रँचो का करिश्मा

रँचो का करिश्मा

तारीख

रँचो का करिश्मा
ठाणेकरांना वेड त्याने आधीच लावलेलं आहे, आता पुणेकरांना ठार वेडं करायचं असं या माणसानं ठरवलेलं आहे. हा माणूस मानसशास्त्रातला बापमाणूस आहे, मनकवडा आहे, एकाच वेळी इतके उपक्रम राबवतो की त्याच्या कल्पकतेला सीमाच नाहीत. प्रचंड बुद्धिमान, कष्टाळू, नावाप्रमाणे सतत आनंदी, प्रसन्न, उत्साही, हेल्दी विचारसरणी असलेला. किती वर्णन करावं तेवढं कमीच आहे. थ्री इडियट्सचा नव्‍हे, तर आपला रँचो याने की डॉ. आनंद नाडकर्णी.
आता हेच बघा ना, फिल्मी नगमे आणि तुमचा इक्यू असा कार्यक्रम पुणेकरांसाठी करून आनंद मास्तराने दोन तास पुणेकरांचा वर्गच घेतला. पण हा वर्ग रूक्ष, कोरडा, एकतर्फी नव्‍हता. मानसशास्त्रातल्या एक एक संकल्पना त्यांच्या शब्दांतून उतरत होत्या, भावनांचे पदर आणि प्रकार उलगडले जात होते आणि त्यातूनच हिंदी चित्रपटसृष्टीतली एक से एक गाणी पडद्यावर साकारली जात होती. सभागृहात इतकं आनंददायी शिक्षण चालू होतं, की दोनो तरफ बराबर की आग लगी है प्रमाणे प्रेक्षक/श्रोते आणि डॉक्टर यांच्यामधला संवाद भावनांचे पूल बांधू लागला.
‘आ चल के तुझे मै लेके चलू’ या किशोरकुमारच्या सुंदर गाण्याने सुरू झालेला प्रवास वेगवेगळ्या भावनांच्या झोक्यावर हिंदोळे घेत पुढे पुढे चालत राहिला. आशेचा संदेश देणाऱ्या या गाण्याचं तिसरं कडवं खूपच अर्थपूर्ण आहे. गायक, संगीतकार आणि गीतकार सबकुछ द ग्रेट किशोरकुमार आहे.
सपनों के ऐसे जहाँ में,जहाँ प्यार ही प्यार खिला हो
हम जा के वहा खो जाये, शिकवा ना कोई गीला हो
कही बैर ना हो, कोई गैर ना हो, सब मिल के यूँ चलते चले
जहाँ गम भी न हो आसूं भी न हो, बस प्यार ही प्यार पले
डॉ. नाडकर्णी खरं तर प्रश्‍नच विचारत होते, की आपण सगळेच भावसाक्षर आहोत का? बॅड, मॅड, सॅड आणि ग्लॅड एवढ्या चारच भावनेत आपण गुरफटलो आहोत. खरं भावनांचे वेगवेगळे पदर दाखवणारे 1500 च्या वर शब्द असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांनी भावसाक्षर होण्यासाठीच फिल्मी नगमे आणि तुमचा इक्यू या कार्यक्रमाला सादर केलं होतं. त्यासाठी त्यांना साहाय्य करायला हिंदी चित्रपटसृष्टीतली एक से एक गाणी धावून आली होती.
गाणी पडद्यावर दिसत होती, ऐकायला येत होती. अशा वेळी डॉक्टरांनी तुम्हीही मनातल्या मनात नव्‍हे, तर शेजारच्या खुर्चीवरल्या माणसालाही ऐकू येतील अशा आवाजात गुणगुणा असं म्हटलं. त्यामुळे सभागृहातली शिल्लक राहिलेली थोडीफार औपचारिकताही नष्ट झाली. आख्खं सभागृह एका सुरात गुणगुणू लागलं, दाद देऊ लागलं आणि डॉक्टरांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरही देऊ लागलं. या दुतर्फा संवादाने वातावरणात ‘जान’ आणली.
आयपीएच संस्थेचं बोधवाक्य सुदृढ मन सर्वांसाठी असून ते सुदृढ राहण्यांसाठी हेल्दी आणि अनहेल्दी भावनांबद्दल बोलून डॉक्टरांनी सकलजनांना शहाणं करून सोडलं. असह्य, सह्य, सुसह्य आणि अतिसह्य अशा टप्प्यांतून सद्भावनांचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. भावनांचा विचार करताना भावनांच्या बाबतीत आपली जाण (अवेअरनेस), सर्व भावनांचा स्वीकार (ॲक्सेप्टन्स), भावनांचं विश्लेषण (ॲनेलेसिस) आणि भावनांना कृतीत उतरवणं किंवा वर्तन (ॲप्लिकेशन) हे सगळं गाण्यांच्या माध्यमातून डॉ. नाडकर्णी यांनी इतकं सोपं करून समोर ठेवलं की उन्नत भावनांनी मन भरून गेलं. आपण सुखद भावनांचा सहज स्वीकार करतो, पण दु:खद भावनांची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतो. हा ॲक्स्पेटन्स कसा आणायचा याचं उत्तर समस्तजणांना मिळालं.
