मनसमझावन

मनसमझावन

मनसमझावन
निळाईने वेढलेल्या मुखपृष्ठावर कबीराचा एक दोहा दिसला आणि पुस्तकाची पानं उलटण्यासाठी मन उत्सुक झालं. रोहन प्रकाशनातर्फे नुकतंच प्रकाशित झालेलं संग्राम गायकवाड लिखित ‘मनसमझावन’ ही कादंबरी हातात घेतली आणि संपूर्ण वाचल्याशिवाय ती खाली ठेवताच आली नाही.
वास्तवाचं बोट धरून निघालेल्या या कादंबरीने मला इतका मोठा प्रवास घडवला की मी थक्क झाले,  तर कधी आनंदून गेले, कधी माझ्या मनाची मरगळ आणखी गडद झाली, तर कधी एका सुगंधी शिडकाव्‍याने मन उल्हसित झालं. मनावर जमलेली धूळ कधी आणखी साठली, तर कधी झाकोळून आलेलं मळभ कधी दूर झालं कळलंच नाही.
‘मनसमझावन’ या कादंबरीचा प्रवास अनेक पात्रांच्या मनोगतातून पुढे पुढे सरकत राहतो. विशेष म्हणजे यातली काही पात्रं सजीव आहेत आणि काही निर्जीव वस्तू/वास्तू या देखील आहेत. मात्र यांना निर्जीव म्हणता येत नाही, कारण त्या सजीवतेचं रूप धारण करून त्यांचं मनोगत व्‍यक्‍त करतातात. आपल्या व्‍यथा, वेदना, एकटेपण, भूतकाळातल्या सुखद आठवणी सारं काही त्यांच्या बोलण्यातून वाचकाला कळत राहतं आणि त्याचबरोबर त्या त्या वास्तूंचा, ठिकाणांचा, माणसांचा, वातावरणाचा मोठा पट डोळ्यासमोर उभा राहतो.
खरं तर हा लालबाबाचा दर्गा वाचकाला त्या वातावरणात घेऊन जातो. तामिळनाडूमधला शाह तुराब अली नावाच्या सुफी संताचा अनुयायी लालबाबा बाभुळगाव नावाच्या गावात आला आणि तो तिथेच स्थायिक झाला. लालबाबाच्या स्मरणार्थ तिथे दर्गा बांधला गेला आणि 200 वर्षांपासून उभ्या असलेल्या त्या दर्ग्यात मुस्लिम लोकांबरोबरच हिंदू लोकही भक्‍तिभावाने जात असत. त्या वेळी अल्लाह आणि विठ्ठल यांत गावकऱ्यांना कुठलाच भेद वाटत नसे. थोडक्यात, हिंदू-मुस्लिम यांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणूनही लालबाबाचा दर्गा महत्वपूर्ण होता. एकेकाळी वैभव, समृद्धी, चहलपहल अनुभवलेला लालबागचा दर्गा आज अशा दुर्लक्षित अवस्थेत का, असा प्रश्न वाचकाला पडतो. इतिहासाच्या सांस्कृतिक खुणा जपणाऱ्या लालबाबाच्या दर्ग्यासारख्या वास्तूंची आजची उपेक्षित अवस्था, या वास्तू जर जिवित असत्या तर त्यांची तडफड, वेदना समजायला मदत झाली असती. त्यामुळे लेखकाने लालबाबाचा दर्गा यालाच या कादंबरीच्या माध्यमातून बोलायला भाग पाडलं आहे आणि त्याचा संपूर्ण प्रवास यात उलगडला गेला आहे. 
मंदिराचा पुजारी आणि दर्ग्याचा मुजावर यांच्यातलं साम्य काय, त्यांची परंपरा आणि विचारात होत गेलेले बदल, वारसाहक्‍काने येणारी मुजावरपदाची जबाबदारी, बेफिकिरी, उदासीनता यामुळे होणारं नुकसान हे या कादंबरीतून कळत जातं. मात्र त्याच वेळी या गावात असलेलं सलोख्याचं वातावरणही एक सुखद अनुभूती देऊन जातं. लालबाबा दर्ग्यात येणारे लोक आपल्या निरनिराळ्या मनोवस्थेला घेऊन इथे प्रवेश करत आणि इथे आल्यावर त्यांना थोडा काळ का होईना शांतीचा अनुभव मिळत असे. यात लेखकाने लालबाबाच्या दर्ग्याचं मनोगत व्‍यक्‍त करताना एक सुरेख वाक्य पेरलं आहे. आजचं वास्तव सांगताना लेखक म्हणतो, ‘भावभावनांचे तऱ्हेतऱ्हेचे तरंग माझ्या या परिसरात उठत असत. आता ते तरंगच नाहिसे झाले आहेत. माझ्या सर्वांगावर उगवलेलं जे पिवळ्या रंगाचं कुरळं गवत आहे, ते त्या तरंगांच्या स्मृतींचं आहे.’ पडझड झालेल्या ओसाड अवस्थेतल्या लालबाबा दर्ग्याची खिन्नता वाचकालाही वेढून घेते.
लालबाबाच्या दर्ग्याचा शोध घेत तिथंपर्यंत पोहोचणाऱ्या, आपल्या जन्मदात्या आईला भेटू इच्छिणाऱ्या चिन्मय नावाच्या एका दत्तक गेलेल्या तरुणाची अस्वस्थताही ‘मनसमझावन’ या कादंबरीत जाणवत राहते आणि त्याच्या या शोधयात्रेचे साक्षीदार म्हणून आपलीही उत्कंठा वाढीस लागते. चिन्मयला दत्तक घेऊन आपलं पालकत्व निभावणारे त्याचे आई-वडील आजच्या समाजाचंही प्रतिनिधीत्व करणारे आहेत. त्यामुळे दोन परस्परविरोधी विचारसरणींची ही दोन माणसं वाचकाला भेटतात आणि त्यांची विचारसरणी तशी का आहे याचं उत्तरं त्यांच्याच मनोगतातून मिळतं. चिन्मयला त्याच्या शोधप्रवासात अनेक माणसं भेटत राहतात, ते त्याची मदतही करतात. त्यामुळेच त्याचा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो.  
‘मनसमझावन’ या कादंबरीचं शीर्षक हेच का आणि मनसमझावन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधताना कळतं, की ‘मनसमझावन’ हा 18 व्‍या शतकातला दखनी भाषेतला एक काव्‍यग्रंथ असून तो शाह तुराब अली यांनी लिहिलेला होता. शाह तुराब अली हे इस्लामचे एक गाढे अभ्यासक आणि थोर सुफी संत होते. शाह तुराब अलींना समर्थ रामदास यांचं मनाचे श्लोक हे काव्‍य खूप आवडलं होतं आणि त्यांनी अशाच एका काव्‍यग्रंथांची निर्मिती आपणही करायची ठरवलं. ‘मनसमझावन’ हा ग्रंथ फारसी लिपीत असून त्याची भाषा मात्र दखनी आहे. शाह तुराब अली यांनी आपल्या काव्‍यग्रंथाला  ‘ मनसमझावन’ नाव देण्याचं नक्‍की केलं. ‘ मनसमझावन’ निर्मितीचा इतिहास खालील दखनी भाषेतल्या ओळींमधून कळतो: 
तंजापर मे जिस रोज हुआ आको दाखिल
सुन्या रामदास की तो पोती है कामिल
गया सुन खुशी से दिल का कमल खिल
जबाव इसका कहना हुआ शौक ए कामिल
‘मनसमझावन’ मध्ये शाह तुराब अली यांनी रामभक्‍तीचे गोडवे गायले आहेत. मात्र त्यांची रामभक्‍ती ही निर्गुण, निराकार आणि सर्वव्‍यापी अशा रामाची होती. त्यांनी चराचरातल्या समस्त भूतांच्या एकत्वाची अनुभूती दखनी भाषेतून व्‍यक्‍त केली. अतिशय दुर्मिळ असा हा ग्रंथ असून लेखकाने हा इतिहास कादंबरीतून सांगत पुढे लालबाबा हे पात्र निर्माण करून त्याच्याशी संबंध जोडला आहे. शाह तुराब अली यांनी आपला शिष्य लालबाबाच्या स्वप्नात येऊन त्यांना ‘ मनसमझावन’ लिहून काढण्याचा आदेश दिला. लालबाबांना ‘ मनसमझावन’ मुखोद्गत असल्यामुळे त्यांनी ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढलं होतं. ज्या शाह तुराब अली यांनी हा गंथ लिहून काढायला सांगितला, त्या दखनी भाषेला मराठीची बहीण असं संबोधलं आहे. 
