अन्वर हुसेन याचं चित्र प्रदर्शन आणि मुलाखत!!!

अन्वर हुसेन याचं चित्र प्रदर्शन आणि मुलाखत!!!

तारीख
-
स्थळ
Pune

अन्वर हुसेन यांचं पहिलं चित्र बघितलं ते अमूर्त (ऍब्स्ट्रॅक्ट) शैलीतलं! आणि ते खूपच आवडलं होतं. त्यानंतर मात्र एनसीपीए, मुंबई इथे त्यांचं चित्रप्रदर्शन भरलं असतानाही जाता आलं नाही. त्यामुळे मनात खंत होतीच. सध्या पुण्यात त्यांचं चित्रप्रदर्शन भांडारकर रोडच्या स्कोडाच्या शोरूमच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या आर्ट गॅलरीत ३१ मार्चपर्यंत सुरू असून रसिकांनी त्यांच्या चित्रांचा जरूर आस्वाद घ्यावा. काल प्रचंड गर्दीतून वाट काढत थोडी उशिराच मी या प्रदर्शनात पोहोचले.

अन्वर यांच्याआधी त्यांच्या चित्रांनीच हसून स्वागत केलं. इतकी सुंदर चित्रं की मी माझं भान विसरून गेले. रंगसंगतीचा मेळ तर अदभुतच, पण चित्रं आवडायचं कारण की सगळी चित्रं कष्टकरी, गरीब, सर्वसामान्य लोकांचं जगणं दाखवणारी....व्हॅन गॉघच्या पोटॅटो इटर्स पासून त्याच्या बुटाच्या चित्रापर्यंत आठवण करून देणारी....अन्वर यांच्या चित्रातली चहाची किटली बोलते, त्यांची रिक्षा बोलते आणि त्यांचा जुनापुराणा ट्रकही बोलतो. चित्रं कितीही वेळ बघितली तरी मन तिथून हलायला तयार नव्हतं. पण अन्वर यांच्याशी संवाद साधायचा होता. त्यांच्याकडून चित्रांबद्दल अनेक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेत आम्ही प्रियंमवंदा यांच्या टेरेसवर पोहोचलो. अतिशय सुरेख टेरेस.....स्वप्नातल्यासारखा! तिथे अन्वर यांना बोलतं करण्याआधी समस्त आर्याबागकरांची, नव्यानं दाखल झालेल्यांची ओळख झाली. सगळेच आपापल्या क्षेत्रातले दिग्गज! कोणी उद्योजक, तर कोणी ड्रेस डिझायनर, कोणी साहित्यिक तर कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर तर कोणी आर्किटेक्ट.......विशेष म्हणजे सगळ्यांनाच चित्रकला, साहित्य, संगीत सगळ्यांची आवड! ओळख परेड पार पडल्यानंतर मी संवादक झाले आणि मुळात अबोल असलेल्या अन्वर यांना बोलतं केलं.

या संवादात खूपच मजा आली. उपस्थित सगळेच सामील झाले. अन्वर यांनी सगळ्यांच्याच प्रश्‍नांची मनापासून उत्तरं दिली. याबद्दलचा सविस्तर वृत्तांत मी लवकरच देईन. मात्र तोपर्यंत सगळ्यांनी ३१ तारखेपर्यंत अन्वर हुसेन यांची भेट घेत हे चित्रप्रदर्शन जरूर जरून पाहावं.

दीपा देशमुख.

२२ मार्च २०१८.

कार्यक्रमाचे फोटो