मानवतेचे उपासक पुरस्कार आणि डॉ. प्रकाश सेठ

मानवतेचे उपासक पुरस्कार आणि डॉ. प्रकाश सेठ

तारीख
-
स्थळ
Shrigonde

श्रीगोंदे इथे प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन गेली १० वर्ष केलं जातं. या वेळी २४, २५ आणि २६ डिसेंबर असे तीन दिवस व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या एका डॉक्टर व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरवलं जातं. महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेतर्फे या वर्षी डॉ. प्रकाश सेठ यांना स्व. श्री उत्तमचंदजी लोढा मानवसेवा पुरस्कार जाहीर झाला. माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार माझ्या हस्ते डॉ. प्रकाश सेठ यांना देण्यात आला.

श्रीगोंदे इथलं सभागृह पूर्णपणे भरलं होतं. जितक्या संख्येनं पुरुष उपस्थित होते, तितक्याच संख्येनं स्त्रियाही उपस्थित होत्या. डॉ. प्रकाश सेठ यांची आणि माझी ओळख झाली ती अनंत मुळेच. त्यांचा मृदू स्वभाव, त्यांच्यातली सेवाभावी वृत्ती, त्यांचा विनम्रपणा मी अनुभवते आहे. त्यांचं काम कुठलीही वाच्यता न करता अविरतपणे चालू आहे. 'कर्मण्येवाधिकारस्ते' प्रमाणे कुठल्याही अपेक्षेविना हा माणूस सातत्यानं स्नेहालयसाठी आणि इतर संस्थांसाठी काम करतो आहे. डॉक्टरांना स्वतःबद्दल बोलायला फारसं आवडत नाही. आपलं काम अतिशय शांतपणे ते करताना दिसतात. कुठलाही गाजावाजा न करता त्यांचं अविरत चालणारं काम बघून अक्षरशः मी थक्क झाले. अनामप्रेमची इमारत असो, वा मुलांच्या जेवणासाठी लागणार्‍या टेबलखुर्च्या असोत, दिवाळीचा फराळ असो वा मुलांना लागणारी इतर मदत - डॉक्टर त्यासाठी कसे प्रयत्न करतात आणि कुठून ही सगळी मदत उपलब्ध करतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक!

पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या गुरूविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपण डोंगराएवढं काम करणार्‍या इतर लोकांसमोर अगदीच नगण्य आहोत आणि आपण काहीच केलेलं नाही असंही त्यांनी नम्रपणे सांगितलं. खरं तर डॉक्टरांकडे बघूनच त्यांच्यातल्या माणुसपणाची, त्यांच्यातल्या स्नेहभावाची कल्पना येते. मलाही डॉक्टरांबद्दल बोलायचं होतं. गेली दीड-दोन वर्षं मी त्यांना एक पेशंट म्हणूनही वेळी-अवेळी त्रास देते. त्यांच्या कपाळावर कधी वैताग, कधी एक आठी मी अद्याप बघितली नाही. इतका चांगला माणूस कसा असू शकतो असा प्रश्न मला नेहमीच त्यांच्याकडे बघून पडतो. माझी त्यांच्याशी ओळख करून देणार्‍या अनंत झेंडे याची मी खरोखरंच ऋणी आहे.

डॉक्टरांबद्दल बोलताना मला पिकासोनं म्हटलेलं वाक्य आठवत होतं, तो म्हणाला होता, 'काही चित्रकार असे असतात की सूर्य काढताना ते एक पिवळा ठिपका रंगवतात, पण काही चित्रकांरामध्ये अशी ताकद असते की ते आपली कला आणि प्रतिभा यांच्यातून एका पिवळ्या ठिपक्याचं रुपांतर सूर्यामध्ये करतात.’ एका पिवळ्या ठिपक्यामधून सूर्य निर्माण करणारा एक मानवतावादी माणूस, मला डॉक्टरांमध्ये दिसला. मी डॉ. प्रकाश सेठ यांना त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी लोढा यांच्या कन्या शीला संचेती या आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनिल काकडे यांनी केलं, तर अक्षय जहागीरदार या तरुणाने अतिशय नेटकं सूत्रसंचालन केलं, डॉक्टरांसाठी अतिशय बोलकं आणि त्यांच्या कामाचा आढावा घेणारं त्यांचं सन्मानपत्र विकास पाटील या तरुणाने केलं. सगळं काही यशस्वीपणे घडवून आणणारा अनंत झेंडे मात्र व्यासपीठावरही न येता त्याच्या टीमला प्राधान्य देत होता! श्रीगोंदे इथे संपन्न झालेला हा पुरस्कार सोहळा अतिशय हृद्य अशा वातावरणात पार पडला! (डॉक्टर प्रकाश सेठ यांनी गुरुकुल ही सुरेख डायरी या प्रसंगी आम्हाला भेट दिली!)

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो