मी आलोय...
मी आलोय...
आज सकाळी अतिशय विनम्र आवाजात चायकॅटनं दाराबाहेरून ‘मी आलोय’ असं सांगितलं.
मी दाराच्या आतूनच, रोज रोज काय रे, इथे येण्याचा तुझा अधिकार आहे असं वाटतंय का तुला?,
असं म्हणताच, त्यानं
स्वराज्य हा माझा जन्मसिद्घ अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच
असं टिळकांसारखंच बाणेदारपणे उत्तर दिलं.
मी बघतच राहिले त्याच्याकडे.
मग चायकॅटनं आणखीनच हिम्मत करून बाजूच्या कठड्यावर उडी मारत,
दार उघड ना म्हणायला सुरुवात केली.
थांब बस तिथेच जरावेळ. असं सांगून मी स्वयंपाकघरात वळले.
दूध तापवलेलं होतंच, मी एका डिशमध्ये घेवून सेफ्टीडोअर उघडलं, दूध त्याच्या जवळ ठेवलं. दुधाच्या गरमपणाचा अंदाज घेवून त्यानं ते पिवून टाकलं आणि नंतर पुन्हा नम्र आवाजात
‘आणखी दे ना, माझं पोट भरलेलं नाही.‘ असं सांगितलं.
मागचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मी गुपचूप त्याची रिकामी झालेली डिश घेवून आत वळले आणि पुन्हा दूध भरून डिश त्याच्यासमोर ठेवली. त्यानं ते अर्थातच आस्वाद घेत पिवून टाकलं आणि मग माझ्याकडे बघत इतक्या गोड आवाजात थँक्यू म्हटलं की हाच का तो उर्मट, उद्घट चायकॅट असा मी विचार करत राहिले. त्यानं माझ्याकडे बघतच पंजानं तोंड पुसून घेतलं. पुन्हा एकदा मला थॅक्यू म्हटलं आणि मग समोरच्या पॅसेजमध्ये आपल्याच मालकीची जागा असल्यासारखं राजेमहाराजे लोडला टेकून जसे आरामात पहुडतील तशी पोझ घेतली.
दार लावताना त्याला ‘अरे जा ना आता, झालंय ना सगळं’ असं मी म्हणताच त्यानं ‘पोट टम्म भरलंय, जरा वेळ आराम करून मग जातो‘ असं म्हणत माझ्याकडे पुन्हा एकदा प्रेमभरल्या नजरेनं बघितलं आणि मी त्याच्या या नव्या रूपाकडे अवाक होवून बघतच राहिले!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment