आरोग्याशी खेळणारी सौंदर्यप्रसाधनं! - मिळून साऱ्याजणी दिवाळी 2015
‘सांग दर्पणा कशी मी दिसते?’ असं आता फक्त आजच्या स्त्रियाच म्हणत नाहीत तर पुरुषांच्याही मनात तीच भावना आहे. शरीर सुंदर दिसावं यासाठी प्रयत्न करणं, ते सजवणं नवीन नक्कीच नाही. आपले अनेक पूर्वज त्यांचे चेहरे आणि शरीर रंगवत होते, दागदागिने घालत होते आणि स्वत:ला नटवत होते. बॅबिलोनियन, इजिप्शियन आणि असीरीयन संस्कृतीत डोकावलं, तर तेव्हाही अत्तरं आणि सौंदर्यप्रसाधनं बनवली जात असत याचे अनेक पुरावे आढळतात. पण त्या काळी कृत्रिम रसायनं वापरत नसत. कदाचित ते ते बनवणार्या आजच्यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्याही नव्हत्या!
औद्योगिक क्रांतीमुळे एकूणच समाजजीवनात प्रचंड प्रमाणात उलथापालथ झाली. बाजारपेठेत वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जायला लागल्या. औषधं आणि सौंदर्यप्रसाधनं बनवणार्या कंपन्यांची संख्या झपाट्यानं वाढायला लागली. आजकालच्या आधुनिक जगात मार्केटिंग आणि जाहिरातबाजीचं फार मोठं बजेट असतं, जास्त झकपक करुन त्या जाहिराती ग्राहकांपर्यंत म्हणजे जास्त करुन स्त्रियांपर्यंत पोचतात. ‘सौंदर्यप्रसाधनांशिवाय आपलं आयुष्य व्यर्थ असेल!’ हा त्यांचा एकमेव संदेश असतो. मस्कारा ब्रश, लवकर न विखुरणारी लिपस्टिक किंवा डोळ्याबाहेर फरकाटे न मारणारं काजळ, लवकर वाळणारं नेलपॉलिश आणि त्वचेचं दिवसभर रक्षण करणारं क्रीम याशिवाय एखादी स्त्री जगूच कशी शकेल? असं या जाहिरातबाजीतून स्त्रियांना वाटायला लागतं.
आपलं स्वत:चं व्यक्तिमत्व आपण वापरणार्या सौंदर्यप्रसाधनांवरच कसं अवलंबून आहे असं बिंबवण्यात जाहिराती यशस्वी झाल्याच आहेत. आपण अमुकतमुक उत्पादन वापरुन कसे दिसतो? हाच विचार करुन आपण वस्तूंची खरेदी करतो. इतकंच नव्हे तर सौंदर्यप्रसाधनं वापरुन आपण कसे दिसतो यानुसार सतत आपल्या भावनाही बदलत असतात. एखादं विशिष्ट अत्तर वापरुन आपण जास्त आकर्षक वाटतो आणि आपलं व्यक्तिमत्व त्यानं खुलतं असं स्त्रियांनाही मग वाटायला लागतं. शांपूचंच उदाहरण घेतलं तर तो तुमचे केस स्वच्छ करतो हा त्याचा उपयोग. पण सौंदर्यप्रसाधनं बनवणार्या कंपन्या त्यांच्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा त्यांचा शांपू कोणत्यातरी एका बाबतीत वेगळा कसा आहे हे स्त्रियांना पटवून देतात. मग अमुकतमुक शांपूमुळे केसांच्या टोकांना फाटे फुटणार नाहीत किंवा त्यातून दिवसभर टिकणारं चैतन्य मिळेल किंवा त्यामुळे तुम्ही जास्त आकर्षक दिसावं किंवा त्यामुळे तुम्हाला चांगला मित्र, नवरा, नोकरी मिळेल वगैरे वगैरे अशी काहीतरी फसवी जाहिरात केली जाते.
