अडलंय का?
पुणे शहराचं भूषण सांगणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे नाट्यकर्मी अतुल पेठे. सूर्य पाहिलेला माणूस, दिवाकरांच्या एकांकिका, सत्यशोधक, समाजस्वास्थ्य, शब्दांची रोजनिशी या त्यांच्या कलाकृतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. पण कोरोनाचं संकट आलं आणि जवळजवळ दोन वर्षं सगळं जनजीवन कडीकुलुपात बंदिस्त झालं....हळूहळू वातावरण निवळत असताना अचानक ‘अडलंय का?’ हा नाट्यप्रयोग पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरमध्ये प्रत्यक्ष अनुभवता येणार हे कळलं आणि खूप बरं वाटलं. अपार उत्सुकता मनात होती, ‘अडलंय का?’ नाव वाचल्यानंतर, काय असेल विषय? हे कुतूहल वाटत होतं.
‘अडलंय का?’ हे नाटक Die Besetzung या नावाने जर्मन भाषेत असून मूळ लिखाण चार्ल्स लेविन्स्की या स्वीस लेखकाचं आहे. चार्ल्स लेविन्स्की हा एक भन्नाटच माणूस आहे. टीव्हीसाठी हजारो शोंसाठीचं लिखाण या माणसानं केलं आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंड इथे त्याचे शोज प्रदर्शित झाले आहेत. सुदैवाने त्याचं नाटक कळण्यासाठी ते मराठीतून येणं आवश्यक होतं आणि ते महत्वाचं काम शौनक चांदोरकर यानं ‘अडलंय का?’ लिहून केलं आहे. नाटक बघितल्यानंतरच लक्षात येतं की उत्कृष्ट लिखाण असून उपयोग नाही, तर त्याचं सादरीकरण तितकंच महत्वाचं आणि ते जर तितकंच तोलामोलाचं व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक विचार पोहोचवायचा असेल तर दिग्दर्शकही तसाच हवा आणि ते शिवधनुष्य म्हणा, किंवा आव्हान म्हणा, ते लीलया पेलण्याचं काम निपुण धर्माधिकारी यानं केलं आहे.
ठरल्याप्रमाणे भरत नाट्य मंदिरला काल, म्हणजे शुक्रवार ११ फेब्रुवारीला पोहोचताच, काहीच वेळात पडदा वर गेला आणि अतुल पेठे आणि पर्ण पेठे व्यासपीठावर दिसले. दोघांमधल्या संवादातून नाटक पुढे सरकत होतं.
कलेचं आयुष्यातलं स्थान, कलेमुळे आलेलं झपाटलेपण, कला संस्कृतीची वाहक, एखाद्याचं आयुष्य कलेलाच वाहिलेलं, त्याचं जगणंच कलेला समर्पित असलेलं, द्वेषाचा नायनाट करणारी कोण तर तीही कलाच. असं एकीकडे आणि दुसरीकडे व्यक्तिकेंद्री स्वार्थाभोवती फिरणारा समाज, यंत्रवत झालेली आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धावत राहणारी माणसं, त्यांच्या आयुष्यात कलेला तसूभरही जागा नसावी हे वास्तव. अशा भिन्न प्रवृत्तींचं आमनेसामने रंगलेलं एक नाट्य ‘अडलंय का?’ या नाट्यप्रयोगात बघायला मिळतं. मुख्य म्हणजे यात दोन्ही बाजू ब्लँक अँड व्हाईट असं न रंगवता खूप सशक्तपणे हाताळल्या गेल्या आहेत.
अतुल पेठेचा अभिनय - नो वर्ड्स. पहिल्या टप्प्यात त्यानं वठवलेलं पात्र - लाजबाव. त्यानं काढलेला खर्जातला आवाज, त्याची हालचाल आणि लकब....तो समतोल त्याने कसा साधला असेल तोच जाणे. आजवर मी बघितलेल्या त्याच्या भूमिकांमधली ही सर्वात अप्रतिम भूमिका असं मला वाटलं. या नाटकातलं त्याचं चालणं, त्याचं क्षणोक्षणी वेगळ्या लयीत बोलणं, त्याचा पद्न्यास, त्याचं पुटपुटणं, त्याचं अडखळणं, त्याचा आवेश, सगळंच अप्रतिम. त्याला तितकीच झकास साथ पर्णने दिली आहे. दोघांमध्ये चाललेला खेळ आणि त्या त्या टप्प्यातलं खेळातलं प्रत्येकाचं सरशी करणं...हे बघणं सुद्धा तितकंच लाजबाव!
यातले अनेक प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतात. नायिका तिच्या लहानपणी बंकरमध्ये जो जीवघेणा अनुभव घेते तो प्रसंग, नायिकेच्या पिस्टोल मधून सुटलेली गोली आणि नायकाच्या डोक्यावर कोसळलेलं झुंबर, भूतकाळातल्या आपल्या भूमिकांमध्ये रंगलेला नायक, असे अनेक प्रसंग. एका प्रसंगात यातला नायक नकळत्या वयात आपल्या आयुष्यात नाटक कसं आलं ते सांगत असतो. त्या नाटकात सुशेमान नावाच्या एका नाकतोड्याची भूमिका नायकाने केलेली असते. गोष्टीतल्या नाकतोड्याचा-सुशेमनचा सहावा पाय तुटतो आणि राक्षसानं तो पळवलेला पाय चंद्रावर ठेवलेला असतो. त्याला तो हवा असतो, म्हणून तो दोघा बहीण-भावांना सांगतो आणि ते चिमुकले त्याला मदत कशी करतात आणि त्याचा पाय मिळवून देतात याची एक गोष्ट यात खूप सुंदर तऱ्हेने तो सांगतो. चंद्रावर जाण्यासाठी मनाचा अस्सलपणा आणि पारदर्शीपणा किती महत्वाचा असतो, असं सांगत अतुल पेठेनं ज्या तऱ्हेनं स्वत: समोर न येता चित्रकथा सादर केली, तेव्हा त्याचा आवाज, आवाजातले चढउतार यांनी वातावरण निर्मिती तर केलीच, पण त्या वेळी संपूर्ण प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटात न्हावून निघालं.
‘अडलंय का?’ हे नाटक मराठीत अनुवादित झालेलं असलं तरी त्याचा मूळ बाज मात्र अस्सल वाटतो. आपण जणूकाही जर्मन भाषेतूनच नाटक पाहतो आहोत असा भास होत होता. खरं तर नाट्यप्रयोग जसजसा पुढे सरकतो, तसंतशी उत्कंठा वाढत जाते. यात प्रसंगानुरूप केलेलं भाष्य समाजातली विसंगती दाखवतं. माणसातला जिवंतपणा टिकवून ठेवायचा असेल तर कलेचं आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे अधोरेखित करतं. या नाटकाचा शेवट देखील ‘वा, क्या बात है ’ अशी दाद द्यावी असा. नाटक करायचंय, त्यासाठी व्यवस्थेचे, नियमांचे अडथळे आणि ते अडथळे दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा नायक - शेवटी त्याला लक्षात येतं, की अरेच्च्या, आपण नाटक कुठेही करू शकतो आणि त्याच वेळी त्याच्या सहवासात काहीच तास व्यतीत केलेली पॉला - तिलाही त्या कलेचा स्पर्श होतो आणि त्यामुळे तिच्यात झालेला बदल, टिकून राहण्याच्या शर्यतीत तिच्यातल्या स्पर्धकाला गवसलेलं सत्य हेही शेवटाकडे जाताना दिसतं. मूळ नाटकाचा शेवट जरा वेगळा आहे, पण ‘अडलंय का?’ च्या टीमने केलेला शेवट मनाला जास्त भिडणारा आहे. त्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप आभार.
नाटकाचं संगीत, वेशभूषा, नेपथ्य सारं काही समर्पक असंच. नाटक संपलं तरी सारेच प्रेक्षक खुर्चीला खिळून होते, बराच वेळ!
अस्सल कलाकृती अशी असते, घरी आल्यावरही मनातच रेंगाळणारी! मला तर हे नाटक पुन्हा पुन्हा बघता आलं, तरी मी बघीन. कारण यातली थोरोपासून अनेक वाक्य....खूप काही सांगून जाणारी आहेत. अंतर्मनात डोकावून बघायला लावणारी आहेत. काही नाटकं प्रत्येक वेळी नवं काहीतरी सांगतात, तसंच हे आहे.
नाटक चुकवाल, तर एका अप्रतिम अशा प्रयोगाला मुकाल. त्यामुळे ‘अडलंय का?’ असं म्हणून घरात बसू नका, उठा आणि आज आणि उद्या होणारे प्रयोग बघा आणि मग लक्षात येईल, आपण जर हा प्रयोग बघितला नसता तर खरंच चुकलंच असतं.... जरूर बघा.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.comअडलंय का?

adipaa@gmail.com
Add new comment