वर्षानुवर्ष ऐकलेली गाणी डॉक्टरांच्या शिकवणीनुसार ऐकल्यावर त्या गाण्यातल्या भावना, शब्दांमधली मोकळी जागा भरली गेली. नैराश्यातून उगवलेल्या गाण्यांनी पडद्यावर यायला सुरुवात केली. अगदी संताप किंवा अँगर मधली गाणीही प्रेक्षकांच्या साथीने डॉक्टरांनी समोर आणली. कधी कधी शब्द वेगळे असतात आणि इमोशन्स वेगळ्या असतात, शब्द वेगळे आणि मनात काही वेगळंच असं एक गाणं त्यांनी ऐकवलं/दाखवलं. ‘तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकीं है मुझे प्यार तुमसे नही है नही है’ असं म्हणताना त्या नायिकेचं नायकावर किती प्रेम आहे हेही दिसत राहिलं. आँधी चित्रपटातलं ‘तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही’ हे गाणं डॉक्टरांच्या नजरेतून बघताना पुन्हा स्वत:लाच्या मनालाही अनेक डोळे फुटले. शब्दांबरोबरच नायक/नायिकेच्या वर्तनातल्या अनेक जागांचे अर्थ कळू लागले. ‘एक अकेला इस शहर मे’ हे गाणं ऐकताना त्या नायकाचं एकाकीपण, उदासी, कळत असतानाच ‘दो दिवाने शहर मे’ हे तेच गाणं जोडीने ऐकताना भावनाच बदलून गेल्या. एकाचे जेव्‍हा दोन झाले, तेव्‍हा उदासी दूर झाली, नैराश्य भुर्र पळालं आणि आयुष्य उल्हसित झालं. देशभक्‍तीची गाणी ऐकताना, स्फूर्ती, निर्धार, आत्मविश्वास, समर्पण, दृढनिश्चय, त्याग, संघभावना अशा अनेक भावनांची नव्‍याने ओळख झाली. मी पासून आम्ही कडे अणि आम्ही पासून सगळ्यांपर्यंतची व्‍यापकता लक्षात आली. तारे जमीन पर आणि बर्फी यातल्या गाण्यांनी आणि त्यातल्या भावनांनी डोळे भरून आले. डॉक्टरांनी भावनांची खोली दाखवणारी अनुपमामधल्या अप्रतिम अशा गाण्यांचा संदर्भ दिला. एम्पथी दर्शवताना त्यांनी ‘या दिल की सुनो दुनियावालो’ हे पडद्यावर गात असलेला धर्मेद्र दाखवला. आनंद आणि अत्यानंद यातली गाणी दाखवून त्यांनी बहार आणली. खरं तर या कार्यक्रमाने आनंद-अत्यानंद हे एकरूप झाले होते आणि आम्हालाही वाटायला लागलं होतं, आज मै उपर आसमाँ निचे....
भावनांचं नियोजन कसं करायचं याची कुठलाही उपदेश न करता डॉक्टरांनी आमच्या मनात पेरणी केली. मनाची स्थिरता कशी येते हे सांगत असतानाच अनेक गाणी डॉक्टरांनी गायली, त्या त्या वेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटात त्यांना सलामीच दिली. 
आदिम भावना, प्रगत भावना आणि उन्नत भावना असा सगळा प्रवास डॉक्टरांनी करवला. असं म्हणतात पूर्वीच्या काळी काही ऋषीमुनी किंवा इतर ज्ञानी लोक आपलं ज्ञान सहजपणे कोणाला देत नसत. काहींचं ज्ञान तर त्यांच्याबरोबरच संपून जात असे. पण डॉक्टर तुम्ही असे आहात की भरभरून सढळ हाताने वाटत चालला आहात, पसरवत चालला आहात आणि आम्हाला उजळवत चालला आहात, अधिकाधिक समृद्ध करत चालला आहात.
दीपा देशमुख
(म्हटलं तर महत्वाचं म्हटलं तर किरकोळ असं काही : 
प्रवेशिकांना आसनक्रमांक नसल्यामुळे तासभर बाहेर उभ्या असलेल्या गर्दीला संगीतखुर्ची कार्यक्रम खेळावा लागला. पळा, पळा, कोण पुढे पळे तो असं म्हणत समस्त ज्येष्ठांनी आपापल्या खुर्च्या पकडल्या. कार्यक्रम हाऊसफुल्ल होता हे वेगळं सांगायलाच नको. तिरुपती बालाजी/शिर्डी/शेगाव अशा लोकप्रिय देवस्थानात देवदर्शनासाठी जशी भलीमोठी रांग लागते तशीच चौपदरी रांग इथेही लागली होती. एक प्रोफेशनल फोटोग्राफर कौतुकाने गर्दीचे फोटो काढण्यात व्‍यग्र झाला होता.
प्रायोजकांची प्रतिनिधी असलेली ललना फक्‍त क्रियापद मराठीतून अशा तऱ्हेने अतिशय अस्खलित मराठीतून बोलत होती. तिने वृद्धाश्रमाची माहिती देताना तिथे वृद्धांना पुनर्जन्म झाल्याचा फील येईल अशा अर्थाचीही माहिती दिली. ऐकून धन्य आम्ही झालो. तिचं पाल्हाळिक बोलणं सभागृहाने डॉक्टरांकडे बघून बघून संयमाने ऐकलं.
कार्यक्रमाचा निवेदनकर्ता तरूण ओंकार दीक्षित हा दिसायला आणि बोलायला अतिशय स्मार्ट होता. त्याचं बोलणंही खुसखुशीत होतं. त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा.)
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories