सुगंध

सुगंध

रोजच्या प्रमाणे पहाटे पाच वाजताचा गजर वाजला. तशी जाग केव्हाच आलेली होती. पण मन अंथरूणातून उठायला तयारच होत नव्हतं. मनाची द्विधा अवस्था झालेली होती. एक मन म्हणत होतं, नकोच उठायला. रात्री किती जागलो आपण. झोप तरी कुठे पुरेशी झालीये? कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि एक दिवस नाही गेलो फिरायला तर काय फारसं बिघडणार आहे? दुसरं मन केविलवाण्या आवाजात उत्तरलं, अग असं करू नकोस. चल उठ. हा क्षणाचा आळस दिवसभराचा घात करेल. दोन्ही मनांच्या वादावादीत अखेर उठलेच. आणि नेहमीप्रमाणे फिरायला निघाले.

अजूनही पहिल्या मनाचा अंमल मन आणि शरीर दोन्हीवर होता. मनाचं पुटपुटणं सुरूच होतं, आजचा दिवस जरा एकच आणि छोटीशी चक्कर मारूया. उद्यापासून जास्त लांबवर जाता येईल. आज या कोपर्‍यापर्यंतच जायचं. पण त्या कोपर्‍यापर्यंत पोहोचताच मन आपोआप प्रफुल्लित झालं होतं. मग काय सगळा आळस झटकून मी नेहमीचं अंतर कापायला सज्ज झाले.

सहजच नजर कोपर्‍यातल्या कचराकुंडीकडे गेली. सायकल कडेला लावून एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा त्या कचराकुंडीत उतरून कागद गोळा करत होता. त्या घाणेरड्या वासाच्या झुळकीबरोबर शरीर तीव्र नापसंती दर्शवायला लागलं होतं. मग आपोआपच पावलांनी तिथून जास्तच वेग घेतला. हळूहळू ते ठिकाण दृष्टिआड झालं. शी, कसला घाणेरडा वास येत होता. सकाळी सकाळी कसलं घाणेरडं काम करत बसला तो मुलगा. सकाळची सुरुवात मुळी कशी प्रसन्न वातावरणात व्हायला हवी. आणि हा अरसिक त्या घाणीत घाण उपसत बसला होता. तेवढ्यात एक जोडपं समोरून आलं आणि मी मनातला तो मुलगा आणि ती कचराकुंडी बाजूला सारली.

नवीनच लग्न झालेलं जोडपं असावं. दोघांच्याही पायात नवे कोरे शूज, जॉगींगसाठी घेतलेला खास पेहराव, हातात हात घालून जोडी येत होती. अरेच्च्या, आणि हे काय? इतक्यात परतही फिरले? भातुकलीच्या खेळाप्रमाणेच चाललंय की यांचं फिरणं. या दोन मिनिटांच्या मॉर्निंग वॉकनं त्यांना काय साध्य होणार होतं कुणास ठाऊक. गंमतच आहे. मला क्षणभर हसूच फुटलं. पण म्हटलं, चला, निदान सकाळी लवकर उठायची प्रॅक्टिस तरी करताहेत.

काही अंतर पुढे जाताच नेमकं या चित्राच्या उलट चित्र बघायला मिळालं. उंचापुरा पहेलवानी थाटाचा कोणी तो - अंगात सँडो बनियन आणि खाकी हाफ पॅन्ट घालून, हातात सोन्याचं कडं आणि कानात सोन्याची बाळी घालून दणादणा पावलं टाकत चालला होता. त्याच्या त्या आकडेबाज मिशा आणि पिळदार शरीर बघून तो मॉर्निंग वॉक ऐवजी लांब लांब ढांगा टाकत युद्धभूमीवर चालल्याचा भास होत होता. त्याच्या मागोमाग त्याची ठेंगणीठुसकी बायको धावतच त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत अक्षरशः धावत होती. पण तिला त्याच्या वेगाची बरोबरी करणं जमतच नव्हतं. तिची होणारी दमछाक तिच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होती.

तेवढ्यात तिच्या मागून येणार्‍या दोन पन्नाशीच्या पुढल्या स्त्रिया दिसल्या. संध्याकाळी बागेत जसं रमतगमत गप्पा मारत चालावं तशाच त्या चालल्या होत्या. अंगात स्वेटर, वर शालही पांघरलेली, कानाला स्कार्फ बांधलेला, हातात आणि पायात मोजे आणि पायात फटक फटक आवाज करणारी स्लिपर होती. दोघींची अखंड बडबड सुरू होती. पहिली म्हणत होती, माझ्या सुनेला एक काम नीट येत नाही. सगळं मलाच करावं लागतं. याही वयात आराम नाही. माझ्या नशिबात सुखच नाही. दुसरी सांगत होती, अग, घरात कोणाला माझी किंमतच नाही. कोणी विचारत नाही. सगळे दुर्लक्ष करतात. जणू काही मी या घरात नाहीच. दोघीही आपली ही दुःखं एकमेकींना आनंदात सांगत होत्या हे विशेष. अखेर हुश्श म्हणत त्या थकून रस्त्याच्या दुभाजकावर बसल्या. मला मात्र माझ्या पायांची गती वाढवावी लागली.

एवढ्यात समोरून पासष्टीचा, सहा फूट उंचीचा, सडपातळ बांध्याचा, काटक प्रकृतीचा, डोक्यावर फेटा घातलेला, अंगात फुलशर्ट आणि धोतर, वर जाकीट घातलेला एक गृहस्था दिसला. मी तर याचं नाव पंडितजी असंच ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत त्याचा एक सहकारी असाव. सतरा-अठरा वर्षांचा मुलगा त्याच्याबरोबरच गंभीर चेहर्‍यानं चालत असतो. दोघंही अतिशय वेगानं माझ्यासमोरून निघून गेले. ते समोरून दिसेनासे होईपर्यंत एखाद्या मंदिराचा घंटानाद ऐकू यावा तसा काहीसा मला भास होत राहतो. तसंच पंडितजींच्या हातात काही नसतं, पण मला उगाचच त्यांच्या हातात एक जाडजूड ग्रंथ असल्याचाही भास होतो.

त्या धीरगंभीर वातावरणातून मला बाहेर काढलं ते पाच-सहा गावठी कुत्र्यांनी. तांबड्या-काळ्या रंगाची ही कुत्री रोजच पहाटे फिरायला मोहिमेवर निघाल्यासारखी लांब लांब घोड्यांच्या टापा टाकावीत तशी निघालेली असतात. सगळी कशी एकदम फ्रेश दिसत असतात. दिवसभर नंतर एकमेकांवर दात काढत भांडताना बघायला मिळतात. पण मॉर्निंग वॉकच्या वेळी मात्र सगळं कसं एकोप्यानं चाललेलं असतं.

पुढल्या कोपर्‍यावर एक स्टॉल लावलेला असतो. तिथे नेहमीच गव्हापासून अनेक प्रकारचा रस (ज्यूस) मिळतो. एक काळी सावळी तरूणी तिथेच एक टेबल मांडून त्यावर अनेक काचेच्या बाटल्यात तो रस ठेवून विकताना दिसते. तृणरस, आवळा रस, गाजर रस, गव्हाचा रस आणि आणखी बरंच काही. काही ज्येष्ठ मंडळी मोठ्या भक्तिभावाने तो हिरवट चॉकलेटी रस मुकाट्याने पैसे देऊन पिताना दिसतात. ती तरूणीही तितक्याच निर्विकारपणे गल्ल्यात पैसे जमा करताना दिसते. आजही तेच दृश्य जसंच्या तसं पाहायला मिळालं.

तेवढ्यात मला समोरून नेहमीचे एक वयस्कर गृहस्थ येताना दिसले. हे गृहस्थ मला रोजच दिसतात. अमिरखानलाही लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व. स्वतःहून मला गुडमॉर्निंग करतात. त्यांनी गुडमॉर्निंग करताच त्यांचे पांढरे शुभ्र दात चमकतात आणि डोक्यावरचे पांढरे केसही वार्‍यानं भूरभर उडतात. त्यांच्या प्रसन्न हास्याने सकाळ जास्तच प्रसन्न झाल्यासारखी वाटते. हे गृहस्थ इतक्या पहाटे देखील टापटीप असतात. रोज फिरायला येताना लांब स्टार्च केलेला कुर्ता, थंडी असल्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारची जाकिट्स, तरुणांनाही लाजवेल अश उत्साह. या सगळ्यात त्यांचं दीर्घायुष्याचं रहस्य दडलेलं असावं.

माझं मन  नव्या आशेने, नव्या सकारात्मक भावनेने भरून आलं. सकाळी सकाळी फिरायला निघणं म्हणजे मेंदूला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा करून घेणं. नैराश्याला दूर पळवणं, प्रसन्नतेला आपलंसं करणं या गोष्टी घडतात. त्याचबरोबर मला महत्वाची वाटतात ती या प्रवासात साथ देणारी माणसं. यातलं एक जरी पात्र एखादे दिवशी गैरहजर राहिलं तर मनाला चुटपूट लागते.

बघता बघता मी परतीच्या मार्गाला लागले. हळूहळू त्या कोपर्‍यावर आले आणि आता तो सकाळी निघाल्यानंतरचा तोच उग्र घाणेरडा वास नाकात शिरणार याची भीती वाटली. मी माझ्याही नकळत ओढणी नाकाला लावली. मी आता त्या कचराकुंडीजवळ येऊन पोहोचले होते. ती सायकल आणि तो मुलगा अजूनही तिथेच उभे होते. त्या मुलाने ढीगभर कागदाचा कचरा एका पोत्यात भरला होता. कुंडीबाहेर आधी त्याने ते पोतं बाहेर टाकलं. आणि त्यानंतर स्वतःही खुशीत शीळ घालत त्या कचराकुंडीतून बाहेर उडी मारली. त्याने उडी मारताच मी नकळत एक पाऊल मागे घेतलं. जणू काही त्याचा स्पर्शच मला होणार होता. त्याला मात्र त्या कचर्‍याशिवाय काहीही दिसत नसावं. त्याने ते पोतं उचललं आणि आपल्या सायकलच्या कॅरिअरला लावलं.

कसली घाण, किती माशा....असं घाणेरडं काम सकाळी करण्यापेक्षा या पोरानं वर्तमानपत्रं टाकावीत, फुलं विकावीत, काय वाट्टेल ते करावं. जराही सौंदर्यदृष्टी ती नाहीच. मी विचार करतेय तोवर त्यानं सायकलवर टांग मारण्याआधी सायकल वळवली. त्याच्या सायकलच्या समोर त्यानं सात-आठ प्लास्टिकची टपोरी गुलाबाची फुलं लांब काड्यांनी सुशोभित केली होती. त्याने त्या फुलांवरून खरी असल्याप्रमाणे नाजूकपणे, हळुवारपणे हात फिरवला. नंतर अलवार फुंकर घालत त्याने त्यावर जमलेली धूळ उडवली. आपली फुलं सुरक्षित पाहून तो खुशीतच स्वतःशी हसला अन् मजेत सायकलवर टांग मारत चालता झाला.

तो गेला त्या दिशेने मी आश्चर्याने बघतच राहिले.  त्याच्या त्या प्लास्टिकच्या फुलातला सुगंध आता वातावरणात पुरेपूर पसरला होता. त्या नव्या अनोख्या सुगंधाला मनात साठवत मी पावलांचा वेग वाढवला.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.