पहिला जागतिक चांगुलपणा दिन - 5 नोव्हेंबर 2020

पहिला जागतिक चांगुलपणा दिन - 5 नोव्हेंबर 2020

तारीख
-
स्थळ
Pune

यशवंत शितोळे या कार्यकर्त्याचा 4 नोव्हेंबरला फोन आला, उद्या आपण पहिला जागतिक चांगुलपणा दिन साजरा करणार आहोत आणि तुमचा एक तास मला हवा आहे. या तासात तुम्ही आणखी 5 जणांना सामील करून घ्यायचं आहे. पहाटे 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सलग 12 तास चांगुलपणाचा जागर केला जाणार आहे. प्रत्येक तासाला 6 वक्ते प्रत्येकी 10 मिनिटं डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याविषयी, चांगुलपणाविषयी, चांगुलपणाच्या चळवळीविषयी बोलतील अशी संकल्पना होती. सकाळी 9 वाजताची वेळ ठरली. मी फोन करताच मनोविकासचे अरविंद पाटकर, अर्थक्रांतीचे यमाजी मालकर, डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ, नगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि आसावरी कुलकर्णी यांनी 9 वाजता झूम मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला.

5 नोव्हेंबर हा दिवस जागतिक चांगुलपणाचा दिनाचा जागर करण्यासाठी निवडला गेला आणि या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी डॉ. ज्ञानेश्वर मुळे या आमच्या मित्राचा वाढदिवस होता. इतकंच नाही तर या झूम मिटिंगमध्ये सहभागी होणार्‍या किरण काळे याचाही वाढदिवस होता. (किरणने मात्र आपला वाढदिवस असल्याचं अजिबात लक्षातच येऊ दिलं नाही. त्यामुळे त्याला जाहीर शुभेच्छाही देता आल्या नाहीत.) या सत्राच्या सुरुवातीला किरणने तो जेव्हा एमबीए झाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्या वेळी दिल्लीला जाण्याचा प्रसंग आला होता. ज्ञानेश्वर मुळे यांचं माती, पंख आणि आकाश हे पुस्तक वाचून तो खूप प्रभावित झाला होता. दिल्लीत गेल्यावर त्यानं सहज म्हणून मुळेंना फोन केला, ते प्रतिसाद देतील याची अपेक्षाही त्याच्या मनात नव्हती. मात्र अहो आश्चर्यम, ज्ञानेश्वर मुळेंनी स्वत: फोन तर उचललाच, पण ओळख नसतानाही किरणला भेटायची वेळ दिली. ती भेट आपलं जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी खूप वेगळी ठरली असं किरणनं सांगितलं. एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असणार्‍या व्यक्तीचं इतकं साधेपणानं वागणं बघून तो चकित झाला. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेत राहून समाजोपयोगी काम करायचं हा किरणचा निर्धार आणखीनच पक्का झाला होता. पण काही कारणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं नाही, पण आज काँगे्रससारख्या पक्षामध्ये राहून तेच काम करता येत आहे याचं त्याला समाधान आहे. मुळेसरांच्या, आत्मचरित्राने, क्रियाशील व्यक्तिमत्वाने आणि साधेपणाने आपल्याला काम करण्याची प्रेरणा दिली असून चांगुलपणाच्या या चळवळीत आपण सक्रिय सामील राहू असं त्यानं सांगितलं. जाता जाता किरणनं डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

त्यानंतर ऑफीसला जाण्याची गडबड असूनही आसावरीने वेळ काढला आणि मुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, ती खूपच उत्स्फूर्तपणे बोलती झाली. दीपामुळे (म्हणजे मी) आणि कल्याण तावरे यांच्यामुळे आपली ज्ञानेश्वर मुळे यांची ओळख झाली आणि भेट होईपर्यंत मनावर प्रचंड दडपण होतं, मी आणि माझं छोटंसं जग इतकंच तोपर्यंत मला ठाऊक होतं, त्या जगाबाहेर बघण्याची मला इच्छाही नव्हती. असं असताना ज्ञानेश्वर मुळे यांच्यामुळे माझ्यात एक सकारात्मक बदल घडला, प्रचंड आत्मविश्वास मिळाला आणि जगच विस्तारलं गेलं. मी च्या पलीकडे जाण्याची प्रेरणा मला त्यांच्यामुळे मिळाली असं म्हणताना आसावरीने त्यांना ‘माऊली’ हे विशेषण बहाल केलं. मुळेसरांचं कार्य एकाद्या वृक्षासारखं असून एक एक पारंबी होऊन त्यांच्या चांगुलपणाची मुळं पसरत, विस्तारत जाणार आहेत असं म्हणत आपण या चळवळीत असणार हे गृहीतच असल्याचं ती म्हणाली. त्यानंतर मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर यांनी मुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांची आणि आपली पहिली भेट त्यांच्या काव्यसंग्रहाच्या निमित्त कशी घडली आणि नारायण सुर्वे आणि त्यांची भेट घडवून देण्यास आपण कसे कारणीभूत ठरलो याची आठवण सांगितली.

या भेटीत नारायण सुर्वे यांनी अतिशय सुरेख अशी प्रस्तावना ‘जोनाकी’ या काव्यसंग्रहाला दिली. मधले अनेक दिवस भेट नाही, पण माती, पंख आणि आकाश या पुस्तकाला नवं रूप देण्याची संधी मनोविकासला मिळाली आणि त्या काळात ज्ञानेश्वर मुळे यांचे अनेक पैलू दिसत गेले. हे पुस्तक तयार होत असताना त्यांनी कधीही त्या कामात ढवळाढवळ केली नाही, अधिकारी म्हणून कधी रुबाब गाजवला नाही आणि इतकंच नाही तर पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर कधीही किती प्रतींची विक्री झाली याची चौकशी करून भंडावून सोडलं नाही. त्यांच्याबरोबर प्रवास करताना आम्ही त्यांची सरबराई करण्याऐवजी जेवणापासून ते चहापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनीच आमची काळजी घेतली हाही अनुभव त्यांनी सांगितला. त्यांच्यातला चांगला माणुस कसा पदोपदी आपण बघितला हे सांगत असताना त्यांनी आपण या चांगुलपणाच्या चळवळीत बरोबर आहोत हे सांगितलं. याच वेळी त्यांनी हे सगळं दीपा मॅडम (अर्थात मी) मुळे अनुभवता आलं हे आवर्जून सांगितलं. डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ, पर्यावरण संवर्धनावर काम करणार्‍या मैत्रिणीनं डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची ओळख बारामतीत आर्याबाग इथे कल्याण तावरे यांच्यामुळे झाल्याचं सांगत, ही ओळख कशी वृद्घिंगत होत गेली आणि त्यात त्यांच्यातला अधिकारी, साहित्यिक आपण कसा बघितला याविषयी सांगितलं. (यासाठी तिची स्वतंत्र पोस्ट जरूर वाचावी) यमाजी मालकर यांनी विदेश सेवेच्या कारकिर्दीबद्दल बोलत डॉ. ज्ञानेश्वर मुळेंनी प्रशासनात दिलेल्या विशेष योगदानाचं महत्व सांगितलं. भारतासारख्या देशात काम करताना ज्या मर्यादा असतात, त्यांन ओलांडून जात हा मनुष्य कसं काम करतो आणि ते केवळ चांगुलपणामुळेच. भारतासारख्या अवाढव्य देशामध्ये व्यवस्थेत राहून परिणामकारक काम करणं सोपं नसताना हा माणूस ज्या प्रकारे काम करतो, त्यामुळे व्यवस्थेत कसा सकारात्मक बदल घडतो हे यमाजी मालकर यांनी सांगितलं. मुख्य म्हणजे या कामाचा परिणाम खालपर्यंत कसा दिसायला लागतो हे पासपोर्ट सेवेच्या बाबतीत अशक्य ते शक्य ज्ञानेश्वर मुळे यांनी करून दाखवलं. दिल्लीमध्ये त्यांनी पुढचे पाऊल हा गटही कसा निर्माण केला आणि महाराष्ट्रातून दिल्लीत कामासाठी जाणार्‍या सर्वसामान्य माणसाची अडचण कशी दूर केली याविषयी यमाजीने सांगितलं. आपला वैयक्तिक अनुभवही या प्रसंगी यमाजी मालकर यांनी सांगितला. आपण आपल्या कामानं या चांगुलपणाच्या चळवळीत सहभागी असू असं सांगत यमाजीने ज्ञानेश्वर मुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