बाह्यसौंर्दयाला आजच्या आधुनिक जगात इतकं प्रचंड महत्त्व आलं आहे की सौंदर्यप्रसाधनं निर्माण करणार्या कंपन्यांनी बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. अगदी साधा वाटणारा शांपू किंवा त्वचा मृदू करणारं क्रीम यामुळे कॅन्सर होऊ शकतो किंवा प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो हे आपल्याला माहितीच नसतं. शरीर फीट ठेवण्याच्या बाबतीत दक्ष असलेली माणसं जीम लावतात, योगासनं करतात आणि योग्य आहाराकडे लक्ष देतात. पण घातक घटकांपासून बनलेली उत्पादनं शरीरावर चोपडताना त्यात काय अपायकारक आहे याचा नीटपणे विचारही करताना दिसत नाहीत. सुंदर दिसण्यासाठी आपण मेकअप करतो, चेहर्यावर वेगवेगळी क्रीमस् लावतो आणि सुगंधी परफ्युमचे फवारे मारतो. या सर्व उत्पादनांवर लावलेली ‘नॅचरल’, ‘ऑर्गॅनिक’ किंवा ‘आयुर्वेदिक’ अशी लेबल्स आपली दिशाभूल करत असतात. म्हणजे या कंपन्या हे सगळं मुद्दाम लोकांना हानी पोहचवण्यासाठी करत नाहीत, तर त्यांना सौंदर्यप्रसाधनांत घातक गोष्टींचा वापर करावाच लागतो. त्यांनतर फसव्या जाहिरातींचा मारा करुन ही उत्पादनं सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचे या कंपन्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. सौंदर्यप्रसाधनात वापरण्यात येणार्या रसायनांमधला जवळजवळ ६०% भाग हा शरीरात साबण, शाम्पू, टूथपेस्ट, क्रीम्स, पोमेड्स, सुगंधी द्रव्यं, यांच्यामार्फत आपण शरीरात जिरवतो. त्यातून ते रक्तात मिसळले जातात. डोळ्यांच्या पापण्या आणि आसपासचा भाग म्हणजे आयशॅडो रंगवण्यासाठी कोल्टार ही रंगरसायनं वापरली जातात. कित्येक स्त्रियांना या रसायनामुळे अॅलर्जी होऊ शकते. अगदी त्वचेची जळजळही होते. इतकंच नाही तर मज्जासंस्थेवरही याचा घातक परिणाम होतो. आयशॅडोमध्ये जे टाल्क वापरलं जातं त्यातही अॅस्बेस्टॉस (Asbestos) आणि सिलिका (silica) वापरलेलं असल्यामुळे पुन्हा श्वसनाचे रोग आणि कॅन्सरची शक्यता वाढतेच. सौंदर्यप्रसाधनांमध्ये मस्कारा हा प्रकार पापण्यांसाठी वापरला जातो. यामुळे पापण्या लांब आणि दाट दिसतात आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढतं. या मस्कारामध्ये मेण, रंगरसायनं, पॉलिमर्स, प्लास्टिक (polymers &Plastics) अशा रसायनांचा वापर होतो. ही रसायनं पाण्यात टिकावीत यासाठी आयसेडिकेन या रसायनाचाही यात वापर होतो. शिवाय बुटाडाईन बीएचए (butylene glycol), फिनॉक्सीइथेनॉल अशी रसायनंही त्यात असतात. मस्कारामध्ये प्लास्टिक आवरणासाठी स्टायरिन, पीव्हीपी पॉलिमर, पॉलिमिथाईल अक्रेलेट याही रसायनांचा समावेश असतो. ही सगळीच शरीराला घातक असतातच. मात्र मस्कारा टिकवण्यासाठी पराबेन (parabens) संयुगं त्यात असतात जी हार्मोन्सना अत्यंत घातक असतात. गंमत म्हणजे ही सौंदर्यप्रसाधनं मोठ्या उत्साहनं शरीरावर थापली लावतात. पण ती शरीरावरून काढण्यासाठी देखील पुन्हा रसायनांचाच वापर करावा लागतो. अनेक रसायनांचा उपयोग मेकअप रिमूव्हर म्हणून केला जातो. यात पॉलिइथेलिन ग्लायकोल ( polyethylene glycol), सिटॉलअथर् हे मुख्यत्वे वापरले जातात. या रसायनांमध्ये इथेलिन ऑक्साईडचाही अंश असतो. त्याचप्रमाणे १.४ डॉयक्सॉन (dioxane) याही रसायनाचा अंश असतो. ही रसायनं अत्यंत घातक समजली जातात आणि ती कॅन्सर निर्माण करतात.
खरं तर सौंदर्यंप्रसाधनं बनवताना त्यात काय काय वापरलं पाहिजे यासाठीचे नियम खूपच तोकडे आहेत. तसंच सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोणते घटक वापरावेत आणि लेबलवर ते सर्व कसे छापावेत याबद्दल जे कायदे आहेत ते कागदोपत्री आहेत. कित्येक कंपन्या त्या उत्पादनांमध्ये घातक रसायनं मिसळत असतात आणि त्यावर कोणाचाच ताबा नाही. उत्पादकांनीही बहुतेक सर्व सौंदर्यप्रसाधनांच्या नीटशा चाचण्या घेतलेल्या नसतात. तसंच कोणकोणत्या उत्पादनांत वापरलेली किती रसायनं विषारी आहेत याच्या महागड्या चाचण्या तर अजिबातच घेतल्या जात नाहीत. शिवाय ग्राहकांना सौंदर्यप्रसाधनं वापरुन कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तेही फक्त नशिबालाच दोष देतात आणि गप्प बसतात. त्यानंतर ते विशिष्ट उत्पादन वापरायचं बंद करुन दुसरं (तसंच) उत्पादन वापरणं सुरू करतात.
अमेरिकेतही सौंदर्यप्रसाधनात वापरलेल्या वस्तू प्रयोगशाळेत नीट चाचण्या घेऊन मगच त्यात घातल्या असतील; ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)’ सौंदर्यप्रसाधनांचा आरोग्यावर होणारा परिणाम विचारात घेत असेल असं अनेक लोकांना वाटत असतं. एफडीए या उत्पादनांची सुरक्षितता ठरवतं असा बर्याच लोकांचा भ्रम आहे. पण तसं अजिबात घडत नाही. दुर्दैवानं एफडीएचं सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणार्या वस्तूंवर फारच कमी नियंत्रण आहे. सौंदर्यप्रसाधनांमुळे साधारणपणे स्तनांचा कर्करोग, लैंगिक अवयवांच्या विकृती असे आजार होण्याची शक्यता असते असं संशोधक म्हणतात. एफडीए नवीन सौंदर्यप्रसाधनं बाजारात येण्याआधी तपासत नाही. त्या वस्तूंचे उत्पादकच त्या उत्पादनांच्या सुरक्षेसाठी जबाबदार धरले जातात. सौंदर्यप्रसाधनांसाठी ‘कॉस्मेटिक टॉयलेटरी अँड फ्रागरन्स असोसिएशन (सीटीएफए)’ आणि ‘कॉस्मेटिक इनग्रेडियंट रिव्ह्यू पॅनेल (सीआयआर)’ या संघटना सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादक कंपन्यांनीच पैसे देऊन बाळगलेल्या शास्त्रज्ञांच्याच आधारावर तयार होतात. मग तेच शास्त्रज्ञ सीटीएफए या पॅनेलखालची सौंदर्यप्रसाधनं सुरक्षित आहेत याबद्दल आपलं मत देतात. सीटीएफए संघटनेमधले लॉरिअल, युनिलिव्हर अशा कंपन्यांचे ६०० सदस्य आहेत. हीच संघटना सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षेचे निकष ठरवते. पण ते ठरवताना ग्राहकांसाठी आवश्यक अशा द़ृष्टिकोनातून सुरक्षेचे निकष कसे असावेत याचा विचार त्यात अजिबात केला जात नाही.
यावर जागृत होऊन आरोग्य आणि पर्यावरणविषयक अनेक संघटना काम करताहेत. टाल्कम पावडर जर लैंगिक अवयवांना आणि सॅनिटरी नॅपकिनवर लावली तर ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता स्त्रियांमध्ये ३२८ पटीनं जास्त असते असंही याचे अभ्यासक म्हणतात. २००२ साली अनेक संघटनांनी एकत्र येऊन सुरक्षित सौंदर्यप्रसाधनांसाठी मोहीम करून कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण देणारे घटक (कार्सिनोजेनिक carcinogenic) या सौंदर्यप्रसाधनांमधून काढून टाकावेत यासाठी प्रयत्न केले. २००४ साली ‘एन्व्हायरमेंट वर्किंग ग्रुप’ यानं सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षिततेवर एक अहवाल सादर केला. त्यांनी ७५०० सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरलेल्या १०००० रसायनांची घातक रसायनांबरोबर तुलना सादर केली. एन्व्हायरमेंट वर्किंग ग्रुपनं २००४ साली ‘स्किन डीप’ नावाचा अहवाल तयार केला होता. त्यात त्यांनी ७११ लिपस्टिकमधल्या २८% लिपस्टिकस्मध्ये कॅन्सरला आमंत्रण देणारी (Methylparaben, Propylparaben, Retinyl Palmitate, Tocopheryl Acetate, Lead) मेथो पॅराबेन, रेटिनल पालमिटेट, प्रेपोपॅराबेन, टिकोफेरल अॅसिटेट आणि लीड किंवा शिसं ब्युटिलेटेड हायड्रॅाक्झिटॉल्विन, नॉयलॉन ६, फेरिक ऑक्साईड, पॉलिथिलिन आणि टिटॅनियम डायऑक्साईड अशी रसायनं असल्याचा दावा केला होता. २००६ मध्ये ‘फ्रेडस् ऑफ अर्थ’ आणि ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अॅसेसमेंटनं एफडीए’नं सौंदर्यप्रसाधनांतले नॅनोपार्टिकल्सच्या स्वरुपात असलेले घटक तपासावेत असं आवाहन केलं होतं. नॅनोपार्टिकल्स मानवी शरीरातल्या उती (टिश्यूज) आणि पेशी (सेल्स) यात जाऊन जैवरासायनिक (बायोकेमिकल) विकार होऊ शकतात असं संशोधकांचं मत होतं. या सगळ्या अहवालांनंतर आणि सामाजिक संस्थांनी आवाज उठवल्यानंतर सीटीएफए संघटना सावध झाली. त्यांनी स्वत:च्या उत्पादनांची सुरक्षितता लोकांपर्यंत पोचवण्यासाठी समाजातल्या काही ‘वजनदार’ लोकांची नियुक्ती केली. तसंच काही विशिष्ट कार्यक्रम आयोजित करुन त्यात राजकारणातल्या लोकांना खास आमंत्रणं दिली गेली. यात सरकारवर दबावतंत्राचा वापर करून आपलं हित साधून घ्यायचं असाच त्यामागे डाव होता.
ओठांना चमक देणार्या लिपस्टिकस् सर्वात जास्त धोकादायक असतात. त्यात पेट्रोलियम जेली वापरली जाते. तेल खणताना निघणारा तो एक बायप्रॉडक्ट आहे. म्हणजे लिपस्टिक लावणं त्यातलं गॅसोलिन खाल्ल्यासारखंच आहे. १० वर्षात एखाद्या स्त्रीनं लावलेल्या किंवा खाल्लेल्या लिपस्टिकचा विचार करता ७ पौंड गॅसोलिन तिच्या पोटात जातं. हायड्रोकार्बन हे पेट्रोलियम जेलीत आढळतं. ज्या स्त्रियांना स्तनांचा कर्करोग असतो त्यांच्या शरीरात हायड्रोकार्बनची पातळी स्तनांचा कर्करोग नसलेल्या स्त्रियांमधल्या हायड्रोकार्बनच्या पातळीच्या दुप्पट असते असं सिद्ध झालंय. खरं तर युरोपियन युनियननंही पेट्रोलियम जेलीच्या अनेक उत्पादनांवर बंदी आणलीय.
फेब्रुवारी २०१२च्या ‘एज’ मासिकातल्या एका लेखानुसार अमेरिकेतल्या लोकप्रिय असलेल्या ४०० लिपस्टिकस् मध्ये शिसं सापडलं. त्यानंतर आठवड्याभरातच लंडनच्या ‘डेली मेल’ या वृत्तपत्रानं आयलायनर आणि डोळ्यांच्या मेकअपच्या उत्पादनांमध्ये कॅडमिअम (cadmium), टाल्कम पावडरमध्ये निकेल आणि मस्कारामध्ये ब्राँझ सापडल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. हे धातू मेकअपमध्ये वापरलेले असतात असं ग्राहकाला कळण्याची काही सोय नाही. लिपस्टिक आणि मेकअपच्या इतर साहित्यामध्ये अॅल्युमिनियम (aluminum) असतं. माणसांना ते धोकादायक आहे. धातूंपासून बनवलेल्या मेकअपच्या वस्तू हे आरोग्यावर परिणाम होण्याचं एक प्रमुख कारण आहे. मायका हा धातू आता १० वर्षांपूर्वी मिळत होता त्यापेक्षा हजारो पटीनं सूक्ष्म कणांमध्ये उालब्ध होऊ शकतो. या लहान आकारामुळे तो पावडरमध्ये वापरला जातो. पण लहान आकारामुळेच तो हवेत सहज उडून फुप्फुसांमध्ये शोषला जाऊ शकतो. बांधकामाच्या ठिकाणी तिथले मजूर मायका वापरतात तेव्हा ते चेहर्यावर मास्क घालतात. आत्तापर्यंत मायका असलेल्या पावडरने केलेल्या मेकअपमुळे स्त्रियांवरचे घातक परिणाम दिसून आले नसले तरी दीर्घकाळ वापरामुळे त्वचेला खाज सुटणं आणि फुप्फुसांचे रोग होऊ शकतात. काही धातुंमुळे कॅन्सर, न्यूरॉलॉजिकल आजार, स्मरणशक्तीवर परिणाम होणं, मूडमधले तीव्र चढउतार, केस गळणं असे परिणाम होऊ शकतात असं त्या वृत्तात मांडलं होतं.
कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी सौंदर्यप्रसाधनं या विषयावर संशोधन केलं. त्यात त्यांना लोकांची केशभूषा करणार्या आणि मेकअप करणार्या ५८००० जणांना मायेलोमा (प्लाझ्मा सेलचा कॅन्सर) असल्याचं दिसून आलं. हेअरडाय, शांपू, हेअर कंडिशनर्स, केस कुरळे करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादनं आणि नेल पॉलिश ही याची मुख्य कारणं होती. इतर संशोधनांमुळे मेकअप, चेहर्याला लावली जाणारी पावडर आणि बबलबाथ ही उत्पादनं धोकादायक असू शकतात असेही निष्कर्ष निघालेत. बबल बाथसारख्या उत्पादनांमधून त्वचेवर पुरळ उठणं, किडनी दूषित होणं, डोळ्यांची आग होणं असे परिणाम होऊ शकतात.
चेहर्यावरच्या सुरकुत्या नाहीशा करण्याचा दावा करणारी कित्येक क्रीमस् देखील त्वचेला हानीच पोचवत असतात. सुरकुत्या घालवण्यासाठी खास बनवलेली ही क्रीम्स् रक्त पुरवठा करणार्या धमन्यांच्या जास्त आतपर्यंंत पोचल्याने त्यांच्यापासून जास्त धोका संभवतो. तसंच शरीरातल्या कोलाजेन या महत्वाच्या प्रोटीनचं प्रमाण ही क्रीमस् वापरुन कमी झाल्यानं सुरकुत्या जास्तच वाढतात. असाच प्रकार लव्हेंडर, युकॅलिप्टस, पेपरमिंट या क्रीमस्मध्ये आणि इतर उत्पादनांत वापरलेल्या सुगंधांमुळे होतो. फेस क्रीममधल्या काही रसायनांमुळे मळमळणं, चक्कर येणं आणि निद्रानाशासारखे प्रकारही होऊ शकतात. सौंदर्यप्रसाधनं वापरणार्या लोकांना आपल्याला होणार्या शारीरिक समस्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे होत असतील असं स्वप्नातही वाटत देखील नाही. रोज आंघोळीसाठी वापरला जाणारा साबण जरी नीट निवडला नाही तरी निद्रानाश आणि अस्वस्थता येणं हे प्रकार घडू शकतात. त्यामुळे खरं म्हणजे सुवास नसलेलं, रंग नसलेलं, व्हिटॅमिन ए-रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी असलेलं क्रीम वापरायला हवं. तसंच ही क्रीमस् रात्री झोपताना लावावी. दिवसा ही क्रीमस सूर्यामुळे ऑक्सिडाईज (ऑक्सिजनशी रासायनिक क्रियेनं मिसळलं जाणं) होऊन त्यांचा परिणाम नष्ट होतो.
सौंदर्यप्रसाधनांमधले बॅक्टेरिया मारण्यासाठी त्यांच्यात प्रिझर्व्हेटिव्हज् वापरणं भाग पडतं असा उत्पादक दावा करतात. या कामासाठी पॅराबेन्ससारखी (parabens) घातक रसायनं वापरली जातात. पण अॅाब्रे हँपटनच्या (ऑब्रे ऑर्गनिक कॉस्मेटिक्स) म्हणण्यानुसार उत्पादक ही प्रिझर्व्हेटिव्हज् बॅक्टेरियांपासून बचावासाठी नव्हे तर स्वत:च्या उत्पादनांचं आयुष्य वाढावं यासाठी वापरतात. व्हिटॅमिन-इ सारख्या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे सौंदर्यप्रसाधनं ६ महिने ते १ वर्षं इतकीच टिकतात. तयार सौंदर्यप्रसाधनं जास्त दिवस टिकावीत यासाठी त्यात फॉर्मलडिहाईड, मिथाईल आणि प्रॉपिल पॅराबेन यासारखी रसायनं घातली जातात. ही रसायनं आरोग्याला प्रचंड घातक असतात. यापैकी काही रसायनांमुळे शरीरातलं हार्मोन्सचं संतुलनही बिघडतं. १९३८ मध्ये त्वचेवरचे केस काढण्यासाठी एक जाहिरात केली जात असे. या जाहिरातीद्वारे ते उत्पादन किती सुरक्षित आणि चांगलं आहे असंच सांगितल्या जाई. पण प्रत्यक्ष तपासणीअंती त्यात उंदीर मारण्यासाठी वापरायचं थॅलियम अॅसिटेट (thallium acetate) हे घातक रसायनं वापरण्यात येत असे. या रसायनामुळे पॅरालिसिस होण्याचे धोके सांगितले गेले होते. एकूणच अशी अनेक सौंदर्यप्रसाधनं आपल्या जिवाशी खेळत असतात आणि आपल्याला मात्र त्याची अजिबात कल्पना नसते.
१९३८ नंतर ४० वर्षांनी म्हणजे १९७८ मध्ये बर्याचशा केसांच्या रंगांमधून घातक रसायनं वापरण्यावर बंदी घातली गेली. काही वर्षांनंतर केसांच्या रंगांमुळे काही प्राण्यांना कॅन्सर झाल्याचं प्रयोगांमध्ये निष्पन्न झालं. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या डिसेंबर १९७९च्या नियतकालिकात केस न रंगवणार्या स्त्रियांपेक्षा केस रंगवणार्या स्त्रियांमध्ये क्रोमोसोम्सची जास्त हानी होते असं दिसून आलं. केस रंगवण्याच्या डाय मध्ये एकेकाळी शिसं सापडायचं आणि कित्येक केस कापणारे शिशाच्या विषानं मरणही पावले. केवळ शिसंच नव्हे तर त्या उत्पादनांमध्ये १९८१ साली आर्सेनिक आणि पारासुद्धा घालायला परवानगी दिलेली होती. डोक्याच्या कातड्यातून ही रसायनं शोषली जातात. तपासणीअंती त्या सगळ्यात कोळशाची राख आढळली. कोळशाच्या राखेमुळे मूत्राशयाचा कर्करोग होण्याची भीती असते. नॅशनल कॅन्सर असोसिएशननं यावर शिक्कामोर्तब केलंय. एखाद्या माणसानं बरेच दिवस हेअरडाय वापरल्यानंतर ब्लॅडर कॅन्सर, लिंफोमिया आणि विविध मायलोमा होतात असं अनेक सर्वेक्षणांवरुन लक्षात आलंय. एका संशोधनावरुन ज्या स्त्रिया महिन्यातून एकदा तरी हेअरडाय वापरतात त्यांना ब्लॅडर कॅन्सर होण्याचा दुप्पट धोका संभवतो. विशिष्ट सौंदर्यप्रसाधन वापरल्यानं येणारी पिंपल्स ही अनेकजणांची डोकेदुखी होऊन बसलेली असते. त्यातलं विशिष्ट रसायन बहुतेक सर्व मॉईश्चरायझर्समध्ये वापरल्यानं पिंपल्सला आमंत्रण मिळतं. सौंदर्यप्रसाधनं वापरुन अॅलर्जी येणं हे बर्याजणांच्या बाबतीत घडतं.
नेल पॉलिश, परफ्युम, हेअर डाय ही सौंदर्यप्रसाधनं त्वचेवर, केसांवर जास्त काळ टिकावीत यासाठी फॅथॅलेटस् (Phthalates ) सारखी घातक रसायनं वापरली जातात. फॅथॅलेटस्मुळे जन्मजात व्यंग घेऊन येणार्या मुलांचं प्रमाण वाढल्याचं आणि जननक्षमतेवर कायमस्वरुपी परिणाम झाल्याचं दिसून आलंय. पुरुषांच्या बाबतीत फॅथॅलेटस्मुळे स्पर्म काऊंट कमी होण्यापासून ते लैंगिक अवयवांवर परिणाम होण्यापर्यंत अनेक समस्या दिसून आल्या आहेत. यकृत, मूत्राशय, फुप्फुसं आणि पुनरुत्पादनाच्या अवयवांवर फॅथॅलेटस्चा घातक परिणाम होतो. या रसायनांमुळे आरोग्य बिघडेल आणि पुनरुत्पादनाच्या अवयांवरचे घातक परिणाम वाढत राहातील हे अमेरिका आणि कॅनडातले सरकारसाठी काम करणारे शााज्ञही कबूल करतात. एन्व्हायरमेंट वर्किंग ग्रुप’ (इडब्लूजी) यानं फॅथॅलेट सर्व नेल पॉलिशमध्ये असतं हे शोधून काढल्यानंतरही ते अनेक उत्पादनांमध्ये असतं. २००४ मध्ये युरोपियन युनियननं फॅथॅलेट असलेल्या सर्व सौंदर्यप्रसाधनांवर बंदी आणली होती. कॅलिफोर्नियामध्ये मात्र अशी बंदी आणण्याची मागणी ‘कॉस्मेटिक टॉयलेटरी अँड फ्रागरन्स असोसिएशन’ (सीटीएफए) यानं थातुरमातुर कारणं सांगून फेटाळून लावली.
नैसर्गिक गोष्टी वापरून सौंदर्यप्रसाधनं बनवायची असतील तर उत्पादकांचा नफा कमी होईल. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींना पर्यायी अशी कोणतीतरी स्वस्त रसायनं त्यात वापरली जातात. सौंदर्यप्रसाधनं बनवणारे उद्योजक तुम्हाला गोरेपणा मिळवून देण्याचे वादे करतात. पण या उद्योगाला फसवणुकीची प्रचंड मोठी काळी किनार आहे. सौंदर्यप्रसाधनांची अमेरिकेतली बाजारपेठ ३५०० कोटी डॉलर्सची आणि सर्वात जास्त नफा मिळवणारी आहे. या वस्तूंच्याच सर्वाधिक जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जातात.
सौंदर्यप्रसाधनांतलाच एक प्रकार म्हणजे अत्तरं (परफ्युम्स)! यात काही तेलं, सुगंधी द्रव्यं, आणि काही सॉल्व्हंटस् घातलेली असतात. हे सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकारात उालब्ध असतं. परफ्युम वापरुन शरीराला सुगंध येतो. मात्र काही लोकांना त्यामुळे डोळे चुरचुरणं, तीव्र डोकेदुखी, मळमळणं असे प्रकार सुरु होतात. परफ्युमच्या सुगंधानं अॅलर्जी येण्याला ‘एक्झेमा’ असं म्हणतात. या प्रकारात त्वचेला खाज सुटणं, त्याच्यावर चट्टे उमटणं असे प्रकार बहुतांशी घडतात. परफ्युम्सचे उत्पादक बर्याचदा इथेनॉल वापरतात. इथेनॉलची अॅलर्जी असलेल्या लोकांना इथेनॉल वापरलेली परफ्युम्स् आणि इतरही उत्पादनांची अॅलर्जी येऊ शकते. आपण वापरतो त्या उदबत्तीतल्या काही घटकांचीसुद्धा त्या बाबतीत संवेदनाशील असणार्या लोकांना अॅलर्जी असू शकते.
लहान मुलं, वृद्ध आणि आजारी माणसं यांना परफ्युम्सच्या उग्र वासानं धोका पोहोचू शकतो. डिओडरंटस् वापरणं योग्य आहे असं सगळ्या पाश्चिमात्य लोकांना वाटतं आणि म्हणून आपल्याकडेही उच्चभ्रूंना वाटतं. ते माफक प्रमाणात, नीट तपासणी केल्यावर वापरायलाही हरकत नाही. पण आपल्याला त्यातले धोके ठाऊक नसतात. सर्व डिओडरंटस्मध्ये अॅल्युमिनियम क्लोराईड (aluminium chloride) असतं. शिवाय डिओडरंटस् ज्यात साठवलेलं मिळतं ते अॅल्युमिनिअमचे टिनसुद्धा वापरणं घातक असतं. अॅल्युमिनियम हे न्यूरोटॉक्सिन आहे आणि आरोग्याला अनेक प्रकारे हानिकारक आहे. परफ्युम्सच्या प्रत्येक उत्पादनातल्या एकूण रसायनांमधली काही रसायनं दमा, डोकदुखी आणि त्वचारोगांना निमंत्रण देणारी असतात, तर काही रसायनं हॉर्मोन्सचं संतुलन बिघडवणारी असतात. परफ्युम्सच्या अॅलर्जीतून त्वचारोग, श्वसनसंस्थेचे विकार आणि डोळ्यांना त्रास असे प्रकार सुरू होतात. रासायनिक सेन्सिटायझर्स घातलेल्या परफ्युम्समुळे कोणत्याही माणसाला लगेच झाला नाही तरी नंतरच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो. प्रत्येक परफ्युममध्ये १० तरी रासायनिक सेन्सिटायझर्स असतातच.
टॅटू काढण्याची फॅशन आपल्याकडेही जोर धरतेय. त्यातली शाई आणि पिगमेंटस् उत्कृष्ट प्रतीची असल्याचा दावा कंपन्या करत असल्या तरी टॅटूच्या शाईत घातक रसायनं असतातच. त्यात जर अल्कोहोल असेल तर त्वचेवर ते वापरल्यानंतर इतर रसायनं रक्तात मिसळली जाण्याचा रस्ता सुकर होतो. कार्सिनोजेनिक रसायनांचा प्रभावही अल्कोहोलमुळे वाढतो. टॅटूची शाई मिसळणार्या माणसाला स्टरलायझेशनचं तंत्र नीट माहिती असायला हवं. वेगवेगळ्या घटकांचं स्टरलायझेशन करण्याच्या तसंच थंड आणि उष्ण स्टरलायझेशन करण्याच्या पद्धती त्याला माहिती असायला हव्यात. कारण जास्त तापवली गेली तर त्यातली रसायनं घातक पातळीला पोचू शकतात.
सौंदर्यप्रसाधनं बनवणार्या कंपन्यादेखील गोरं असणं म्हणजेच सुंदर असणं असं आपल्या जाहिरातीतून मनावर बिंबवतात आणि मग गोरं होण्यासाठी काय करा, तर आमचं अमुकतमूक उत्पादन वापरा! तसंच सौंदर्याचं दुसरं लक्षण म्हणजे झिरो फिगर किंवा अगदी एैश्वर्या रॉयसारखं बारीक असायला हवं. मग बारीक होण्यासाठी देखील उत्पादक फसव्या उत्पादनांच्या जाहिराती करतात. या कंपन्या आपल्या नफा पाहत कुरळे केस सरळ करा, सरळ केस कुरळे करा, ब्लीच करून गोरं व्हा असं आपल्या जाहिरातीतून सांगत आपल्या आरोग्याची हानी करत असतात आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही.
स्त्री ही एक उाभोग्य वस्तू आहे असं तर कित्येक जाहिरातीतून बिंबवलं जातं. स्त्रियांना जर या समाजात रहायचं असेल तर त्या वस्तू वापरुन पुरुषांच्या उाभोगाचं एक साधन म्हणून त्यांनी स्वत:ला तयार करावं असा संदेश दिला जातो. तुम्ही अमूक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं वापरली तर तुम्ही पुरुषांना हव्याशा वाटाल असं या जाहिराती सांगत असतात. एखादं उत्पादन पुरुषांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी ते पुरुषांचं स्वातंत्र्य आणि स्वयंपूर्णता यावर भर देणारं असावं लागतं. याउलट स्त्रियांमध्ये ते प्रिय होण्यासाठी ते उत्पादन वापरुन ती पुरुषाला कसं खुश करू शकेल यावर भर दिलेला असतो. स्त्रियांना आपण कुठेतरी कमी आहोत असं वाटायला लावणं आणि त्यातून त्यांनी सुंदर दिसण्यासाठी नवनवीन वस्तू विकत घेणं अशा दु्ष्टचक्रात त्यांना अडकवणं हा या सगळ्या मंडळींचा हेतू असतो. ठरावीक ब्रँडचे कपडे घातले की आत्मविश्वास कसा वाढतो. ठरावीक ब्रँडचं डिओडरंट लावल्यावर पुरुषाकडे सुंदर मुली कशा आकर्षित होतात वगैरे वगैरे. अमेरिकेत टीनएजधल्या मुली एका वर्षात ९०० कोटी डॉलर्स मेकअप आणि त्वचा चांगली दिसावी यावर खर्च करतात. झटपट सुंदर दिसा असं सांगणार्या जाहिरातीतलं सौंदर्यप्रसाधन तात्पुरतं बरं वाटतं. पण जर ती सौंदर्यप्रसाधनं वापरली नाहीत तर त्यांचा आत्मविश्वास ढळतो. थोडक्यात त्यांची स्वची जाणीव, स्वबद्दलचा अभिमान नाहीसाच होतो.
