शब्दांचे जादूगार फणीश्वरनाथ ‘रेणू’
नेपाळच्या सीमेवर आणि उत्तर-पूर्व बिहारच्या अतिशय दुर्गम प्रदेशातल्या ग्रामीण भागातली ही गोष्ट आहे. बिहार राज्यातल्या पूर्णिया जिल्ह्यातलं मेरीगंज इथे प्रशांत बॅनर्जी नावाचा एक तरूण डॉक्टर वैद्यकीय सेवा करण्यासाठी येतो. परदेशी जाण्याची संधी नाकारून तो ग्रामीण भाग निवडतो. तो गावात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा गावातली गरिबी, अंधश्रद्धेचा विळखा, दुःख, अज्ञान आणि सामाजिक शोषण यांच्या दुष्टचक्रात अडकलेले गावकरी बघतो. इथल्या लोकांवर अंधश्रद्धेनं इतका प्रभाव टाकलेला असतो की डॉक्टर हा रोग पसरवणारा असतो, त्यानं उपचार केला तर मृत्यू अटळ आहे, अशा त्यांच्या गैरसमजुती असतात. या सगळ्यांना तोंड देत प्रशांत तिथे राहतो. या गोष्टीमध्ये अनेक पात्रं येतात. त्यातून जमीनदारी, गावातला जातिवाद, गावातलं राजकारण, तिथल्या अंधश्रद्धा, अशा अनेक गोष्टींचं दर्शन प्रशांतला होतं. त्यांच्याशी सामना देत प्रशांत शेवटी यशस्वी होतो आणि या ‘मैला आँचल’ या कादंबरीचा शेवट सुखद होतो. यात फक्त प्रशांत नायक नसून यातली सामाजिक परिस्थिती, यातली अनेक पात्रं, त्यांच्या गोष्टी, तिथली विषमता, गरिबी, जातिवाद, अंधश्रद्घा अशा सगळ्याच गोष्टी नायकाचं काम करतात.
‘मैला आँचल’ ही भारतीय हिंदी साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. यात अनेक लोकगीतं देखील येत राहतात. ते त्या कथानकाचा भाग बनून जातात. फणीश्वरनाथ रेणू यांना ‘स्वातंत्र्योत्तर काळातले प्रेमचंद’ असं म्हटलं जातं. याचं कारण प्रेमचंद आणि फणीश्वरनाथ रेणू यांच्या लेखनशैलीत खूप साम्य आहे.
फणीश्वरनाथ रेणू यांच्या सगळ्याच लिखाणामधून संपूर्ण समाज, त्यातली परिस्थिती, स्थानिक वास्तव, त्यातलं राजकारण, जातिव्यवस्थेचा पगडा, भांडवलशाहीचं येऊ घातलेलं संकट, अज्ञान आणि अंधश्रद्धेचा पगडा या सगळ्या गोष्टी नायकाचं काम करतात. त्यांच्या लिखाणातून व्यवस्थेशी संघर्ष करणारा समाज वाचकाला दिसतो. त्यांच्या लिखाणाचं वैशिष्टय म्हणजे त्यांनी कधीही काल्पनिकतेला आपलं केलं नाही. जे वास्तव आहे, जे आसपास घडतं आहे तेच त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं. त्यांना ‘आँचलिक उपन्यासकार’ असंही म्हटलं जातं. फणीश्वरनाथ यांच्या लिखाणामधून वाचकानं पूर्वी कधी ऐकलेले किंवा वाचलेले नसतात असे अनेक स्थानिक शब्द सहजतेनं येतात. उदाहरणार्थ, या कादंबरीत स्टेशनला टीसन म्हटलंय. सोशालिस्ट म्हणजे सुशलिंग. स्वराज म्हणजे सुराज, राजेंद्र प्रसाद म्हणजे रजिन्नर परसाद वगैरे.
