औरंगाबाद आणि अपर्णा भेट. ३० सप्टेंबर अपर्णाचा स्मृतीदिन!

औरंगाबाद आणि अपर्णा भेट. ३० सप्टेंबर अपर्णाचा स्मृतीदिन!

तारीख
-
स्थळ
औरंगाबाद

गेली ३० वर्षं सातत्यानं अपर्णाच्या स्मृतीप्रीत्यर्थ औरंगाबादला आंतरशालेय नाट्यस्पर्धेचं आयोजन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे केलं जातं. या वर्षी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मी यावं अशी अपर्णाच्या आईची म्हणजेच जोशीकाकूंची इच्छा होती आणि ती इच्छा मी पूर्ण करणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट होती. लगेचच होकार दिला. रीतसर शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव यांचा मला फोन आला आणि ३० ला पहाटे मी पुण्याहून निघत असल्याचं सांगितलं. शारदा मंदिर शाळेची मी विद्यार्थिनी असल्यानं आपल्याच शाळेत जायची अनेक वर्षांनी संधी मिळत होती ही देखील खूप आनंदाची गोष्ट होती. अर्थात, आता मला शिकवणार्‍या सगळ्याच शिक्षिका निवृत्त झाल्या होत्या. पण त्या सगळ्यांची आठवण मनात होती.

सकाळी गोविंदभाई श्रॉफ सभागृहात पोहोचताच जोशी काकूंनी आणि मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव यांनी माझं स्वागत केलं. जोशी काकूंकडे बघत असतानाच माझ्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी औरंगाबादला असताना अपर्णा आमच्या शेजारीच किंवा आम्ही अपर्णाच्या शेजारी म्हणजे महाजन कॉलनीत राहायचो. अपर्णा अत्यंत लाघवी स्वभावाची मुलगी! तिची आणि माझी गट्टी खूप लवकर जमली. माझ्याशीच नव्हे तर तिची प्रत्येकाशीच अगदी सहजतेनं मैत्री होत असे. अभ्यासातच नव्हे तर अनेक कलांमध्ये तिला रस होता. शिकत असतानाच तिनं विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे ती आणि तिचे वडील दोघंही नाटक शिकायला बरोबर जात. दोघांनीही एकत्र नाटकात काम केलेलं मी बघितलंय. घरचं मोकळं, आश्वासक, विश्वास देणारं वातावरण आणि आपल्यावरचा विश्वास सार्थ करण्यासाठी तिनं घेतलेले परिश्रम याला खरोखरंच तोड नाही. त्यामुळे आज अपर्णासाठी आपल्याला इथं यायचंय हे नक्की होतंच. अपर्णाला आवडणार्‍या गोष्टीसाठी जोशी काकू किंवा एमडी जोशी काका यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं.

अपर्णा बारावीत मेरीटमध्ये आली होती. त्यानंतर सगळं काही चांगलं चाललेलं असताना तिचा अपघात होतो काय, मृत्यूला परतवण्यासाठी ती जिद्दीनं झुंज देते काय आणि अखेर सगळ्यांचा हसत हसत कायमचा निरोप घेते काय, सगळंच सुन्न करणारं होतं. जवळ जवळ वर्षभर जोशीकाकूंच्या नजरेला नजर देण्याचीही माझी हिम्मत होत नव्हती. त्या आणि जोशी कुटुंब हे दुःख कसं पचवत असतील कळत नव्हतं. ते कसे सावरतील या विचारानं मन हळवं व्हायचं. मात्र अपर्णाचेच ते आई-वडील होते. त्यांनी वास्तव स्वीकारलं आणि अपर्णाला आवडणार्‍या गोष्टींसाठी बरंच काही करायचं ठरवलं. त्यातलीच एक नाट्यस्पर्धा! हॉलमध्ये प्रवेश करताच व्यासपीठावर एका बाजूला अपर्णाचा फोटो होता, तोही जणू काही स्वागतासाठी सज्ज होता. आपण अपर्णाला भेटायला आलो आहोत असाच काहीसा फिल त्या फोटोनं मला दिला. मग सगळं काही खूप भराभर घडलं. या स्पर्धेसाठी औरंगाबादच्या सर्वच शाळांमधून एकूण ५२ मुलामुलींनी भाग घेतला होता. पर्यावरण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, ती फुलराणी, परीक्षा आणि विद्यार्थ्यांचा ताण, इतिहासातले काही प्रसंग, कचर्‍याचा प्रश्न, मानसिक विकार अशा अनेक विषयांवर मुलामुलींनी सादरीकरण केलं. यात काही मुलांनी सादरीकरण करताना ते स्वतः लिहिलेलं होतं. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शीतल देशपांडे आणि रमाकांत भालेराव यांनी काम बघितलं. स्पर्धेचं आयोजन खूपच नेटकं केलेलं होतं. स्पर्धेचे निकाल जाहीर होण्याआधी मला उपस्थितांशी संवाद साधायचा होता.

स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा हेतू, अपर्णाचं व्यक्तिमत्व, नाटक काय देतं, नाटकासाठी काय आवश्यक आहे, वाचन माणसाला कसं घडवतं, (चंदू, प्रशांत, धनु यांच्याबद्दलही बोलले ) आणि झपाटलेली माणसं कशी असतात याबद्दल उदाहरण देत मी बोलले. नाट्यस्पर्धेचे निकाल जाहीर होताच, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या ठरलेल्या पारितोषिकांसह जीनियसचा संच भेट दिला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक शिक्षक, मुलंमुली भेटून गेली. मला खास भेटायला आणि ऐकायला मिनाक्षी वळसे आवर्जून आल्या होत्या. स्पेशल मुलांसाठी काम करणाऱ्या मंजुषा राऊत यांनी भेटून Music Therapy च्या सीडी भेट दिल्या. नंतरचा वेळ खूप भुरर्कन उडून गेला. शारदा मंदिरच्या उज्ज्वला जाधव आणि मैत्रिणींबरोबर स्माईलमध्ये जेवण, नंतर महाजन कॉलनीत अपर्णाच्या घराला भेट, जोशी काकूंनी दिलेली सुरेखशी साडी आणि मीलन मिठाईचे पेठे घेऊन निघावं वाटत नसतानाही निरोप घेतला.

त्यानंतर ऑटीस्टीक मुलांसाठी काम करणाऱ्या अंबिका टाकळकर या मैत्रिणीच्या सेंटरला भेट दिली. सुरेखशा चेक्सच्या युनिफॉर्ममधली सर्व वयोगटातली मुलं त्या त्या वर्गात विभागलेली होती आणि आपापली कामं करत होती. अंबिकानं आपली संस्था खूपच सुरेख ठेवली आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला स्टाफही तितकाच तत्पर आणि हसतमुख बघायला मिळाला. तिथेच धनश्री ओक हिची मुलगी गार्गी हिचीही भेट झाली. गार्गी मुलांना हस्तकलेच्या सुरेख वस्तू शिकवत होती. स्वतःच्या मुलासाठी पालक वाट्टेल ते करतात पण इतरांची मुलं (तीहीऑटीस्टीक असलेली) आपली मानून त्यांच्यासाठी झोकून देवून काम करणारी अंबिका! अंबिका, तुला आणि तुझ्या कार्याला सलाम! दिवसभर माझी वाट बघणार्‍या आणि जवळजवळ ३५ वर्षांनी भेटलेल्या माझ्या मैत्रिणी रजू आणि उजू यांच्याशी गप्पा झाल्या. मिनाक्षीताई, त्यांचे पती, सून आणि नात स्वरा या सगळ्यांचीही भेट घेतली. उजू आणि रजू यांनी दिलेली गुलाबी लेननची साडी, वळसे कुटुंबीयांनी प्रेमानं दिलेलं ज्वारीचे पापड, बुकमार्क असं बरंच काही घेऊन औरंगाबादचा निरोप घेतला. नगरला संदीपमध्ये काळ्या मसाल्याची भरल्या वांग्याची भाजी, भाकरी आणि नागलीचा पापड खाऊन रात्री उशिरा पुण्यात पोहोचले. घरी आल्यावर अपूर्वला सगळा वृत्तांत सांगितला. औरंगाबादला असताना तो खूपच लहान होता. त्यामुळे त्याला खूप अस्पष्ट आठवत होतं, पण माझ्या बोलण्यातून अपर्णा, वृषाली, लड्डू, जोशीकाका, जोशी काकू असं सगळं त्याच्या डोळ्यासमोर मी चित्र उभं केलं.

बोलता बोलता झोपेनं पापण्यांवर ताबा मिळवला आणि त्याच वेळी फोटोतली अपर्णाची छबी माझ्यासमोर आली आणि ‘दीपाताई, लवकर भेटू ग’ म्हणत तिनं हसत ‘बाय’ म्हटलं!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो