नमस्कार मित्रांनो, 

नमस्कार मित्रांनो, 

तारीख
-
स्थळ
Pune

नमस्कार मित्रांनो, 
घरात बसून बसून तुम्हाला जसा कंटाळा आला, तसाच तो आम्हा मोठ्यांनाही आला. मग मी आणि धनू म्हणजे नाट्यकर्मी मित्र धनंजय सरदेशपांडे- आम्ही मिळून असं ठरवलं की आपण आपल्या बालमित्रांना गोष्टी सांगूयात. 
मग एक दिवसाआड आमच्या गोष्टींचा सिलसिला सुरू झाला. मी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आणि धनूने  त्या तुमच्यासमोर सादर केल्या. 
पहिल्या गोष्टीमध्ये छोट्याशा छकुलीला कोरोना नावाचा राक्षस विषाणू काय असतो हे ठाऊकच नसतं, पण जादूच्या गॉगलमुळे तिला तो कोरोना एकदाचा दिसतो. आसपासच्या सगळ्या लोकांकडे तो जादूचा गॉगल नसल्यामुळे त्या लोकांना तो कोरोना उघड्या डोळ्यांनी दिसतच नाही आणि त्या कोरोनाचं गांभीर्यच सुरुवातीला नसतं. मग दुसर्‍या गोष्टीत हा कोरोना म्हणजे काय, तो आला कुठून, जगभर कसा पसरला याची गोष्ट चिनूचा विटी नावाचा एक मित्र चिनूला सांगतो. चिनू ठरवतो, बापरे, हा कोरोना राक्षस हद्दपार होईपर्यंत घरातून बाहेर जायचंच नाही. मात्र एक गंमत घडते. सगळी माणसं घरी बसून राहिल्यामुळे, रेल्वे, बसेस सेवा बंद झाल्यामुळे, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, कंपन्या बंद ठेवल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. सगळा देश प्रदूषणमुक्त झाला. हवा स्वच्छ झाली. आणि मग भारतातच नव्हे, तर जवळजवळ सगळ्याच देशांमध्ये अनेक प्राणी या मोकळ्या रस्त्यांवर आनंदानं फिरायला लागले. मोर थुई थुई नाचले, हत्तींच्या कळपांनी मज्जा केली आणि माकडसेना तर उड्या मारत नाचायला लागली. पंजाबमधल्या जालंदर या शहरातून १५० किमी दूरवर असलेल्या हिमालय पर्वताच्या बर्फाळ रांगा दिसायला लागल्या. पुण्यातल्या लोकांनी तर वेताळ टेकडीवरून आयफेल टॉवर दिसतोय अशा बढाया (थापा) मारायला कमी केलं नाही! 
या सगळ्यांत मात्र पोलीस यंत्रणा, सफाई कामगार, डॉक्टर्स, नर्सेस आणि सगळे सरकारी अधिकारी रात्रंदिवस कामाला लागले. देशाचे पंतप्रधान असोत, वा मुख्यमंत्री सगळ्यांनीच लोकांना काळजी घ्यायला सांगितलं. घरातच बसायची विनंती केली. छोट्याशा चिनूला पोलीसकाका, सफाईमावशी आणि सिस्टर स्वाती या सगळ्यांची ओळख झाली. त्यानं आपला वाढदिवसही खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. विंदा करंदीकर या कवींनी म्हटल्याप्रमाणे, ‘एक दिवस घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत’ या ओळीनुसार चिनूनं ती ओळ सार्थ करून दाखवली. घेण्यापेक्षा देण्यात किती आनंद असतो ही गोष्ट त्याला समजली.
मित्रांनो, कोरोनाच्या या गोष्टी सांगताना आम्ही त्यात रंगून गेलो. आम्हाला खूप मजा आली. आम्हाला अनेक फोन आले, मेसेजेस आले. नगरच्या स्नेहालय संस्थेचे संजय गुगळे यांनी मुलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून या गोष्टी ऐकवल्या. अक्षय या तरुणाने त्याच्या गावाकडे छोट्यांनाच नव्हे तर मोठ्यांनाही या गोष्टी ऐकवून उत्सुकता निर्माण केली. मुंबईतल्या पत्रकारिता करणारा सिद्धू, नयन, दीपक पळशीकर, गीता भावसार, तुषार कुलकर्णी, रेणुका माडीवाले, शंकर, मिलन कणेकर, मोहन रेडगावकर, अच्युत गोडबोले, आशा साठे, अंजली मालकर, स्वाती प्रभुणे, ज्ञानेश्वर मुळे, या सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. त्यात ईशा नावाच्या एका चिमुकलीनं तर चक्क धनूची नक्कल करून दाखवली. मल्हारनं आपल्याला सगळ्या गोष्टी खूप आवडल्याचं सांगितलं. काहींनी प्रयत्न करत आपणही गोष्टींचं सादरीकरण करून काही व्हीडियोज आम्हाला पाठवले, तर आमच्या काही मोठ्या मित्रमैत्रिणींनी आपण मोठे असूनही त्यात रंगून गेल्याचं सांगितलं. आम्हाला हे सगळं ऐकून खूप खूप आनंद झाला. 
तर आता, काही दिवसांसाठी आपण निरोप घेऊ या. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत हा कोरोना राक्षसही दूर पळून गेलेला असेल. बाय !
दीपा देशमुख 
https://youtu.be/xN7NBLMOGUA
बोलकी प्रतिक्रिया!!!!
✍️अतिशय उत्कृष्ट लेखन ,
व धनंजय सरांचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण
यामुळे सर्व मुलांना एक वेगळाच अनुभव घेता आला.
✍️मी तर माझ्या शाळेतील सर्व मुलांच्या पालकांना ही लिंक पाठवून त्यांचे अभिप्राय घेतले.
✍️काही काही पालक तर याविषयी आपुलकीने चौकशी चर्चा करीत होते.
रोशनी नावाच्या मुलीने तर चक्क मला चीनु ची गोष्ट ऐकात सर म्हणून पाठीमागं घोषा लावला.
कदाचित हीच आपल्या लेखनाची व सादरीकरणाची ताकद असावी.
✍️सध्या आपल्या जीनियस पुस्तकांचा संच माझ्या शाळेतील विद्यार्थी आवडीने वाचून त्याप्रमाणे अनुभव घेत आहेत.
✍️ आपण ही लेखमाला व कथा सादरीकरण बंद न करता कदाचित तीन दिवसातून एकदा का असेना पण एखादी कथालेखन करून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बालमनावर बालसंस्कार जाण्याकरता अतिशय व्यवस्थित नियोजनाने सादर केलेली आहे ही अशीच पुढे चालू राहावी अशी आम्हा सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांची आपणास विनंती आहे.
✍️ आपली लेखणी सहज रसाळ मधुर व ऐकावयास केलेले सादरीकरण अतिशय हावभाव युक्त व बालमनाचा विचार करून केलेले असल्याने ते मुलांना आपलेसे वाटते यात नवल ते काय ?
✍️ आपण आमच्या मागणीचा पुनर्विचार करून काही लेखन कराल अशी आशा करायला काय हरकत आहे?.
टीप : यातील कथामालेचा पुढचा भाग केव्हा येणार याविषयी माझ्या शाळेतील पालक व मुले आतुरतेने चौकशी करत आहेत.
🙏🏻💐💐💐
आपला नम्र
राजेंद्र डांगे
शिक्षक
गिर्यारोहक
सोलापूर महाराष्ट्र.

कार्यक्रमाचे फोटो