लेखक म्हणतो, कुठलीही भाषा कधी कुठे असावी हे त्या भाषेच्या गुणवत्तेपेक्षा राजकीय आणि आर्थिक बाबींवर अवलंबून असतं. जैन, बौद्ध, शैव आणि शाक्‍त पंथीयांनी आठव्‍या शतकापासून ते बाराव्‍या शतकापर्यंत रचलेल्या भाषेत अपभ्रंश होत गेला. भारतभर संचार करत असलेल्या सिद्धजणांच्या वाणीत त्या त्या ठिकाणचे शब्द् सामील होत असत. सिद्धांची नाना प्राकृतांचे पाणी प्यायलेली भाषा तेव्‍हा सहजपणे भारतवर्षांची मध्यवर्ती भाषा होती. या अपभ्रंश भाषेची जागा नंतर नाथपंथीयांच्या संधा भाषेने घेतली आणि संधा भाषेतून उत्क्रांत होत आणि त्यात फारसी आणि अरबी भाषेचे प्रवाह मिसळत दखनी भाषेचा जन्म झाला. दखनी भाषेला कुणी हिंदुई, तर कुणी हिंदवी, तर कुणी भाका, तर कुणी दखनी म्हणत असे. दखनी भाषेचं लेखकाने खूप सुंदर शब्दांत वर्णन केलं आहे. तो म्हणतो, दखनी भाषेचं व्‍यकिमत्व तुम्हाला आपल्या नजरेसमोर आणायचं असेल, तर तुम्हाला एखादी भटकी भारतीय व्‍यक्‍ती डोळ्यासमोर आणावी लागेल. जिचा पोशाक्षा थोडासा मध्ययुगीन आहे, जिच्यामध्ये बैरागीपणाच्या छटा आहेत, मुलूखगिरी करत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या सैनिकांचा धडधाकटपणा आहे, गावोगावी जाऊन आपला माल खपवणाऱ्या व्‍यापाऱ्यांची सहनशीलता आहे, मराठीतून आलेला राकटपणा आहे, फारसीकडून आलेली नजाकत आहे, खडी बोलीची सरळता आहे, पंजाबीतून आलेला उमदेपा आहे, तेलुगूचे लालित्य आहे आणि गुर्जरीचा गोडवा आहे.
कोरोनाचं आक्रमण झालं त्या कालावधीत घडलेला कादंबरीतल्या हा पात्रांचा प्रवास असून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनेक परिणामांना सामोरं जात घडणाऱ्या घटनांचा समावेश, ती वातावरणनिर्मिती यात दिसत राहते. कादंबरीतली गोष्ट तशी साधीच, पण सोपी मात्र मुळीच नाही. एका हिंदू तरूण आणि मुस्लीम तरुणी यांची प्रेमकहाणी या कादंबरीतून समोर येते. त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम यांच्यातली तेढ,  वाढत गेलेलं अंतर, युरोपमध्ये आठव्‍या ते अकराव्‍या शतकादरम्यान मुस्लिम विचारवंतांनी केलेली कामगिरी मात्र परस्परातल्या संवादाचा अभाव यामुळे काय घडलं याचाही धांडोळा लेखक या कादंबरीतून घेतो. या कादंबरीतल्या या प्रेमकहाणीचा शेवट काय होतो, या दत्तकपुत्र चिन्मयला त्याची खरी आई भेटते का अशा प्रश्नांची उत्तरं ‘ मनसमझावन’ या कादंबरीतून सरतेशेवटी उलगडली जातात.
ही कादंबरी, इस्लाम, हिंदू धर्म याबरोबरच सुफी परंपरेविषयी बोलत असतानाच लेखक कादंबरीतल्या पात्रांनाही बोलतं करतो, पण ही कादंबरी इथेच थांबत नाही, तर  या कादंबरीतून लेखकाने प्रसारमाध्यमांच्या वापराबद्दलही भाष्य केलं आहे. प्रसारमाध्यमांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्‍यात आणि त्यातल्या गोष्टी तात्कालिक असल्यामुळे त्यामुळे पडलेला प्रभावही तात्कालिकच असतो. खोलवरच्या बदलांसाठी लेखक पुस्तकं आणि ग्रंथ यांना पर्याय नाही असं सांगतो.
‘ मनसमझावन’ मध्ये आजच्या समाजातली राजकीय आणि सामाजिक विचारसरणी यावरही भाष्य केलं आहे. मात्र ही मांडणी करताना कुठेही टोकाला जाऊन त्याबद्दलची कट्टरता त्याने दाखवली नाही, तर अतिशय संयमितरित्या त्या त्या पात्रांच्या माध्यमातून त्याने ती व्‍यक्‍त केली आहे.
‘ मनसमझावन’ चे कादंबरीकार संग्राम गायकवाड  एक सरकारी अधिकारी असून त्यांची साहित्यावरची पकड किती मजबूत आहे हे या कादंबरीतून प्रकर्षाने लक्षात येतं. कादंबरी वाचताना आजचं वास्तव सतत जागं ठेवतं. संत कबीर, समर्थ रामदास, शाह तुराब यासारख्या संतांचे दोहे, पंक्ती आणि विचार यातून वाचकाला चिंतन करायला ही कादंबरी भाग पाडते. विशेष म्हणजे या कादंबरीत दखनी भाषेतलं सौंदर्य, तिचा इतिहास, तिचं महत्व आणि तिचं सर्वसामान्यातलं वावरणं यामुळे तिच्याशी जवळीक साधायला मदत होते. या कादंबरीत कादंबरीवरही लेखकाने सहजपणे भाष्य केलं आहे. कादंबरी हा एकाच सरळ रेषेत प्रवास करणारा वाड्मयप्रकार नसून तुम्ही जसे पुढे जाता, तसे त्या पुढं जाण्याच्या उजेडात मागच्या गोष्टींचे नवे अर्थ उलगडत जातात.
आजच्या व्‍यक्‍तिकेंद्री समाजात, धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, स्तराच्या, लिंगाच्या, अशा अनेक भेदाभेदांच्या भिंती जास्त मजबूत होत असतानाच ‘मनसमझावन’ ही कादंबरी त्यावरचा उपाय सांगण्याचं काम करते. कादंबरी म्हणजे केवळ निखळ मनोरंजन नाही तर त्यातून इतिहासाचा, संस्कृतीचा, मानवी भावभावनांचा, राजकीय-सामाजिक विचारसरणीचा, आढावा घेण्यासाठी बांधील असलेली ‘मनसमझावन’ ही कादंबरी प्रत्येक सजग, सुजाण वाचकाने वाचायलाच हवी.
दीपा देशमुख, पुणे
मनसमझावन 
लेखक : संग्राम गायकवाड
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन
प्रकाशक: रोहन प्रकाशन
शुल्क : रू. 375/-

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.