आपलं संपूर्ण आयुष्य फणीश्वरनाथ ‘रेणू’ यांनी अन्यायाविरुद्धच्या चळवळीला दिलं. 1942 साली ‘भारत छोडो’ या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. फणीश्वरनाथ ‘रेणू’ यांना त्यांच्या ‘मैला आँचल’ कादंबरीच्या योगदानाबद्दल भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. अन्याय आणि शोषण यांच्या विरोधात ते कायमच उभे राहिले. याच कारणानं त्यांनी आपली पद्मश्री देखील नाकारली होती.
फणीश्वरनाथ यांचा जन्म बिहार राज्यातल्या अररिया जिल्ह्यातल्या फारबिसगंजच्या जवळच्या औराही हिंगना या खेडेगावात 4 मार्च 1921 या दिवशी झाला. त्या वेळी हा भाग पूर्णिया जिल्ह्यात येत असे. शालेय शिक्षण आपल्या गावात झाल्यानंतर नेपाळ इथल्या विराटनगरमधल्या विराटनगर आदर्श विद्यालय इथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आपलं पुढलं शिक्षण काशी हिंदू विश्वविद्यालयामधून पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच फणीश्वरनाथ यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली होती.
1936 साली फणीश्वरनाथ रेणू यांनी आपल्या लिखाणाची सुरुवात केली. त्यांच्या कथा याच सुमाराला प्रसिद्ध व्हायला लागल्या. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना 2 वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला, तेव्हा तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या बटबाबा आणि पहिलवान की ढोलक या कथा साप्ताहिक विश्वामित्रमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्या लोकांना खूपच आवडल्या. भित्तिचित्र मयुरी ही फणीश्वरनाथ रेणू यांची शेवटची कथा. त्यांच्या एकूण 63 कथा प्रसिद्ध आहेत. त्यात ठुमरी, अगिनखोर, आदिम रात्र की महक, एक श्रावणी दोपहरी की धूप, अच्छे आदमी, संपूर्ण कहानिया हे त्यांचे कथासंग्रह जास्त गाजले. मात्र कथांपेक्षाही त्यांच्या कादंबर्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. फणीश्वरनाथ यांनी रिपोर्ताज शैलीतलं लिखाणही विपुल केलं. नेपाली क्रांतिकथा त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. त्रणजल धनजल, वन-तुलसी की गंध, श्रुत अश्रुत पूर्व, समय की शिला पर, आत्मपरिचय असं त्यांचं आठवणीपर लिहिलेलं किंवा चरित्रात्मक लिखाणही खूपच लोकप्रिय आहे.
फणीश्वरनाथ रेणू यांची कितने चौराहे ही कादंबरी किशोरावस्थेतल्या मुलांच्या मनोवस्थेबद्दल भाष्य करणारी आहे. बिहारच्या छोट्याशा गावातला मनमोहन नावाचा एक मुलगा या कथेचा नायक आहे. मनमोहनला आपलं गाव खूप आवडत असतं. मनमोहनला मात्र आपलं घर, आपलं गाव, आपला परिसर खूप आवडत असतो. एके दिवशा त्याचे वडील त्याला गावातून शहरात शिकायला पाठवण्याचं ठरवतात. आपल्या मुलानं शिकून मोठा वकील व्हावं अशी त्यांची इच्छा असते. मनमोहनच्या इच्छेविरूद्ध त्याला शहरात पाठवलं जातं. सुरुवातीला त्याला शहरातल्या वातावरणात राहणं जमत नाही, पण हळूहळू तो या वातावरणात रुळायला लागतो. इथेच त्याला त्याच्यापेक्षा थोडा मोठा असलेला प्रियव्रत भेटतो. गांधी विचारांनी प्रभावित असलेला प्रियव्रत भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मनमोहन प्रियव्रतच्या ग्रुपमध्ये सामील होतो आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतो. या सगळ्या काळात त्याला आपल्या देशातलं वास्तव खूप जवळून बघायला मिळतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची लढाई, तो संघर्ष किती कठीण आहे हेही कळतं. ‘मी’च्या पलीकडलं ‘आम्ही’चं जग त्याला समजतं. स्वातंत्र्यसंग्रामाच्या या लढाईत एके दिवशी प्रियव्रत आणि त्याचे साथीदार तिरंगा हाती घेऊन फडकवत राहायचं ठरवतात. इंग्रजांनी गोळी जरी चालवली तरी तो तिरंगा खाली पडू द्यायचा नाही, तर दुसर्याच्या हातात द्यायचा असं ठरवतात. त्याप्रमाणे पहिली गोळी तिरंगा हाती घेऊन फडकवणार्या प्रियव्रतला लागते, तो दुसर्या जवळ तिरंगा देतो असं करत करत पाचवा साथीदार भोलूजवळ तिरंगा येतो, त्यालाही गोळी लागते आणि तो तिरंगा आपल्या हाती घेण्यासाठी मनमोहनला पुकारतो. पण त्या वेळी मनमोहन कमकुवत पडतो. तो तिरंगा हाती घेण्यासाठी पुढे होत नाही आणि भोलाही मरण पावतो. जो वाचेल त्यानं मरण पावलेल्यांना अग्नी द्यावा असं प्रियव्रतनं सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे मनमोहन आपल्या पाचही मित्रांना अग्नी देतो, पण त्याच्या मनात अपराधीपणाची टोचणी लागलेली असते. ती खंत तो कधीही विसरू शकत नाही. मनमोहन स्वतःला माफ करू शकत नाही आणि तो संन्यासी बनतो. अनेक वर्षांनी अखेर भारत देश स्वतंत्र होतो. रेडिओवर बातमी लागते. त्यात अनेकांना वीरमरण येतं. त्यातलाच एक जो सैनिक शहीद झाला त्याचं नाव अभिमानानं सांगितलं जातं अिाण त्या वेळी संन्यासी झालेला सच्चिदानंद यांच्या मनातला अपराधीभाव नष्ट होतो. कारण तो वीर सैनिक त्यांचा लहान भाऊ गुणी असतो अिाण सच्चिदानंद म्हणजे कधी काळी असलेला मनमोहन असतो. एका किशारोवस्थेत असलेल्या मनमोहन नावाच्या मुलाचं आयुष्य कसंकसं बदलत जातं, त्याचे विचार कसे बदलत जातात आणि त्याला कुठे घेऊन जातात यावर अतिशय सुरेखरीतीनं फणीश्वरनाथ रेणू यांनी एका किशोरवयीन मुलाचं भावविश्व रंगवलं आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या चित्रपटाला मैलाचा दगड मानलं जातं, जगभरात जो चित्रपट प्रशंसला गेला त्याचं नाव होतं तीसरी कसम. राजकपूर आणि वहिदा रहेमान यांच्या अत्युत्कृष्ट भूमिका असलेल्या या चित्रपटाचे निर्माते होते त्या वेळचे विख्यात कवी/गीतकार शैलेंद्र आणि दिग्दर्शक होते बासू भट्टाचार्य! आणि हा चित्रपट ज्या ‘मारे गये गुलफाम’ कथेवर बेतलेला होता, ती कथा लिहिली होती फणीश्वरनाथ यांनी! एका प्रवासातून यातली कहाणी पुढे सरकत जाते आणि एका साध्यासुध्या माणसाच्या आयुष्यातलं नाट्य प्रेक्षकाला अस्वस्थ करून सोडतं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय आणि राष्ट्रपती पुरस्कार यांनी गौरवलं गेलं.
11 एप्रिल 1977 या दिवशी पैप्टिक अल्सर या आजारानं फणीश्वरनाथ रेणू यांचं निधन झालं आणि आणखी एक प्रेमचंद आपल्यामधून कायमचा दूर निघून गेला!
दीपा देशमुख
Add new comment