क्लासचं ठिकाण आलं आणि मी तासाभराने इथेच भेटू म्हणत तिला ‘बाय’ केलं. तासाभराने मी गाडीत स्थानापन्न झाले आणि आम्ही इतर कामं आटोपत परत घराकडे निघालो. आता प्रश्न विचारायची पाळी माझी  होती आणि तिच्या उत्तरांमधून मला कळलं, दिपाली ही अतिशय कष्टाळू आणि अभ्यासू तरुणी असून दहावीनंतरच तिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्‍हावं लागलं. वेगवेगळी कामं करावी लागली. दातांसाठी ज्या कॅप बनवाव्‍या लागतात, त्यातलं कौशल्य तिनं प्राप्त केलं. त्याच वेळी ती ड्रायव्‍हिंग देखील शिकली. ड्रायव्‍हिंग शिकताना ड्रायव्‍हिंग हे काम नसून ती एक खूप उत्कट अशा आनंदाची गोष्ट आहे हे तिला समजलं. गाडी चालवताना आपण आपल्या स्वप्नांचे पंख घेऊन भरारी घेत आहोत असं तिला वाटलं.
हळूहळू स्थैर्याकडे जात असतानाच आपणही ड्रायव्‍हिंग स्कूल का सुरू करू नये अशी कल्पना दिपालीच्या मनात आली आणि तसे प्रयत्न करताच त्यासाठी लागणारं तांत्रिक शिक्षणाचं रीतसर पदवी किंवा प्रमाणपत्र  आपल्याकडे नाही हे तिला कळलं आणि मग हार न मानता तिने चक्‍क मेकॅनिकल इंजिनियरचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण होताच तिला चांगली नौकरी मिळाली आणि कोरोना नामक एका मोठ्या संकटात हल्लाबोल केला. चांगली नोकरी गमवावी लागली. कोणाला काय बोलणार आणि काय मदत मागणार असा तो दोन वर्षांचा काळ होता. अशा वेळी तिच्यातल्या जिद्दीने तिला पुन्हा धीर दिला आणि पुन्हा एकदा भरारी घेण्याचं ठरवलं. 
पुण्यामध्ये अनेकांकडे गाडी आहे, ड्रायव्‍हर आहे पण तरीही काही वेळा स्त्रिया बाहेर पडताना कंटाळा करत असल्याचं दिपालीला दिसलं. काही ठिकाणी वयाची ऐंशी ओंलाडलेल्या कुणा एकीला आता या वयात बाहेर पडायचा उत्साह तर होता, पण त्यासाठी आपल्या नातीसारख्या कुणाचीतरी आश्वासक सोबत हवी होती. तसंच आताशा वेगवेगळ्या अविश्वसनीय घटना घडत असताना आपल्या मुलीला एकटीनं बाहेरगावी जाताना तिच्यासोबत टॅक्सीत एखादी मैत्रीण असली तर? असाही विचार एखाद्या आईच्या मनात दिपालीला दिसला आणि तिने मग गाडी विथ लेडी ड्रायव्‍हर किंवा गाडी नको असेल तर फक्त लेडी ड्रायव्‍हर असे दोन्ही पर्याय समोर ठेवले. 
दिपालीने कठीण काळातही स्वस्थ न बसता पहिलं पाऊल टाकलं आणि तिला स्त्रियांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज कुणी आज्जी तिला फोन करते आणि चल जरा लांब चक्‍कर मारून येऊ असं म्हणते, तर कुणी भल्या पहाटे विमानतळावर माझ्या मुलीला सुखरूप नेऊन सोड असं म्हणत दिपालीला हाक मारते, कुणाला खरेदी करायची असते, कुणाला ऑफीसला जाण्यासाठी पर्याय हवा असतो, तर कुणाला पिकनिकला जायचं असतं, कुणा मैत्रिणींना एकत्र येऊन लाँग ड्राईव्‍हला जायचं असतं आणि त्यासाठी या सगळ्यांना दिपाली आपल्याबरोबर असणं खूप छान वाटतं. पहिल्या भेटीतच दिपाली तिच्या लाघवी स्वभावाने आपल्याबरोबर येणाऱ्या स्त्रीचं मन जिंकून घेते आणि मग पुढला प्रवास अर्थात खूपच सुखकर होतो.
दिपालीचं ड्रायव्‍हिंगचं कौशल्य तर कौतुकास्पद आहेच, पण गाडी चालवताना ती कधीही समोरून बेदरकारपणे येणाऱ्या वाहनचालकावर वैतागत नाही, की वाहतूककोंडीत कंटाळत नाही. अतिशय सफाईदारपणे प्रत्येक वेळी शांतपणे आणि संयमाने ती मार्ग काढते. 
तर, दिपालीबरोबरचा माझा प्रवास खूप उत्तम झाला. एखादी मैत्रीण बरोबर असल्यावर वेळ कुठे गेला हे कळतंच नाही तसं काहीसं वाटलं. कित्येक दिवस रेंगाळत असलेली कामं पूर्ण तर करता आलीच, पण घरी आल्यावरही ‘हुश्श, थकले बाई’ असं म्हणावंसं वाटलं नाही.
तर, या भरारी घेत असलेल्या दिपालीबरोबर (contact No: 9922907073/ 9762001053) तुम्हीही सैर करायला हरकत नाही, नक्‍कीच अनुभव घ्या.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.