खरं तर या पाच जणांच्या ओघवत्या आणि सुरेख अशा बोलण्यातच वेळ संपत आला. नवाचे दहा कधी वाजले याचा पत्ताही लागला नाही. त्यामुळे मला मात्र बोलण्यासाठी तसा वेळच मिळाला नाही, पण आनंद मात्र मिळाला. या प्रसंगी माझ्या मनात अनेक आठवणींनी गर्दी केली होती. माझा स्वत:चा पासपोर्ट मिळवताना माझी झालेली दमछाक, पण डॉ. ज्ञानेश्वर मुळे नावाच्या याच माणसानं चुटकीसरशी माझे प्रश्न सोडवले होते. इतकंच नाही तर त्यानंतर माझ्या अमित नागरे आणि इतर अनेक मुलांना, मित्रमैत्रिणींना कोणालाही कुठलीही पासपोर्ट बाबत समस्या निर्माण झाली तर त्यात लक्ष घातलं होतं. कुठलंही संकट आलं तर आपण बरोबर आहोत याचा धीर दिला होता, आश्वस्त केलं होतं. ज्ञानेश्वर मुळे यांना नारायण सुर्वे पुरस्कारानं गौरवलं गेलं, त्या वेळी जे भाषण करायचं त्याविषयी माझ्याशी चर्चा केली होती. नारायण सुर्वेंना त्यांनी आधुनिक काळातला कबीर म्हटलं होतं. इतकंच नाही तर इंदूरला होणार्‍या भाषेच्या संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना भाषेविषयी खूप खोलवर मांडणी त्यांनी केली होती. भाषेची उत्पत्ती, तिचं सौंदर्य, तिची बलस्थानं, याविषयी माझ्याबरोबर सखोल चर्चाही केली होती. ज्या राष्ट्राला स्वत:ची भाषा नाही, त्या राष्ट्राला स्वत:ची जिव्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्याच शब्दांत, ‘पण फक्त शब्दांमुळे किंवा फक्त विपुल साहित्यामुळे भाषा संपन्न होईल, फुलेल, फळेल याची खात्री देता येणं शक्य नाही. तंत्रज्ञानाच्या समकालीन गतिमान प्रक्रियेचे भाषांतरित स्वरूप भाषेला सांगाडा देईलही पण या पलीकडे आपल्या समाजात सर्जनशीलतेला मानाचं स्थान मिळालं पाहिजे. निर्मितीक्षमता म्हणजे फक्त सुंदर काव्यरचना असा नसून संपूर्ण भाषासमूहालाच नवनिर्मितीचे सर्वकंष डोहाळे लागले पाहिजेत. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत जेव्हा आपण अनुकरणशीलतेचा त्याग करून उद्योजकतेचे, नवनिर्मितीचे, सृजनाचे पीक उगवू तेव्हाच खर्‍या अर्थानं भाषा समृद्धीची रास आपल्याला साजरी करता येईल. जगाला नेतृत्व देणारे उद्योग, व्यापार, शिक्षणपद्धती, आधुनिक आणि पुरोगामी विचार जेव्हा आपण या मातीतून तयार होण्यासाठी अनुकूल पर्यावरण तयार करू तेव्हाच नवनवीन शब्दांचे भांडार आपल्या भाषेत तयार होईल आणि पर्यायी शब्दांच्या शोधात आपल्याला वेळ घालवण्याची गरज पडणार नाही.’ --ज्ञानेश्वर मुळे इतरांची प्रशंसा करण्यासाठी मन मोठं असावं लागतं, जे ज्ञानेश्वर मुळे यांच्याजवळ आहे. त्यामुळेच माझ्या लिखाणाची, माझ्या कवितांची प्रत्येक वेळी मुक्तकंठानं प्रशंसा केली होती, काही वेळेस तर त्यांची कविता ऐकली की त्याच वेळी प्रत्युत्तर म्हणून माझीही एक कविता जन्म घेत असे. अशा वेळी प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असं म्हणत ते तुझी कविता जास्त चांगली आहे म्हणत कौतुक करत. त्यांची अर्धी कविता मला याप्रसंगी आठवत होती... अर्धी कविता या कवितेचा शेवट मी आधीच ठरवलेला नाही मुक्कामावर पोहोचल्यानंतर काय दिसेल या चिंतेनं व्याकुळ कशाला व्हायचं? कोणतेच मुक्काम आपल्या आज्ञेबरहुकूम नसतात हे फक्त जिप्सीला कळतं प्रवास हाच आत्मा असतो त्याचा, म्हणून एरवी प्रत्येक झाडानं ठरवलं असतं उद्याच्या पानाफुलांचं स्वरूप कोणत्या डहाळीवर किती आंबे लगडतील याचा हिशोब ठेवला असता अंगण्यातल्या आंब्याने मी सकाळी अशोकाची पानं हातात घेऊन निरखत राहिलो पानांच्या पिवळसर शिरा त्यातून निघणार्‍या उपशिरा त्यांच्या नाजूक प्रवासाचा आलेख सुरूवात, मध्य आणि शेवट असा नसतोच ही गौरीची गडद गुलाबी फुलं या फुलांचं लावण्य झाडाला समजावून सांगायचं का त्या नक्षीला नाव देता येईल का म्हणून कवितेचा शेवट आधी नाही ठरवता येत हे कैलास लेणं नव्हे ज्याची सुरुवात शिखरापासून होते आणि समारोप भूमीवर खोलवर रुजलेल्या कातळात या कवितेचंही असंच आहे ती घालते आहे अस्वस्थ येरझारा माझ्या खोलवरच्या गाभार्‍यात तिच्या प्रवासाची सुरुवात तिच्या पदलालित्याने जाणवते माझ्या सर्वदूर रंध्रांना घुमटातून येणारा तिचा ओंकार घुमतोय जाणिवेच्या खोल डहाळीत ती आपल्या कक्षेच्या बाहेर धूमकेतूसारखी निघणार याच्या केवळ जाणिवेनं समस्त भूमंडळ थरथरतंय ती कोणत्याच हुकूमशहाच्या दबावासमोर झुकत नाही तिच्या स्वातंत्र्याचे आयाम मोजू शकणारं गणित जन्मलेलं नाही तिचा पायथा आणि शिखर यांचा अंदाज स्थापत्यात नाही तिच्या कोमलतेसमोर पारिजातकाचे सडे पडतात आणि तिचा प्रत्येक शब्द खडग होऊन अर्थाच्या गाभार्‍यात प्रवेशतो तिचं रंग, रूप, आकार ठरवता येत नाही कोणत्याही व्यासमहर्षीस ती आहे आणि येणार या कल्पनेनंच माझ्या जिवाचा आकांत झाला आहे - ज्ञानेश्वर मुळे.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याविषयी लिहिताना मी त्यांचे अनेक लेख वाचले. त्यांचं जगभरातलं फिरणं, कामाची व्यस्तता, कामातले अनेक ताण-तणाव यांच्याशी सामना करत असतानाही या माणसानं स्वतःमधलं संवेदनशील मन कसं जपलं आहे, हेही बघितलं. त्यामुळे त्याच्या शब्दांमधून कविता अवतरतात आणि त्याच्या लेखांमधून मालदीव, जपान, सीरिया, रशिया, अमेरिका असे देशही आपलं दर्शन घडवतात हे लक्षात आलं. आपलं काम करत असताना हा माणूस आपल्या कार्यालयाच्या खिडकीतून दिसणारे मोर न्याहाळत असतो, आपल्या कॅमेर्‍यात आणि आपल्या मनात त्यांना टिपून घेत असतो. बरं हे मोर रोजच दिसतात. पण हा मात्र रोज नव्यानं त्यांच्याकडे बघतो. सायंकाळी घरी परतताना लोधी गार्डनमधून एक फेरफटका मारताना तिथले पक्षी, तिथले वृक्ष, तिथल्या तळ्यात विहरणारी बदकं, स्तब्ध, स्थितप्रज्ञ उभा असलेला एखादा कुत्रा असं काय काय मग कॅमेर्‍यात पुन्हा जाऊन बसतं. बरं हे सगळं इथंच थांबत नाहीत, तर ते मोर कागदावर येऊन पिसारा फुलवून नृत्य करू लागतात आणि त्यांच्या नृत्यातून ज्ञानेश्वर मुळे यांची कविता साकारायला लागते. तिस्ता नदीला न बघताही तिला अनुभवलं, ते केवळ ज्ञानेश्वर मुळे यांच्या कवितेमुळे! फोटोतली चिमुकली मांजराची पिल्लं असोत वा ज्ञानेश्वर मुळे यांच्या घरातल्या मुंग्या या दोन्हीकडे बघणारा ज्ञानेश्वर हा मनुष्य विलक्षण आहे. आंघोळीच्या शॉवरमधून येणार्‍या मुंग्यांची रांग बघून त्यांनतरचे कित्येक दिवस त्या मुंग्याचा विचार हा करत होता. सुरुवातीला त्या येऊ नयेत म्हणून उपाय आणि ते करून झाल्यावरही त्या हार मानत नाही म्हटल्यावर त्यांच्या वागण्याचा शोध...या शोधातून या माणसाला लक्षात आलं की आपलं आज राहायचं घर ज्या जागेवर उभं आहे, तिथे पूर्वी मैदान होतं, अनेक वृक्षं होते. थोडक्यात, तिथं मुंग्यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं. त्यांचं खरं घर माणसानं हिरावून घेतलं. आज त्या मुंग्यांचं घर तर माणसानं उदध्वस्त केलंच आहे, पण त्यांना समूळ नष्ट करायच्या मागे तो लागला आहे. असं असलं तरी कुठल्याही कोर्टात दाद न मागता त्या आपलं काम न थकता, न तक्रार करता अव्याहतपणे करत असल्याचं बघून मुळेंमधला लेखक थक्क झाला. म्हणूनच केवळ व्यक्तींबरोबरच नाही तर प्राणिमात्राबरोबरचाही त्याचा अलिखित सहजिवनाचा करार झालेला दिसतो. त्यानंतर शॉवर सुरू करताना हळू पाणी सोडणं - मग कराराप्रमाणे मुंग्याही शहाण्यासारख्या बाजूला होतात. महाशयांची आंघोळ होताच त्या पुनश्च आपल्या कामाला लागतात. त्या वेळी आता इथं त्यांचं (मुंग्यांचं) अधिराज्य असणार हे मान्य करत ज्ञानेश्वर मुळे आपल्या कामाला लागतात. मालदीपला गेल्यावर तिथली हवा, तिथलं पाणी ज्ञानेश्वर मुळे यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि त्या प्रश्नांची उत्तरंही देतात. दूरदेशी जाताना त्या समुद्राचं पाणी आणि ती अंगाअंगाला स्पर्शत जाणारी हवा आपल्या गावाची, आपल्या शहराची किंवा आपल्या देशाची ताटातूट सांगत राहते आणि विरहाच्या भावनेनं तो मनुष्य वेडापिसा होतो. इथं मात्र ज्ञानेश्वरमधला माणूस त्या लाटांच्या थेंबातून जाणवलेला आपल्या मायभूमीचा सुगंध अनुभवतो हे चकित करणारं आहे. हवा, जमीन, अवकाश, पाणी या सगळ्यांच्या आपणच तयार केलेल्या सीमा त्याला हास्यास्पद वाटतात आणि विश्वची माझे घर म्हणत तो पुढे पुढे चालत राहतो.

