माझे गांव माझे जगणे

माझे गांव माझे जगणे

'ऊनसावलीचा खेळ आयुष्यभर चालू असतो. या खेळात आपण कधी दमतो, तर कधी सुखावतो. अशा वेळी आपलं गाव आपल्या सोबत असतं...’ - माझे गाव माझे जगणे
१९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अक्षरधारा आणि ऋतुरंग प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, पुणे च्या सभागृहात अरूण शेवते संपादित ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

कार्यक्रमाला जायचं नक्की होतंच. तेवढ्यात सकाळी फोन खणाणला आणि पलीकडून अतिशय सौम्य, मृदू आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सचिन इटकर यांनी कार्यक्रमाला येण्याची आठवण करून दिली. या कार्यक्रमाचे आयोजक/संयोजक सचिन इटकर आणि अक्षराधाराचे संचालक रसिका आणि रमेश राठीवडेकर होते. सचिन इटकर यांनी मागच्या वर्षी पिंपरी चिंचवड, पुणे इथं पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती. तर अक्षरधाराचं पुस्तक दालन हे संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तकांच्या दुनियेत एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं आहे. हे दांपत्य वाचनसंस्कृती अधिक वाढावी या हेतूनं वर्षभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. 

सायंकाळी ६ वाजता मी, अच्युत गोडबोले, किरण केंद्रे, उषा नवले आणि कल्याण तावरे असे आम्ही सगळेजण सभागृहात स्थानापन्न झालो आणि लगेच पाचच मिनिटांत कार्यक्रम सुरू झाला. व्यासपीठावर माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख, नागनाथ कोतापल्ले, पी.डी. पाटील, सदानंद मोरे, अरूण शेवते, सचिन इटकर आणि रसिका राठिवडेकर उपस्थित होते. व्यासपीठ जसं अनेक मान्यवर व्यक्तिंनी फुलून गेलं होतं, तसंच सभागृह देखील सर्वच वयोगटातल्या रसिकांनी भरून गेलं होतं. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केलं. त्यांनी साहित्य क्षेत्रात गेली २४ वर्षांपासून ‘ऋतुरंग’ हा दिवाळीअंक प्रकाशित करणारे आणि त्याचबरोबर अनेक पुस्तकांचे लेखक, संपादक असलेले अरूण शेवते सगळ्यांपेक्षा वेगळे कसे आहेत हे सांगत गुलजारजीशी असलेला त्यांचा स्नेह याविषयी सांगितलं. ‘मराठी भाषेची माझी ओळख आणि अ या अक्षराशी ओळख अरूण शेवते या नावापासून झाली’ असं गुलजार जाहीरपणे सांगतात आणि अरूण शेवतेविषयी आपल्या भावना व्यक्त करतात असा उल्लेखही इटकरांनी आवर्जून केला. तसंच अरूण शेवते यांच्या ‘शर्वरीच्या कविता’ या कवितेच्या पुस्तकातल्या कवितांचा हिंदीतून अनुवाद गुलजारजींनी करून त्यांचा एक प्रकारे गौरवच केल्याचं इटकरांनी सांगितलं. सचिन इटकर यांनी ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकातल्या अनेक गोष्टींनी आपल्याला प्रेरित केलं असून आपणही आज संकल्प करतो आहोत आणि येणार्‍या दोन वर्षांत आपल्या गावात आपल्या गावासाठी काही चांगलं काम करणार असल्याचं सांगितलं. व्यासपीठावरच्या मान्यवरांबद्दलची कृतज्ञता सचिन इटकर यांनी व्यक्त केली. 

सुशिलकुमार शिंदे यांच्यासारख्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाशी आपली ओळख कशी झाली याबद्दल आपल्या मनोगतात सांगून त्यांच्यातलं माणूसपण आपल्याला कसं भावलं याबद्दलचे काही प्रसंग अरूण शेवते यांनी उदृत केले त्यांच्या पंच्च्याहत्तरी निमित्त ‘माझे गाव माझे जगणे’ हे पुस्तक सुशिलकुमार शिंदे यांना अर्पण करून आपल्या नात्याविषयीची, एक स्नेहाची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते आहे असंही ते म्हणाले. यशवंतराव गडाख, सदानंद मोरे, नागनाथ कोतापल्ले, पी. डी. पाटील यांच्याबरोबरचं मैत्र किती दृढ आहे हेही त्यांनी या प्रसंगी सांगितलं.  

पिंपरी चिंचवड, पुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि शिक्षणक्षेत्रात ज्यांचं काम अतुलनीय आहे असे श्री पीडी पाटील यांनी अरूण शेवते यांनी किती सहजतेनं आपल्याला गावाविषयी बोलतं केलं हे सांगितलं. साहित्यिक आणि संपादक म्हणून अरूण शेवतेंमधली बलस्थानं त्यांनी सांगितली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी शेवते यांचं अभिनंदन केलं. आपलं गाव आपल्या जीवनाशी निगडित असतं. आपलं गाव आपण सोडलं तरी जे आपल्या जगण्यात रुतून बसलेलं असतं. गाव या शब्दाचा केवळ भौगोलिक अर्थ नाही तर त्या पलीकडला अर्थ त्यात दडला आहे, याबद्दलही त्यांनी सविस्तर विवेचन केलं. 

अरूण शेवतेंनी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना ‘माझे गाव माझे जगणे’ या विषयावर लिहितं केलं. काही लोकांनी आपल्या गावाबद्दल तर काहींनी दुसर्‍याच्या गावाशी आपण कसे एकरूप झालोत हे लिहिलं. शरद पवार यांनी बारामतीचा विकास यावर लिहिलं. एका रीतीनं त्यांच्या आत्मचरित्राचाच हा एक छोटासा भाग म्हणता येईल. यात वेगवेगळ्या प्रवृततीचे लोक साहित्यिक, राजकारणी, कलावंत, समाज कार्यकर्ते असे अनेक जण आहेत. या सगळ्या लोकांनी गावाचे वेगवेगळे पैलू गावाविषयी व्यक्त केले आहेत. फाळणीच्या वाट्याला आलेलं आत्यंतिक दुःख, सगळे पैलू या पुस्तकात आलेत. एक एैतिहासिक दस्तावेज ठरावा असं हे पुस्तक असल्याचं मान्यवरांनी एकमुखानं सांगितलं.

नागनाथ कोतापल्ले यांनी अरूण शेवते यांच्याविषयीची प्रतिमा एक कवी म्हणून मनात ठसली असून ‘कावळ्याच्या कविता’ आणि ‘राजघाट’ हे त्यांचे काव्यसंग्रह आजही आपल्या मनात घर करून असल्याचं सांगितलं. या पुस्तकातल्या अनेक लेखांमधले तपशील त्यांनी सांगितले. गाव म्हणजे नुसतं गाव नसतं. त्याची मुळं माणसाच्या मनात खोलवर रुजलेली असतात असं सांगून ही गोष्ट त्या गावाच्या लक्षात येईल असं नाही किंवा त्या माणसाच्याही ते लक्षात येईल असंही नाही, असं ते म्हणाले. मा. सुशिलकुमार शिंदे यांनी माणसाच्या जडणघडणीला परिस्थिती कशी कारणीभूत असते हे सांगितलं. ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकामधले अनेक विदारक अनुभव त्यांनी कथन केले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सुशिलकुमार शिंदे यांनी ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकाची प्रत चक्क विकत घेतली आणि पुस्तकाचे पैसे त्यांनी अरूण शेवतेच्या हातात सरकवले. 

'माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकात अरूण साधू, सुशिलकुमार शिंदे, शरद पवार, विश्‍वास पाटील, रंगनाथ पठारे, पी.डी. पाटील, सुहास बहुलकर, नागनाथ कोतापल्ले, पोपटराव पवार, अण्णा हजारे, गिरीश कुबेर, मकरंद अनासपुरे, प्रभा गणोरकर, सयाजी शिंदे, कुलदीप नय्यर, रामानंद सागर, ना. धो. महानोर, शिरीष पै, सदानंद मोरे, मधुकर भावे, गुलजार, दत्तप्रसाद दाभोळकर, यशवंतराव गडाख यांसारख्या अनेक दिग्गजांनी आपल्या जडणघडणीत आपल्या मनामधलं गावाबद्दलचं स्थान आणि गावाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

या कार्यक्रमामुळे ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकाविषयीचं कुतूहल नक्कीच वाढलं. ७७५ पानी असलेलं हे पुस्तक कार्यक्रमस्थळी ६०० रुपयांमध्ये उपलब्ध होतं. पुस्तक मोठं असल्यानं वाचायला वेळ थोडा जास्त लागेल. पण वाचून झालं की सविस्तर लिहीनच. पण सचिन इटकरांना या कार्यक्रमाच्या प्रतिक्रियेबरोबरच एक विनंती अशी, की व्यासपीठावरची मान्यवरांची गर्दी वाढवण्याचा मोह त्यांनी टाळावा. सगळेच वक्ते - मान्यवर 'एक से एक' असतात, मात्र एक ते दीड तासाच्या कार्यक्रमात त्यांना बोलायला पुरेसा अवधी मिळत नाही आणि श्रोत्यांनाही पूर्ण समाधान लाभत नाही. तसंच व्यासपीठावर एक किंवा दोनच वक्ते असतील, तर त्या वक्त्यांचं बोलणं हे आपल्या मनावर प्रचंड प्रभाव पाडून जातं. घरी परतलं तरी त्या व्याख्यानात आपण बुडालेलो असतो. ...... तरी आयोजकांनी (या सूचनेबद्दलचा राग नसावा!) याचा विचार नक्कीच करावा असं वाटतं.

दीपा देशमुख.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.