आपलं नाव सार्थ करणारी पुण्यातली आयडियल कॉलनी!

आपलं नाव सार्थ करणारी पुण्यातली आयडियल कॉलनी!

तारीख
-
स्थळ
Ideal Colony Pune

आपलं नाव सार्थ करणारी पुण्यातली आयडियल कॉलनी! ८ मार्चसाठी वेळ देऊ शकतेस का असा फोन संभा (संजय भास्कर जोशी ) यांचा आला आणि मी होकार दिला. त्यानंतर ठरल्यानुसार आयडियल कॉलनीचे मकरंद केतकर यांचा मला फोन आला. महिला दिनाचं औचित्य साधून आयडियल कॉलनीतल्या अतिशय समर्थपणे कुटुंब आणि घर सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार करणारा तो कार्यक्रम असणार होता. त्यासाठी मला प्रमुख पाहुणी म्हणून जायचं होतं. कार्यक्रम आयडियल कॉलनीच्या मैदानात होणार होता. वेळ संध्याकाळी ७ ची होती. मी आयडियल कॉलनीत ओला टॅक्सीनं पोहोचले. त्यानं मला न चुकवता व्यवस्थित गेटजवळ सोडलं.

आयोजकांनी स्वागत केलं. मी बघत होते - आयडियल कॉलनी हे ३० वर्षं जुनी कॉलनी. इथलं मैदान एकदम विस्तीर्ण! कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू होती. सगळ्या वयोगटातले पुरुष आणि स्त्रिया इकडून तिकडे लगबग करताना दिसत होते. आयोजकांमधल्या तर सगळ्याच जणी खूपच छान तयार होऊन आल्या होत्या. मन एकदम प्रसन्न झालं. तसंही पुण्यातल्या स्त्रियांचा नीटनेटकेपणा बघण्यासारखा! नोकर्‍या करून, उद्योग सांभाळून, घरातली कसरत पार पाडून या सगळ्याच नेहमी प्रसन्न आणि हसर्‍या असतात याचं विशेष कौतुक! श्रीमती केतकर, दिपाली, वृषाली आमर्डेकर अशा सुंदर आयोजक मैत्रिंणीबरोबर कार्यालयात जरा वेळ गेला. माझ्याबरोबर आणखी दोन पाहुण्या होत्या. एकजण आयटी क्षेत्रात कमिन्स या विख्यात कंपनीत जनरल मॅनेजर पदावर असलेली संगीता पुरोहित, तर दुसरी नंदाताई बराटे स्वतंत्र व्यवसाय करणारी आणि तिसरी मी - प्रत्येक क्षेत्रात काहीतरी लुडबूड करू पाहणारी! आता तीन तीन पाहुण्या आणि त्याही स्त्रिया, म्हणजे बोलायला वेळ कसा पुरणार, समोरच्यांवर आणि इतर पाहुण्यांवर अन्यायच होणार, त्यांचा महत्वाचा वेळ कदाचित आपण खाणार असे विचार मनात येणार तोच आयोजकांनी सांगितलं, आम्ही कार्यक्रमात थोडा बदल केलाय. आम्ही तुमची भाषणं ठेवण्याऐवजी आम्ही तिघींची एकाच वेळी मुलाखत घेणार आहोत. मी मनातच हुश्श केलं. हे छान असणार होतं!

कार्यक्रम सुरू झाला. प्राची या तरुणीनं अतिशय सुरेलपणे हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे ही प्रार्थना सादर केली. समोरचं मैदान उत्साही स्त्री-पुरुषांनी भरून गेलं होतं. सर्व वयोगटातल्या स्त्रियांना आम्ही तिघी त्यांच्या गळ्यात पदक घालून सन्मानित करत होतो. मात्र त्या स्त्रियांपुढे आपण खूप नगण्य आहोत याची जाणीवही होत होती. त्यांचा अनुभव, त्यांची आव्हान, त्यांच्यासमोर आलेली संकटं आणि दुःख यांना सामोरं जात त्या आज हसतमुखानं, ताठ मानेनं, कुटुंबापुढे, समाजापुढे एक नवीन आदर्श घालून स्वाभीमानानं उभ्या होत्या. प्रत्येकीपुढे मी मनातून नतमस्तक होत होते. त्यानंतर आमच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला. आयडियल कॉलनीतल्या वैजयंती केतकर, मानसी जोगळेकर आणि वृषाली आंबर्डेकर तिघी उत्साही मैत्रिणींनी मुलाखती घेण्यासाठीची तयारी केली होती.

आमचे परिचय वाचून, यू ट्यूब, फेसबुक, गुगलवरून माहिती शोधून त्यांनी बराच अभ्यास केला होता. या मैत्रिणींनी इतकी सुरेख मुलाखत घेतली की त्या हेच काम नेहमी करत असाव्यात इतकी सहजता त्यांच्यात होती. मात्र आपण पहिल्यांदाच याप्रकारे असं काम केलंय हे त्यांनी नंतर सांगितलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आपली पदवी मिळाल्यानंतर माहेरच्या आणि सासरच्या प्रोत्साहनानं आपण आयटी क्षेत्रातली वाट कशी चोखाळली याबद्दल संगीता पुरोहित बोलल्या. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून काही वेगळे अनुभव, दुय्यम वागणूक आणि आव्हानं येतात का आणि आली तर त्यावेळी काय करता असं विचारल्यावर आपली भूमिका ठाम असली आणि आत्मविश्वास असला तर तुम्ही सगळ्या अडचणींशी सामना करू शकता असं सांगितलं. ही एक अतिशय प्रसन्न, हार्डवर्कर आणि जगण्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघणारी, संकटांचा बाऊ न करणारी, दुसर्‍याचं श्रेय जाणून त्याबद्दल सतत कृतज्ञ असलेली नवी मैत्रीण मला खूपच भावली.

दुसरी मैत्रीण नंदाताई बराटे ही बाई तर कमालच! एके दिवशी एका कच्च्या साध्या घरासमोर एक लहान दोन-चार वर्षांचं मुलं समोर ताटली घेऊन बसलेलं तिनं बघितलं. या ताटलीतल्या भाकरीचे तुकडे ते मूलं आणि समोरून आलेला कुत्रा दोघंही खात होते. त्या मुलाकडे बघायला आसपास कोणीही नव्हतं आणि तो जिथे बसला, त्या घराला कुलूप लागलेलं होतं. नंदाताईला ते दृश्य बघवलं नाही, तिनं शेजारी पाजारी चौकशी करत आपण या मुलाला आपल्या घरी घेऊन जात आहोत असं सांगितलं आणि पत्ता देत त्या पत्त्यावर त्याच्या आईला पाठवावं सांगितलं. संध्याकाळी त्या मुलाची आई नंदाताईचं घर शोधत आली. आपलं मुलं तिथे सुखरूप पाहताच तिचा जीव भांड्यात पडला. मात्र नंदाताईनं तिला इतक्या लहान मुलाला एकटं सोडून गेल्याबद्दलचा जाब विचारताच ती रडवेली झाली. ती म्हणाली, मी लोकांकडे घरकाम करते. जिथे जाते, तिथे कोणीही लहान मूल आणायचं नाही असं सांगतात. मग मी मुलाला ठेवायचं कुठे? ती तिच्या बाळाला घेऊन गेली, पण नंदाताईच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं. मध्यमवर्गीय, नोकरी करणार्‍या स्त्रिया बिनधास्तपणे आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवून जातात. त्या पाळणाघराची फी देखील मोजतात. त्यांच्यासाठी तशा प्रकारच्या सुविधाही उपलब्ध होतात. पण इथं कसंबसं पोट भरणार्‍या या कष्टकर्‍यांच्या मुलांचं काय, त्यांची मुलं कोणाजवळ सोडायची, पाळणाघराचे पैसे देणं त्यांना परवडेल तरी कसं? नंदाताईनं यावर फक्त विचारच केला नाही, तर ती सरळ कामालाच लागली. तिनं धुणीभांडी घरकाम करणार्‍या कष्टकरी स्त्रियांसाठी आपल्याच राहत्या घरात पाळणाघर सुरू केलं. त्यांना जमेल अशी अतिशय क्षुल्लक फी आकारली. या मुलांना घर मिळालं, सुरक्षितता मिळाली आणि संस्कारही! आज सगळ्या कष्टकरी स्त्रिया नंदाताईला देवासारखं मानतात. त्यांच्या मुलांमध्ये संस्कार, शिस्त, स्वच्छता जे गुण दिसतात, त्यामुळे त्यांना नंदाताईची कृतज्ञता कशी व्यक्त करावी तेच कळत नाही. नंदाताई मात्र आपल्या कामात व्यस्त असून आपलं हे काम आपल्याला आनंद देतं म्हणतात. आज शेकडो मुलांची आई असलेली नंदाताई बघून मी तिच्यापुढे मनोमन नतमस्तक झाले.

माझ्या मुलाखतीबद्दल काय बोलू? मला विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं देत होते. त्यात माझी वेगवेगळ्या विषयांतली आवड, माझी लेखन प्रक्रिया, वेळेचं नियोजन, आपली मूल्यं, पुढला जन्म असला तर काय व्हायला आवडेल असं बरंच काही होतं. मी कविता सादर करण्याचीही विनंती समोरून आली. मीही आनंदानं एक कविता गायले. कार्यक्रम संपल्यावर पोटपूजेचा कार्यक्रम पार पडला. एक एक करत अनेकजण भेटून गेले. कार्यक्रमाविषयीचा आनंद व्यक्त करून गेले. संगीताचे अनुरूप असे जोडीदार अजय पुरोहित (आणि माझे फेसबुक फ्रेंड) यांचीही तिथे छान ओळख झाली. त्यांचा आणि नंदाताईंचा निरोप घेतला. वृषाली ही माझी मुलाखत घेणारी अतिशय गोड (टपोर्‍या डोळ्यांची आणि बंगाली अभिनेत्रीसारखी दिसणारी) मैत्रीणही मिळाली. सुनीला शेंडे हिने खूप नेटकं आणि नेमकं निवेदन करत कार्यक्रमात रंगत भरली.

केतकर कुटुंबीय, शैलेश बुरसे, नंदकुमार आढावकर, अतुल आंबर्डेकर, मोहिनी देशपांडे, दयानंद जवळकर, इतर सर्व आयोजक आणि सगळ्यांचा निरोप घेत मी तृप्त मनानं घराकडे परतले! खरं तर असे कार्यक्रम खूप समाधान देऊन जातात. वेगवेगळी माणसं भेटतात, जवळ येतात, त्यांच्याशी स्नेहाचं नातं जडतं. त्यांच्यातल्या वैशिष्ट्यांनी आपल्याला आणखी खूप काही करायचंय याची जाणीव होत राहते. त्यांच्यातला उत्साह आणि ऊर्जा आपल्यालाही मिळते.

दीपा देशमुख, पुणे. 

कार्यक्रमाचे फोटो