माणसाची प्रत्येक गोष्टीतली अतिक्रमणं, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी, अत्याचार आणि स्पर्धा, त्यातून होत असलेलं निसर्गाचं नुकसान तो अधोरेखित करतो. तेवढा वेळ त्याला आलेली विषण्णता वाचकालाही अस्वस्थ करत राहते. शेतीचा शोध लागला, माणूस शेती करायला लागला आणि प्रगतीला वेगात सुरुवात झाली असं आपल्याला वाटत असतानाच माणसामधली निरागसता कशी संपली आणि त्याच्यातली लालसा किती विध्वंसक कृत्याकडे वळली हे हा ज्ञानेश्वरमधला माणूस सांगतो. निसर्गाच्या सौंदर्याला नजर लागली असं सांगताना ज्ञानेश्वर मुळेंमधला लेखक अतिशय खोलवर जाऊन त्यातल्या प्रत्येक गोष्टीची आकडेवारी, त्याचं विश्लेषण करतो. आणि हे सगळं करत असतानाच त्या निसर्गाचा आस्वाद तिथल्या सौदंर्याचं दर्शनही आपल्याला घडवतो. त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातली सकारात्मकता अनेक कवितांमधून जाणवते : . . तरीही मी अंकुरलो अंकुरताच नांगराचा फाळ घुसला मुळासकट कुदळीने तिथल्या तिथे सफाचट केले तरीही फुटल्याच फांद्या झालोच झाड . . . खतात मिसळल्या विषाच्या गोळ्या तरीही तरारलेच माझे झाड -ज्ञानेश्वर मुळे ज्ञानेश्वर मुळे यांच्या 2016 च्या वाढदिवसानिमित्त व्‍यक्‍त केलेल्या माझ्या मनात उमटलेल्या भावना सांगून मी थांबते - एक गोष्ट सांगायचीये आज गोष्ट नाही राजाची किंवा राणीची ना राजपुत्राची किंवा शूर सरदाराची गोष्ट आहे माणसाची! मला पहिल्यांदा भेटला तोच मुळी रणरणत्या उन्हात सायकलवरनं जात असताना वाटेत सापडलेली नाणी वेचित चालला होता..... पोटातल्या भुकेला समजावत होता, की आता थोडाच वेळ धीर धर, या मिळालेल्या पैशात वडापाव नक्कीच खाता येईल तेवढ्यात आपले रस्त्यात हरवलेले पैसे शोधणारी वृद्धा दिसताच आपल्या पोटातल्या उसळलेल्या भुकेकडे दुर्लक्ष करून तिचे पैसे तिच्या स्वाधीन करत, तिला तिच्या इच्छित स्थळी सायकलवर बसवून सोडणारा..... त्यानंतर मला पुन्हा तो भेटला, त्याच्या शाळेत खोडकर, खट्याळ, न आवडलेल्या बाईंना सतवणारा... पण आपल्यामुळे त्याच बाईंना त्रास होतोय कळताच अपराधी भावनेनं ग्रस्त होऊन आजारी पडणारा..... त्यानंतर दिवस-रात्र एक करून त्याच बाईंची स्वप्नं खरी करण्यासाठी सानेगुरूजींच्या गोष्टीतला धडपडणारा मुलगा मला भेटला तो पुन्हा एकदा.... मर्ढेकर, अनिल, नारायण सुर्वे, यांच्या वाटेवरून चालताना.... किती वेळा भेटला मला तो... गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, नव्हे देशाच्या सीमा ओलांडून पार सातासमुद्रापलीकडे मी बघितले त्याचे परिश्रम.... त्या त्या देशांत राहून त्या देशाची भाषा शिकतांना.... मी बघितली त्याची चिकाटी, त्यांच्यातला एक होऊन तिथल्या भूमीचं मनोगत मांडताना मी बघितला त्याच्यातला उत्साह, त्याची उमेद त्या प्रत्येकाच्या दारी जाऊन त्याच्या अडचणी समजून घेताना.... मी बघितली त्याची भरारी, आकाशाच्या सीमाही ओलांडून जाताना त्याचं काम, त्याचा ध्यास, त्याची स्वप्नं, त्याची सर्जनशीलता सार्‍यांनाच त्यानं लावलेत पंख क्रियाशीलतेचे या माणसाची गोष्ट वाचताना, मला मात्र भावला त्याच्यातला विश्वाला जोडू पाहणारा, माणुसकी जपणारा एक सुंदर मनाचा माणूस - दीपा. अशी चांगली माणसं एकत्र आली, तर चांगुलपणाची चळवळ निश्चितच एक आकार धारण करेल, ती फोफावेल, बहरेल, फुलेल.

खरं तर प्रत्येक माणूस मूलत: चांगलाच असते. मात्र त्याच्यावर कधी कधी परिस्थितीची, कधी स्वार्थाची, तर कधी आलेल्या अनुभवांची वेगवेगळी पुटं चढतात. ही पुट बाजूला करून त्याच्यातलं चांगुलपण शोधायचं आहे आणि त्याला सोबत घेऊन या चळवळीची ताकद वाढवायची आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वाढदिवसाचा, चांगुलपणाचा जागर या निमित्तानं आम्ही केला, तुम्हीही या जागरात आणि चांगुलपणाच्या या चळवळीत सामील होऊ शकता.

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो