बारामतीत सांजरा झालेला आंतरराष्ट्रीय महिला दिन- ८ मार्च २०१७

बारामतीत सांजरा झालेला आंतरराष्ट्रीय महिला दिन- ८ मार्च २०१७

तारीख
-
स्थळ
बारामती

‘रंगुनी रंगात सार्‍या रंग तुझा वेगळा’ या शीर्षकाखाली कार्यक्रम महिना-दीड महिनाभरापूर्वीच ठरला. पण कार्यक्रम जसजसा जवळ येऊ लागला, तसतसं माझं टेन्शन वाढू लागलं. कारण असं झालं की माझ्या ओळखीचे आणि अनोळखी असे अनेकांचे मेसेजेस आणि फोन कॉल्स......‘आम्ही वाट पाहत आहोत, आम्ही तुमचं बोलणं ऐकायला उत्सुक आहोत......’ स्त्री-वर्ग तसंच पुरुष-वर्ग दोघंही संवाद साधत होते. आता खरं तर मला व्याख्यानाच्या वेळी जवळ जवळ ५००० लोक असले तरी बोलण्याची भीती वाटत नाही, पण बारामतीच्या लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे मी खूप अस्वस्थ झाले. मी आयोजकांना माझ्या परीनं सांगण्याचाही प्रयत्न करत होते, की मी वेगळी नाही, तुमच्यासारखीच एक तुमच्यातलीच एक आहे. तेव्हा मी काहीतरी भव्यदिव्य बोलणार आहे असा गैरसमज करून घेऊ नका. पण त्या सगळ्यांना तो माझा विनय वाटत होता आणि मी मात्र हे धरणीमाते मला ८ मार्चला दुभंगून पोटात घे असं मनाशी म्हणत होते.

या सगळ्या काळात अच्युत गोडबोले यांच्याजवळ मी सतत माझी अस्वस्थता व्यक्तही करत होते. ते मात्र मला सतत धीर देत होते, तू छान बोलतेस, छानच होणार....अगदी आज सकाळीसुद्धा त्यांनी मला मी काय बोलणार याबद्दलचे मुद्दे विचारले आणि सुरुवातीचे काही मुद्दे शेवटी घ्यावेत अशी सूचना केली. त्यांची सूचना अगदीच योग्य होती....थँक्स टू हिम! बारामती भेटीत सुवर्णामुळे मिळालेला एक गोड छोटा भाऊ दिनेश याच्या स्वयंप्रेरणा संस्थेला धावती भेट देता आली. तो तर माझ्या भेटीसाठी अक्षरशः दिवस मोजत होता. आता तीनच दिवस राहिले, आता दोनच दिवस राहिले असे त्याचे मेसेजेस येत होते.

बारामतीला त्याच्या संस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे सतत मेसेजेस, की मी कुठपर्यंत पोहोचले....त्याच्या केंद्राजवळ पोहोचताच दोन गोड मुली समोर आल्या. सुटाबुटातला दिनेश आणि आणखी एक गोड सुंदरी (जी त्याची बायको ज्योती!) समोर आले. त्यांच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ....त्यांचे चेहरे बघून मीच जास्त टवटवीत झाले. अतिशय नेटकं आणि सुंदर ऑफिस.....तिथेच बसून राहावं इतकं छान वातावरण....तिथे दिमाखात स्वागत करणारी पुस्तकं बघून तर मी हरखून गेले. दिनेशच्या आणि माझ्या नात्याचा खूप अभिमान वाटला. ज्योतीला कधी भेटले नव्हते, पण पहिल्याच भेटीत पोरीनं मन जिंकलं. दिनेश आणि मी वेगळे नाहीच इतके त्याचे आणि माझे विचार एकसारखे...म्हणजे मी बोलले काय आणि तो बोलला काय इतकं सारखं! उशीर झाला -----तरी योगितानं अपूर्वला माझी आवड विचारून पुरणपोळीसहित साग्रसंगीत सुग्रास स्वयंपाक तयार केलेला.....मला तर जेवणच जाईना....अशी अवस्था तिच्या प्रेमानं झाली..... जेवण होताच, तयार होऊन (प्रिय मैत्रिणीनं दिलेली साडी नेसून आणि दुसर्‍या प्रिय मैत्रिणीनं गळ्यातलं आणि कानातलं काश्मीरहून आणलेलं लेवून) आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो.

तिथं प्रवेशद्वाराजवळच डॉ. संजीव कोल्हटकर, सीमा, संगीता, रुपाली, प्रतिभाताई, साधनाताई, सुचित्रा,सुनिता शहा, माधुरी राऊत, नीता शेंबेकर सगळे बारामतीतले आर्याबागकर भेटले....सगळ्याच जणी इतक्या सुंदर दिसत होत्या की बस्स! सीमा तर ‘मार डाला’ अशी! इतकं छान वाटलं. आत गेल्यावर संपूर्ण ऑडिटोरियम खच्चून भरलेलं....काही चेहरे ओळखीचे पण बाकी सगळे अनोळखी....पण सगळ्या स्त्रिया महिला दिनाचा उत्साह घेऊन बसलेल्या.... साध्या, पण कलात्मक सुंदर साड्या नेसून आलेल्या....काहीच क्षणात सुनंदा पवार आणि सुनेत्रा पवार याही आल्या. कार्यक्रमासाठी आम्ही व्यासपीठावर स्थानापन्न झालो. सुरुवातीला अनेक महिलामंडळांचे आणि चांगलं काम करणार्‍या महिलांचे सत्कार झाले. संगीताला जीजाऊ पुरस्कार जाहीर झालाय, तिचाही खास सत्कार झाला. आता लवकरच माझ्या व्याख्यानाला सुरुवात होणार होती....कार्यक्रमाचं निवेदन करणारी एक गोड मुलगी खूपच छान बोलत होती. त्यानंतर वर्षा सिधये हिनं माझा परिचय करून दिला.... माझ्या अनेक पुस्तकांमध्ये असलेला छापील परिचय वाचला जात होता...मीही सवयीप्रमाणे ऐकत होते....आणि तो संपताच वर्षानं चक्क माझी वेगळीच ओळख करून द्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, दीपा ही यापेक्षा आणखी वेगळी आहे आणि मग तिनं माझं शिवण, मी करत असलेले पदार्थ, माझं गाणं, माझी चित्रकला, मी लिहिलेले चित्रपटांचं परीक्षण, माझं आणि अपूर्वचं नातं, मी अजातशत्रू कशी आहे वगैरे ज्या पद्धतीनं सांगितलं की मी चकित झाले. खरंच, हीच माझी ओळख मला त्या छापील ओळखीपेक्षाही जास्त भावली. त्याच क्षणी मला वर्षाला मिठी मारावीशी वाटली. पण गुपचूप गंभीर चेहरा करून बसून राहिले.

बोलण्यासाठी डायसजवळ गेले....बारामतीच्या लोकांच्या प्रेमाविषयी, स्नेहाविषयी बोलले आणि बारामतीशी संपर्क आला त्या आर्याबाग ग्रुपविषयी बोलले....त्यानंतर सुनंदाताईंचं स्त्री-सक्षमीकरणाचं काम आणि सुनेत्राताईंचं ग्रामविकासाचं काम याविषयी महिला दिनानिमित्त त्या कामांचा विशेष आदर आणि उल्लेख केला.. महिला दिनाचं औचित्य साधून स्त्री-जीवनाची स्थिती सांगणारी एक लोककथा सांगितली आणि महिला दिन साजरा का करायचा, त्याचा इतिहास आणि आजची स्त्री यावर बोलले....आणि मग माझ्या आयुष्याच्या प्रवासाच्या गाडीनं वेग घेतला.....पुन्हा सगळा प्रवास नव्यानं मीही अनुभवला....या प्रवासातले चढउतार आणि त्यातून मला भेटलेली माणसं, माझं समृद्ध होत जाणं हे सगळं बोलत गेले.....विजयाताई चौहान यांच्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनातला सहभाग आणि नर्मदेच्या वादळात अडकलेला तो विलक्षण अनुभव आठवला.....यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मित्र-मैत्रिणी आणि निर्माणमुळे मिळालेले महाराष्ट्र आणि त्याबाहेरचे अनेक युवा आठवले.....बाबा (अनिल अवचट) आठवला आणि मग माझा लेखन प्रवास सुरु झाला...सहलेखन करताना अच्युत गोडबोले यांच्याकडून मी काय शिकले, त्यांच्यातल्या हाडाच्या शिक्षकानं मला ‘तुला हे जमेल’ हा विश्‍वास कसा दिला इथंपासून ते शास्त्रज्ञांनी काय प्रेरणा दिली, स्त्री हे पुस्तक का लिहावंस वाटलं आणि त्यात काय असणार आहे हे सांगत राजा राममोहन रॉय यांच्या आयुष्यातला त्यांची वहिनी अलकमंजिरी हिचा सतीचा अंगावर काटा येणारा प्रसंग....ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातले प्रसंग आणि ते नसते तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो हेही सगळं सांगत गेले.....! शेवट मात्र मेधाताई पाटकर यांच्या गीतानं केला....मला हे गाणं खूप आवडतं. मी नर्मदेच्या आंदोलनात सहभागी झाले असताना, मासवणला असताना अनेक वेळा गायलं होतं....आज ते गायल्यानं खूप समाधान मिळालं. कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय साध्य होत नाही हे सांगताना या ओळी सहजपणे ओठाबाहेर पडल्या,

इसलिये राह संघर्ष की हम चुने

जिंदगी आसूँओमे नहाई न हो

शाम सहमी न हो,

रात हो ना डरी, भोर की आँख

फिर डबडबाई न हो.....

कार्यक्रम संपला...खूप उशीर झाला होता. भुकेनं प्रत्येक महिलेच्या घरातले पुरुष दीनपणे वाट बघत असलेले मला दिसत होते. मात्र सगळ्यांनी व्यासपीठावर एकच गर्दी केली. कोणाला सेल्फी घ्यायचे होते, कोणाला हातात हात घ्यायचा होता, तर कोणाला मिठी मारायची होती....कोणाला माझं बोलणं किती आवडलं हे सांगायचं होतं....एका चिमुरडीनं तर माझ्यासाठी खास ग्रिटिंग बनवून आणलं होतं आणि ते माझ्या हाती देऊन तिला फोटो काढायचा होता.....गेल्या तीन-चार वर्षांत अनेक कार्यक्रम झाले. कितीतरी प्रचंड गर्दी समोर होती....पण बारामतीचा हा कार्यक्रम कायम माझ्या स्मरणात राहील....माझ्या मनातली त्यांच्या अपेक्षांची भीती बारामतींकरांनी मला प्रतिसाद देत पूर्णपणे नाहीशी केली होती.....कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जे भरभरून प्रेम दिलं, मी भारावून गेले....! बारामतीच्या सगळ्या आर्याबागकर माझ्या आनंदात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याबरोबरही अनेक फोटो झाले!

परतायचं होतं, आयोजकांनी जेवणासाठी स्थळ निश्‍चित केलं होतं....आणखी एक कार्यक्रम सुनेत्राताईंचा होता, पण तरीही त्या तिथे हजेरी लावून जेवणाच्या स्थळी वेळेवर पोहोचल्या.... जिवाभावाची एक मैत्रीण लाभावी अशा गप्पा झाल्या. औरंगाबादला त्या शिकत असतानाच्या काळातल्या आठवणी जाग्या झाल्या...तसंच माझ्या सध्या फेसबुकवरच्या मराठवाडी रेसिपीजबद्दल त्या भरभरून बोलल्या. त्या पदार्थांची वेगळ्या तर्‍हेनं आठवण झाल्याचं त्यांनी सांगितलं. सुनेत्राताई, तुमची स्नेहपूर्ण ‘साय’ मी कधीच विसरणार नाही. खरं तर मन म्हणालं, साय नाही खाल्ली तरी चालेल, सायीसारख्या चेहर्‍याच्या सुनेत्राताई समोर आल्या तरी बस आहे! जेवताना संगीता, मिनाक्षी, श्रीमती मुथा, पोर्णिमा तावरे, अनिता खरात, सुनेत्राताईंची गोड भाची, आश्‍विनी - आम्ही हसतखेळत गप्पा मारत जेवण केलं.....पाऊल निघत नव्हतं, पण निघणं भागच होतं.... पुन्हा भेटू या असं न बोलताही बोलत एकमेकींचा निरोप घेतला.

या सगळ्यांत राहून गेलेल्या गोष्टी म्हणजे माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींशी मला बोलता आलं नाही, फार वेळ देता आला नाही. तसंच सुवर्णा ही मैत्रीण आजारी असून उशीर झाल्यानं तिला भेटायला जाता आलं नाही....श्रीराम गडकर या प्राध्यापक मित्राला शब्द देऊनही भेटू शकले नाही याची खूप खंत मनाला लागली. यात चांगली गोष्ट अशी घडली, की माझी बारामतीच्या कार्यक्रमाची फेसबुक पोस्ट वाचून माझी सख्खी चुलत बहीण आश्‍विनी हिनं मला फेसबुकवर ‘दीपाताई, मी रमाकाकाची पिंटू, (आश्‍विनी) मी कार्यक्रमाला येतेय’ असा मेसेज टाकला. ती आली. भेटली. तब्बल २० वर्षांनी मला ती भेटली. तेव्हाची खट्याळ, अवखळ मुलगी आज किती मोठी, गंभीर, पण प्रसन्न असलेली मी बघत होते. खूप प्रेम दाटून आलं. सगळ्यांबरोबर तिच्याशी थोडंफार बोलले, पण मन मात्र खूप बोलत गेलं...खूप...तिलाही ते नक्कीच ऐकू गेलं असणार.....! या प्रवासात मिनाक्षी या मैत्रिणीनं आपल्या फॅक्टरीचं काम सोडून मला अतिशय सुरेख साथ दिली. तिच्यामुळे प्रवास अधिकच सुंदर झाला. आता शेवट.....दिनेश, ज्योती, आश्‍विनी यांनी प्रेमानं माझ्यासाठी आणलेली साडी-भेट दिली.....(माझे सतत कार्यक्रम होतात आणि त्यांनी प्रेमाखातर दिलेली साडी त्या कार्यक्रमाच्या वेळी मी नेसावी हा त्यांचा आग्रह होता!) कार्यक्रमाच्या आठवणी, लोकांचं प्रेम आणि सुंदर साड्यांची भेट घेऊन मी रात्री १.३० वाजता घरी पोहोचले.....! मन मात्र अजूनही तिथेच रेगांळत आहे हे मात्र खरं! 

दीपा, 
९ मार्च २०१७.

कार्यक्रमाचे फोटो