तुमच्या आकर्षक दिसण्यावर तुमचे मित्रमैत्रिणी, प्रियकर/प्रेयसी, कामाच्या ठिकाणच्या बढत्या अवलंबून आहेत असं चित्र आपल्यासमोर जाहिरातींतून सतत उभं केलं जातं. मग आकर्षक दिसण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न सुरू होतात. सौंदर्यप्रसाधनं, प्लॅस्टिक सर्जरी आणि डाएट करुन बारीक होणं हे सर्व त्याचेच प्रकार आहेत. तसंच आता वय कितीही वाढलं तरी तरूण दिसण्याच्या प्रयत्नांत बहुतांशी स्त्री-पुरूष दिसतात. मग काय तरूण दिसण्यासाठी आणि वार्धक्य थोपवण्यासाठीच्या पुन्हा सौंदर्यप्रसाधनांचाच आधार घेतला जातो. एकूण सौंदर्यप्रसाधनांपैकी ४०% उत्पादनं स्त्रियांनी त्या आहेत त्यापेक्षा कमी वयाच्या दिसाव्यात यासाठी बनवली जातात. स्त्रीचं सौंदर्य, तिचं तरुण दिसणं हाच तिचा सर्वात महत्त्वाचा दागिना आहे असं ही पुरुषप्रधान संस्कृती आणि तिला खतपाणी घालणारी ही संस्कृती सर्वांच्याच मनावर बिंबवत असते. त्यामुळे एखादी स्त्री कितीही विवेकवादी, माणुसकी जपणारी, समानता मानणारी, भेदभाव न करणारी, सुसंस्कृत असली तरीही ती तरुण आणि लौकिकदृष्ट्या सुंदर नसेल, तर तिची किंमत या समाजात एकदम कमी होते. यामुळे मग स्त्रियाही बाह्य सौंदर्य आणि तारुण्य यांच्या मागे धावत सुटतात. त्यातूनच सौंदर्याची व्याख्या तरुण दिसण्याशी प्रसारमाध्यमं प्रचंड प्रमाणात जोडतात. टीव्हीवरच्या मालिका, सिनेमे यातले अभिनेते सतत तरुण दिसतात किंवा दाखवले जातात. ज्यांचे फोटो मासिकांमध्ये झळकतात त्या नटनट्या त्यांचं वय वाढलं तरी फोटोग्राफर त्यांच्या सुरकुत्या कमी करुन फोटो मात्र सुंदर आणि तरुण करतो. असे नट-नट्या जनतेसाठी आदर्श असतात. ग्लॅमरसोबतच या लोकांमागे प्रसिद्धी आणि पैसा धावत असतो आणि सर्वसामान्य लोक या नटनट्यांच्या मागे धावत सुटतात. प्रसिद्धी आणि पैसा हा सुखाचा मूलमंत्र आणि त्यासाठी तरुण दिसण्याची अतिआवश्यकता अशा दुष्टचक्रात सापडून लोक तरुण दिसण्यासाठी सतत धडपडत असतात. मात्र कितीही प्रयत्न केला तरी ते अशक्य असतं, याचं कारण ते मुळातच खोटं आणि फसवं असतं. पण यातून सौंदर्यप्रसाधनांची विक्री वाढते आणि उत्पादकांच्या तिजोर्या भरल्या जातात.
खरं तर एखाद्या माणसाची बुद्धी, त्याचं एकूण वागणंबोलणं, त्याची संस्कृती, त्याची जगण्याची मूल्यं असे सौंदर्याचे वेगवेगळे निकष आहेत. फक्त बाह्य सौंदर्य हेच खरं सौंदर्य नव्हे हे लक्षात घेतलं तर रसायनांचा त्वचेवर मारा करणं थांबवलं जाऊ शकतं. चांगलं आणि नीटनेटकं दिसणं आणि तसं दिसांवंसं वाटणं यात खरं तर अयोग्य मुळीच नाही. बाह्य सौंदर्य वाढवलं तर दृष्टीला जास्त चांगलं वाटतं. पण शारीरिक सौंदर्यापलीकडेही आंतरिक सौंदर्य असतं हे लक्षात घेतलंच जात नाही. सौंदर्यप्रसाधनांचा वापर शरीर विशेषत: चेहरा जास्त सुंदर दिसणं, फक्त वरवरचं सौंदर्य चांगलं करणं यासाठी केला जातो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम करणार्या या घातक रसायनांपासून वेळीच स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवायला हवं.
थोडक्यात, परदेशी आणि भारतीय बड्या मक्तेदारी असलेल्या कंपन्यांच्या नफ्यासाठी लोकांना सतत प्रचंड मोठ्या प्रमाणावर सौंदर्यप्रसाधनांचा वापर करायला भाग पाडणं हा या स्पर्धेवर आधारलेल्या बाह्यरुपाला अवास्तव महत्व देणार्या चंगळवादी समाजाचंच एक लक्षण आहे. अशा उत्पादनांमुळे जीडीपी वाढून काय फायदा? म्हणूनच आरोग्याला धोका पोहोचणार नाही अशी हानिकारक नसलेली सौदर्यप्रसाधनं वापरून नीटनेटकं आणि स्वच्छ राहता आलं तर ते जास्त आरोग्यदायी आणि आनंददायी ठरेल!
Add new comment