विजेता आणि हृदयस्थ पुस्तकांचं प्रकाशन
पावसाचा जोर वाढलेला, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सभागृह लोकांनी पूर्ण भरलेलं. लेखक उमेश घेवरीकरच्या प्रेमापोटी शेवगावपासून ते पुणेकरांपर्यंत त्यांचे स्नेही, नातलग खूप प्रेमानं पावसाची तमा न बाळगता येऊन पोहोचले होते. माझा मित्र धनंजय सरदेशपांडे, वंदना ठुबे, राजू इनामदार, सुनील महाजन, देवदत्त पाठक प्रांजल थोरात, प्रकाश पारखी आणि अभिनेता राजकुमार तांगडे आवर्जून आले होते. कार्यक्रम लवकरच सुरू झाला. कार्यक्रमाचं निवेदन करणारी निवेदिका हिनं खूप अभ्यासपूर्ण तयारी केली होती. प्रत्येक पाहुण्यासाठी तिनं समर्पक कवितांच्या ओळी वापरल्या. तिचा आवाज आणि बोलणं खूपच मधाळ होतं.
व्यासपीठावर बालसाहित्यिक राजीव तांबे, अभिनेता आणि नाटककार योगेश सोमण, दिग्दर्शिका रीमा अमरापूरक आणि दस्तुरखुद्द दीपा देशमुख उपस्थित होते. विजेता या पुस्तकात एकूण सात कथा बाल-कुमारांसाठी लिहिल्या असून या वाचताना नाट्य डोळ्यासमोर उभं राहतं. या कथांचे नायक/नायिका हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. शेतकरी, गवंडीकाम करणारा, अपंग अशा प्रकारचं जगणं जगणारे ते आहेत....मात्र त्यांच्यातली माणुसकी, प्रश्नांना, संकटांना सामोरं जाण्याची तयारी या कथांमधून आपली उत्कंठा क्षणोक्षणी वाढवते.
या कथांमधून लेखक कुठलाही उपदेश करत नाही. मात्र या कथाच नकळत मूल्यांची पेरणी वाचकांच्या मनात करून जातात. उमेश घेवरीकर हा पेशानं शिक्षक, पत्रकार, नाटककार, दिग्दर्शक, कवी, लेखक असा सबकुछ आहे. नुकतीच त्याची पुरुषोत्तम चित्रपटातली आयुक्तांच्या सचिवाची भूमिका खूपच वाखाणली गेली. अंगी सगळे गुण असूनही हा माणूस अतिशय साधा आणि नम्र आहे. सध्याच्या व्यस्त दिनक्रमात पालकांनाही मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही, अशा वेळी शिक्षकानं मुलांचा पालक, मार्गदर्शक आणि मित्र व्हायला पाहिजे असं उमेश म्हणतो. कार्यक्रमात योगेश सोमण यांनी उमेशविषयी कौतुकपर संवाद श्रोत्यांशी साधला, तर रीमानं उमेशमधल्या कौशल्यांची वाखाणणी करत तो आपल्या कुटुंबाचाच भाग असल्याचं सांगितलं.
राजीव तांबेनं आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत पालकांना शालजोडीतले काढून मारले आणि त्याच वेळी मुलांची मानसिकता कशी असते तेही विनोदी पद्धतीनं सांगितलं. उमेश घेवरीकरनं आपल्या कुठल्याही कृतीला पाठिंबा देण्यासाठी भारदे संस्था, शाळा, शिक्षकमित्र आणि कुटुंबीय कसे असतात हे सांगत त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं. विजेताचा कार्यक्रम इतका नेमका आणि नेटका झाला की तो कुठेही रेंगाळला नाही, उलट त्याची रंगत वाढतच गेली. मुलांसाठी दर्जेदार लिखाण कमी प्रमाणात प्रसिद्ध होत असताना उमेश घेवरीकरचं विजेता मुलांसाठी पर्वणीच ठरणार आहे यात शंका नाही!
जरूर वाचा. दीपा देशमुख, पुणे.